आनंदी आणि अर्थपूर्ण जगण्यासाठी सोपे १२ नियम

प्रेरणादायी विचार लेख

आपण किती जगतो यापेक्षा महत्त्वाचं आहे आपण कसं जगतो?

जर आपलं आयुष्य समाधानी, आनंदी आणि अर्थपूर्ण असलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर हे साधे, सोपे १२ नियम पाळा आणि बघा जगण्यात किती सुंदर बदल होतात!!!

मार्क चेर्नॉफ यांच्या लेखाचा हा भावानुवाद खास मनाचेTalks च्या वाचकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत.

मार्क यांची आजी, झेल्डा, हिला नव्वद वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. आयुष्याच्या उत्तरार्धात तिने एक सुंदर हस्तलिखित डायरी तयार केली होती. तिला भावणाऱ्या अनेक कविता, सुविचार, तिच्या मनात येणारे विचार किंवा सहज सुचणाऱ्या नवीन कल्पना ती या डायरीत लिहून ठेवत असे.

ही होती तिची “इन्स्पिरेशन डायरी” खरंच नावाप्रमाणेच प्रेरणा देणारी !!!

आपल्या मृत्यूपूर्वी काही वर्षे ही डायरी तिने मार्क यांना सुपूर्द केली. मार्क लहान असताना या डायरी मधलं लिखाण ती त्याला वाचून दाखवत असे. या विचारांचा त्याच्या बालमनावर खूप प्रभाव होता.

आजीचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, तिचे साधे, सुंदर आणि सुज्ञ विचार यामुळे माणूस म्हणून मार्कची जडणघडण चांगल्या प्रकारे झाली. आपले जगणे सुंदर करणारे हे विचार सर्वांना सांगावेत यासाठी आपल्या प्रिय आजीच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी हे विचार वाचकांसाठी मांडले आहेत.

बघूया कोणते आहेत हे जगणे अर्थपूर्ण करणारे १२ नियम

१. भूतकाळ मागे टाका, भविष्याकडे पहा

घडून गेलेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही. म्हणून त्यावर विचार करून वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण भविष्यात अधिक चांगले काम कसे करू शकतो यावर लक्ष द्या.

जरी आताचा काळ कठीण असला तरी तुम्ही सतत प्रयत्न करत असल्याने भविष्यात निश्चितच काही तरी चांगले घडेल. आज माझ्या आवाक्यात कोणत्या गोष्टी आहेत याचा विचार करा आणि त्यावर काम करत रहा. मार्ग नक्कीच सापडत जातील.

२. आज, आता, या क्षणी हा मंत्र जपा

एक ना धड भाराभर चिंध्या असं न करता, आजच्या दिवशी करायचं काम कोणतं हे ठरवा.

त्यावर संपूर्ण लक्ष द्या. आणि अशाच रितीने दररोज एक एक काम व्यवस्थित पूर्ण करा. म्हणजे विचलित न होता तुम्ही ध्येय गाठू शकता.

अशा पद्धतीने विचार केला तर तुमच्या आयुष्यात गुंता होणार नाही आणि अगदी साधं, सोपं जगणं शक्य होईल.

३. जसे आहात तसेच जगाला दाखवा

इतरांचा जास्त विचार करून उगाच कुढत राहू नका.

४. तुमच्यात बदल झाला आहे हे मान्य करा

सतत बदल होत रहाणे हीच जीवनाची प्रवृत्ती असते. आपले वय, अनुभव, बदलणारी परिस्थिती यानुसार आपण बदलत असतो.

आणि तसे होणे अपेक्षितच आहे.

त्यामुळे तू आता पूर्वीसारखी राहिली नाहीस असे कोणी म्हणाले तर वाईट वाटून घेऊ नका. हसून उत्तर द्या की,” खरंच आहे!

मी पूर्वीपेक्षा आता अनुभवी, शहाणी आणि स्ट्रॉंग झाले आहे. आणि याचा मला खूप अभिमान आहे.”

५. घडणाऱ्या वाईट गोष्टी तुमच्या फायद्याच्या

तुमच्यासोबत आज एखादी वाईट गोष्ट घडली तर आज तुम्हाला नक्कीच वाईट वाटेल आणि ते साहजिकच आहे. पण बारकाईने विचार करा.

आपले काय चुकले? या गोष्टीवरून मला काय समजले? भविष्यात असे घडू नये यासाठी मी कोणती काळजी घेऊ?

हे प्रश्न स्वतःला विचारा. प्रामाणिकपणे त्यांची उत्तरे शोधलीत तर लक्षात येईल की आज झालेल्या नुकसानामुळे माझ्या अनुभवात भर पडली आहे आणि त्यामुळे भविष्यात पुन्हा अशीच वेळ आली तर मी त्यापासून बचाव करू शकेन.

६. श्रीमंत होण्यापेक्षा समाधानी व्हा

तुमची वृत्ती समाधानी असेल तर आयुष्यात तुम्ही आनंदी रहाल. अन्यथा कितीही पैसे असले आणि मन समाधानी नसेल तर काय उपयोग?

वस्तूची किंमत किती यापेक्षा तिचे मूल्य काय असा विचार करण्याची सवय लावा. लहान सहान गोष्टींवर कृतज्ञता व्यक्त करा.

म्हणजे आपल्याला खूप काही मिळालंय हे लक्षात येईल. अवास्तव अपेक्षा गळून पडतील आणि फक्त समाधान भरून उरेल.

७. सकारात्मक विचारसरणी

आयुष्यात सर्वच गोष्टी चांगल्या घडणार नाहीत. पण अश्यावेळी निराश न होता वाईट गोष्टीची सुद्धा चांगली बाजू कोणती हे पहा. आपण मनाला जशी सवय लावू तसेच विचार मनात येतात.

म्हणूनच प्रत्येक प्रसंगात मी जास्तीत जास्त सकारात्मक राहीन असा निश्चय करा. त्याचप्रमाणे आपले वागणे ठेवा.

हळूहळू तुम्हाला जाणवेल की लहान सहान कुरबुरी, तक्रारी यांचा आता तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी त्रास होतोय.

तुम्हाला मुद्दामहून टोमणे मारणाऱ्या, दु:ख देणाऱ्या लोकांना दाखवून द्या की ते तुमचा आनंद कधीच हिरावून घेऊ शकत नाहीत.

कारण सभोवतालची परिस्थिती ही आपल्या विचारसरणीवर अवलंबून असते. विचार बदला, परिस्थिती नक्कीच बदलेल !!!

८. निरीक्षणशक्ती वाढवा

तुमचे कुटुंब, मित्रपरिवार यांच्याकडे नीट लक्ष द्या. काही वेळा तुमच्या सोबतीची, धीराच्या शब्दांची, प्रेमाची त्यांना नितांत गरज असते. पण आपण वरवर पहात असू तर ही गोष्ट आपल्या लक्षातच येत नाही. आणि जवळच्या माणसांपैकी काही असे सुद्धा असतील की फक्त गरजेपुरती तुमची आठवण काढतील, तुमचा वापर करून घेतील…. हरकत नाही.

असं समजा की तुमचं अस्तित्व एखाद्या दिव्यासारखं आहे. लोकांच्या आयुष्यात अंधार पडला की त्यांना तुमची आठवण येते.

९. जाणाऱ्याला जाऊ द्या

तुमच्या पासून दूर जाण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला अडवू नका. प्रत्येक माणूस काळानुसार बदलत असतो. त्यांचे चॉईस, प्राधान्य सर्व काही बदलते. त्यांना रोखण्यापेक्षा जाऊ देण्यात शहाणपण आहे. कदाचित तुमच्या पासून दूर गेल्यावर त्यांची प्रगती होऊ शकते. आणि तुमचीही!!

१०. समान ध्येय असलेल्यां सोबत रहा

एकदा तुम्हाला समजले की तुम्ही कोण आहात, तुमचं ध्येय काय की मग त्या दिशेने तुमची वाटचाल सुरू होईल.

या प्रवासात अनेक अनुभव येतील. आपल्या सोबत रहाणारी, खरीखुरी साथ देणारी माणसे कोण हे तुम्हाला कळेल. काही वेळा वर्षानुवर्षे सोबत रहाणारी माणसे आपल्याला ओळखू शकत नाहीत कारण त्यांचा प्रवास वेगळ्या दिशेने होत असतो.

तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी त्यांना तितक्या पटत नाहीत. जे तुम्हाला समजून घेऊन बरोबर येतील त्यांच्यासोबत आपली उद्दिष्टे जरूर शेअर करा.

११. खंत बाळगू नका अभिमान बाळगा

जीवनात कधीही मागे वळून पाहताना आभिमान बाळगा की मी काही प्रमाणात तरी यशस्वी झालो.

किमान काही चांगल्या गोष्टी मी करू शकलो. न जमलेल्या गोष्टी आठवून खंत करत बसू नका. तुम्ही जगातील प्रत्येक व्यक्तीला खुश करु शकत नाही.

त्यामुळे नावं ठेवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. स्वत:वर मनापासून प्रेम करा. सतत स्वतःमध्ये सुधारणा करा.

१२. नव्याने सुरुवात करण्याची तयारी

आयुष्यात तुम्ही अपयशी होऊ शकता. पण सदैव शिकण्याची तयारी ठेवा. जे लोक आपल्या चुकांमधून धडा घेतात तेच प्रगती करू शकतात.

कारण भरपूर अनुभव त्यांच्या गाठीशी असतो. कित्येक कसोटीचे प्रसंग त्यांनी पार केलेले असतात.

म्हणून कधीही निराश न होता पुन्हा नव्याने सुरुवात करा. नवी सुरुवात म्हणजे नवीन संधी!!!

हे साधे सोपे दिसणारे नियम प्रत्यक्षात खूप गहन आहेत. जसजसा तुम्ही त्यावर विचार कराल तसतसे तुम्हाला यातून अधिक ज्ञान मिळेल. मार्क यांच्या आजीने जणू ही जगण्याची सूत्रंच आपल्यापुढे ठेवली आहेत.

ती अंमलात आणून तुम्ही जीवनाचा आनंद घ्या. हा लेख कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. लाईक व शेअर करून हे विचार तुमच्या मित्रमैत्रिणीं पर्यंत पोहोचवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. Nita says:

    If u talked the truth and people went away from you and you feel alone what to do

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!