आम्ही मुले घडवितो

प्रमोद नवले अमेरिका सोडून भारतात परत आलाय हे मला विक्रमकडूनच कळले. त्यानेच निरोप देऊन आम्हाला बोलावले होते. हा आमचा कॉलेज मित्र.
अतिशय हुशार. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला आणि तिथेच स्थायिक झाला.
संध्याकाळी आम्ही त्याच्या घरी गेलो. महाशय नेहमीप्रमाणे पाय पसरून बसले होते. जुनी सवय… पण यावेळी मांडीवर पुस्तकाऐवजी लॅपटॉप होता.
“काय रे अचानक मुंबईत …”?? कोपऱ्यातल्या बाटलीकडे पाहत विक्रमने डायरेक्ट विचारले.
“अमेरिकेत सध्या तंगी आलीय. भारतात नवीन काहीतरी सुरू करू… खूप स्कोप आहे इथे”. प्रमोद हसत हसत म्हणाला.
“अरे वा….! कसला बिझनेस..”? मी कुतूहलाने विचारले.
“एक सर्विस कंपनी स्थापन करतोय. एक आदर्श कर्तबगार मुलगा/मुलगी तयार करण्याची ..”?? प्रमोद हसत हसत उत्तरला.
“काय ..???. ही कसली कंपनी ..”?? आम्ही दोघे एक सुरत ओरडलो.
“अरे मित्रांनो…. हल्ली सगळीकडे पॅकेज घेतले जाते ना.. ?? लग्नाचे … बारश्याचे….. कार्यक्रमाचे….. इतकेच काय ..?? अंत्यसंस्काराचे ही.. . पण आपण त्याच्या आधीचे पॅकेज घेऊ”.
डोळे मिचकावत प्रमोद म्हणाला, “हल्ली आई वडिलांना आपल्या मुलाकडे लक्ष द्यायला वेळ कुठेय ..?? लहानपणी पाळणाघरात, नंतर इंटरनॅशनल स्कूल, मग पुढील शिक्षणासाठी कॉलेज/क्लास या सर्वांचे एकत्र पॅकेज आपण घ्यायचे….. अर्थात आपले ग्राहक अतिश्रीमंत असणार.”
“काही लक्षात येत नाही मित्रा..” मी चिडून म्हटले.
“अरे भाऊ …हल्ली बऱ्याच पालकांना सगळे काही रेडी हवे असते. आपण त्यांना त्यांच्या मुलांसाठी घरबसल्या सर्विस देऊ. म्हणजे बघ त्यांना पाळणाघर हवे… ते आपण देऊ. त्यांच्या मुलांना पाहिजे त्या शाळेत ऍडमिशन घेऊन देऊ. त्यांच्या मुलांना त्यांना काय बनवायचे आहे..? ते बनविण्याची जबाबदारी आपण घेऊ”.
“म्हणजे …??” आता विक्रमचेही कुतूहल जागे झाले.
“म्हणजे समजा….. एका आईवडिलांना वाटले आपला मुलगा सीए व्हावा तर आपली कंपनी त्या मुलाला सीए बनवायची जबाबदारी घेईल. त्यासाठी त्याच्या मनात लहानपणापासून ती आवड निर्माण करायची जबाबदारी घेईल….
एखाद्या मुलीला सैन्यात जायचे तर त्यासाठी काय काय करावे लागते ते सर्व आपली कंपनी करेल. तिला पहिल्यापासूनच सैनिकीपेशा बद्दल आवड निर्माण करायची जबाबदारी ही घेईल…म्हणजे कसे..?
त्यासाठी जे काही करायचे ते आपण करू. वेगवेगळ्या शाळा, कॉलेज, हॉस्पिटल बरोबर आपण कॉन्ट्रॅक्ट करू…..बोलता बोलता प्रमोदला दम लागला. तो पाणी पिण्यासाठी थांबला.”
तीच वेळ साधून विक्रम म्हणाला “अरे.. हे शक्य आहे का… ?”
“का शक्य नाही …??” प्रमोद जोरात म्हणाला
“तुम्ही मुलांना पाळणाघरात ठेवत नाहीत का.. ??? तुम्ही त्यांना पाचगणीला पाठवीत नाहीत का शिकायला.. ?? तुम्ही त्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवीत नाही का.. ?? फरक इतकाच आहे हे सर्व करण्यासाठी आई वडिलांना धावाधाव करावी लागते.
त्यांना आपली मुले मोठी कर्तबगार बनवी असे वाटते पण त्यासाठी योग्य माहिती आणि वेळ त्यांच्याकडे नसतो. परिणामतः त्यांच्यात आणि मुलांच्यात समन्वय साधला जात नाही. हेच काम आपण करणार फक्त भरमसाठ पैसे घेऊन.
पालक कायदेशीर कागदपत्र बनवून आपल्या मुलांच्या भवितव्याबाबतीत निर्धास्त राहणार. नाहीतरी आज आय. आय. टी. च्या ऍडमिशन साठी मुलांची नववी पासूनच तयारी करून घेतात त्यासाठी पॅकेज आहेतच ना???” प्रमोद हसत म्हणाला.
मी गपचूप उठलो आणि कोपऱ्यात ठेवलेली बॉटल उचलून विक्रमला खूण केली.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा