सुगरण व्हायचंय? मग ह्या टिप्स वापरा आणि किचन क्वीन व्हा.

महत्त्वाच्या किचन टिप्स

रोज सकाळच्या घाईत, ऑफिसहून आल्यावर स्वयंपाकाचं जीवावर येतं😥? लेकीचं लग्न ठरलंय पण स्वयंपाक करायची तिला सवय नाही🤦🏻‍♀️? लग्न होऊन किती दिवस झाले पण सूनबाईला कीचनमधलं काम अजून सराईतपणे जमत नाही???? 🙄 ….

मग काळजी करू नका या लेखात दिलेल्या किचन टिप्स सगळ्या किचन क्विन्स आणि किंग्स साठी खासच आहेत!!

असं म्हणतात की एखाद्याच्या हृदयात प्रवेश करण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. म्हणजेच तुम्ही नेहमी चविष्ट जेवण बनवून सर्वांना खुश केलंत की तुमची कॉलर अगदी ताठ असते.

सगळेजण तुमचं कौतुक तर करतातच पण एखादा पदार्थ बनवताना न चुकता तुमचा सल्ला घेतात. घरची पार्टी असो की सणसमारंभ तुम्ही केलेल्या पदार्थांची वाहवा होते. मग तुम्ही नक्कीच सुगरण आहात याचा सार्थ अभिमान बाळगा.

पण प्रत्येक व्यक्ती काही स्वयंपाकात पारंगत असेलच असं नाही. जरी तुम्हाला खंडीभर पदार्थ करता येत नसले तरी काही हरकत नाही. जे काही रोजच्या जेवणात पदार्थ बनवता ते नेमकेपणाने आणि स्वादिष्ट बनवता आले तरीसुद्धा तुम्ही सुगरण होऊ शकता.

आजकालच्या मुलींना करिअरमुळे किचनमध्ये जास्त वेळ घालवणं शक्य नसतं. त्यामुळे स्वैपाकाशी अगदी जरुरीपुरताच संबंध येतो. मग कधी जेवण बनवायची वेळ आली की खूप टेन्शन येतं.

घाईघाईत चुका होतात आणि पूर्ण जेवण बिघडून जातं. काही जणींना तर किचनमध्ये काम करायचं म्हटलं की कॉन्फिडन्स निघून जातो. पण काही सोप्या टीप्स वापरून आपण यावर मात करु शकतो.

शेवटी स्वयंपाक बनवणं हे एक कौशल्य आहे. आणि आपण जेवढा जास्त सराव करु तेवढे आपण त्यात पारंगत होत जातो.

आपली आई, आजी कधी वजन करून, मोजून मापून मीठ, मसाले वापरताना तुम्ही पाहिलंय का?

अगदी सहज बोलता बोलता त्या सुंदर, चविष्ट जेवण बनवतात. याचं कारण म्हणजे वर्षानुवर्षे केलेला सराव!!! आणि अनुभवातून आलेलं शहाणपण. हेच त्यांच्या सुगरणपणाचं गुपित आहे.

या लेखातून आम्ही अशाच काही साध्या सोप्या टिप्स खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. रोजच्या जेवणात जर यांचा वापर केलात तर कोणतीच गडबड होणार नाही. आणि अगदी छोटे, छोटे प्रॉब्लेम चुटकीसरशी सुटतील.

आजकाल तर शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने देशविदेशात फिरावं लागतं. अशावेळी जरुरीपुरता बेसिक स्वयंपाक करता येणं खूप गरजेचं आहे. मुलगा असो की मुलगी जेवण बनवता येणं हे एक आवश्यक लाइफ स्कील आहे.

नेहमी बाहेर खाणं खिशाला परवडणारं नसतंच पण त्याचा जास्त घातक परिणाम आपल्या तब्येतीवर होतो. म्हणून अगदी वरणभात जरी घरीच स्वतः बनवला तरी पोटभर जेवल्याचं समाधान मिळतं आणि घरचं अन्न सात्त्विक असल्यामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही. यासाठी प्रत्येकाने जेवण बनवायला शिकलेच पाहिजे.

नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या व्यक्तीला कोणतेही अवघड पदार्थ करायचेच नसतात. त्यांना पोहे करणे, चपाती साठी कणिक मळणे, कुकर लावणे अशा अगदी बेसिक गोष्टींमध्ये अडचण येते.

जर का या साध्या गोष्टी छान जमल्या तर साहजिकच नवशिक्या व्यक्तीला उत्साह वाटतो. स्वयंपाक करण्याची आवड निर्माण होते आणि मग हळूहळू कठीण रेसिपीज पण जमायला लागतात. तर एका सुगरणीचा प्रवास हा असा पायथ्यापासून शिखरापर्यंत हळूहळू होत असतो.

नवीन शिकणाऱ्या व्यक्तीला स्वयंपाक करताना कोणत्या अडचणी येतात?

कांदेपोहे करताना एकतर पोह्यांचा लगदा होतो किंवा पोहे चिवट होतात.

कणीक नीट भिजवता येत नाही.

कुकर लावला की डाळ व तांदूळ कुकरमध्ये खाली सांडतात. एकमेकांमध्ये यांचं पाणी मिक्स होतं.

कांदा एकसारखा अगदी बारीक चिरता येत नाही.

अशाच सर्व प्राथमिक अडचणी दूर करण्यासाठी वापरा या टिप्स.

1) पोहे करताना भांड्यात पाणी घेऊन त्यात पोहे भिजवू नका. जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पोहे एकत्र चिकटून त्याचा लगदा होतो.

म्हणून चाळणीमध्ये पोहे घालून नळाखाली स्वच्छ धुवून घ्यावेत आणि उरलेलं पाणी गळून जाण्यासाठी ती चाळणी एक झाकण घालून बंद करावी व एका टोपावर ठेवावी. म्हणजे पोहे बंद असल्यामुळे वारा लागून कोरडे होत नाहीत व छान मोकळे होतात. काही वेळा पोहे चिवट होतात.

हे टाळण्यासाठी फोडणी केल्यानंतर तेलात भरपूर कांदा परतून घ्यावा. जर दोन वाट्या पोहे असतील तर दीड वाटी कांदा वापरावा. म्हणजे कांद्यातील पाणी बाहेर सुटते व त्यात पोहे छान नरम शिजतात. ‘कांदेपोहे’ हेच नाव असलेल्या पदार्थात कांदा कमी घालून कसं चालेल?

2) कणीक नीट मळली गेली नाही तर पोळ्यांचं तंत्र बिघडतं. कणीक आणि पाणी यांचं प्रमाण अगदी योग्य प्रमाणात असेल तर कणकेचा गोळा एकजीव होऊन मिळून येतो.

पण हेच जर का पाणी जास्त झालं तर पिठाची पार खीर होऊन जाते आणि कमी झालं तर कडक पापडासारख्या पोळ्या होतात.

आज आम्ही तुम्हाला पोळ्यांसाठी कणीक आणि पाण्याचं परफेक्ट प्रमाण सांगणार आहोत. या प्रमाणाने चपात्या बनवल्यात तर अगदी मऊसूत चपात्या तयार होतील. चार वाट्या कणीक असेल तर दीड ते दोन वाट्या पाणी घ्यावे.

परात न घेता खोलगट भांडे घेऊन त्यात कणीक मळावी. दिड वाटी पाण्यापैकी थोडेसे शिल्लक ठेवावे व उरलेल्या पाण्यात कणीक मळावी. जेवढे छान पीठ मळले जाईल तेवढ्या पोळ्या नरम होतील.

पीठ एकत्र येऊन गोळा तयार झाला की उरलेले थोडे पाणी वापरुन तो गोळा चांगला भिजवून घ्यावा.

म्हणजे भांड्याला लागलेले सर्व पीठ स्वच्छ निघते. नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या व्यक्तीला कणीक भिजवायला खूप वेळ लागतो.

जर या पद्धतीने कणीक भिजवून वीस मिनिटे झाकून ठेवून दिलीत तर पीठ छान भिजून तयार होतं आणि दरम्यान तुम्ही इतर कामं पण उरकून टाकू शकता.

3) पोळ्या लाटायला घेताना परत एकदा कणकेच्या गोळ्याला पाण्याचा हात लावून थोडं मळून घेतलं की सुंदर, लुसलुशीत चपात्या तयार होतील. मग आता कणीक भिजवताना मुळीच टेन्शन घेऊ नका.

4) दररोजच्या जेवणात कशात ना कशात बटाटा वापरला जातो. अशावेळी आपण बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवतो. पराठे, बटाटेवडे करताना जो उकडलेला बटाटा शिल्लक रहातो तो सुद्धा आपण फ्रीजमध्ये ठेवतो.

पण कधीकधी हे सारण पातळ होतं व पदार्थ करायला त्रास होतो. बटाट्यात पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यास असं होतं. मग यावर उपाय काय? तर बटाटे उकडताना कुकरच्या तळाशी पाणी घालायचं आणि त्यावर एका भांड्यात अजिबात पाणी न घालता बटाटे ठेवायचे.

कुकर बंद करून तळातील पाण्याच्या वाफेवर बटाटे उकडून घ्यावेत. म्हणजे बटाटे जास्तीचं पाणी ओढून घेण्याची वेळ येतच नाही. सारण अगदी कोरडे रहाते आणि तुम्ही आरामात हवा तो पदार्थ बनवू शकता.

5) जेव्हा आपण तव्यावरची गरम गरम भाकरी, चपाती, थालिपीठ किंवा पराठा डब्यात भरतो किंवा टिश्यू पेपरवर काढतो तेव्हा वाफेमुळे थोड्याच वेळात पाणी सुटते व हे पदार्थ ओलसर होतात.

म्हणून गरम चपाती, भाकरी आधी एका जाळीवर काढून घ्यावी. ही जाळी जमिनीपासून थोडी उंच असावी म्हणजे वाफ जाळीतून निघून जाते. पदार्थ ओलसर होऊन चिकटत नाहीत.

6) जेव्हा आपल्याकडे पाहुणे येणार असतील तेव्हा सलाड साठी लागणारे काकडी, टोमॅटो हे सर्वात शेवटी चिरावे. कारण खूप आधी जर सलाड चिरुन ठेवले तर त्याला पाणी सुटते.

पण जर तुम्हाला ऐनवेळी ही तयारी करणे शक्य नसेल तर कोशिंबीर किंवा सलाडच्या भाज्यांचे तुकडे करून मिठाच्या थंड पाण्यात बुडवून ठेवा. हवं तर हे असंच पाण्यासहीत भांडं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता.

वाढायच्या वेळी सलाड पाण्यातून काढून निथळून घ्यावे. म्हणजे भाज्यांच्या फोडी कुरकुरीत रहातात.

7) डाळ भाताचा कुकर लावताना काही जणांना प्रॉब्लेम येतो. डाळीचं पाणी उतू जाऊन खालच्या भाताच्या भांड्यात सांडतं व त्यामुळे भात पिवळा दिसतो. म्हणून ही टीप नक्की लक्षात ठेवा.

कुकर लावताना डाळीचं भांडं खाली आणि तांदूळ वर लावा. डाळ शिजायला जास्त पाणी लागतं. त्यामुळे शिजताना उकळी आली की हे पाणी बाहेर येऊन भातात मिसळतं.

जर डाळीचं भांडं खाली ठेवून वर भाताचं भांडं ठेवलं तर वरच्या वजनामुळे डाळीतलं पाणी बाहेर पडू शकत नाही. किंवा जर बाहेर आलंच तर खाली कुकरमध्ये पडतं. त्यामुळे भात खराब होत नाही.

8) बिर्याणी करताना मोकळा भात कसा बनवावा हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला असा मोकळा भात कुकरमध्ये झटपट कसा बनवावा हे सांगणार आहोत. तर बिर्याणीसाठी सुवासिक बासमती तांदूळ घ्या.

हा तांदूळ जुना असला पाहिजे. जुना तांदूळ पिवळसर रंगाचा असतो. तसेच त्यातील स्टार्च कमी असते. त्यामुळे तो चिकट होत नाही. हा तांदूळ साधारण अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवला की त्यातील स्टार्च पाण्यातून निघून जाते.

बिर्याणी साठी कुकरमध्ये भात करताना जर दोन वाट्या तांदूळ असेल तर तेवढेच म्हणजे दोन वाट्या पाणी गरम करून घ्यावे. हे उकळलेले पाणी आणि तांदूळ कुकरमध्ये घालावे त्यात एक चमचा तेल व चवीनुसार मीठ घालावे व मोठ्या गॅसवर दोन शिट्ट्या काढून घ्याव्यात. अगदी मोकळा सळसळीत भात तयार होतो.

9) टोमॅटोची पेस्ट वापरली की भाजी आंबट होते तर अशावेळी टोमॅटो मधील बिया काढून मग पेस्ट तयार करावी. कारण आंबटपणा बियांमध्ये असतो.

शिवाय बिया पांढरट रंगाच्या असतात. त्या काढून टाकल्यामुळे अगदी लालबुंद रंगाची पेस्ट तयार होते. आणि भाजीची चवही बिघडत नाही.

10) समजा तुम्हाला कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही बनवायची आहे आणि ऐनवेळी लाईट गेली किंवा अचानक मिक्सर बिघडला तर आपण मिक्सर लावू शकत नाही. अशावेळी घाई असेल तर आपण थांबून पण राहू शकत नाही. मग खूप गोंधळून जायला होतं. आणि काही सुचत नाही.

तर अशावेळी ही सोपी गोष्ट करुन पहा. किसणीवर कांदा आणि टोमॅटो किसून अगदी मिक्सर सारखीच बारीक पेस्ट बनवू शकता. ही पेस्ट तेलावर परतलीत की मस्त ग्रेव्ही झटकन तयार होते.

आणि सर्वात महत्वाची टिप म्हणजे आदल्या दिवशी रात्रीच उद्या काय बनवायचं हे ठरवून ठेवा.

त्यामुळे सकाळी काय स्वयंपाक बनवायचा याचा विचार करण्यात वेळ वाया जाणार नाही. टाइम मॅनेजमेंट मुळे आपण मानसिकरित्या तयार असतो. आधीच ठरवलेल्या मेनूप्रमाणे पटकन काम सुरू करता येतं.

ऐनवेळी गोंधळ उडत नाही त्यामुळे आपण शांत असतो. करत असलेल्या कामाचा पूर्ण आनंद घेण्यासाठी आपलं मन शांत असणं खूप गरजेचं आहे. आणि शांत आणि आनंदी मनाने केलेला प्रत्येक पदार्थ रुचकर होणारच याची खात्री बाळगा. कारण आपली मनस्थिती जशी असते त्या सर्व भावना अन्नामध्ये उतरत असतात.

म्हणूनच प्रसन्न मनाने श्रद्धापूर्वक केलेला नैवेद्य किती चविष्ट लागतो!!!

या टिप्स बरोबरच जर तुम्हाला खरंच सुगरण व्हायची इच्छा असेल तर चवीसोबतच आरोग्याचा विचार केलाच पाहिजे.

आरोग्यासाठी या टिप्स वापरा.

1) पालेभाज्या करताना लोखंडी कढई वापरा. त्यामुळे लोहतत्त्व शरीरात शोषून घेतले जाते.

2) भाज्या व फळं कापल्यानंतर खूप वेळ तसेच ठेऊ नका. यामुळे हवेशी संयोग होऊन व्हिटॅमिन नाश पावतात.

3) ऋतुमानानुसार मिळणाऱ्या भाज्या व फळे यांचा वापर करा. फ्रोजन फूड तसेच रेडी टू कूक अन्नपदार्थ टाळावेत.

4) लहान मुलांना टिफीन देताना नेहमी पोळीभाजी न देता वैविध्यपूर्ण पण आरोग्यदायी पर्याय निवडा.

5) फावल्या वेळात शेंगदाणे भाजून कूट करणे, आलं लसणाची पेस्ट, नारळ खवून ठेवणे अशी कामं केलीत तर वेळ व एनर्जी दोन्ही वाचतील.

फक्त चविष्ट स्वयंपाक करणं एवढाच सुगरणपणाचा निकष नाहीय तर स्वयंपाक करताना स्वच्छता आणि आरोग्य यांचं भान राखणं गरजेचं आहे.

रोजच्या जेवणाचं ताट बहुरंगी असावं. म्हणजे हिरवी भाजी, गाजर, बीट किंवा टोमॅटोची कोशिंबीर, पिवळं वरण यासोबतच योग्य प्रमाणात कडधान्यं, लिंबाची फोड असं ताट समोर आलं की लगेच समजतं की स्वयंपाकघरात नक्कीच सुगरण वावरत असली पाहिजे.

चवीसोबतच ताट अगदी सुबकपणे वाढा. भाजी किंवा चटणीचे ओघळ पसरलेलं ताट दिसायला पण गचाळ दिसतं.

जे काही ताटात वाढाल त्या पदार्थांचे रंग आणि रुप पाहून खाणाऱ्याच्या जिभेला पाणी सुटलं तर तुम्ही सुगरण आहात यात तिळमात्र शंका नाही.

खरी सुगरण तीच जी स्वयंपाकघर म्हणजे अन्नपूर्णेचं मंदिर असं समजते !!!

आमच्या या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट्स करुन आम्हाला सांगा.

तुम्ही स्वयंपाक करताना कोणत्या युक्त्या वापरता हे शेअर करा. तसंच तुमच्या मते सुगरण कोणाला म्हणावे हे सुद्धा ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.

या लेखातील माहिती आवडली असेल तर न विसरता लाईक व शेअर करून उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!