आयुर्वेद, योगशास्त्र आणि निसर्गोपचार करून डोळे तेजस्वी कसे ठेवावे?

डोळ्यांचे आजार व निगा

डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे…

डोळे हे जुलमी गडे….

डोळ्यांचे वर्णन करणारी अशी कित्येक गीतं आपण ऐकलेली आहेत.

खरंच डोळे नसतील तर जगणं खूप कठीण आहे. पाणीदार, सुंदर डोळे म्हणजे आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा!!!

मानवाला मिळालेली ही नैसर्गिक देणगीच आहे. पण आपण डोळ्यांची नीट काळजी घेतो का?

आजूबाजूला पाहिलं तर दिसेल की लहान वयातच डोळ्यांचे विकार खूप वाढले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे सततचा मोबाईलचा वापर.

हल्ली लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वजण मोबाइल फोन, कॉम्प्युटर, टॅब, लॅपटॉप वापरतात. आधुनिक जगात जवळपास सर्व व्यवहार हे गॅजेट्स वापरूनच केले जातात.

ऑनलाईन बॅंकिंग, तिकीट बुकींग, शॉपिंग ते फूड डिलीव्हरी सर्व काही मोबाईलच्या एका क्लिकवर हजर आहे.

याशिवाय सोशल मिडिया, त्यावरचे अनेक ग्रुप, सततचे मेसेज, ऑफिसचं काम यामुळे दिवसातले कितीतरी तास डोळे स्क्रीन वर खिळलेले असतात.

याशिवाय उरलेल्या वेळात मनोरंजन म्हणून जे काही आपण पहातो ते सुद्धा याच स्क्रीन वर. अगदी वाचन सुद्धा पुस्तकां ऐवजी ई बुक्सचं !!

इतकंच काय रोजचं वर्तमानपत्र सुद्धा मोबाईल वर वाचतो. मग हळूहळू डोळ्यांवर ताण येतो आणि अनेक लक्षणे दिसून येतात.

डोळ्यांवर अतिरिक्त ताण आल्याने दिसणारी लक्षणे

 • डोळ्यातून पाणी येणे
 • खाज येणे
 • लालसरपणा
 • अंधुक दिसणे
 • पापण्या जड होणे
 • डोळे कोरडे पडणे
 • पुरळ येणे
 • डोळ्यांना थकवा जाणवणे
 • लवकर चष्मा लागणे
 • चष्म्याचा नंबर भराभर वाढणे
 • तिरळेपणा
 • डोकेदुखी
 • एकाग्रतेचा अभाव

यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

स्वत:च्या मनाने कधीच उपचार करु नयेत. यामुळे समस्या अधिक गंभीर होऊ शकते. डॉक्टरांच्या सूचना व्यवस्थित पाळाव्यात.

औषधे वेळेवर घेणे आवश्यक आहे. ठराविक वेळ चष्मा लावायला सांगितला असेल तर नक्कीच लावावा अन्यथा डोळ्यावरचा ताण वाढत जातो.

याबरोबरच मुळात ही अशी अवस्था का झाली याचा विचार प्रामाणिकपणे केला पाहिजे.

यासाठी आयपॅड वापरावेत किंवा आपल्या दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासून गरम करावेत आणि अलगदपणे हात डोळ्यांवर ठेवून हलकेच शेक द्यावा.

स्क्रीन आणि डोळे यातील अंतर योग्य असावे.

अपुऱ्या प्रकाशात किंवा अंधारात स्क्रीन कडे टक लावून पाहू नये.

यामुळे डोळ्यांवर खूप ताण येतो. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप ठेवलेल्या ठिकाणी योग्य तेवढी लाईटची सोय असावी.

चष्म्या लागलेला असेल तर न विसरता लावावा.

कामाव्यतिरिक्त आपण किती वेळ मोबाईलवर वाया घालवतो याचे स्वतःच परीक्षण करावे. आणि निश्चय करून हा वेळ कमी करावा. याला एक सुंदर नाव म्हणजे डिजिटल उपवास !!!

काय आहे डिजिटल उपवास?

जास्त प्रमाणात जेवण झालं की अपचन, अजीर्ण असा त्रास जाणवतो. मग उपवास करून पोटाला आराम दिला की आपोआपच हलकेपणा वाटतो.

अगदी असंच ही सर्व गॅजेट्स जरुरी पेक्षा जास्त वेळ वापरल्याने होतं. म्हणून जाणीवपूर्वक स्क्रीन टाईम कमी करणे म्हणजे डिजिटल उपवास.

रात्री झोपण्यापूर्वी एक तास कोणत्याही स्क्रीन पासून कटाक्षाने दूर रहावे.

लहान मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य

कोव्हीड काळामध्ये शाळा, क्लास सर्व ऑनलाईन स्वरूपात सुरू झाले. त्यानंतर लहान मुलांच्या डोळ्यांचे प्रश्न खूप जास्त वाढले. याचे एक कारण म्हणजे अभ्यासाच्या निमित्ताने मोबाईल, टॅब हातात आले.

नेमके याच काळात लॉकडाऊन असल्याने मुले घरातच अडकून पडली होती. यानंतर मुलांमध्ये डिजिटल व्यसन खूप जास्त प्रमाणात वाढल्याचे आढळते.

यासाठी पालकांनी जागरूकपणे मुलांना या सवयींपासून दूर ठेवले पाहिजे.

त्यासाठी त्यांचे मन रमेल असे इतर पर्याय मुलांसमोर ठेवले पाहिजेत. आणि मुले पालकांचे अनुकरण करत असतात त्यामुळे त्यांना जे नियम लावणार असू ते स्वतः नीट पाळावेत.

मुलांवर सक्ती करण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधावा. संभाव्य धोके, होणारे नुकसान यांची जाणीव करून द्यावी.

आयुर्वेद आणि डोळ्यांचे आरोग्य आयुर्वेद शास्त्रानुसार आपले शरीर पंचमहाभूतांचे बनलेले आहे.

पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते होत. डोळा हे ज्ञानेंद्रिय आहे आणि तेजतत्त्व डोळ्यांच्या ठिकाणी असते.

आलोचक पित्त चक्षु इंद्रिय म्हणजे डोळ्यांमध्ये असून त्यामुळे दृष्टीज्ञान होते.

आयुर्वेदानुसार डोळ्यांच्या आरोग्यासाठी अंजन म्हणजे एक प्रकारचे औषधी काजळ लावणे हितकर आहे.

व्यवहारातही आपण डोळ्यात अंजन घालणे हा वाक्प्रचार वापरतो !!!

याशिवाय डोळ्यांवर थंड पाणी, गुलाबजल यांची पट्टी ठेवावी. काकडीचे काप डोळ्यांवर ठेवले तर थंडावा मिळतो.

त्रिफळा काढ्याने नेत्रधावन म्हणजे डोळे धुणे. त्रिफळा जंतुनाशक आणि डोळ्यांची शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.

नेत्रबस्ती म्हणजे डोळ्यांभोवती उडदाच्या पिठाची खोळ करुन त्यात विशिष्ट प्रकारचे औषधी तेल किंवा तूप भरून त्याद्वारे उपचार करणे. हे वैद्यकीय देखरेखीखाली करावे.

डोळ्यांसाठी हितकर आहार घटक व्हिटॅमिन A युक्त आहार गाजर, पपई, पालक, लेट्यूस, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, रताळे, पपनस, बेल पेपर म्हणजे पिवळी सिमला मिरची, याशिवाय लिव्हर व ट्यूना फिश हे खाल्ले असता डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

आयुर्वेदानुसार शेवगा डोळ्यांसाठी हितकर आहे. शेवग्याच्या शेंगा, पानांची आणि फुलांची भाजी किंवा पावडर स्वरूपात विविध पदार्थांमध्ये वापर करावा.

आवळा नियमितपणे सेवन करावा. गाईचे तूप आहारात असावे तसेच झोपण्यापूर्वी पापण्यांवर हलक्या हाताने तुपाचे बोट फिरवावे.

योगशास्त्र आणि डोळ्यांचे आरोग्य योगशास्त्रातील त्राटक ही क्रिया डोळ्यांचे तेज वाढवते. यात नजर एकटक ठेवून निरांजन किंवा समईच्या ज्योती वर ध्यान केले जाते. पण हे अनुभवी मार्गदर्शकाची मदत घेऊन करावे.

त्राटक- मेडिटेशनच्या एक प्रकार : त्राटक कसे करावे

नियमितपणे सूर्यनमस्कार केल्याने डोळे तेजस्वी होतात.

निसर्गोपचार पद्धतीत हिरव्या गवतावर अनवाणी फिरल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

भारतीय संस्कृतीत शास्त्रानुसार सूर्योदयाच्या वेळी उगवत्या सूर्याला अर्घ्य आणि सूर्यास्ताच्या वेळी संध्या करणे असा नियम आहे.

याचा संबंध डोळ्यांचे आरोग्य सुधारण्याशी आहे.

डोळा हा नाजूक अवयव आहे. त्याची योग्य प्रकारे निगा राखणे आवश्यक आहे. म्हणून “डोळसपणे” आपल्या डोळ्यांची काळजी घ्यावी.

स्वच्छ, टवटवीत आणि पांढरेशुभ्र डोळे हवे असतील तर या टिप्स फॉलो करा

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!