मार्ग… (मराठी कथा)

अलीकडे दादांचं वागणं विचित्र होत चाललं होतं. माई गेल्यानंतरचा आलेला हळवेपणा, एकटेपणा त्यांच्या स्वभावाला धरून होता. त्यामुळे नैराश्य साहजिकच म्हणून किंचित दुर्लक्षच केलं गेलं का?
नैराश्याबरोबर त्यांचं विसरभोळेपण पण नजरेआड केलं का? नाही, तसे विसरभोळे ते आधीपासूनच होते. माईच सगळं आठवणीने करायची म्हणून निभावलं आमचं.
माई गेल्यावर आता एकट्या दादांना कुठे ठेवायचं असा प्रश्न आला. आपल्याकडे घेऊन जाऊ असं सुचवलं होतं मी पण ह्या प्रस्तावाला अनुने एका क्षणात नकार दिला होता.
“तीन वेळचा स्वयंपाक? मला नाही झेपणार. मी दमून आल्यावर आपण खिचडी, आमटी भात असं काहीही खातो पण हे आले की चटणी, कोशिंबीर, तोंडी लावणं, पातळ भाजी असं सगळं साग्रसंगीत करावं लागेल.
परत बाई लावलेली चालणार नाही. नातेवाईक आहेतच मग बडबडायला…” तिचा तोंडाचा पट्टा सुटला होता. दोन टोकं जुळवून आणणं शक्य नव्हतं.
दादांचं एकटेपणदेखील बघवत नव्हतं. हल्ली तर सकाळी टेकडीवर जायचं पण बंद झालं होतं.
मग शेवटी दर शुक्रवारी रात्री मी दादांकडे जायचं आणि सोमवारी रात्री घरी परत यायचं असा मार्ग निघाला.
कधी कधी मलाच शुक्रवार पर्यंत राहावत नाही, मग मधेच कधीकधी ऑफिसला येता-जाता चक्कर असते.
आज अशीच सकाळी ऑफिसला जाताना जायचा विचार होता, दादांच्या घराजवळ एक काम होतं आणि ह्या खेपेला त्यांच्याकडे राहायला असताना त्यांचं वागणं फारच विचित्र वाटलं होतं.
अचानक अंगात उत्साह सळसळला होता, सगळी कामं न विसरता, वेळेत करत होते. अगदी मागच्या वेळेपर्यंत उदास असलेले दादा चक्क वाचन करत, शास्त्रीय संगीत ऐकत बसले होते शुक्रवारी संध्याकाळी मी गेलो तर.
माई असतानाची प्रत्येक संध्याकाळ अशीच असायची. दोघेही दोन आरामखुर्चीत बसून वाचत असायचे, आणि मधल्या टेबलवर किटलीत चहा.
एक कप संपला की दुसरा असं किटली पूर्ण रिकामी होई पर्यंत चहा करत राहायचे. मग परत आत जाऊन कोण चहा करून आणणार ह्यावरून वाद व्हायचे.
माई गेल्यापासून त्या किटलीत कधीच चहा केला नाही कोणीच. पण शुक्रवारी शास्त्रीय संगीत, पुस्तक आणि किटली सगळं दिसलं.
शिवाय पुढचे तीन दिवस न विसरता गजर लावून झोपले आणि सकाळी उठून टेकडीवर गेले. दादांनी गजर लावला? गजर लावायला नेहमी विसरायचे ते. माई असताना माईच लावायची गजर त्यांचा.
ह्या एकूण प्रकाराने मी गोंधळून गेलो होतो, म्हणून आजची ही अचानक भेट.
इतक्यात परत बाथरूमचा दरवाजा वाजला, मुद्दाम बाहेर न जाता मी स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात उभं राहून बघत होतो. टॉवेल गुंडाळून दादा खोलीत गेले, येताना हातात साबण होता तो खाली फरशीवर ठेवला आणि परत दार लावून घेतलं.
आता पाण्याचा आवाज यायला लागला, दोन मिनिटांनी दादांचा आवाज.
“ऐकलंस का गो? साबणाची वडी संपली आहे, जरा देतेस का?”
एका मिनिटानी दार उघडून जमिनीवरची वडी उचलून “तुझ्याशिवाय कसं होणार माझं?” असं पुटपुटत दार लावून अंघोळ करायला गेले. स्वयंपाकघरात दादांनी केलेल्या पोह्यांची चव घेऊन आणलेला नाश्ता परत बॅगेत ठेऊन मी आपला गेलो तसा गप निघून आलो.
दादांनी ही त्यांचा मार्ग शोधला होता.
लेखन – मुग्धा शिरीष शेवाळकर
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा