कमावती बायको हवीय? मग या गोष्टी समजून घ्या

वैवाहिक समुपदेशन

 

हल्ली वधूवरसूचक मंडळ किंवा मॅट्रिमोनिअल साईट्सवर नजर टाकलीत की लक्षात येईल, नोकरी करणारी मुलगी असावी ही अपेक्षा असते. अपेक्षा म्हणण्यापेक्षा अट हा शब्द जास्त योग्य म्हणता येईल.

हल्ली महागाई खूपच वाढली आहे. एका व्यक्तीने कमावणं आणि इतरांनी त्याच्यावर अवलंबून असणं हा काळ कधीच इतिहासजमा झाला आहे. आता प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छा, आकांक्षा, उद्दिष्ट यांना महत्त्व देणारी आहे. यात मुलग्यांप्रमाणेच मुली सुद्धा करिअरला प्राधान्य देणाऱ्या आहेत. घर एके घर, चुल आणि मुल ही मानसिकता मागे पडली आहे. मुली शिक्षणाच्या एकेका क्षेत्रात आपला झेंडा रोवत आहेत. अगदी अंतराळवीर, पायलट किंवा सैन्यातही मुलींचं मोठं योगदान दिसून येतं.

पण दुसऱ्या बाजूला लग्नाबद्दलच्या अपेक्षा मात्र फारशा बदललेल्या नाहीत. जरी नोकरी करणारी मुलगी हवी असली तरी ती गृहकृत्यदक्ष असलीच पाहिजे असंच सर्वांना वाटतं.

जुन्या पिढीतील माणसांचं जाऊद्या, पण लग्नाला इच्छुक मुलगा पण हीच अपेक्षा करत असेल तर?

1) नोकरी करणाऱ्या बायकोची भावनिक गरज समजून घ्या.

नोकरी करणारी स्त्री ही साधारणपणे दिवसाचे आठ तास घराबाहेर असते. यात ऑफिसच्या कामाचं टेन्शन, तिथल्या जबाबदाऱ्या, टार्गेट्स, डेडलाईन्स सांभाळणं याला काही पर्याय नसतोच पण तिथून घरात पाऊल टाकलं की, कामं आ वासून उभी असतात. जरी मदतनीस बायका हाताखाली असल्या तरीही त्यांच्याकडून काम वेळेवर करुन घेणं हे एक मोठं काम असतं. शिवाय घरातली माणसं आणि त्यांचे मूड्स सांभाळणं हे घरच्या सुनेचं कर्तव्यच आहे अशी एकंदरीत धारणा आहे.

मग एवढ्या सगळ्या गदारोळात तिच्याकडून थोडीशी चूक झाली, की टोचून बोलायचं एक निमित्तच मिळतं. आणि बहुतेक वेळा नवरा सुद्धा यात सामील असतो किंवा प्रत्यक्ष बोलत जरी नसेल तरी बायकोची पाठराखण न करता बघ्याची भूमिका घेतो. म्हणजेच अप्रत्यक्षपणे माझंही असंच म्हणणं आहे हेच तो दाखवत असतो.

सणवार, कुळाचार, व्रतवैकल्ये यथासांग पार पडावीत आणि ती बायकोच्या जीवावर असं वाटणाऱ्या नवऱ्याची मनोभूमिका काय असावी बरं? त्याच्या मनात सतत तुलना सुरू असावी.

2) तुलना करणं सोडून द्या.

कदाचित ते आपल्या आईची आणि बायकोची तुलना करत असावेत. आई जशी सर्व जबाबदाऱ्या एकहाती पार पाडत होती तसंच बायकोने करावं या सुप्त इच्छेमधून ते असं वागत असतील.

पण बदललेला काळ ते लक्षात घेत नाहीत. आई पूर्णवेळ गृहिणी असेल तर तिची आणि आताच्या नोकरी करणाऱ्या बायकोची तुलना करणे हेच मुळात चुकीचे आहे. आणि आई नोकरी सांभाळून जरी घरचं सगळं व्यवस्थित सांभाळत होती तरी आता बायकोने तेच करावं हे म्हणणं सुद्धा तेवढंच अयोग्य आहे.

याची कारणं लक्षात घेऊया. आता लग्नासाठी तयार होणाऱ्या मुलांचं सरासरी वय तीस वर्षे असं समजूया. म्हणजे मग या मुलाची आई नोकरी करून घर सांभाळत होती तो काळ कोणता हे लक्षात येईल.

त्याने साधारण वयाच्या दहाव्या वर्षापासून आपल्या आईला नोकरी आणि घर या दोन्ही आघाड्या सांभाळताना पाहिले आहे. म्हणजे हा काळ साधारण वीस वर्षांपूर्वीचा !!! त्या काळात आयुष्य एवढं वेगवान होतं का?

मुलांच्या शाळा, शिक्षणपद्धती कशी होती? नोकरीचे तास किती होते? त्यातली स्पर्धा, आव्हानं वेगळी नव्हती का?

बदललेल्या काळाप्रमाणे कोणते बदल झाले आहेत? एवढं चिंतन जरी केलं तरी नोकरी करणारी बायको हवी तर आपण स्वतःच्या मानसिकतेत कोणते बदल केले पाहिजेत हे समजेल.

लग्न हे सहजीवन असं आपण म्हणतो. मग या नात्यामधल्या जबाबदाऱ्या एकाच व्यक्तीवर लादणं योग्य आहे का?

पूर्वीच्या काळात अर्थार्जन करण्यासाठी पुरूष घराबाहेर जात असे आणि बाकी सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या घरची बाई आपल्या खांद्यावर घेऊन सांभाळत असे.

आता स्त्रीने आर्थिक हातभार तर लावायचाच आणि संसाराचे इतर व्यापताप पण वाहायचे म्हणजे तिची किती ओढाताण होत असेल. अशी मानसिक कुचंबणा सहन केल्यामुळे भावनिक पातळीवर काही बदल होतात.

यातूनच नैराश्य, उदासीनता, चिडचिड होणे, संताप, रडू येणे अशी लक्षणे दिसतात.

याशिवाय समाजजीवनात सुद्धा हल्ली अनेक घटना आपण पहातो. घटस्फोटाचे वाढते प्रमाण ही त्यातलीच एक चिंताजनक बाब आहे.

लग्नानंतर मुलींना असं वाटतं की या नात्याचे ओझे आपल्यावर लादले जात आहे. नवऱ्याची नात्यामधील गुंतवणूक फारच कमी आहे. मग तो मला समजून घेत नाही, मानसिक कोंडमारा होतो या कारणाने वेगळं व्हावं असं वाटतं.

उलटपक्षी मुलांना वाटतं की बायको घरात लक्ष देत नाही, घरकाम करत नाही, सासू सासरे, पाहुणे यांचं हवं नको पहात नाही अशी तक्रार असते.

पूर्वी आर्थिक स्वातंत्र्य नसल्याने मुली विभक्त होण्याचा निर्णय सहजपणे घेऊ शकत नसत. पण आता मात्र लग्न ही आपल्या पायातील बेडी आहे, आपले पंख छाटले जात आहेत असं वाटलं की लगेच अशा नात्यातून स्वतःला मुक्त करण्यासाठी मुली तयार असतात.

करिअरवर फोकस असल्याने त्याच्याआड येणारी कोणतीही गोष्ट त्यांना कमी महत्त्वाची वाटते.
म्हणून लग्नापूर्वीच या नात्याकडून आपल्या नक्की कोणत्या अपेक्षा आहेत याबाबत स्पष्ट मत असलं पाहिजे.

मिळवती बायको हवी असेल तर मी स्वतः मध्ये कोणते बदल करु शकतो हे मुलांनी ठरवावे.

लग्नाआधीच एकमेकांशी व्यवस्थित बोलून घ्यावे. मुलींनी सुद्धा हे तपासून पाहिले पाहिजे, की आपण जी नोकरी करतोय ती फक्त पैसे मिळवणे या उद्देशाने की आपल्या कामावर आपलं मनापासून प्रेम आहे म्हणून.

याचं कारण असं आहे की जर फक्त पैसे हेच उद्दिष्ट असेल तर कदाचित उत्तम आर्थिक स्थिती असलेला नवरा मिळाला तर तुम्ही नोकरी सोडून घरी रहाण्याची तडजोड करु शकता.

पण आपल्या शिक्षणावर, कामावर तुमचं प्रेम असेल, तर मग पैसे कमी मिळत असतील तरीही तुम्ही ते काम करणं सुरुच ठेवाल. म्हणून आपण कोणती तडजोड करु शकतो हे पहाणं खूप गरजेचं आहे.

विवाहपूर्व समुपदेशनाचा नक्कीच फायदा होतो. यात नातं निकोप रहाण्यासाठी काय करावं, सुसंवाद कसा असावा, एकमेकांना आधार देतानाच आपापली स्पेस कशी जपावी यावर मार्गदर्शन केलं जातं.

लग्न हा आयुष्यातील मोठा निर्णय आहे. यात फक्त दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंबांना एकत्र यायचं असतं. म्हणून हा निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण विचार करावा.

फक्त चांगली नोकरी आहे म्हणून एखाद्या मुलीची निवड न करता आपली व्यक्तिमत्त्वं, विचार, भविष्याच्या कल्पना एकमेकांना पूरक आहेत का हे पहावे. तरच पुढची वाटचाल सहजीवन म्हणून छान होऊ शकते.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. तसेच या विषयावरील तुमची मतं व्यक्त करा.

लेख आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका.

Manachetalks

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

Manachetalks

 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!