आपुलाची वाद आपणाशी!

दिवसेंदिवस वाढणा-या स्पर्धेमुळे निराशा आणि तणाव माणसाच्या आयुष्यात डोकावू लागल्या आहेत. जीवनात वेळोवेळी समस्या उभ्या राहतात. आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यावेळी आपण यातून सहीसलामत बाहेर पडू की नाही अशी भीती प्रत्येकाला वाटते. ज्यांची मनोवृत्ती तग धरण्याची, लढण्याची असते, मनात आत्मविश्वास असतो; त्यांना अशावेळी तरून जाता येते.

स्वत:ला जिवापाड जपणारी अनेक माणसे आपल्या आजूबाजूला नेहमीच दिसत असतात. स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव घ्यायला मागेपुढे न पाहणारी माणसेदेखील या समाजात दिसून येतात. या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करून त्याला कृतीची जोड देणारी व्यक्ती समाजासाठी आदर्शच. त्यात त्या व्यक्तिमत्वाला सामाजिकता आणि अध्यात्माचा स्पर्श असेल तर ती व्यक्ती इतरांसाठी प्रेरणादायी आणि आधारस्तंभच. अशा समाजशील व्यक्तीकडे समाज आदराने बघत असतो. त्याच्या बाबतीत नुसता सार्वत्रिक आदर आणि जिव्हाळा जपल्या जात नाही तर त्याच्या व्यक्तित्वातून, कर्तृत्वातून प्रेरणा घेत समाज त्याचं अनुकरण करत असतो.

राष्ट्रसंत तथा राजकीय गुरू म्हणून ख्याती असलेल्या भय्यूजी महाराज यांचं व्यक्तित्वही याच धाटणीतलं. भय्यूजी महाराज हे संत असले, तरी सुतकी तत्त्वज्ञान सांगणारे गुरू नव्हते किंवा भोगलालसेच्या आहारी गेलेले भोंदू बुवाही नव्हते. जीवनात अध्यात्म आणि सामाजिकता यांचा सुरेल संगम साधणारे ते कर्मयोगी संत होते. प्रसन्न मुद्रेच्या भय्यूजी महाराजांकडे पाहून कुणाच्याही मनातील नैराश्य दूर व्हावं, असं त्याचं व्यक्तित्व. तर अस्ताला जाणाऱ्या सूर्यालाही पुन्हा उगविण्याची उर्मी मिळावी, असं त्यांचं कर्तृत्व.

अशा सकारात्मक विचारधारणेचे धनी असलेल्या संतात्म्याने स्वतःच्या हाताने आपलं जीवन संपवून घ्यावं, हे मोठं धक्कादायक आहे. ज्या हातानी अनेकांच्या पाठीवर थाप देऊन त्यांना जगण्याची उमेद दिली. त्याच आशिर्वादरूपी हाताने बंदूक उचलावी आणि तीही स्वतःला संपविण्यासाठी. या घटनेकडे कुठल्या नजरेने बघावे, हा प्रश्न आपल्यातील अनेकांना पडणे स्वाभाविक आहे. सर्वांना तणावमुक्त करण्याची ज्यांच्याकडे क्षमता होती त्याच भय्यूजी महाराजांनी तणावातून किंव्हा नैराश्यातून आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलावे, ही बाब नुसती दुःखद नाही तर चिंताजनकही आहे. त्यामुळे तात्पुरती हळहळ व्यक्त करून किंव्हा वाढत्या आत्महत्येच्या सुप्त लाटेतील एक घटना म्हणून भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येकडे बघता येणार नाही तर या घटनेने अनेक गंभीर प्रश्न नव्याने उपस्थित केले आहेत.

‘आत्महत्या’ हा आजच्या काळात चर्चेचा, चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युवकांच्या आत्महत्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, कुटुंब कलहातून होणाऱ्या आत्महत्या अशा कितीतरी घटना दररोज घडत असतात. आत्म्हत्येची बातमी असल्याशिवाय वर्तमानपत्रच पूर्ण होत नाही, अशी आजची अवस्था आहे. भारतातील आत्महत्यांची नोंद ठेवणाऱ्या ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’ या संस्थेच्या रिपोर्टनुसार, २००६ पासून दरवर्षी भारतातील आत्महत्यांची संख्या २.५ टक्क्यांनी वाढते आहे. त्यामुळे वाढत्या आत्महत्यांची विशिष्ट कारणे शोधण्याआधी एखादी व्यक्ती आत्महत्या का करते, हे मुळातून समजून घेणे आवश्यक आहे.

साधारणतः कलह, नैराश्य, अपेक्षाभंग, दुर्बळ मनोवृत्ती, आर्थिक समस्या, बेकारी, वैयक्तिक स्तरावर येणारं यशापयश, आर्थिक नुकसान, जोडीदाराचा वियोग, घटस्फोट आदी विविध कारणांमुळे आत्महत्या केल्या जातात. यावरील उपाय सुचविताना सकारात्मक विचारांची कास धरण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या चित्तवृत्ती स्थिर करून मानसिक समाधान लाभावे आणि तणावमुक्त जीवन जगता यावे यासाठी काही जण अध्यात्माची कास धरतात. मात्र भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येने यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

भय्यूजी महाराज सकारात्मक विचाराचा सागर होते. अंधभक्तांचा गोतावळा जमवून स्वतःचा उदो उदो करत स्वहिताला अध्यात्म म्हणणाऱ्या तथाकथित पाखंडी बाबासारखे नाही, तर ‘ऐसी कळवळ्याची जाती, लोभाविन करती प्रीती..’ या संत तुकाराम महराजांच्या अभंगाला कृतीत उतरवून सत्य आणि सामाजिक तत्वावर आधारित अध्यात्म भय्यूजी महाराजांनी अंगिकारला होता. शेतकरी कष्टकरी समाजाचे अश्रू पुसता पुसता, अनाथ दिन-दुबळ्यांची सेवा करता करता, दुःख, वेदना, निराशा त्यांनी जवळून पाहली. यावर मात करण्याचा मार्ग भय्यूजी महाराजांनी अनेकांना दाखविला. मात्र स्वतःवर वेळ आल्यानंतर महाराज तणावावर विजय मिळवू शकले नाही.

कदाचित यासाठी आवश्यक असलेली प्रेमाची ऊर्जा तितक्या काळापुरती कमी पडली असावी. मनाची घालमेल दूर करण्यासाठी किंव्हा भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी मार्ग दिसला नसावा. आणि त्यातच काळाने आपला डाव साधला असावा. भय्यूजी महराजांच्या आत्महत्येचे कारण कुठलेही असो, मात्र वरून पहाडासारखी मजबूत असणाऱ्या व्यक्तीही आतून किती नाजूक असतात हे यामुळे समोर आले आहे. काही दिवासापूर्वी हिमांशू रॉय ह्या कणखर पोलीस अधिकाऱ्याने सुद्धा अशीच आत्महत्या केली होती. माणसाला मन आहे म्हणून तो माणूस आहे. मनाला भावना आहेत. आणि या भावनांचा कोंडमारा झाला कि कल्पवृक्षासारखा असणारा माणूसही यात उन्मळून पडू शकतो. त्यामुळेच जगावं कसं हे ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी, जगावं कशासाठी अन् कोणासाठी हे ठरविण्याची वेळ जरूर आलेली आहे.

दिवसेंदिवस वाढणा-या स्पर्धेमुळे निराशा आणि तणाव माणसाच्या आयुष्यात डोकावू लागल्या आहेत. जीवनात वेळोवेळी समस्या उभ्या राहतात. आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यावेळी आपण यातून सहीसलामत बाहेर पडू की नाही अशी भीती प्रत्येकाला वाटते. ज्यांची मनोवृत्ती तग धरण्याची, लढण्याची असते, मनात आत्मविश्वास असतो; त्यांना अशावेळी तरून जाता येते. मात्र ज्यांना हे जमत नाही त्यांचे मन कच खाते. कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी न झाल्यामुळे कधी कधी अगदी लहानसहान वाटणा-या गोष्टींमुळे कित्येक जण नैराश्याच्या गर्तेत अडकतात आणि त्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होतं. त्यांची आयुष्याकडे बघण्याची नजरच बदलून जाते.

अशा वेळी भावनांना साठवून न ठेवता त्या योग्यमार्गाने मोकळय़ा करणे गरजेचे आहे. आशा आणि अपेक्षांच्या जाळ्यात किती गुंतून राहायचे हे ठरविणेही आता आवश्यक बनले आहे. यासाठी अध्यात्म आपल्याला मदत करते. अध्यात्म- ‘अधि आत्म’- म्हणजे स्वतकडे पाहणे. स्वताचा शोध घेणे. साधारणतः आपल्या मनाला मानवी देहाचे चालक म्हटल्या जाते. म्हणून तर मनात येईल ते आपण करत असतो ते बरोबर कि चूक हे त्याचा परिणाम ठरवत असते. तेव्हा प्रत्येक गोष्टीचा परिणाम चांगलाच येण्यासाठी त्या मनालाच चालवायला जे शास्त्र त्यालाच अध्यात्म म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. एकंदरीत मनाचा खेळ म्हणजे मानवी जीवन आहे. त्यामुळे या मनाला सकारात्मक ठेवण्यासाठीची कसरत माणसाला कायम करावी लागते. मनानें कच खाल्ली कि त्याचे किती दुर्दैवी परिणाम होतात हे आपण अनुभवतो आहोत. त्यामुळे ‘तुका म्हणे होय मनाशी संवाद..’ ही अभंगवाणी मनोमनी जागवत जीवनाची वाटचाल करण्याची गरज आहे.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “आपुलाची वाद आपणाशी!”

  1. खूप खूप छान,मला खूप आवडत वाचायला,अन आपले सगळेच लेख तर खरच खूपच अप्रतिम असतात….खूप खूप धन्यवाद….

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय