कटींग, पाटली व हिप्पीकट

cutting

लहापणी न्हावी काकाकडे गेलो की काका खुर्चीवर पाटली टाकायचे पाटलीवर बसने मला फार कमीपणाचे वाटायचे, आपण उगीच लहान असल्याची जाणीव होत असे. एकदा ती कसरत काकाची सुरु झाली की बस, मधे मधे मान आपण सरळ करायची तर काका दुसऱ्या बाजूला एकदम दाबायाचे. समजा त्याच बाजूला ठेवावी तर परत दुसऱ्या बाजूला दाबल्या जायची.

नेमके कुठल्या बाजूला डोके ठेवावे हा प्रश्न मनात यायचा अवकाश की समोर एकदम झटक्यान डोकेे दाबल्या जाई व मागच्या बाजूच्या केसावर आक्रमण होई. बऱ्याचवेळा डोक्याला वाटेल तसे झटके देवून झाले की मग कैचीचे काम संपे, मग कैचिची जागा वस्तारा घेत असे. एकदा हा वस्तारा हातात आला की परत डोक्याला वाटेल तसे वाकवून होई कधी या वस्तऱ्यातुन एकदाची मुक्ती होते असे वाटायचे. कसे बसे एकदा हे वस्तरा पुराण संपले की मग सर्व शरीर झटकल्या जाई.

मग ते केसाने माखलेले शरीर घरी आई च्या तावडीत जायचे. कटिंग करून काय आलो फार गुन्हा करून आल्यासारखे वाटायचे, या सर्व विधिंविषयी मला काही आक्षेप नव्हता, होता तो फक्त त्या खुर्चीवर पाटली टाकण्याचा. कधी एकदाचे आपण मोठे होतो व थेट खुर्चीवर बसून कटिंग करण्यास पात्र होतो असे सतत वाटायचे. त्या खुर्ची वर बसून मागच्या टेक्यावर आपले डोके टेकवायचं व कटिंग वाल्याने आपल्याला विचारत विचारत केस कापावे हे माझे तेव्हाचे स्वप्न होते.

त्यावेळी मना सारखी हेयर कट ठेवण्याचे स्वातंत्र नव्हते. मी साधारण तीसरी मधे असेल, आम्ही त्यावेळी परतवाडाला राहत होतो, हिप्पी कट ची फैशन आली होती. देव आनंद च्या हरे कृष्ण हरे राम चा तो काळ होता. अमिताभ सारखे काही स्टार्स हिप्पी कट ठेवायचे. हिप्पी ठेवली तर पाटलीवर बसून कटींग करण्याच्या मानहानीला तेवढ़ीच अनुकम्पा मिळू शकेल असे मला वाटायचे. माझा मोठा भाऊ त्याकाळी महाविद्यालयात होता त्यामुळे दादाला असलेले स्वातंत्र आपल्यालाही मिळावे असे मला वाटायचे.

शिवाय हिप्पी कट ठेवली की आपण या तरुण मुलांच्या गँग मधे हक्काने शामील होऊ असा माझा ग्रह होता. बाबा पोलिस विभागात त्यामुळे त्यांचा लांब केस ठेवण्यास भारी विरोध होता. मोठा भाऊ महाविद्यालयात गेल्या मुळे व तो अमरावतीला असल्यामुळे असेल कदाचित परंतु त्याला मात्र बाबांनी विरोध केला नव्हता. एकदा घरी बरेच आंदोलन केले, रडा-रडी फुगणे वैगरे प्रकार केले, तात्पुरता अन्नत्याग केला. परंतू बाबाला काही मागणी पटत नव्हती, शेवटी आई ने मध्यस्थी केली व बाबा हिप्पी कट साठी एकदाचे राजी झाले.

त्या दिवशी मी कटिंग साठी पहिल्यांदा एवढा खुश होतो. आईचे तर सर्व लहान सहान कामे मी पटापट केली, जशी शेजारच्या काकूचे उसने आनलेले जिन्नस परत करने इत्यादी. त्या दिवशी कटींग वाल्या काकाच्या पाटलीवर मी खुशीत जाऊन बसलो. त्यांना वाटेल त्या दिशेने वाटेल तसे डोके दाबू दिले एकदम सहकार्य केले. एकदाची हिप्पी कट झाली. कटिंग करून येताना माझी देह बोली पार बदलून गेली होती, आता आपल्याला मोठ्या मुलांच्या गोष्टीत थेट सहभागी होता येइल असे वाटू लागले.

मानेवर व कानावर येणाऱ्या त्या गुंडाळा झालेल्या केसांचे मला भारी कौतुक वाटत होते. त्या दिवशी काकाने पहिल्यांदाच डोक्याच्या मागे आरसा धरून माझे गोल गोल केलेले केस दाखवले. (मी पूर्ण सहकार्य केल्यामुळे असेल कदाचित) कान व मानेवर आलेले ते केस मिरवत मी माझ्याच तोऱ्यात होतो, परंतु माझा मानभंग दुसऱ्याच दिवशी झाला. मोठ्या मुलांनी एका खेळात मला कच्चा नींबू केले. कच्चा नींबू हा प्रकार फार विचित्र, बिन खात्याच्या मंत्र्या सारखा. खेळात स्थान तर मीळे परंतू आपल्या सहभागाची फारशी दखल घेतल्या जात नाही. लहान मुलांनी घरी जाउन आईचे डोके खाऊ नये व आपल्या खेळात काही विघ्न येवू नये म्हणून मोठ्या मुलांनी केलिली सोय म्हणजे कच्चा नींबू होय. याशिवाय बारीक चिरीक कामे करण्यासाठी ही बारकी पोर कामी येत होती. अलीकडे सरकार स्थापन्यात देखील या तत्वाची मदत होते.

हिप्पी कटचा मोठ्या होण्यात फरसा उपयोग दिसत नव्हता. शाळेत मास्तरच्या हातात सहजच केस लागत होते त्यामुळे मिळू नये त्या गुन्ह्याची सुद्धा शिक्षा मिळू लागली होती. लांब केस असणारी मूलं बदमाशी करण्यात आघाडीवर असतात असा बहुतेकांचा समज असतो. जसे चश्मा असणारी मूलं हुशार असतात असे बऱ्याच लोकांना वाटते पुढे दहावीत मलाच चश्मा लागला व हा गोड गैरसमज माझ्यासह इतरांचा देखील दूर झाला. हिप्पीकटचे फायदे तर काही दिसत नव्हते परंतु तोटे जागोजागी जाणवत होते. मित्रांचे आई वडील वेगळ्याच नजरने पाहू लागले, शाळेत गुरूजीला जसे शस्त्र मिळाले होते तसेच घरी बाबालाही त्यांचा राग शांत करण्यास “केस” हाती लागली होती, तसेही त्यांच्या मनाविरुद्धच मी कटिंग केली होती. या नंतर मात्र मी हिप्पी कट केली नाही एवढेच काय तर बरेच वर्ष म्हणजे (खरच मोठे होई पर्यंत) लांब केस सुध्दा ठेवले नाही. आज मुलाला कटिंग साठी घेवून गेलो कटिंगवाल्याने मुलाला पाटलीवर बसवले, मी मात्र मुलाकडे उगीच सहानभुतीने पाहू लागलो.

वाचण्यासारखे आणखी काही:

Wedding Photography – एक गम्मत
“माफ कर मामा”
आम्हा घरी धन…

Previous articleआयकरासंबंधी नऊ महत्त्वाचे बदल
Next articleघर थकलेले सन्यासी
लेखक अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर असून त्यांनी अभियांत्रिकी मधून डॉक्टरेट केली आहे. ते १९ वर्षांपासून व्यवस्थापन व अभियांत्रिकी क्षेत्रात आध्यापनाचे काम करत आहेत. त्यांचे अनेक शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांना वाचन, संगीत व लिखाणाची आवड असून त्यांचे मराठी ललित साहित्य व कवितांवर मनस्वी प्रेम आहे. निव्वळ निर्मळ आनंद प्राप्त करण्याचा मार्ग म्हणून ते साहित्या कडे पाहतात व याच हेतूने लिहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.