पुणे शहरातील खरेदीची उत्तम ठिकाणे.

जाणून घ्या पुणे शहरातील खरेदीची प्रसिद्ध ठिकाणे जी स्थानिक लोकांबरोबरच पर्यटकांमध्ये सुद्धा अतिशय लोकप्रिय आहेत.

‘पुणे तिथे काय उणे?’ असे अगदी अभिमानाने म्हटले जाते. आणि ते खरंच आहे, नाही का?

आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणारे पुणे शहर म्हणजे नव्या जुन्याचा एक अगदी सुंदर असा संगम आहे. उत्तम शिक्षणाचे माहेरघर असणारे पुणे म्हणजे आधुनिक कॉस्मोपॉलिटन जीवनशैली आणि परंपरागत सांस्कृतिक जीवनशैली यांचा उत्तम मिलाफ आहे.

पुण्यात शिवाजी महाराज, पेशवे यांचा वारसा सांगणारी ऐतिहासिक स्थळे जशी आहेत तसेच हल्लीच्या काळातील आधुनिक कॅफे आणि मनोरंजनाची ठिकाणे देखील आहेत.

खरेदीसाठी पुणे हे अगदी उत्तम शहर मानले जाते. जवळपासच्या अनेक गावातून आणि शहरातून लोक पुण्यात आवर्जून खरेदीसाठी येतात.

पुण्यात जुन्या पद्धतीच्या कपड्यांपासून ते अगदी आधुनिक पद्धतीचे कपडे सहजपणे मिळतात. कपडे, दागिने, अँटिक वस्तू, गृहोपयोगी वस्तू, सजावटीसाठी उपयोगी अशा शोभेच्या वस्तू असे सर्व प्रकार पुण्यामध्ये उत्तमोत्तम दुकानांमध्ये तर मिळतातच परंतु अशा वस्तूंचे सर्वांच्या खिशाला परवडेल असे रस्त्यावरील मार्केट देखील पुण्यात प्रसिद्ध आहे.

आज आपण पुण्यातील खरेदीसाठी उत्तम असणारी प्रसिद्ध ठिकाणे जाणून घेणार आहोत. पुण्यातील स्थानिक लोक असोत किंवा पर्यटक ते या ठिकाणांना आवर्जून भेट देतातच.

१. तुळशीबाग

पुण्याला जाऊन खरेदी करायची असे म्हटले की सर्वप्रथम डोळ्यासमोर येते ते नाव म्हणजे तुळशीबाग. पुण्यातील तुळशीबाग अक्षरश: जगभरात प्रसिद्ध आहे. समस्त महिला वर्गाचे अतिशय लाडके असणारे हे ठिकाण वर्षातील ३६५ दिवस गजबजलेले असते. निरनिराळे कपडे आणि दागिने यांपासून ते गृह उपयोगी वस्तू, शोभेच्या वस्तू, जुन्या पद्धतीच्या तांब्या-पितळेच्या वस्तू अशा सर्व वस्तू तुळशीबागेत मिळतात.

खरे तर तुळशीबागेत मिळत नाही असे या जगात काहीच नाही असेच गमतीने म्हटले जाते. दिवसाच्या कोणत्याही वेळी सतत गजबजलेली असणारी ही तुळशीबाग फक्त खरेदीसाठीच नव्हे तर खाण्याच्या निरनिराळ्या पदार्थांसाठी सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे. इथे मिळणारी मिसळ, बटाटे वडे, सामोसे आणि अमृततुल्य चहा यांचा आस्वाद घेऊन खरेदीमुळे आलेला थकवा कुठल्याकुठे निघून जातो. तर अशी ही पुणेकरांच्या अभिमानाचा विषय असणारी तुळशीबाग.

lulshi baug तुळशीबाग

२. फॅशन स्ट्रीट

४५० पेक्षा जास्त स्टॉल आणि दुकाने असणाऱ्या फॅशन स्ट्रीटवर निरनिराळ्या आधुनिक कपड्यांचे अक्षरश: भांडार उघडलेले दिसते. अद्ययावत फॅशनचे सर्व कपडे हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणून पुण्यातील फॅशन स्ट्रीट ओळखली जाते. सध्याच्या कॉलेजवयीन मुला मुलींमध्ये लोकप्रिय असणारे कपडे आणि फॅशन ॲक्सेसरीज मिळण्याचे हे पुण्यातील सर्वात मोठे ठिकाण आहे. सर्व प्रकारच्या वस्तू आणि कपडे इथे एकाच जागी मिळू शकतात.

इथे भरपूर स्टॉल आणि दुकाने असल्यामुळे घासाघीस करून वाजवी किमतीमध्ये वस्तू पदरात पाडून घेणे इथे सहज शक्य आहे. खिशाला परवडतील अशा किमतीमध्ये आधुनिक कपडे, चपला आणि दागिने मिळत असल्यामुळे कॉलेजला जाणारी मुले मुली इथे वारंवार खरेदीसाठी येताना दिसतात.

fashion street

३. जुना बाजार

संताजी घोरपडे मार्गावर मालधक्का चौकापाशी दर बुधवारी आणि रविवारी भरणारा हा जुना बाजार म्हणजे खरेदी करण्याचे एक निराळेच ठिकाण आहे. पहिल्यांदा येथे आलेला माणूस इथे मिळू शकणाऱ्या निरनिराळ्या वस्तूंची व्हरायटी पाहून बावचळून जाण्याची शक्यता जास्त असते.

जुन्या बाजारात शिवकालीन नाण्यांपासून ते आधुनिक यूएसबी पर्यंत काहीही मिळू शकते. इथे जुन्या अँटिक मूर्ती, कॅमेरे, रेडिओ, जुने फर्निचर, पुस्तके, घड्याळे आणि अशा असंख्य वस्तू अतिशय कमी किमतीत मिळू शकतात.

भारतीय आणि परदेशी पर्यटकांचे खरेदीचे हे एक लोकप्रिय ठिकाण आहे आणि अनेक परदेशी पर्यटक इथे वारंवार येऊन खरेदी करताना दिसतात. मात्र आपण खरेदी करत असलेल्या वस्तूची नेमकी किंमत किती असू शकेल याची थोडी जाण आपल्याला असणे आवश्यक आहे अन्यथा इथे फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही.

juna bajar

४. फर्ग्युसन कॉलेज रोड

पुणे शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज समोरच्या रस्त्यावर हे मार्केट आहे. तरुण-तरुणींमध्ये अतिशय लोकप्रिय असणारे हे मार्केट कायमच अतिशय गजबजलेले असते.

निरनिराळी हॉटेल्स आणि कॅफे, रस्त्यावर असलेले फूड जॉइंट्स, अद्ययावत कपडे आणि ॲक्सेसरीजची दुकाने, पुस्तकांची दुकाने यांनी हे मार्केट सतत फुललेले असते. खिशाला परवडतील अशा किमतीत उत्तमोत्तम वस्तू मिळवण्याचे हे एक ठिकाण आहे आणि जर तुम्ही चांगल्या पद्धतीने बार्गेनिंग करू शकत असाल तर हे मार्केट तुमच्यासाठी अगदी योग्य आहे.

fc collage road

५. हॉंगकाँग लेन

निरनिराळ्या आधुनिक फॅशन ॲक्सेसरीज मिळण्याचे पुण्यातील हॉंगकाँग लेन हे एक प्रसिद्ध ठिकाण असून या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे स्त्रियांच्या बरोबरीने पुरुषांसाठी देखील अनेकानेक उत्तम वस्तू मिळतात. त्यामुळे तरुण मुले आणि पुरुष देखील इथे खरेदीसाठी गर्दी करताना दिसतात.

परदेशी बनावटीच्या वस्तू आणि फॅशन ॲक्सेसरीज येथे सहजपणे मिळतात त्या देखील वाजवी किमतीत. लेदरच्या वेगवेगळ्या वस्तू, मण्यांपासून बनवलेल्या वस्तू, चपला, पर्सेस, घड्याळे आणि वेगवेगळे ड्रेस वाजवी किमतीत मिळण्याचे हे एक उत्तम ठिकाण आहे. हॉंगकाँग लेन अर्थातच तरुण-तरुणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.

hong-kong lane

६. लक्ष्मी रोड

अक्षरश: जगभरात प्रसिद्ध असणारा हा लक्ष्मी रोड म्हणजे पुणेकरांची खरेदीसाठीची पहिली पसंती. उत्तमोत्तम सिल्कच्या साड्या मिळणारी अनेक जुनी दुकाने येथे आहेत. पिढ्यानपिढ्या येथील स्थानिक लोक या दुकानांमधून खरेदी करतात.

लक्ष्मी रोड वर अनेक सोनारांच्या पेढ्या देखील आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या साड्या, आधुनिक कपडे, दागिने, लोकरीचे आणि रेशमी कपडे मिळण्याचे लक्ष्मी रोडवरील दुकाने हे खात्रीचे ठिकाण असते. पुणेकरांमध्ये अतिशय लोकप्रिय असणारा हा लक्ष्मी रोड वर्षभर सतत गजबजलेला असतो.

lakshmi-road

तर ही आहेत पुण्यातील अतिशय प्रसिद्ध अशी उत्तमोत्तम वस्तू खरेदी करण्याची सहा ठिकाणे.

तुम्ही जर पुण्याला पर्यटक म्हणून जाणार असाल तर या ठिकाणांना भेट देणे हा तुमचा ट्रिप मधील अविस्मरणीय अनुभव होऊ शकतो.

तुम्ही जर स्थानिक पुणेकर असाल तर या ठिकाणांना तुम्ही वारंवार भेट देत असणार हे तर गृहीतच आहे.

मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या पुण्याच्या भेटीत या ठिकाणांना नक्की भेट द्या आणि खरेदीचा आनंद मनमुराद लुटा.

तसेच पुण्यातील आणखी काही उत्तम ठिकाणे तुम्हाला माहीत असतील तर कॉमेंट मध्ये लिहून ते आम्हाला नक्की सांगा.

या लेखातील माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख शेअर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय