धनत्रयोदशी आणि धन्वंतरी पूजन | धनत्रयोदशी ची संपूर्ण माहिती आणि पूजा विधी

धनत्रयोदशी ची संपूर्ण माहिती आणि पूजा विधी
दिवाळीमधला महत्त्वाचा सण म्हणजे धनत्रयोदशी. यादिवशी धनाची देवता कुबेर आणि लक्ष्मी यांचे पूजन केले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. हा दिवाळीचा दुसरा दिवस.
या लेखातून आम्ही खास तुमच्यासाठी धन्वंतरी पूजनाची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.
कोण आहेत भगवान धन्वंतरी?
भगवान धन्वंतरी हे देवांचे चिकित्सक आहेत अशी मान्यता आहे. धन्वंतरींचे पूजन केल्याने आरोग्य प्राप्त होते. आयुर्वेदाचे जनक असलेले भगवान धन्वंतरी धनत्रयोदशी दिवशी प्रकट झाले अशी धार्मिक कथा आहे.
भगवान धन्वंतरी कसे प्रकट झाले?
पौराणिक कथेच्या संदर्भानुसार भगवान धन्वंतरी हे समुद्र मंथनातून प्रकट झाले. देव आणि दैत्य यांच्या युद्धाच्यावेळी समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यातील एक म्हणजे श्री धन्वंतरी !!! हे श्रीविष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी बारावा अवतार होत. समुद्र मंथनातून एकूण चौदा रत्ने बाहेर पडली.त्यातील चौदावे रत्न म्हणजे साक्षात श्री धन्वंतरी!!!
भगवान धन्वंतरींचे स्वरूप कसे आहे?
श्री धन्वंतरी हे विष्णूचे अवतार असल्यामुळे त्यांचे स्वरूप ओजस्वी दिसते.त्यांना चार भुजा असून त्यात त्यांनी अमृतकुंभ, शंख, आयुर्वेद आणि जलौका म्हणजे जळू धारण केली आहे. ही सर्व प्रतिके आरोग्याशी जोडलेली आहेत.अमृतकुंभ म्हणजे अक्षय आरोग्याचा ठेवा. शंख हा विजयाचे प्रतिक आहे.अनारोग्य, विकार, आजार यावर विजय मिळवून देणारे असे हे देवांचे चिकित्सक श्री धन्वंतरी. यातील जळू ही शरीरातील अशुद्धी शोषून बाहेर टाकणारी आणि आयुर्वेद हे संपूर्ण आरोग्यप्राप्तीकरिता मार्गदर्शन करणारे दिव्य शास्त्र !!!
समुद्रमंथनातून लक्ष्मी नंतर बाहेर पडली.त्यामुळेच आधी धनत्रयोदशी आणि नंतर दोन दिवसांनी लक्ष्मीपूजन केले जाते.याचाच अर्थ असा की शरीर संपदा हे पहिले धन व त्यानंतर पैसे.म्हणजेच निरोगी शरीर हे सर्वात महत्वाचे. त्याची काळजी उत्तम प्रकारे घेतली तर आपण धन कमावू शकतो असाच यातील संदेश आहे.
आयुर्वेदशास्त्राचे जनक म्हणून श्री धन्वंतरी प्रसिद्ध आहेत.त्यांच्याकडूनच हे ज्ञान गुरुपरंपरेने अनेक ऋषिमुनींनी घेतले.व मौखिक परंपरेने हे ज्ञान शिष्यांकडे आले.अशाप्रकारे आयुर्वेद या वैद्यकीय शास्त्राचा प्रचार व प्रसार झाला. आजही भारतात ही गुरुशिष्य परंपरा दिसून येते.चरक आणि सुश्रुत यांनी चिकित्सा आणि शस्त्रक्रिया या वैद्यकाच्या दोन शाखा पुढे विकसित केल्या.
भगवान धन्वंतरी मंत्र व त्याचा अर्थ
ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये:
अमृतकलश हस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोगनिवारणाय
त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप
श्री धनवंतरी स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नमः॥
या श्लोकाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे
परमभगवान ,ज्यांना सुदर्शन, वासुदेव, धन्वंतरी असे म्हणतात, ज्यांच्या हातात अमृत कलश आहे,जे सर्व रोगांचा विनाश करणारे आहेत, तिन्ही लोकांचे स्वामी आहेत, आणि त्यांचा निर्वाह करणारे आहेत, अशा विष्णू स्वरूप श्री धन्वंतरींना सादर प्रणाम !!!
धन्वंतरी पूजन हे सर्व वैद्यकीय व्यवसायिक विशेषतः आयुर्वेदिक वैद्य भक्तीभावाने करतात आणि यशस्वी चिकित्सेकरिता भगवान धन्वंतरींचे आशीर्वाद घेतात.
धन्वंतरी पूजन विधी
धनत्रयोदशी दिवशी स्नान करून धूत वस्त्र धारण करावे.एका चौरंगावर श्री धन्वंतरींची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. वरील मंत्र उच्चारण करुन विधीवत पूजा करावी. पूजेमध्ये तांदूळ, गंध, पुष्प, फल, जल अर्पण करून नंतर धूप ,दीप व आरती करावी.
प्रसाद म्हणून खीर करतात.
धार्मिक मान्यतेनुसार धन्वंतरींना पितळ हा धातू प्रिय आहे.म्हणून या दिवशी पितळी किंवा अन्य धातूची भांडी खरेदी करतात.या भांड्यांची पूजा करतात.
भांड्यात आपण अन्न शिजवतो व अन्न हे शरीर पोषणासाठी सर्वात महत्वाचे आहे.त्यादृष्टीने देखिल भांडी पूजण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
भारतातील अनेक धन्वंतरी मंदिरे
कर्नाटक,केरळ आंध्र प्रदेश, तामिळनाडू, इंदूर अशा अनेक ठिकाणी धन्वंतरींची मंदिरे आहेत. ही सर्व मंदिरे प्राचीन असून तिथे वैद्यकीय सेवा सुरू करण्यापूर्वी दर्शन घेण्यासाठी वैद्य आवर्जून भेट देतात.
केरळमध्ये कित्येक ठिकाणी तर घरातही लोक नित्यनेमाने धन्वंतरी पूजन करतात व मंगल आयुष्याची कामना करतात. पौराणिक कथेच्या संदर्भानुसार भगवान शंकरांनी जेव्हा हलाहल हे जहाल विष प्राशन केले त्यानंतर त्यांच्या संपूर्ण अंगामध्ये दाह होऊ लागला. त्यावेळी त्यांची चिकित्सा श्री धन्वंतरींनी केली.
अशा श्री धन्वंतरींचे स्मरण करण्याचा पवित्र दिवस म्हणजे धनत्रयोदशी!!! अश्विन वद्य त्रयोदशीला धन्वंतरींचे जसे पूजन करतात तसेच कुबेर पूजनातून धनाचे महत्त्व सुद्धा वर्णन केले आहे.
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. मनाचेTalks घ्या सर्व वाचकांना निरोगी दीर्घायुष्य लाभो याच शुभेच्छा!!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.