हे सोळा नियम तुम्हाला एक कणखर, मजबूत व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख देतील

मित्रांनो या जगात जो स्वतःची ताकद वेळोवेळी दाखवून देतो, त्यालाच दुनिया सलाम करते. दुर्बळ व्यक्तीच्या मताला कोणीच किंमत देत नाही.

इंग्रजी भाषेत एक सुंदर म्हण आहे. Survival of the fittest !!! म्हणजे सर्वात सशक्त असेल तोच जिवंत राहील. शब्दशः अर्थ न बघता याचा मतितार्थ जाणून घ्या.

तुमचं व्यक्तिमत्त्व कणखर असेल तर या जगात तुम्ही टिकून रहाल. फक्त शारीरिक दृष्ट्या ताकदवान नाही, तर मनाची ताकद प्रचंड प्रमाणात वाढवलीत तर तुम्हाला कोणीच सहजासहजी नामोहरम करु शकणार नाही. कामाच्या ठिकाणी असो की घरगुती बाबतीत, तुम्हाला कोणीही गृहीत धरणार नाही.

मनाचेTalks खास तुमच्यासाठी असे सोळा उपाय घेऊन येत आहे. हे नियम अगदी साधे दिसत असले तरी खूपच उपयुक्त लाइफ हॅक्स म्हणून तुम्ही हे आत्मसात करु शकता.

पाहूया तर स्वतःला कणखर बनवण्याचे सोळा उपाय

१. तुमच्या अनुपस्थितीची इतरांना दखल घ्यायला लावा.

एका उदाहरणावरून पाहूया. सुरेश हा कंपनीमधला हरहुन्नरी कर्मचारी!!! कोणतेही अडलेले काम चुटकीसरशी करणारा. सर्वांनाच त्याची खूप मदत होत असते.

त्याचा सुद्धा भरपूर कष्ट करण्याचा स्वभाव असतो. पण असं असलं तरीही त्याला प्रमोशन मात्र मिळत नाही. कष्टाला फळ येत नाही म्हणून तो आपल्या गुरुंकडे जातो. ते त्याला सांगतात, “अरे, नुसते कष्ट करून उपयोग नाही तर तुझ्यावाचून सगळीकडे कसं अडतं हे इतरांच्या लक्षात आणून दे. सुट्टी घेऊन चार दिवस फिरायला जा.” तो तसंच करतो.

इकडे मात्र सुरेशच्या ऑफिसमध्ये सगळ्या कामाचा सावळागोंधळ उडतो. प्रत्येकाला सुरेशच्या असण्याची आणि हातोहात प्रॉब्लेम सोडवण्याची इतकी सवय झालेली असते, की त्यांना काही सुचेनासं होतं. आता सुरेशची खरी किंमत त्यांना समजते!!!

मित्रांनो, घरी असो की कामावर, तुम्ही निमूटपणे वर्षानुवर्षे काम करत राहिलात तर लोकांना त्याची सवय होते. म्हणून अधूनमधून आपल्या अनुपस्थितीची दखल घ्यायला भाग पाडा. म्हणजे तुमच्या कष्टाचे मोल इतरांना समजेल.

२. समूहातील एक न होता स्वतंत्र स्थान निर्माण करा.

विचार करा एकाच ठिकाणी काम करणाऱ्या अनेक व्यक्तींपैकी काही विशिष्ट लोकांना प्रमोशन मिळते. का बरं? कारण त्यांनी केलेलं काम बॉसला ठळकपणे दिसतं!!! मित्रांनो, जमाना जाहिरातीचा आहे.

प्रामाणिकपणे काम केलंच पाहिजे. पण हे सुद्धा तेवढंच खरं आहे की तुम्हाला स्वतःचे व्यवस्थित मार्केटिंग करता आले पाहिजे. म्हणून आपली कौशल्ये, कष्ट, अनुभव, स्ट्रॉंग पॉइंट याविषयी योग्य ठिकाणी बोलले पाहिजे. भिडस्त स्वभाव प्रगतीत अडथळा निर्माण करतो.

असं म्हणतात की बोलणाऱ्याची माती सुद्धा खपते आणि मुखदुर्बळ व्यक्तीचं सोनं देखील खपत नाही. म्हणून चारचौघांपेक्षा वेगळं असं स्वतःचं स्थान निर्माण करा.

न लाजता स्वतःचं महत्त्व इतरांना सांगा. पण याचा अर्थ असा नाही की उगाचच काहीतरी थापा मारायच्या. जे काम खरोखरच तुम्ही उत्कृष्टपणे करता ते अभिमानाने सांगा.

३. आपला हेतू उघड करु नका.

जर तुम्हाला व्यवहारात यशस्वी व्हायचे असेल तर वाटाघाटी करण्याची कला तुम्हाला यायलाच हवी. आणि त्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे आपला हेतू उघड न करणे.

समजा तुम्ही एखादी महागडी वस्तू घेण्यासाठी शोरूममध्ये गेलात आणि उतावीळपणा दाखवलात तर सेल्समन समजून जाईल की तुम्ही ही वस्तू नक्की खरेदी करणारच.

मग तो तुम्हाला थोड्या कमी किंमतीची कोणतीही ऑफर किंवा डिस्काउंट देणार नाही. पण तुम्ही जास्त न बोलता वस्तू विकत घेण्याचा इरादा मनातच ठेवलात तर मात्र तो तुमच्या मागे लागेल. बेस्ट ऑफर देईल. म्हणून आपला हेतू स्पष्टपणे उघड न करता जेवढे आवश्यक आहे तेवढेच बोला.

४. शब्दांची किंमत ओळखा, गरजेपेक्षा कमी बोला.

या जगात सर्वात मौल्यवान आहेत तुमचे शब्द. म्हणून ते अगदी मोजून मापून खर्च करा. एक नियमच बनवा. तो म्हणजे गरजेपेक्षा कमी बोलणे. उगाच नको ती बडबड केल्यामुळे नसते घोळ होतात.

बऱ्याच वेळा तर अती बोलणे हे आपल्याला संकटात टाकते. म्हणून अगदी ‘टू द पॉइंट ‘ म्हणजे मुद्देसूद आणि नेमके बोलण्याची सवय ठेवावी. यामुळे आपले बोलणे प्रभावी होते. शिवाय अती बडबड करणाऱ्याच्या शब्दाला काही किंमत उरत नाही. म्हणून कमी बोला आणि आपल्या शब्दाचे वजन वाढवा !!!

५. वाद घालून नाही तर कृतीतून उत्तर द्या.

बऱ्याच लोकांना आपले म्हणणे खरे करण्यासाठी इतरांशी वाद घालण्याची सवय असते. पण त्यामुळे तुम्ही विजयी होऊ शकत नाही. कायमस्वरूपी तर नक्कीच नाही. याउलट सतत वादावादी करणाऱ्या व्यक्तींना समाजात काही विशेष स्थान दिले जात नाही. अशा व्यक्तींना इतर लोक टाळतात. त्यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने जगासमोर येते. म्हणून इतरांना उत्तर देण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृती करणे.

आपले काम इतके चोख झाले पाहिजे की आपल्याला काही बोलण्याची गरजच पडता कामा नये. आपले कामच बोलले पाहिजे.

६. मित्रांपेक्षा जास्त विश्वास शत्रूवर ठेवा!!!

आश्चर्य वाटलं ना वाचून? जरा भूतकाळात डोकावून पहा. तुमच्या जवळच्या लोकांनीच तुम्हाला दगा दिलाय हे अनुभव आलेले लक्षात येईल. कारण आपण ज्यांना आपले मानतो, त्यांना आपला स्वभाव, कमजोरी, सिक्रेट्स यांची पूर्ण माहिती असते आणि याचाच फायदा घेऊन काही लोक आपल्याला दगा देण्याची शक्यता असते. समजा एखादं काम तुम्हाला करून घ्यायचं आहे, तर ते नातेवाईक किंवा मित्रांना न देता अनोळखी व्यक्ती किंवा आपले पूर्वीचे शत्रू यांना द्या.

इथे शत्रू म्हणजे ज्यांच्याशी तुमचे संबंध जिव्हाळ्याचे नाहीत असं सुद्धा म्हणता येईल. यामागचे कारण जाणून घ्या. अनोळखी व्यक्तींना काम दिले तर तुम्ही सतर्क असता. सतत त्यांच्या पाठीमागे लागता. यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी होते. याउलट जवळच्या नात्यात आपण अति विश्वास टाकतो आणि नुकसान करुन घेतो.

७. बॉस इज ऑलवेज राईट!!!

आपल्या पेक्षा वरचढ व्यक्तीशी पंगा घेऊ नका. नोकरीत वरीष्ठ व्यक्तीला योग्य तो मान द्या. त्यांच्या चुका काढल्यात तर ते कोणतेही निमित्त करून तुमचा अपमान करतील.

किंवा तुमच्यावर डूख धरुन तुमचे नुकसान करतील. म्हणून तुम्ही कितीही हुशार असलात तरी बॉसच्या कामात चुका काढू नका. आपल्या हाताखालच्या माणसाने आपल्याला अक्कल शिकवलेली कोणालाही आवडत नाही.

त्यांना बॉस म्हणून वरीष्ठ पद उपभोगू द्या. तुम्ही त्यांच्याशी गोड बोलून कार्यभाग साधून घ्या. हेच लॉजिक समाजातील प्रतिष्ठित मंडळी, पैसा आणि पद यादृष्टीने वरचढ असलेल्यांबाबत बाळगा. त्यांच्याशी शत्रूत्व पत्करुन आपलेच नुकसान होणार हे नक्की.

८. मदत मागताना व्यवहारी रहा, भावनिक नको!!!

आजकालच्या जगात प्रत्येक व्यवहाराला प्रॅक्टिकल दृष्टीने पाहिले जाते. कारण प्रत्येक जण आपल्या फायद्याचा विचार करतो. हे कितीही स्वार्थी वाटले तरी ते सत्य आहे. आणि म्हणूनच आपण ते समजून घेऊन त्यानुसार वागले पाहिजे. समजा तुम्हाला कोणाकडून मदत हवी असेल तर भावनिक आवाहन करत बसू नका.

त्याऐवजी तुम्हाला मदत केल्याचा त्यांना काय फायदा होणार आहे हे स्पष्टपणे सांगा. दोघांच्या कॉमन फायद्याची किंवा आर्थिक जमेची बाजू या मदतीने प्रत्यक्षात येईल हे स्पष्ट करा. उगाचच फुकट मदत , दयाबुद्धी, कृतज्ञता असे मोठे शब्द वापरु नका.

समजा तुमच्या मित्राला तांत्रिक माहिती चांगली आहे. आणि तुम्हाला तुमची वेबसाईट त्याच्याकडून बनवून घ्यायची आहे. तर त्याला नुसतेच मदत कर असे न सांगता, पैसे ऑफर करा. म्हणजे तो हे काम व्यावसायिक दृष्ट्या अचूक असे करेल. फुकट अपेक्षा करणे योग्य नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमची किंमत वाटत नाही.

९. आत्मविश्वास बाळगा.

इतरांना तुमच्याबद्दल विश्वास तेव्हाच वाटेल, जेव्हा तुमचा स्वतःवर पूर्ण विश्वास असेल. म्हणून कोणतेही काम सुरू करताना संकटे, अडचणी येणारच हे मनाला पटवून सांगा. आणि कितीही कठीण प्रसंग आला तरी घाबरून जाऊ नका.

घेतलेले काम तडीस न्या. स्वतःला काय हवंय, मी कोण आहे? माझे ध्येय काय? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. विचलित न होता काम केले की आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

१०. जाणीवपूर्वक संगत निवडा.

मानसशास्त्रीय सत्य जाणून घ्या. ज्या व्यक्तींच्या सहवासात तुम्ही जास्तीत जास्त वेळ रहाता, त्यांच्यासारख्या स्वभावाचे तुम्ही होता!!! पॉझिटिव्ह आणि आनंदी व्यक्ती तुमच्या जीवनात ऊर्जा आणतील.

तर रडतराऊत, दु:खी माणसे तुम्हाला नकारात्मक बनवतील. म्हणून प्रेरणादायी, उत्साही माणसे निवडा. संगत ही एखाद्या इन्फेक्शन प्रमाणे असते‌. एका कडून दुसऱ्याकडे संक्रमित होते. म्हणून विचारपूर्वक माणसे निवडा.

११. डिप्लोमॅटिक व्हा!!!

वेळ, काळ, प्रसंग आणि व्यक्ती यांचे भान राखून त्यानुसार वागा. म्हणजे नक्की काय? विचार करा, तुम्ही तुमच्या बॉसशी आणि हाताखालच्या माणसाशी आपलं काम करुन घेताना एकाच पद्धतीने वागता का ?

एका ठिकाणी तुम्ही विनंती करता तर दुसरीकडे थोडा अधिकाराचा वापर करता. याचप्रमाणे घरी आणि ऑफिसमध्ये तुमचं वागणं वेगवेगळ्या प्रकारचं असतं.

थोडक्यात काय तर या जगात वावरताना विविध प्रकारची माणसे भेटतील. त्यांची योग्य ती पारख करा.

विनाकारण भांडण, वाद करुन कोणालाही दुखवू नका. यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज घेऊन त्यांच्याशी साम, दाम, दंड, भेद याप्रमाणे कसे वागायचे हे ठरवा.

१२. येडा बनके पेढा खाना!!!

तुम्हाला काही माणसं अशी भेटतील की तुमची बुद्धिमत्ता पाहून त्यांना मत्सर वाटेल. मग ही माणसे काही ना काही निमित्ताने तुमच्या मार्गात अडथळा आणतील. किंवा तुमच्यापेक्षा वरच्या पदावर असलेल्या माणसांना तुमच्याकडून स्पर्धा जाणवली तर ते तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत. अशी माणसे अहंकारी, असुरक्षित आणि ईर्ष्या करणारी असतात.

त्यांच्यासोबत भांडण्यात वेळ न घालवणे यातच शहाणपणा आहे. अशावेळी ‘तुम्ही हुशार, मी मूर्ख’ असे धोरण ठेवा. त्यांचा अहंकार सुखावेल आणि तुम्ही शांतपणे पुढे जाऊ शकाल.

१३. स्वतःची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढवा.

जगात अनेक महागड्या वस्तू आहेत पण त्याहीपेक्षा जास्त मौल्यवान अशा काही गोष्टी आहेत. त्यांची किंमत पैशात करताच येत नाही.

अशा गोष्टी म्हणजे चारित्र्य, व्यक्तिगत मूल्ये आणि प्रतिष्ठा!!!

यापैकी कोणतीही गोष्ट डागाळली गेली तर न भरुन येणारे नुकसान होते. म्हणून आपला ब्रँड म्हणजे विशिष्ट व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविण्यासाठी आपली जीवनमूल्ये कोणती हे जाणून त्यानुसार आपले चारित्र्य घडवा.

प्रामाणिकपणा, शब्द पाळणे, वेळेची कदर करणे यामुळे आपली ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढते. समाजातील आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असे कोणतेही काम करु नका. मोठमोठ्या कंपन्या, शेअर मार्केट मधील व्यवहार इतकेच काय पण एखाद्या देशाच्या प्रगतीसाठी असा ब्रॅण्ड बनवणे आणि तो प्राणपणाने सांभाळणे हे खूप गरजेचे असते.

१४. स्वतःचा सन्मान करा!!!

इतरांना आदरपूर्वक वागवा हे सर्वजण आपल्याला सांगतात. पण आम्ही एक खास गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत. इतरांनी तुम्हाला कशी वागणूक द्यावी असं तुम्हाला वाटतं?

तशीच वागणूक तुम्ही स्वतःला द्या. जर तुमची देहबोली आत्मविश्वासपूर्ण आणि प्रसन्न असेल तर तुम्ही समूहाचे नेतृत्व करु शकता. लोकांना तुमच्याबद्दल विश्वास वाटतो. पण याउलट देहबोली असेल तर तुमचं म्हणणं कितीही खरं असलं तरी इतरांना ते पटणार नाही.

आपल्याला लहानपणापासून साधी आणि नम्र रहाणी ठेवावी हे शिकवलं जातं. पण अति नम्रता दाखवली तर समोरची व्यक्ती आपल्याला गृहीत धरण्याची शक्यता असते. म्हणून एखाद्या राजासारखे जगा!!! नको तिथे झुकू नका आणि आपल्याशी गैरव्यवहार करणाऱ्यांना लगेच समज द्या.

१५. मोठ्या वृक्षाच्या सावलीत बसू नका!!!

मित्रांनो, एखाद्या भल्यामोठ्या वृक्षाच्या सावलीखाली दुसऱ्या कोणत्याही झाडाची नीट वाढ होत नाही. इतिहासात डोकावून पाहिलं तर याची उदाहरणे दिसतात.

महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान हे महान राजे होते. पण त्यांच्या मुलांची नावं आपल्या लक्षात आहेत का? कोणतेही श्रेष्ठ नट, उद्योगपती, नेते यांच्याबाबतीत सुद्धा बऱ्याच वेळा असंच दिसून येतं. कारण त्यांचा वारसा चालवणाऱ्या माणसांकडून इतरांच्या आभाळाएवढ्या अपेक्षा असतात. त्यांची सतत आधीच्या थोर व्यक्तींशी तुलना केली जाते. पण हेच जर तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीची जागा घेतलीय की ज्याने खूप चुका केल्या आहेत, किंवा जो प्रचंड प्रमाणात यशस्वी नाही आहे तर मग मात्र परिस्थिती वेगळी असते.

अशावेळी तुमच्यावर अपेक्षांचे ओझे नसते, ना तुलनेचे दडपण!!! मित्रांनो, करिअरची सुरुवात करताना जिथे जास्त प्रमाणात स्पर्धा नाही असे क्षेत्र तुम्ही निवडलेत तर तुमच्यावर मानसिक दडपण येणार नाही. तुम्ही मोकळेपणाने स्वतःला सिद्ध करु शकता.

१६. डोक्यावर बर्फ ठेवून वावरा!!!

एखाद्या व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू कोण हे तुम्हाला माहीत आहे का???

राग!!!

हो, शंभर टक्के खरं आहे. ज्या लोकांना लवकर राग येतो, त्यांच्या प्रगतीच्या वाटेत खूप अडचणी येतात.

कारण समोरच्या व्यक्तीला तुमची ही कमजोरी समजली की तुम्हाला खच्ची करणे त्याला सोपे जाते. तुम्हाला उकसवण्याचा तो पूर्ण प्रयत्न करतो. आणि एकदा का तुमच्या रागाचा पारा चढला, की मग तुम्ही अशा काही चुका करुन बसता की पश्चात्ताप करण्याशिवाय काहीच तुमच्या हातात रहात नाही. म्हणून रागावर नियंत्रण मिळवा. जरी कुणीही तुमचा अपमान केला, तरी रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. अपमान गिळायला शिका. आणि योग्य वेळी त्यांना उत्तर द्या.

आयुष्यातील कोणताही महत्त्वाचा निर्णय तुम्ही रागावलेले असताना कधीच घेऊ नका. संताप ही भावना जहाल विषासारखी आहे. ती न भरुन येणारे नुकसान करते. म्हणून मनाचा तोल ढळतोय असं वाटलं की दीर्घ श्वास घ्या. मनातल्या मनात आकडे मोजा किंवा दुसऱ्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष वळवा.

हे सोळा उपाय किंवा नियम प्रयत्नपूर्वक तुमच्या आयुष्यात वापरुन बघा. एकदा का याप्रमाणे वागण्याची सवय लागली की तुमच्या व्यक्तीमत्त्वात बदल होऊ लागेल.

तुमची मानसिकता बदलून जाईल. एक कणखर व्यक्तिमत्त्व म्हणून तुम्ही सर्वांपेक्षा वेगळे उठून दिसाल. आणि साहजिकच सर्वजण तुमची किंमत जाणतील.

तुम्हाला इतरांना मदत करायची असेल तर आधी स्वतःची ताकद वाढवावी लागेल. म्हणून सर्वप्रथम स्वतःला मानसिकरित्या कणखर बनवा.

सुप्रसिद्ध लेखक रॉबर्ट ग्रीन यांच्या ‘दि फॉर्टीएट लॉज ऑफ पॉवर’ या जगप्रसिद्ध पुस्तकात वरील उपाय सांगितले आहेत.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन आम्हाला सांगा. लाईक व शेअर करून उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

असेच मनाचेTalks चे विविध लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय