शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक

ही मी सुदर्शन केमिकल्स (पुणे) मध्ये नोकरीला असतानाची गोष्ट….तेंव्हा मी कंपनीतील सर्व कर्मचारी व अधिका-यांच्या पगारावर भराव्या लागणा-या आयकराचे हिशोब ठेवण्याचे काम करीत असे. सहाजिकच, भरावा लागणारा टॅक्स वाचविणेकरिता करावयाच्या गुंतवणुकीकरिता असे अधिकारी नेहमीच माझा सल्ला विचारीत असत.

तो 1999 सालचा मार्च महिना होता. मी आमच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे कर्मचा-यांच्या गुंतवणुकीचे अंतिम तपशील घ्यायला सुरवात केली होती. आजही ‘टॅक्स वाचवणे म्हणजे NSC, PPF आणि LIC मघ्ये गुंतवणुक करणे’ या पलिकडे काही पर्याय असतात याची जाणिवही बहुतेकांना नसते, तेव्हा तर ती नव्हतीच नव्हती.माझ्या मतेया अशा करबचतीकरिता असलेलात्यावेळचा (वआजचाही) सर्वोत्तम पर्यायनिःसंशयपणेELSS हाआहे,मात्र त्यात गुंतवणुक करणारा अक्षरशः एकही अधिकारी मला सापडला नव्हता….काही नवख्या वाचकांसाठी येथे सांगणे अप्रस्तुत ठरणार नाही की ELSS म्हणजे ‘Equity Linked Savings Scheme’ होय, टॅक्स वाचविण्यासाठीच्या या प्रकारांत केलेली सर्वच्या सर्व, म्हणजे 100% गुंतवणुक ही या योजनेच्या नावात सुचविल्याप्रमाणेच शेअर्स मधे वर्ग करण्यात येते… तेंव्हा ‘कोठारी पायोनियर’ ह्या भारतातील पहिल्या खासगी म्युच्यअल फडाने (आजचा फ्रॅकलीन टेंम्पल्ट्न म्युचुअल फंड) आपल्या ‘टॅक्सशिल्ड-99′ या ELSS योजनेअंतर्गत नव्याने युनिटस विकायला काढले होते. या नव्या ELSS च्या बरोबरीनेच याच फंडाची ‘कोठारी पायोनियर पेंन्शन फंड’ नावाची एक दुसरी करबचत योजनाही आधीपासुन बाजारात होती. ही त्याकाळची कर वाचविण्याकरिता उपलब्ध असलेली एकमेव ‘संतुलीत (Balanced) योजना होती, ज्यातील जमा रक्कमेचा थोडासा भाग (ELSS मधे गुंतविला जातो तसा) शेअर्स मध्ये, व उर्वरित सर्व भाग शेअर बाजाराशी निगडित नसलेल्या रोख्यांमधे गुंतविला जाणार होता.

माझा एक जवळचा सहकारी देवेंद्र याला टॅक्स वाचविणेकरिता रु.10,000 गुंतवावे लागणार होते. मी त्याच्याशी या बाबत चर्चा करताना ‘कुठ्ल्याही परिस्थितीत त्याने NSC, PPF, LIC अशा ‘पारंपारिक’ योजनांत पैसे गुंतवु नये’ असा मित्रत्वाचा आग्रह केला. मग उरल्या वर सांगितलेल्या दोन योजना… मी त्या दोन्ही योजना त्याला समजावुन सांगितल्या. नेमाने व्याजदर व परताव्याची हमी देणा-या सरकारी योजनांत निष्ठेने पैसे गुंतविणारा हा माझा मध्यमवर्गीय मित्र या दोन्ही योजना शेअर बाजाराशी निगडित आहेत आणि व्याजाचीच काय पण मुद्दलाची ही हमी त्यात दिली जात नाही हे ऐकुन भलताच नाराज झाला होता. शेवटी हजार शंका कुशंका काढुन देवेंद्र साहेबांनी ‘त्यातल्या त्यात कमी धोका असलेली’ योजना पेंन्शन फंड’ मध्ये पैसे ‘टाकायचे’ असे ठरवुन माझ्याकडुन त्या योजनेचा फोर्म घेतला. झाले..मी तेथुन उठलो आणि याच कामासाठी शेजारीच असलेल्या त्याच्या बॉसच्या केबिनमधे डोकावलो. आमचे व्ही. पी., श्री. क्षीरसागर साहेब कामात बीझी दिसत होते…”सर, आपल्या टॅक्सचे काय करुया??” मी दबकतच विचारले. “सांग तुच,… काय करतोस??” -साहेब ..”सर आपल्या P.F/LIC मधेच संपते लिमीट, जेमतेम 8/9 हजार गुंतवले की झाले’ -मी. ” बर, मग करुन टाक,.. चेक देतो” – माझ्याकडे बघण्याचेही कष्ट न घेता, साहेब….. माझे म्युचुअल फंडाचे घोडे पुढे दामटवण्याचा प्रयत्न करीत मी साहेबांनासुद्धा ‘टॅक्सशिल्ड वि. पेंन्शन फंड’ ही कथा सांगावयास सुरवात केलीच होती तोच, “ए बाबा… मला नको सांगु रे ह्या टेक्नीकल गोष्टी.. मी जरा कामात आहे…तुला जे हवंय ते कर , फक्त टेक्स वाचतोय ना ते बघ. हा घे चेक… आणखी सह्या कुठे ते सांग ” असे एका ‘दमात’ म्हणुन साहेबांनी घाईघाईत फॉर्मवर सही केली आणि ताबड्तोब चेक देउन मला जवळजवळ केबीन मधुन हाकललेच..मी मात्र जणु मलाच मिळालेला तो कोरा धनादेश असावा ईतक्या आनंदाने तो ELSS म्हणजेच ‘टॅक्सशिल्ड 99’ मध्ये गुंतवला.

कालांतराने मी कंपनीतुन राजिनामा दिला, श्री. क्षीरसागर साहेबांनीही स्वतःचा वेगळा व्यवसाय सुरु केला आहे, मात्र दुर्दैवाने माझा मित्र देवेंद्र एका अपघातात हे जग सोडुन निघुन गेला आहे. अगदी अलिकडे जुन्या कागदपत्रांची विल्हेवाट लावताना माझ्या ह्या आठवणींना उजाळा देणारी काही कागदपत्रे सापडली, आणि ती पहाता क्षणीच ठरवले, की ही गोष्ट आपणा वाचकांबरोबर शेअर केलीच पहिजे. सांगावयाची महत्वाची बाब म्हणजे माझ्या ह्या दोन्ही गुंतवणुकदारांचे फोलियोज अगदी आजमितीसही चालु आहेत. दरम्यानच्य काळांत योजनांची नावे काय ती फक्त बदलली आहेत

तुलनेने अधिक सुरक्षित अशा ‘फ्रॅकलीन ईंडिया पेंन्शन फंड’ (ग्रोथ प्लॅन) मध्ये गुंतविलेल्या रु.10,000च्या गुंतवणुकीचे आजचे मुल्य रु61,944.23आहे. (खरेदी दि 19/03/99, खरेदीच्यावेळी NAV रु.13.27, दि 04 /07/14 रोजीची NAV रु. 82.20)…त्याचवेळी सर्वस्वी शेअर बाजाराच्या कामगिरीवर अवलंबुन असणा-या, आणि म्हणुनच सर्वसामान्यपणे धोकादायक समजल्या जाणा-या फ्रॅकलीन ईंडिया टॅक्सशिल्ड’ (ग्रोथ प्लॅन) मध्ये गुंतविलेल्या रु.10,000च्या गुंतवणुकीचे आजचे मुल्य तब्बल रु3,32,394.70एवढे आहे.!! (खरेदी दि.31/03/99, योजनेच्या सुरवातीची NAV रु.10.00, दि.04/07/2014 रोजीची NAV रु.332.3947)… होय, ही आकडेवारी अधिकृत आणि बिनचुकआहे.

नोकरी आणि बाकीच्या व्यावसयिक अनुभवांतुन उच्चशिक्षित आणि उच्चऊत्पन्न गटांतील किमान काही शेकडा गुंतवणुकदारांचे अनुभव गाठीशी बांधल्यानंतर माझी अशी बालंबाल खात्री झालेली आहे, की विक्रम व वेताळ या आपल्या सुप्रसिद्ध कथांतील राजा विक्रमादित्याच्या मानगुटीवर बसणा-या त्या वेताळा एवढेच जुनाट, असे एक ‘धोका न पत्करण्याचे भुत’ तुमच्या माझ्या , बहुतेकांच्या मानगुटीवर पीढीजात बसलेले आहे.

मी अशा ‘पापभीरु’ गुंतवणुकदारांबरोबर नेहमी करीत असलेले एक प्रात्यक्षिक आपल्याबरोबर शेअर करतो. मी त्यांना सागतो की कागदाच्या एका बाजुला आपल्या आयुष्यातील असे प्रसंग लिहा, की ज्यात आपण धोका पत्करलात. त्या प्रसंगासमोरच अशा धोकादायक निर्णयामुळॅ झालेला फायदा/तोटाही तेथेच समोर लिहा. आता त्याच कागदावर दुस-या बाजुस असे प्रसंग लिहा, ज्यात आपण धोका पत्करायचे टाळलेत. पुन्हा फायदा/तोटा आलाच. तोही लिहा. आणि शेवटी, अगदी ढोबळ मानाने का होईना, ताळेबंद मांडा. माझा अनुभव सांगतो की ‘बहुतेकदा आपल्या धोका पत्करल्यामुळे झालेल्या नुकसानापेक्षा धोका न पत्करल्यामुळे झालेले नुकसान जास्त असते’ असे दिसून येते.

माझ्या दृढ परिचयातील एक सदगृह्स्थ 25 वर्षांपुर्वी त्यांना “एका मल्टीनॅशनल कंपनीत मिळालेली नोकरीची संधी केवळ पुण्याबाहेर जावे लागेल या भीतीपोटी नाकारली, नाहीतर आजच्या सदाशिवपेठी नोकरीपेक्षा किमान 15/20 पट पगार मिळाला असता” अशी खंत कायम व्यक्त करतात. दुसरीकडे ‘अरे, अमक्या तमक्या मोक्याच्या जागी मिळत होता प्लॉट 1967 साली… जरा आणखी जोर लावुन 500 रु. उभे करतो ना …तर आज नुसत्या भाड्यावर जगतो रे…” ही चित्तरकथा आपण एकापेक्षा जास्त वेळा ऐकलेली नाही काय ?? मी ‘धोका न पत्करण्याचीही किंमत चुकवावी लागते’ असे जे म्हणतो ते म्हणजे हेच ते.

खरे तर धोका ही जीवनातील एक अपरिहार्यता आहे ही वस्तुस्थिती मान्य न करता उलट सदैव धोका टाळण्याचा प्रयत्न करणे म्हणजे एक प्रकारे स्वतःची आत्मवंचनाच करुन घेणे आहे. कारण ते वर संगितल्या प्रमाणे नुकसानकारक असतेच आणि याही पेक्षा असा बचावात्मक पवित्रा घेणे म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसुन शेवटी ‘धोका न पत्करण्याचा धोका पत्करणे’ हेच होय.

अनेकदा ‘धोका’ म्हणजे काय’ याविषयीच्या आपल्या कल्पनाच अस्पष्ट आणि विपर्यस्त असतात. ब्लूमबर्ग चे प्रख्यात स्तंभलेखक बॅरी रिथॉल्ट्झ यांनी या बाबत सुरेख विवेचन केले आहे. त्यांच्या मते एखाद्या घटने वा प्रक्रिये मागील धोका निश्चित करताना नेहमीच वस्तुस्थितीपेक्षा अशा प्रसंगातील नाट्यमयता, ग्लॅमर अशा गोष्टींना महत्व असते. रिथॉल्ट्झ यांनी विचारलेल्या ‘मानवी मृत्युस सर्वाधिक कारणीभुत ठरणारा जीव कोणता??’ या प्रश्नाचे उत्तर देतांना बहुतकांनी शार्क, सिंह, वाघ… अशी उत्तरे दिली पण या प्रश्नाचे खरे उत्तर असलेला ‘डास’ कोणालाही आठवला नाही. अगदी अलिकडील गायब झालेल्या फ्लाईट MH 370 बाबत उठलेला गदारोळ बॅरी साहेबांच्या युक्तीवादाचीच पुष्टी करतो.त्यांनी या सार्‍याचा संबंध गुंतवणुकीशी अतिशय सहजपणाने लावला आहे. ते म्हणतात‘We fear the things that happen relatively rare .. market crash is such a thing !!!

अनेक वर्षापुर्वी एका क्रिडा समालोचकाने अ‍ॅलन बॉर्डर आणि सर व्हीव्ह रिचर्ड्स यांची तुलना करताना संगितले होते की खरेतर दोघेही तितकेच धोकादायक आहेत, फक्त व्हीव्ह अधिक घोकादायक वाटतो, कारण तो प्रतिस्पर्ध्यावर वीजेसारखा कोसळतो, उलट बॉर्डर समोरची गोलंदाजी वाळवीने एखादे झाड कणाकणाने पोखरावे तशी पोखरतो…..गुंतवणुकीच्या बाबतीत चांगले वाईट, योग्य अयोग्य ठरवताना आपलेही असेच होत असते, कधीतरी क्वचित होणारा ‘क्रॅश’ आपल्या नशीबी येवुन आपली अर्थिक वाताहत वाताहत झाली तर?? या भीतीने आपण त्या वाटेलाच जात नाही. मात्र नेमक्या त्याचवेळी ‘उगीच भानगड नको…धोका न घेतलेलाच बरा’ या भावनेने आपण अपारदर्शी, नियमबाह्य भीशी वा चिट्स, फसवी आश्वासने देणार्‍या, अधिक परतावा देणार्‍या पण मुळात मुद्दलच जोखीमीत टाकणार्‍या गुंतवणुक योजना, अनावश्यक महागड्या विमा योजना, अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह असलेल्या पतपेढ्यांसारख्या संस्था, अशा अनेक वित्तपिपासु जळवा-गोचिडांना आपल्या अंगाला लावुन घेतलेले असते. बॅरी साहेब यांचा उल्लेख ‘गुंतवणुकीतील कोलेस्ट्रॉल’ असा करतात, ज्याचा सततच्या धोक्यामुळे झालेले सर्वसामान्य गुंतवणुकदारांचे नुकसान हे प्रत्यक्ष बाजाराने दिलेल्या धोक्यामुळे झालेल्या हानीपेक्षा जास्त असते.

घराच्या बाहेर आणि घरांत कोठेही, कोणत्याही शस्त्राने वा अस्त्राने, कोणा मानवाकडुनही आणि पशूकडुनही, दिवसा वा रात्रीपैकी कधीही मृत्यु येणार नाही असा ’फुलप्रुफ’ वर मिळवुन मृत्युवर सकृतदर्शनी विजय मिळविलेला राजा हिरण्यकश्यपू असो, किंवा तक्षक दंशाच्या भीतीने सातमजली एकखांबी महालात रहाणारा राजा परिक्षित, शेवटी मारले गेलेच, या गोष्टीच ऐनवेळी आपल्या सुरक्षिततेच्या कल्पना कशा तकलादु ठरतात याचे द्योतक आहेत. गुंतवणुक विश्वातही धोका न पत्करण्याचीही किंमत, आणि अनेकदा अवास्तव किंमत मोजावी लागते. धोका कमी-जास्त प्रमाणांत का होईना, पण स्विकारण्यास पर्याय नाही, हेच खरे तर सत्य आहे. .आणि एकदा हे वास्तव मान्य करुन ‘शुन्य धोका’ विचारसरणीला तिलांजली दिली की मग ‘थोडासा धोका-अधिक लाभ’ या ट्प्यावर आपण येवुन पोहोचतो…… जो आर्थिक समृद्धीचा खर्‍या अर्थाने राजमार्ग आहे.

अर्थातच प्रत्येक लेखाप्रमाणेच येथेही मी स्पष्ट करतो की या विवेचनाचा उद्देश बाजारातील सहभागाविषयी सामान्यांच्या मनांतील भीती, गैरसमज दुर करणे हाच आहे, आणि मी कोठेही सट्टेबाजी वा अतिरकी ट्रेडिंगचा पुरस्कार करत नाही. कधीही धोका न पत्करणे हे अयोग्य आहे याचा अर्थ उठसुठ धोकेदायक हालचाली करणे असा अजिबात नव्हे. असा ‘खतरोंसे खेलनेका शौक…’ वगैरे फक्त चित्रपटांत छान असते हे ध्यानांत ठेवावयास हवे.

अलिकडच्याचझिरो डार्कथर्टी‘ या ओसामा बिन लादेन वरील गाजलेल्या हॉलिवुड्पटात एक दृष्य आहे, गुप्तहेर संघटना CIA चे वरिष्ठ अधिकारी ओसामाला मारण्याची योजना बनवत असतात. एका विशिष्ट ठिकाणी ‘तो’ लपला आहे अशी त्यांची अटकळ असते, मात्र तेथील नागरी वस्ती लक्षांत घेता खात्री झाल्याशिवाय अंतिम हल्ला करण्याचा धोका नको अशी CIA प्रमुखांची इच्छा असते. ते अधिकार्‍यांना या बाबत खोदुन खोदुन, पुन्हा पुन्हा विचारतात तेंव्हा शेवटी त्यांचे डेप्युटी उद्गारतात “We don’t deal in certainty, we deal in probability”

खरे आहे. मी ही माझ्या प्रत्येक नवीन क्लायंट्ला आवर्जुन सांगतो तेच आपणास ही सांगेन की, ‘रिस्क’ नकोच ही मानसिकता बदलुन ‘रिस्क’ कधी आणि किती घ्यायची यावर साकल्याने विचार करणेच शेवटी अधिक श्रेयस्कर ठरते. धन्यवाद.

किमान काही शेकडा गुंतवणुकदारांचे अनुभव गाठीशी बांधल्यानंतर माझी अशी बालंबाल खात्री झालेली आहे, की विक्रम व वेताळ या आपल्या सुप्रसिद्ध कथांतील राजा विक्रमादित्याच्या मानगुटीवर बसणा-या त्या वेताळा एवढेच जुनाट, असे एक ‘धोका न पत्करण्याचे भुत’ तुमच्या माझ्या , बहुतेकांच्या मानगुटीवर पीढीजात बसलेले आहे.

एका बाजुला आपल्या आयुष्यातील असे प्रसंग लिहा, की ज्यात आपण धोका पत्करलात. त्या प्रसंगासमोरच अशा धोकादायक निर्णयामुळॅ झालेला फायदा/तोटाही तेथेच समोर लिहा. आता दुस-या बाजुस असे प्रसंग लिहा ज्यात आपण धोका पत्करायचे टाळलेत. पुन्हा फायदा/तोटा आलाच, तोही लिहा. आणि शेवटी अगदी ढोबळ मानाने का होईना, ताळेबंद मांडा…..‘बहुतेकदा आपल्या धोका पत्करल्यामुळे झालेल्या नुकसानापेक्षा धोका न पत्करल्यामुळे झालेले नुकसान जास्त असते’ असे दिसून येते.

कधीतरी क्वचित होणारा ‘क्रॅश’ आपल्या नशीबी येवुन आपली अर्थिक वाताहत वाताहत झाली तर?? या भीतीने आपण त्या वाटेलाच जात नाही. मात्र नेमक्या त्याचवेळी अपारदर्शी, नियमबाह्य भीशी वा चिट्स, फसवी आश्वासने देणार्‍या, अधिक परतावा देणार्‍या पण मुळात मुद्दलच जोखीमीत टाकणार्‍या गुंतवणुक योजना, अनावश्यक महागड्या विमा योजना, अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह असलेल्या पतपेढ्यांसारख्या संस्था, अशा अनेक वित्तपिपासु जळवा-गोचिडांना आपल्या अंगाला लावुन घेतलेले असते.

लेखक – प्रसाद भागवत

लेखकाविषयी – श्री. प्रसाद भागवत हे गेली २२ वर्षे शेअर बाजारात कार्यरत असून मराठी वाचकांना शेअर मार्केटची माहिती व्हावी म्हणून विपूल लेखन करत आले आहेत.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय