लहानपण देगा देवा!.. (भाग – १)

Lahanpn dega deva

आपण मोठे होत गेलो तसतसं आपणच आपल्या हातानी, आपली लाईफ कॉम्प्लीकेटेड करुन घेतली का? लहानपणी असलेलं निरागस, सतत उत्साही, आनंदी व्हर्जन मोठं होता होता, कुठे हरवलं? का नाहीसं झालं?

मोठं झाल्यावर, प्रौढ बनल्यावर जीवनाकडे बघुन भ्रमनिरास व्हावा, इतकं जीवन अळणी आणि बेचव खरचं आहे का? हा दृष्टीकोन खोटा आहे, भ्रामक आहे.

नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तुमच्या लहानपणीचे दिवस आठवतात का? मनावर उमटलेल्या काही पुसटशा आठवणी तर नक्कीच आठवत असतील….

आठवतं का तुम्हाला, जेव्हा आपण नुकतचं रांगायला शिकलो होतो, पांगुळगाडा घेऊन दुडुदुडु चालायला शिकलो होतो, तेव्हा आपल्याला कसला आनंद झाला होता ना? कितीही वेळ चाललं तरी आपण थकायचो नाही,

जेव्हा आपण वस्तु पहायला, पकडायला शिकलो तेव्हा प्रत्येक वस्तु हातात घेऊन बघायचा आपला आग्रह असायचा. मग ती टोबु सायकल असो, वा खेळणी, गाड्यांचं तर कसलं आकर्षण होतं आपल्याला,

मी पाच वर्षाचा असताना, म्हणजे १९९० मध्ये आजच्या इतक्या बाईक्स नसायच्या, दोनचार मोजक्या मोटरसायकल, बाकी स्कुटर आणि लुना!

कधी चुकुन, घराजवळ एखादी कार आली की आम्ही मुलं आनंदाने वेडे होवुन त्या एम्बेसीटर मागे, किंवा प्रिमीयर पद्मिनीमागे पळत सुटायचो, इतकं त्या कारचं वेड होतं तेव्हा आम्हा मुलांना!

मी साडेतीन-चार वर्षाचा झाल्यापासुनच्या सर्व घटना मला लख्ख आठवतात, शाळेची वेळ दुपारी साडेबाराची असायची, पण आम्ही तिघे भावंडं मात्र, दहालाच तयार होवुन, पाठीवर दप्तर अडकवुन, एकमेकांचे हात पकडून, हळुहळु बालवाडीच्या रस्त्याने जायचो, शाळेत एक ग्राऊंड आणि एक चिंचेचं झाड होत, त्या झाडाखाली वेगवेगळे खेळ खेळायचो, शाळा संपली की आम्ही घराकडे पळत सुटायचो, गल्लीतलं प्रत्येक घर आम्हाला आमचचं वाटायचं.

बालपणी आपण लहानसहान गोष्टींमुळेही किती जास्त आनंदी व्हायचो, घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीने कधीतरी बागेत नेलं, की आपल्या उत्साहाला उधाण यायचं, कोपरे फुटेपर्यंत आणि ढोपरं दुखेपर्यंत घसरगुंडी खेळायची, सी-सॉ खेळायचा, झोके खेळायचे, तरीही मन थकायचं नाही, मग आम्हाला भेळ खाऊ घातली जायची, आणि ती कितीही तिखट असली तरी आम्ही तृप्त होवुन घरी परतायचो!

गल्लीत जेव्हा एखाद्याचा वाढदिवस असायचा, आणि फोटोग्राफर फोटो काढायला यायचा, तेव्हा, त्याच्या कॅमेर्‍याचं, असंच प्रचंड आकर्षण असायचं, त्याच्या प्रत्येक फ्लॅशवर आम्ही एकच गलका करायचो, इतका आनंद व्हायचा!.

आणि असंच वेड टी.व्ही.चंही होतं, १९९१ मध्ये गल्लीमध्ये फक्त आमच्या काकाकडे कलर टी. व्ही. आणि केबल कनेक्शन होतं, तिथं जेव्हा टि.व्ही. वर सिरीअल, पिक्चर पाहायला जायचो तेव्हा गुंग होवुन तिथेच बसायचो,

आणि घरातली एखादी व्यक्ती बाहेर पडायच्या तयारीत दिसली, की “मी पण येणार”, असा आपला बालहट्ट चालु व्हायचा, आपल्याला दटावुन गप्प करण्याचा प्रयत्न व्हायची लक्षणे दिसताच, प्रसंगाची आवश्यकता ओळखुन, आपण कर्णकर्कश्य रडून, ओरडुन, जमिनीवर गडाबडा लोळत, आपण आपलं उपद्रवमुल्य आपण सगळ्यांना दाखवुन द्यायचो, कारण, घराबाहेर काय असतं, हे लोक कुठे जातात, काय करतात, या सगळ्याचं आपल्याला प्रचंड कुतुहुल, प्रचंड जिज्ञासा होती!

आमच्या सिद्धेश्वरच्या जत्रेमध्ये जायचो तेव्हा, रंगबेरंगी उंच उंच रहाटपाळणे आणि निरनिराळ्या खेळण्यांची, किचेनची, गॉगल्सची दुकानं, थाटलेली पाहुन आमच्या आनंदाला भरतं यायचं!

गल्लीमध्ये लगोरी, क्रिकेट खेळताना, आणि शाळेमध्ये कबड्डी खेळताना आपण हरलेलं आपल्याला आवडायचं नाही, आपण चिडायचो, ओरडायचो, भांडायचो, पण आपण महीनोमहीने त्या गोष्टीचा राग पकडून बसायचो नाही, उलट ज्यांच्याशी जास्त भांडणं व्हायची, तेच तर आपले जिगरी दोस्त असायचे. “तुझं माझं जमेना, तुझ्याशिवाय करमेना,” अशी विचित्र अवस्था असायची.

लहानपणी आपण सतत इतके आनंदी, सतत इतके उत्साही का असायचो?, कारण हे जग आणि इथली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी नवी होती, चमत्कारिक होती, थोडक्यात ती आपल्यासाठी एक प्रकारची जादुच होती,

तेव्हा आपण पृथ्वीवरच्या प्रत्येक वस्तुवर आणि आजुबाजुच्या प्रत्येक व्यक्तीवर निखळ प्रेम करायचो, मग तो पौर्णिमेचा चंद्र असो, किंवा कापाकापी करुन काटलेला पतंग असो, पाहीलं की आपल्या आनंदाला भरतं यायचं, आपण त्यांच्यामागे वेडेपिसे होवुन, धावत सुटायचो.

लहानपणी आपण प्रेमासाठी भुकेले आणि आसुसलेले होतो, मायेचा स्पर्श आपल्याला हवाहवासा असायचा, प्रेमाची उब हवी असायची, आपण हक्काने आईवडीलांच्या मांडीवर, खांद्यावर चढुन खेळायचो, तसा हट्ट धरायचो.

आपण लहान असताना आपलं ह्रद्य आनंदाने भरुन यायचं.

दिवाळीत फटाके वाजवायला भेटायचे, म्हणुन दिवाळी कधी येईल याची दिवसं मोजत आतुरतेने वाट बघायचो, तर वाढदिवसाला गिफ्टस भेटायचे, नवे कपडे घालुन सेलेब्रीटी बनुन मिरवायचं, आणि केक कापायचं, प्रचंड आकर्षण असायचं.

पेन हे इतरांसाठी फक्त लिहण्याचं एक साधन होतं, आपल्या हातात आलं की विमान, हेलीकॉप्टर आणि घोडा आणि सैनिक असं, पेन सोडुन, खेळण्यासाठी सारंकाही असायचं, कारण आपल्या कल्पनाशक्तीला कसल्याही मर्यादा नसायच्या, आणि हे जग जादुमयी आहे, यावर आपला विश्वास असायचा.

आपण लहान असताना, आपल्यातल्या प्रत्येकाला आजुबाजुची प्रत्येक गोष्ट चांगली आहे, आणि येणारा प्रत्येक दिवस आणखी उत्साह आणि साहस घेऊन येईल, असा विश्वास वाटायचा.

ह्या सगळ्या जादुई वातावरणातील आपला आनंद कोणी हिरावुन घेईल, असं आपल्याला अजिबात वाटायचं नाही. आपल्याला लहान मुलं आवडतात, त्यांच्याशी खेळायला आवडतं, कारण त्याच्याशी खेळताना, काही क्षणांपुरतं का होईना, पण आपण आपलं बालपण पुन्हा एकदा जगत असतो.

पण आपण कधीतरी मोठे होतो, अनेक जबाबदार्‍या, समस्या आणि अडचणींशी आपण सामना करत आहोत, आपल्या खांद्यावर खुप ओझं आहे, असा भ्रम आपण करुन घेतला की जीवन नीरस होतं.

आपण मोठे होत गेलो तसतसं आपणच आपल्या हातानी, आपली लाईफ कॉम्प्लीकेटेड करुन घेतली का? लहानपणी असलेलं निरागस, सतत उत्साही, आनंदी व्हर्जन मोठं होता होता, कुठे हरवलं? का नाहीसं झालं?

मोठं झाल्यावर, प्रौढ बनल्यावर जीवनाकडे बघुन भ्रमनिरास व्हावा, इतकं जीवन अळणी आणि बेचव खरचं आहे का? हा दृष्टीकोन खोटा आहे, भ्रामक आहे.

लहानपणी आपल्याला काही हवं असलेलं दिलं गेलं नाही तर वडीलांच्या हातात नोटांची बंडल बघितल्यावर, वाटायचं, पटकन मोठ्ठं व्हाव, खुप पैसे कमवावेत, खुप मज्जा करावी, खुप स्वप्न पहायचो, कल्पनाविलास करण्यात रमुन जायचो आपणं, हो ना!

मग मोठं झाल्यावर आपली स्वप्न पुर्ण होतील, यावरचा विश्वास का गमावुन बसतो आपण, तेव्हा सहजसाध्य वाटणारी स्वप्ने आता अशक्य कोटीतली वाटुन वाट्याला आलेलं आयुष्य निमुटपणे जगत, आलेला दिवस ढकलुन, उसासे सोडत आयुष्य का जगतो आपण?

बालपणी कल्पना केली होती, त्यापेक्षाही प्रत्यक्ष जीवन जास्त विस्मयकारक, थरारक आणि रोमांचित करणारं असु शकतं,

श्वास रोखुन धरणारं, आपल्याला प्रेरणा देणारं, प्रत्येक क्षणी उत्साही, उत्तेजित करणारं, प्रत्येक क्षणी आनंद देणारं असु शकतं.

एकदा का तुम्हाला ही जादु दृष्टीपथात आणण्यासाठी काय करायचं, हे समजलं, की तुमच्या स्वप्नातील आयुष्य तुम्ही प्रत्यक्षात जगायला लागाल, आणि जगण्याच्या जादुवर विश्वास ठेवणं तुम्ही कसं काय सोडुन दिलं होतं, याचचं तुम्हाला आश्चर्य वाटेल.

ज्या गोष्टी घडाव्याशा तुम्हाला वाटत होत्या, त्या तुमच्या डोळ्यासमोर घडतील. दिर्घकाळातील स्वप्न प्रत्यक्षात येतील, स्वप्नांची गुंफन सत्यात कशी आली तेच तुम्हाला समजणार नाही,

लहानपणानंतर ह्या जादुचा आनंद घेण्यास तुम्ही तयार आहात? लहानपणीसारखा प्रत्येक दिवस तुम्ही आश्चर्य, उत्साह आणि आनंदाच्या भावनेत घालवायला तयार आहात का?

चला तर मग या जादुसाठी तयार व्हा!..

लेख आवडल्यास लाईक करा, लहानपणीच्या आयुष्यातल्या तुमच्या गंमतीजंमती आठवणी मोकळेपणाने कमेंटबॉक्स मध्ये लिहा, तुमची प्रत्येक कमेंट मी आवर्जुन वाचतो आणि आपल्या प्रिय व्यक्तींनाही हा लेख बालपणात घेऊन जाण्यात मदत करेल, असे वाटल्यास हा लेख आवर्जुन आपल्या टाईमलाईनवर शेअर करा.

आपल्यातली निरागसता जपत, तुम्ही तुमच्यातलं छोटं व्हर्जन कायम राखाल, आणि बालपणीसारखं टेंशनफ्री आयुष्य पुन्हा जगाल, ह्या अपेक्षेसह,

मनःपुर्वक धन्यवाद!..

क्रमशः


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

3 Responses

  1. P P DHAMANGAONKAR says:

    felt like i m in navipeth house

  2. नामदेव तुकाराम पाटील says:

    अगदी बालपणातील यथोचित वर्णन , या गुलाबी व रहस्यमय जगात भ्रमण केल्बद्दल धन्यवाद ..!!

  3. Pankaj says:

    मन:पूर्वक आभार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!