आजच्या घडीला आपल्याकडे जी आहे ती शिक्षण पद्धती (Education System) आहे कि परीक्षा पद्धती?

९८१ भागिले ९ किती होतात रे? कंपनीत आमच्या सेक्शनमध्ये नव्यानेच जॉईन झालेल्या ट्रेनी पोराला विचारले. कितीही वेळ लागुदे, मनात कर किंवा कागदावर. पण Calculator, कॉम्प्यूटर किंवा इतर कुणाची मदत नाही घ्यायची. स्वत:चे स्वत: करायचे. (डिप्लोमा-ट्रेनी म्हणजे डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला आहे हा पोरगा.)

“ह्या! त्याची काय गरज आहे? ९८१ भागिले ९ ना… सोप्पे तर आहे उत्तर ९९.”

मी शांतपणे म्हटले “कागदावर कर. तुला हवा तेवढा वेळ घे म्हटलंय ना…”

त्याने तेच गणित आत्मविश्वासाने कागदावर केले , उत्तर बरोबर ९९ आले. मी शेजारी बसलेल्या राहुलला म्हटले, “राहुल्या मुलगा शिकला, पुढे गेला. अरे ८० चा फरक पडलाय १९ पेक्षा ९९ बरोबर उत्तराच्या जरा जास्त जवळ आहे. आता थोडेच अंतर राहिलेय.”

आमचे म्हणणे ऐकत असलेला तो ट्रेनी पोरगा लगेच म्हणाला, “ओ चुकलोच! सॉरी सॉरी, १९ च बरोबर…”

मी पुन्हा राहुल कडे बघितले आम्ही दोघेही हसलो आणि तो म्हणाला “चला काम करू, त्याचा पगार घेतो आपण…”

शिक्षणाच्या निरनिराळ्या मुद्द्यावर अप्रतिहत बडबड करणाऱ्या, म्हणजे शिक्षणाचे माध्यम, मातृभाषा, शाळा चालकांची मुजोरी, शिक्षकांची लायकी, शाळांची भरमसाट फी वाढ, इ. इ. मुख्यत: बाह्य गोष्टीवर बोलणारे कुणीही शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपावर दर्जावर बोलत नाहीत असे का …

आम्ही बरोबर ऊत्तर देणारे अजून शोधतोय… कालच ३० जण झाले , ० लोकाना जमले… पाहू आम्ही आशावादी आहोत.

(तुम्ही करून बघा, फक्त calculator, कॉम्पुटर वापरायचा नाही किंवा इतर कुणाची मदत नाही घ्यायची.) माझी बायको मानसोपचारतज्ञ आहे. तिनेच हि आयडीया दिलीये. अनेक पालक मुलाना घेऊन येतात तिच्या कडची आकडेवारी वेगळे चित्र दाखवत नाही फक्त आपल्या मुलाना एवढे साधे गणित देखील येत नाही ह्याचे वैषम्य पालकाना वाटत नाही. त्यांना स्वत:ला ही ते बरेचदा येत नसते. खिशातल्या मोबाईल मध्ये चांगला calculator असताना हे गणित तोंडी करायची गरज काय? असे पालकांना सुद्धा वाटते. ठीक आहे. पण गुणाकार भागाकार अशा अगदी प्राथमिक गणिती क्रिया म्हणजे नक्की काय हेच मुलांना समजत नाही त्याचे काय.

दुकानात विशेषत: मॉल मध्ये १३.३८ रु किमतीच्या चार वस्तू घेतल्यावर पैसे देताना किती वेळा हात खिशातल्या मोबाईलकडे जातो, माझाही जात नाही पण डोक्यात १३ चोक ५२ अधिक ३८ चोक १५२ म्हणजे एकूण ५३.५२ रु असे गणित होत असते ते नको व्हायला.) चांगले म्हणजे ८०- ९०% मार्क पडणाऱ्या मुलाना साधे साधे प्रश्न विचारले तर घोकून ठेवलेली उत्तर येतात त्या उत्तरावरून काही प्रश्न विचारला तर भंबेरी उडते,हा प्रश्न पाठ्यक्रमात नव्हता आम्हाला सरावासाठी दिलेल्या प्रशोत्ताराच्या यादीत नव्हता, ह्याची गरज काय? एवढेच नाही तर पसायदान संस्कृत मध्ये असून ते समजायला अवघड आहे असे म्हणारे महाभाग मला भेटलेले आहेत…

ही १९९३ सालाची गोष्ट, अगदी खरी खुरी माझ्याच बाबतीत घडलेली. मी तेव्हा दहावीत होतो आणि शाळेत एक बऱ्यापैकी हुशार विद्यार्थी होतो, अगदी हा पुढे कदाचित बोर्डात येऊन आपल्या शाळेची ख्याती वाढवेल असा भ्रम शिक्षकांना व्हावा, इतपत हुशार. पण त्यांच्या भ्रमाचा भोपळा दहावीच्या परीक्षेच्या आधीच फुटला. तो पण त्यांनाच काय, मलाही अनपेक्षित अशा पद्धतीने. आई बाबाना (खास करून आईला) एकंदरीतच माझ्या वकुबाची जाणीव असल्याने ते काही मी बोर्डात येईन असली दिवास्वप्नं पाहत नसत, पण ते ही चकित झाले इतका तो धक्का अनपेक्षित होता.

झाले असे कीं नेहमी प्रमाणे त्यावर्षी बोर्डाच्या परीक्षे आधी आमची प्रिलिम झाली आणि त्यात मराठीत मला अगदी जुजबी म्हणजे ४५ /१०० इतकेच गुण मिळाले बाकीच्या विषयात उत्तम गुण होते अगदी ९०-९५ पर्यंत पण मराठीची अगदीच लाजिरवाणी अवस्था होती. देशपांडे म्हणजे माझे वडील मराठी आणि इंग्लिश साहित्याचे उत्तम जाणकार, त्याकाळीच आमच्या कडे १५०० च्या आसपास पुस्तक होती. माझा भाषा विषयाचा पूर्ण अभ्यास त्यांनी घेतला होता आणि त्यांच्या मते माझी तयारी अतिशय उत्तम होती (इतकेच नाहीतर त्यांनी शिकवलेले आजही माझ्या चांगलेच लक्षात आहे.)

(देशपांडे म्हणजे आमचे वडील. आमचं मूळचं आडनाव देशपांडे पण त्यांनी मी दुसरीत असताना ते बदलून कोरडे केलं. त्यांना म्हणे बाबासाहेब पुरंदऱ्यान्नी सांगितलं कि आमचे पूर्वज रघुनाथ पंत कोरडे हे शिवाजी महाराजांच्या पदरी वकील होते आणि आग्र्याहून महाराज निसटताना हे मागे राहिले होते ते नेमके सापडले, त्यांचा औरंगजेबाने खूप छळ केला पण त्यांनी महाराज कोणत्या वाटेने महाराष्ट्रात परतणार ह्याचा थांग पत्ता काही मोगलांना लागू दिला नहि. पुढे ते (म्हणजे आमचे पूर्वज कोरडे) सुटले तेव्हा त्यांच्या ह्या स्वामिभक्ती साठी शिवाजी महाराजांनी म्हणे त्यांना नाशिक जवळचे वतन (देशपांडे वतन) दिले. त्यामुळे म्हणे आम्ही मूळ कोरडे होतो त्याचे देशपांडे झालो. त्यामुळे भारावून जाऊन वडलांनी स्वतःचे आडनाव परत कोरडे केले. (आता खरेतर ह्या लॉजिक नुसार शिवाजी महाराजांनी दिलेले वतन जे आता नाही राहिले त्याचे निशाणी म्हणून देशपांडे हे नाव अभिमानाने मिरवायला हवे होते …असो) मला हे भिकारडे कोरडे आडनाव अजिबात आवडले नव्हते आजही आवडत नाही पण मी तेव्हा लहान होतो. आणि माझं मत कुणी विचारलं नाही, माझ्या आईचाही नाव बदलण्याला विरोध होत पण तो म्हणजे असली कामं नीट पूर्ण होत नाहित काहीतरी कुठे तरी राहते अन मग ऐन वेळेला त्यामुळे महत्वाची कामं अडतात असा technical कारणासाठी होता जो आजही खरा आहे- म्हणूनच आवडत नसूनही मी माझं आडनाव परत देशपांडे केलं नहि. पण पुढे मी बाबांना ओ, देशपांडे! अशीच हाक मारत असे अजूनही त्यांचा उल्लेख मी देशपांडे असाच करतो. आपला एक छोटासा सूड म्हणा हवा तर याला …पण ते एक असो!)

पण मग प्रिलिम मध्ये काय झाले? पेपर हातात देतानाच मराठीच्या शिक्षकांनी मुख्याध्यापकांना जाऊन भेटायला सांगितले आणि मुख्याध्यापकांनी काहीही न रागावता बोलता उद्या बाबाना घेऊन ये म्हटले आणि पेपर काढून घेतला. मला सॉलिड टेन्शन, सालं झालय काय? पेपर पूर्ण बघता आला नव्हता फक्त मार्क पाहिलेले. गप घरी गेलो आणि देशपांड्याना सगळे सांगितले. तेही विचारात पडले. त्यांना एवढे कमी मार्क ऐकून धक्काच बसला. दुसऱ्या दिवशी चक्क रजा काढून ते माझ्या बरोबर शाळेत आले आणि मुख्याध्यापकांना भेटले.

आमचे मुख्याध्यापक, टिळेकर सर म्हणाले, “जसा पेपर त्याने प्रिलिम मध्ये लिहिलाय ना तसा, जर बोर्डाच्या परीक्षेत लिहिला तर ४५ मार्क सोडा तो पास देखील व्हायचा नाही. आणि त्यांनी पेपर वडलांच्या म्हणजे देशपांड्यांच्या पुढ्यात टाकला. देशपांडे तो पेपर पाहत असतानाच सर बोलू लागले. अहो त्याने धड्याची उत्तरे लिहिताना तो धडा लेखकाच्या ज्या पुस्तकातून घेतला आहे त्याचे संदर्भ, त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतले संदर्भ दिलेत. ठराविक निबंध आम्ही घोकून घेतलेला असताना स्वत:च्या मनाने ३-३ पानी निबंध लिहिलाय. ‘मराठी असे आमुची माय बोली’ ह्या विषयावरच्या निबंधात संस्कृत सुभाषित काय करतय? दीर्घोत्तरी प्रश्न झाला म्हणून दीड दीड पान उत्तर कोण लिहितं! कुणाला एवढा वेळआहे वाचायला? वृत्ताची लक्षणे देताना पण पाठ्य पुस्तका बाहेरची उदाहरणं दिलीत.” … देशपांडे तसे बोलायला खडूस आणि टिपिकल पुणेरी, किमान शब्दात कमाल अपमान करणारे पण पोरा च्या दहावी कडे पाहून त्यांनी भावनांना आवर घातला असावा.

ते म्हणाले,”अहो पण पाठ्य पुस्तकाबाहेरची असली तरी वृत्ताची उदाहरण बरोबर आहेत ना, संस्कृत सुभाषित लिहिलं तरी त्याचा अर्थ लिहिलंय ना मराठीत ? मग ..”

सर म्हणाले, “तुम्हाला मुद्दा कळत नाहीये, ह्याचा पेपर आमच्याकडे नाही तर अख्या पुणे विभागात कुठेही जाणार तपासायला. जो माणूस तपासणार त्याला समजले पाहिजे ना ह्याने लिहिलंय ते बरोबर कि चूक ते. त्यांना नमुना उत्तर पत्रिका दिलेली असते. त्यात ठरलेली उत्तरे, उदाहरणे आणि वृत्ताची लक्षणे वगैरे असतात. त्याबरहुकूम तो तपासतो. ज्याचे उत्तर तंतोतंत त्याच्या नमुन्याशी जुळते त्याला पैकीच्या पैकी गुण. हे असले पाठ्य पुस्तकाबाहेरचे लिहून विद्वत्ता दाखवली तर शून्य मार्क मिळतील त्याची शैक्षणिक पात्रता आणि त्याला मिळणारी बिदागी आणि कामाचा बोजा ह्याबद्दल तर न बोललेलेच बरे, काय! काही समजतंय का?”

आता देशपांड्याच्या डोक्यात प्रकाश पडला ते म्हणाले, “अहो पण हे चूक आहे मूळ शिक्षणाच्या उद्दिष्टाच्या अगदी विरोधात आहे.”

“हो आहे. मग काय करणार आहोत तुम्ही आम्ही? पहा बुवा मी सांगायचे काम केले ह्या उप्पर तुमची मर्जी आणि त्याचे नशीब…”

आता देशपांड्यांच्या डोक्यात उजेड आणि पोटात खड्डा दोन्ही पडले. त्यांना समजले असावे काय ते पण मला समजेल का? पेपर लिहिताना चांगलं व्यवस्थित उत्तर येतंय तरी फक्त पुस्तकातले घोकलेले लिहायला जमेल का? उदाहरण फक्त पुस्तकातलीच लिहायचे आठवेल का? हा मोठा प्रश्न होता. मला घरी जाऊन त्यांनी समजावून सांगितले खरे पण मला समजले नाहीच. मी अगदी मनसोक्त पेपर लिहिला आणि दहावीला मराठीत शंभर पैकी ६१ मार्क घेतले. इतर विषयात ९०-९२ टक्के होते पण एकट्या मराठीमुळे एकुणात ८५.८५ टक्के पडले.

२५ वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही शाळेत जात होतो तेव्हा गाईड, २१ अपेक्षित वापरणे अगदीच निषिद्ध मानले जात नव्हते पण स्वत: अभ्यास करून मनाने लिहिलेले उत्तर समजण्या/तपासण्या इतकी कुवत शिक्षकांमध्ये खासच होती त्यातील अनेक जण अशा स्वत: लिहिलेल्या उत्तराला अधिक गुण देत, जाहीर कौतुक करत. पण हळू हळू पाया भूसभुशीत होऊ लागला होता दहावीच्या शेवटी हा प्रसंग घडला नसता तर आम्हाला त्याकाळीच हा कॅन्सर किती पसरला होता ह्याची जाणीव झाली नसती आणि आज, आज काय परस्थिती आहे?

शिक्षण का घ्यायचे तर परीक्षा उत्तीर्ण होण्या साठी, नुसते उत्तीर्ण नाही तर जास्तीजास्त मार्क मिळवूंन उत्तीर्ण होण्यासाठी मग. विषय येवो ना येवो, समजो न समजो. आजच्या भारतीय शिक्षण व्यवस्थेचा (Education System) प्रवास भरकटलेला जो दिसतोय ना त्याची सुरुवात कधी तरी २५-३० वर्षांपूर्वी आमच्या वेळी झाली असावी, जाणकारांना त्यावेळी हे अंत:प्रवाह दिसले नसावेत किंवा जाणूनबुजून त्याकडे कानाडोळा केला असावा पण आज त्यामुळे काय दिसतंय आपल्याला, ७० मुलं आहेत यंदाच्या वर्षी दहावी दिलेली ज्यांना १०० पैकी १०० गुण एक दोन नाही सगळ्या विषयात मिळालेत. कसे शक्य आहे हे ! घोकून पाठ केलेली उत्तरे आणि तशी पाठ केलेली उत्तरेच तपासु शकणारे परीक्षक… काही समजतंय का? माझ्या मुलीच्या मराठीच्या शिक्षिकेला मराठीत स्वर १२ कि १४ माहिती नाही बाकी वृत्त, अलन्कार वगैरे सोडूनच द्या. इतर कुठल्याही विषयाची अवस्था फार वेगळी नाही.

क्रमश:

वाचण्यासारखे आणखी काही….

सफलतेची बिजं बालपणापासूनच मुलांमध्ये रोवली तर….
मुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही…
जाणून घेऊ शैक्षणिक कर्जाबद्दल (Complete Guide- Education Loan)

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय