रेंगाळलेली कामे वेळेत पूर्ण करून तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला करा

तुम्ही एखादं काम टाळायला लागता तेंव्हा मनातली अनामिक भीती हे एक महत्त्वाचं कारण असतं.
एखादं काम पूर्ण करण्याची मनातून भीती वाटायला लागली की तुम्ही ते काम पुढे तरी ढकलता किंवा ते पूर्ण करायला टाळाटाळ करता.
असा अनुभव तुम्ही कधी ना कधीतरी घेतलेला असेलच, हो ना?
मनातली ही भीती बऱ्याच नकारात्मक विचारांना खतपाणी घालते.
या भीतीमुळे अपूर्णता किंवा आपण या कामाला लायक नाही असा अपराधी भाव मनामध्ये तयार होतो.
ही मानसिक स्थिती आता तुम्ही सहज दूर लोटू शकता.
कारण आज आम्ही तुम्हांला खूप सोप्या टीप्स देणार आहोत.
एकदा का तुम्ही तुमच्या मनस्थितीवर नियंत्रण ठेवलं, ही भीती दूर घालवली की कितीही अवघड काम असू दे, ते काम तुम्ही वेळेत आणि आरामात पूर्ण करू शकाल.
कामं अचानक रेंगाळतात, लांबतात याचं पहिलं कारण म्हणजे अपयशाची भीती.
एखादं काम, एखादी जबाबदारी म्हणून तुम्हाला दिलेलं असेल तर ती जबाबदारी तुम्ही नीट पार पडू शकाल की नाही या चिंतेचं तुमच्या मनात एक छोटसं घर तयार होतं.
एक ताण निर्माण होतो.
“बहुतेक मला हे काम नीट जमणारच नाही” ही भावना कळत नकळत तुमच्या मनात तयार होते आणि कामं रेंगाळत जातात.
पण “ठीक आहे, परफेक्ट नाही जमलं तरी मी तन-मन अर्पून माझं हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन” ही वृत्ती जर तुम्ही ठेवलीत तर भीतीवर अपयशावर तुम्ही सहज मात करू शकता.
रेंगाळलेल्या कामाला तुम्ही गती देऊ शकता पण कोणतंही काम अजिबात थांबू देऊ नका.
काम मनासारखं होत नाही याची शंका आली तरी स्वतःला कुठल्याही पद्धतीने अपराधी ठरवू नका. स्वतःलाच दोष देऊ नका.
आपल्याकडे एक म्हण आहे बघा, “बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी” म्हणजे अजून गोष्टी घडायच्या आहेत पण “त्या जर अमुक पद्धतीनं घडल्या तर ?” हा विचार भीती उत्पन्न करतो.
मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता तुमचं काम जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करा, आणि परिणामांची चिंता अजिबात करू नका.
म्हणजे मग भीती तुमच्या मनात नावाला ही उरणार नाही.
आपल्या ऑफिसमध्ये कॉलेजमध्ये,आपल्या आसपास आपण अशा अनेक व्यक्ती पाहतो ज्यांची बरीच काम रेंगाळलेली किंवा रखडलेली असतात.
पण त्यांना जर थोडासा दिलासा दिला, त्यांच्या मनातली भीती दूर केली तर त्यांच्या कामाला अगदी निश्चित वेग मिळू शकतो
लक्षात ठेवा प्रत्येक जण आपल्या मनातली ही भीती दूर करू शकतो.
भीतीवर मात केल्यामुळे तुमच्या कामाला आणि जीवनाला गती मिळते.
भीतीला हुसकावून लावायला एक पाऊल जरी तुम्ही पुढं केलं तरी तुमचं आयुष्य तणाव मुक्त होतं.
एखादं काम मनासारखं होत नसेल, त्या कामात हवी तशी प्रगती दिसत नसेल तर त्या कामाविषयी बोलायचं तुम्ही टाळता का?
त्या कामापासून, त्या विषयापासून दूर जाण्याचा प्रयत्न करता का?
असं अजिबात करू नका. धैर्यानं आलेल्या परिस्थितीला तोंड द्या.
समजा एखादं गणित सोडवायचं आहे, तर चुकण्याच्या भीतीनं तुम्ही हातात पेन आणि कागद घेतलाच नाही तर काय होईल?
समस्या “जैसे थे” अशीच राहील. याउलट उत्तर चुकलं तर चुकलं सोडवून तर बघू,! असं म्हणत प्रयत्न केलात तर, पहिला प्रयत्न चुकेल, दुसरा चुकेल, कदाचित तिसरा ही चुकेल.
पण जेंव्हा गणित व्यवस्थित सुटेल तिथं तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि त्याचा आयुष्यामध्ये तुम्हाला प्रचंड फायदा होईल.
त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याची गरज असते आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यानंतर यश मिळतंच हे तुमच्या लक्षात येईल, त्याचबरोबर भीती आणि ताण दूर होईल.
एखादं काम करताना अपयशाच्या भीतीने तुम्हाला घेरलं तर हात-पाय गाळून बसू नका, त्या कामापासून तोंडही फिरवू नका.
तर नेहमीच्या पद्धतीनं काम पूर्ण करण्याऐवजी जरा वेगळी पद्धत वापरून बघता येते का? याचा विचार करा.
मला ही गोष्ट जमणारच नाही असा विचार करण्याऐवजी मी कदाचित दुसऱ्या पद्धतीने हे काम चांगलं करू शकेन असा विचार करा.
मित्रांनो, भीती प्रत्येकाच्याच मनात असते, पण जो धाडसाने पुढे जातो, तोच जीवनात यशस्वी होतो.
भीती ही एक भावना आहे, जी वेळेवर दूर करणं म्हणजे तुमची रेंगाळलेली कामे वेळेत पूर्ण करून तुमच्या प्रगतीचा महामार्ग खुला करणं.
तुमच्या मनातल्या भीतीला पळवून लावायला जर तुम्ही काही मजेशीर उपाय केले असतील, आणि त्या उपायांचा तुम्हांला फायदा झाला असेल तर आम्हांला कमेंट मध्ये नक्की सांगा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा