स्पृहा जोशीने ऐकवलेले गदिमांचे ‘काय वाढले पानावरती’

स्पृहा जोशी संवेदनशील अभिनेत्री आणि तितकीच संवेदनशील कवियत्री. सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करताना आपल्या रसाळ वाणीनं स्पृहा, नामवंत कवींच्या वेगवेगळ्या कविता ऐकवत असते.

अशाच एका कार्यक्रमात तिने ग. दि. माडगूळकरांची “काय वाढले पानावरती” कविता ऐकवली.

गदिमा एका लग्नसमारंभात गेले होते तिथे जे पदार्थ होते त्याचं वर्णन त्यांनी आपल्या कवितेत शब्दबद्ध केले.

आताच्या लग्नात पाणीपुरी, चाट, सूप आणि पंजाबी भाज्यांची रेलचेल असते.

पण गदिमांनी वर्णन केलेले पदार्थ जर तरुणाईने पाहिले तर ती तरुणाई चाटच पडेल.

वाचा बरं त्या लग्नात कोणकोणते पदार्थ होते.

काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती ।

धवल लवण हे पुढे वाढले, मेतकूट मग पिवळे सजले

आले लोणचे बहु मुरलेले, लिंबू कागदी रसरसलेले|

काय वाढले पानावरती थाटच ऐका. पांढराशुभ्र मीठ त्याच्या जोडीला पिवळं मेतकूट आणि लिंबात मस्त मुरलेलं लोणचं नुसतं वाचूनच तोंडाला पाणी सुटलं ना?

अजुन बरेच चटपटीत पदार्थ बाकी आहेत.

किसुन आवळे मधुर केले, कृष्णाकाठचे वांगे आणले

खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले

चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनचि त्यांचे भरले

तुरट चवीच्या आवळ्यांच गोड चवीत रूपांतर केलेलं आहे आणि जेवणात वांगी असावी तर ती कृष्णाकाठचीच ! या कृष्णा काठच्या वांग्यांचं खास खमंग भरीत!

रायत्यात कुठले विदेशी अळणी पदार्थ नाही तर आंबा, काकडी, मोहरी वगैरेंचे वेगवेगळे चटके!

चटण्यांचे तर इतके प्रकार की त्यांचं जणू एक प्रकारचं संमेलनच भरलं आहे.

अगदी दोडक्याच्या सालीची, कडीपत्याची चटणी करणा-या सुगरणी महाराष्ट्रात आजही आहेत. तर मग लग्नात किती प्रकारच्या चटण्या असतील कल्पना शक्तीला ताण द्या जरा.!

मिरची खोबरे तीसह ओले, तीळ भाजुनी त्यात वाटले

कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले

वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले!

ओल्या खोबऱ्यात मिरची मध्ये तीळ घातलेले आहेत त्याचबरोबर कवठ आणि गुळाची अप्रतिम चवीची चटणी आणि टेस्टी पंचामृत ही आहे.

बरं हे सगळे पदार्थ पानात वाढत असताना या पदार्थांचे खमंग वास हवेमध्ये अशा पद्धतीने पसरले आहेत की कवीसुद्धा हे पदार्थ खाण्यासाठी अधीर झालेले आहेत.

भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या

काही वाटुन सुरेख तळल्या कोशिंबिरीच्या ओळी जमल्या

शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या

त्यानंतर नंबर आलेला आहे तो डाळींचा. काही भिजलेल्या डाळी, काही वाटलेल्या, त्याचबरोबर मोकळी डाळ, तर तळलेल्या डाळी सुद्धा या पानात वाढणार आहेत.

काकडीची शुभ्र कोशिंबीर, टोमॅटोची कोशिंबीर, मुळ्याची कोशिंबीर असा खास पान सजवणारा मेन्यू आहे.

केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या

एकरुप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी

रानकारली वांगी काळी, सुरण तोंडली आणि पडवळी

त्यानंतर पंगतीत एंट्री झालीय ती फळांची! केळीच्या गोल गोल चकत्या, पेरुच्या फोडी त्यात दही त्यावर किंचित मिरेपूड घालून पानात ऐटीत सजतील.

आता पान वाढताना उजवीकडचे पदार्थ म्हणजे भाज्या ही आलेल्या आहेत.

कोणत्या आहेत या भाज्या?

अळु, घोसाळी आहेत. कृष्णा काठच्या वांग्याचं भरीत झालं होतं, आता भाजीसाठी काळी वांगी, तसंच कडूजार कारली त्याचबरोबर आहेत सुरण तोंडली आणि पडवळ या फळभाज्या.

चुकाचाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी

फणस कोवळा हिरवी केळी, काजुगरांची गोडी निराळी

दुधी भोपळा आणि रताळी, किती प्रकारे वेगवेगळी

फळभाज्या झाल्या आता वेळ झाली पालेभाज्यांची. त्यात आहेत चुका, चाकवत, कोवळी मेथी, चंदनबटवा आणि भेंडी पण आहे.

हिरव्या कोवळ्या फणसाची, भरपूर ओलं खोबरं घालून केली जाणारी भाजी, हिरव्या केळ्यांची भाजी, ओल्या काजुची उसळ, दुधी भोपळा आणि रताळ्याची भाजी, एकूणच वेगवेगळ्या पद्धतीने रांधलेल्या भाज्यांनी आता पंगत सजली आहे.

फेण्या, पापड्या आणि सांडगे, कुणी आणुनी वाढी वेगे।

गव्हल्या नकुल्या धवल मालत्या, खिरी तयांच्या शोभत होत्या

शेवायाच्या खिरी वाटल्या, आमट्यांनी मग वाट्या भरल्या

आता वळूया सांडगे पापडांकडे, त्याच बरोबर लग्नाच्या तयारीसाठी घरात जमलेल्या महिलांनी हातांनी तयार केलेल्या गव्हल्या, नकुल्या, पांढऱ्या शुभ्र मालत्या म्हणजे आकार दिलेल्या बारीक शेवया आता खिरी बनून वाटयात विराजमान झालेल्या आहेत.

त्याच्या शेजारी तुरीची आमटीची वाटी आहे.

सार गोडसे रातंब्याचे, भरले प्याले मधुर कढीचे।

कणीदार बहू तूप सुगंधी, भात वाढण्या थोडा अवधी….

तुरीच्या आमटीबरोबर कोकमचं सार आणि ताकाची कढी ही आहे. कणीदार तूपाचा वास आसमंतात दरवळतो आहे, पान वाढून तयार आहे, आता मंडळी पानावर बसली की गरम गरम पांढरा भात त्यावर दाट वरण आणि कणीदार तूपाची धार धरली जाईल

श्लोकांची आवर्तन झडतील. आग्रहाच्या फैरी झडतील.

वरणभातानंतर मसालेभात त्यानंतर पुरी, पोळी येतील त्यामुळं त्यांचा या कवितेत उल्लेख नाही!

कारण इतके पदार्थ वाढल्यानंतर कवी कविता लिहित बसेल की जेवणावर आडवा हात मारेल ?

अबब! केव्हढे हे पदार्थ !! इतके पदार्थ, खाणारा ही चांगला खवैय्या असला पाहिजे.

पाहुणा तृप्त मनानं आणि तुडुंब पोटाने लग्न समारंभातून घरी जाईल !

लग्नाच्या पंगतीतल्या या रूचकर पदार्थांची मेजवानी वाचताना, सिल्क साड्यांची सळसळ, विधीची गडबड, जमलेली गप्पाष्टकं यांचा ही आपल्याला अनुभव घेता येतो.

एक गंमत लक्षात आली का ? कडू, गोड, तुरट, खारट, तिखट, आंबट या सहा रसांनी युक्त असं हे जेवणाचं पान आहे.

नाना फडणवीसांनी पेशवाई काळात पदार्थ वाढण्याचा क्रम घालून दिला होता.

आधी लिंबू मीठ, मग डाव्या हाताला लोणची, चटणी , कोशिंबीर, मग उजव्या बाजूला वाढल्या जाणाऱ्या भाज्या, मग सांडगे पापड, मग पंच पक्वान्न, आमटी आणि मंडळी पानवर बसली की वरण भात तूप.

पेशवाई थाटाच्या या पदार्थांना पाहुन भूक खवळली नाही तरच नवल.

ग. दि. माडगूळकरांनी एकेका पदार्थाच इतकं रसभरीत वर्णन केलं आहे की ऐकताना वाचताना, त्या पदार्थांचा वास घुमायला लागतो.

मंडळी यातले कोणकोणते पदार्थ तुमच्या आवडीचे आहेत ? तुमच्या प्रांतात कोणते पदार्थ लग्नाची पंगत सजवतात?

हे आम्हांला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय