हे सामाजिक संकेत पाळा आणि व्यक्तिमत्व खुलवा

आकर्षक व्यक्तिमत्त्वाने चारचौघात उठून दिसणारी माणसे समाजात लोकप्रिय होतात. यांची संगत सर्वांनाच हवीहवीशी वाटते.
याचे कारण फक्त त्यांचे सौंदर्य किंवा फॅशनेबल रहाणीमान एवढेच नसते. मग यापलीकडे जाऊन अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे इतर सर्वांपेक्षा ही माणसे वेगळी दिसतात?
तुम्हालाही असंच आकर्षक आणि लोकप्रिय होण्याची इच्छा आहे का? मग खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत हा लेख.
या लेखातून आम्ही असे काही सामाजिक संकेत तुम्हाला सांगणार आहोत की ते अंगी बाणवलेत तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक सुंदर झळाळी येईल. यांनाच एटिकेट्स किंवा गुड मॅनर्स म्हणतात.
जाणून घेऊया कोणते आहेत हे सामाजिक संकेत.
१. कोणालाही फोन करताना हे लक्षात ठेवा
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दोन वेळा फोन केलात आणि त्यांनी तुमचा फोन उचलला नाही तर सतत त्यांना फोन करत राहू नका. कारण ते इतर कोणत्याही जास्त महत्त्वाच्या कामात व्यस्त असू शकतात.
अशावेळी वारंवार फोन करत राहिल्यास त्यांच्या मनात तुमची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने बिंबवली जाते. म्हणून थोडा धीर धरणे व काही वेळानंतर पुन्हा एकदा प्रयत्न करणे योग्य राहील.
२. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून उसने पैसे घेतले असतील तर
शक्य तितक्या लवकर त्या व्यक्तीचे पैसे परत करा. त्यांनी तुम्हाला आठवण करून देईपर्यंत तर कधीच थांबू नका. अडचणीच्या वेळी मित्र किंवा नातेवाईक यांची मदत घेणे गैर नाही.
पण वेळेवर परतफेड करणे खूपच महत्त्वाचे आहे कारण यातून तुमचा प्रामाणिक स्वभाव दिसतो. हे फक्त पैशाच्या बाबतीत नाही तर कितीही छोटी वस्तू असली तरी वेळेवर परत करा.
अगदी पेन, छत्री किंवा टिफीनचा डबा अशा वस्तू असल्या तरीही !!!
३. जेव्हा तुमचा मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला पार्टी देतात
एखादा प्रसंग साजरा करण्यासाठी जेव्हा तुमचा मित्र, नातेवाईक तुम्हाला हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये पार्टी देतात त्यावेळी मेन्यू कार्ड पाहून नीट ऑर्डर करा. अशा प्रसंगी कधीच महागडी डीश मागवू नका.
तुमचे संभाषण हे जनरल विषयावर असावे आणि तुमच्याशी बोलताना इतरांना आपलेपणा वाटेल असे विषय निवडा. व्यक्तिगत विषय आणि त्याच्याशी निगडीत प्रश्न विचारणे टाळावे.
जसे की तुमचे लग्न झाले आहे का? अजूनही लग्न झालेच नाही का? तुमचा पगार किती? असे प्रश्न समोरच्या व्यक्तीला अवघड वाटतात.
शिवाय कोणत्याही व्यक्तीची पर्सनल स्पेस जपणे म्हणजे त्यांचा आदर करणे. म्हणून हलकेफुलके आणि मन प्रसन्न करणारे असे संवाद कौशल्य विकसित करावे.
५. नम्रता दाखवा
तुम्ही समोरच्या व्यक्तीला कसे वागवता यावरून तुमचे व्यक्तिमत्त्व दिसते.
वयाने लहान असो की मोठे, सर्वांशी तुम्ही अगत्याने आणि आस्थापूर्वक वागले पाहिजे. आणि हे अगदी लहान सहान प्रसंगातून दिसते.
नेहमी तुमच्या मागून येणाऱ्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडून ठेवा. ही कृती जरी अगदी साधी असली तरी त्यातून तुमची इतरांना मदत करण्याची वृत्ती दिसून येते.
६. शेअरिंग इज केअरिंग
जर तुमच्या मित्रांसोबत टॅक्सी किंवा कॅब शेअर केलीत आणि त्यांनी पैसे दिले तर पुढच्या वेळी आठवण ठेवून तुम्ही पैसे द्या. यातून तुम्ही इतरांचा विचार करता हे दिसून येते.
याचप्रमाणे हॉटेल बिल, एकत्र शॉपिंग करताना शेअरिंग करा.
७. इतरांच्या मतांचा आदर करा.
प्रत्येक व्यक्तीचा घटनांकडे पहाण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. इतकंच काय एकाच घटनेकडे पाहून दोन व्यक्ती भिन्न मत व्यक्त करु शकतात. म्हणून इतरांचे मत नीट ऐकून त्यांचा दृष्टिकोन समजून घ्या.
माणसाने आयुष्यात जसे अनुभव घेतलेले असतात त्यानुसार त्याचे विचार बदलत जातात. परिपक्व होत जातात त्यामुळे इतरांच्या मताचा आदर करा. ‘तू असे करावे असे मला वाटते’, असे काहीही जाणून न घेता सरसकट सल्ले देणे हे अपरिक्वतेचे लक्षण आहे.
८. इतरांचे बोलणे मध्येच थांबवू नका.
समोरच्या व्यक्तीला त्याचे म्हणणे पूर्णपणे मांडू द्या. ते बोलत असताना तुम्ही लक्षपूर्वक ऐका. त्यांचे हावभाव, आवाज यावरून त्यांच्या भावना समजून घ्या. मध्येच स्वतः बोलणे सुरू करणे योग्य नाही.
९. समोरच्या व्यक्तीचा मूड ओळखून वागा
तुम्ही एखाद्या व्यक्तीला चिडवत असाल आणि त्यांच्या बॉडी लँग्वेज वरुन तुम्हाला समजले की ही गोष्ट त्यांना आवडलेली नाही तर ताबडतोब चेष्टा मस्करी थांबवा आणि पुन्हा या प्रकारचे बोलणे त्यांच्याशी करु नका.
असे केलेत तर आपल्या भावना समजून घेतल्या म्हणून ती व्यक्ती तुमचा आदर करेल.
१०. धन्यवाद हा शब्द कधीच विसरू नका
नेहमीच इतरांनी आपल्याला केलेली मदत, आधाराचा हात, चांगला सल्ला याबाबत कृतज्ञता व्यक्त करा.
११. एखाद्याचे कौतुक जाहीरपणे आणि टीका एकांतात करा
तुम्हाला इतरांची कोणतीही गोष्ट पटत नसेल तर त्यांना एकट्यालाच याबाबत आपण चर्चा करु असे सांगा व ते एकटे असतानाच तुमचे मत सांगा.
पण प्रशंसा करताना मात्र आवर्जून चारचौघांत करा. त्यांच्या यशाचे जाहीर कौतुक करा पण टीका मात्र एकांतात करा.
१२. इतरांच्या शरीरावर टीका टिप्पणी करणे टाळा
इतरांना त्यांच्या वजनावरुन सल्ला देणे किंवा टिप्पण्या करणे टाळा.
ही त्यांची पर्सनल बाब असून जर इच्छा असेल तर ते तुम्हाला त्याबद्दल सांगतील.
१३. इतरांच्या मोबाईल सारख्या व्यक्तीगत गोष्टी हातात घेऊ नका
तुम्हाला कोणी मोबाईल फोन वर फोटो दाखवत असेल तर त्यांचा फोन लेफ्ट किंवा राईट स्वाईप करु नका.
फोटो ही व्यक्तिगत बाब आहे. आणि मोबाईल डेटा ही त्या व्यक्तीच्या स्पेसचा एक भाग आहे त्यात तुम्ही डोकावणे योग्य नाही.
१४. कुणाच्या आजाराबद्दल खोदून विचारू नका
एखादा सहकारी तुम्हाला सांगत असेल की आज माझी डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे अशा वेळी त्यांच्या आजाराबद्दल खोदून विचारु नका.
जर त्यांना शेअर करावेसे वाटले तर ते नक्कीच तुम्हाला सांगतील.
१५. कामावरून एखाद्याची किंमत ठरवून तुसडेपणाने वागू नका
कोणतेही काम कमी किंवा जास्त दर्जाचे नसते. म्हणून एखाद्या अधिकाऱ्याशी जसे तुमचे वागणे असते तसेच नोकर माणसांशी असले पाहिजे.
तुम्ही इतरांचा मान ठेवता की त्यांच्याशी तुसडेपणाने वागता यावरुन तुमचे व्यक्तिमत्त्व दिसून येते.
१६. इतरांशी बोलताना दुर्लक्ष करणे टाळा
जेव्हा कोणीही तुमच्याशी बोलत असेल तेव्हा मोबाईल मध्ये नजर घालून बसू नका. किंवा अधूनमधून मोबाईल चेक करणे टाळा.
याचा अर्थ समोरच्या व्यक्तीला तुम्ही महत्त्व देत नाही असा होतो. हे उद्धट किंवा बेपर्वा वागणे आहे.
१७. कधीही कोणाला अनाहूतपणे सल्ला देऊ नका
जर त्यांना तुमच्या सल्ल्याची गरज असेल तर ते स्वतः विचारतील.
१८. वय आणि कमाई याबद्दल इतरांना प्रश्न विचारू नका
खूप काळानंतर एखाद्या व्यक्तीला तुम्ही भेटत असाल तर त्यांना त्यांचे वय आणि कमाई याबाबत प्रश्न विचारु नका.
त्याऐवजी इतर जनरल गप्पा मारल्या तर संभाषण सकारात्मक होते.
१९. इतरांच्या व्यवहारात विनाकारण हस्तक्षेप करू नका
इतरांच्या व्यवहारात उगाच आपले मत, सूचना, सल्ला देणे टाळावे. जर त्यांनी तुम्हाला चर्चेत सहभागी करुन घेतले तरच तुम्ही त्यात भाग घेणे रास्त आहे. अन्यथा स्वतःचे काम नीटपणे करण्यात लक्ष द्यावे.
२०. नजर भिडवून संवाद साधा
रस्त्यात तुम्हाला कोणी भेटले तर त्यांच्याशी बोलण्यापूर्वी गॉगल्स काढा. हे नम्रपणाचे द्योतक आहे.
त्याचप्रमाणे संवाद साधताना समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोलल्याने संभाषण अधिक चांगल्या पद्धतीने होते.
भावभावना डोळ्यातून प्रकट होत असतात त्यामुळे नजरेची भाषा सुद्धा खूपच महत्त्वाची आहे.
२१. इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या
तुमच्यापेक्षा ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे अशा व्यक्तिंना आपल्या श्रीमंतीचा थाट किंवा वर्णन करुन दाखवू नका आणि ज्यांना मुले नाहीत अशा अपत्यहीन व्यक्तीसमोर कधीच आपल्या मुलांचे गोडवे गाणे प्रशस्त नाही.
इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेणे हे परिपक्व व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे.
प्रशंसा करणे, आदर करणे, नम्रता हे गुण तुमच्या अंगी असतील तर तुमचे व्यक्तिमत्त्व उठून दिसते आणि इतरांना तुमचा सहवास हवाहवासा वाटतो.
हे सोशल एटिकेट्स पाळले तर तुम्ही लोकप्रिय आणि मॅच्युरिटी असलेली व्यक्ती या दृष्टीने समाजात प्रसिद्ध व्हाल. तर या टिप्स लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा.
आपल्याला समाजात एक चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी हे सामाजिक संकेत खूपच उपयुक्त आहेत.
तुम्ही यापैकी कोणते संकेत पाळता हे आम्हाला नक्की सांगा. लाईक व शेअर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा