मैत्र जीवांचे!

manachetalks

रविंद्र इंजिनीअरींगच्या शेवटच्या वर्षाला होता, कॉलेजमध्ये शेवटचा एक आठवडा राहीला होता, खरं तर पास-आउट होऊन नव्या क्षितीजाकडे झेप घेण्यासाठी तो आतुर होता, मागच्या पाच वर्षांपासुन ह्याच क्षणाची तर उत्सुकतेने वाट पाहीली होती, आटापिटा केला होता, पण आज एकच गोष्ट त्याला राहुन राहुन इथुन जाण्याच्या कल्पनेनेच दुःख देत होती, त्याची मैत्रीण ऋचा!

खरं तर त्याची आणि ऋचाची ओळख फक्त सहा महीन्यांखालचीच, पण एवढ्या कमी काळात ते एकमेकांचे घनिष्ठ मित्र झाले होते, ‘मित्र-मैत्रीण’ च्या गोंडस स्टेशनवरुन सुरु झालेली त्यांची गाडी बेस्ट फ्रेंडच्या स्टेशनला येऊन अडकली होती, पुढचा प्रवास प्रेमाच्या रोमॅन्टीक वळणावर जाणारा होता, पण दोघेही एकमेकांच्या सिग्नलची वाट बघत होते.

ऋचा! नुसतं नाव आठवलं की रविंद्र एका वेगळ्या जगात हरवुन जायचा. खरोखर तो तिच्यासाठी वेडपिसा झाला होता, उठताना, बसताना, खाताना, झोपताना, अभ्यास करताना, बस्स, तिचाच विचार मनात यायचा, गोरी, गोरी, गोबर्‍या गालांची, बोलक्या डोळ्यांची, थोडीशी ठेंगणी पण देखणी, उत्तरे देण्यात चलाख, बोलण्यात तरबेज, रंगबेरंगी आनंदाने बागडणारी, नाना प्रश्न विचारुन त्याला भंडावुन सोडणारी, बोलण्यासाठी आसुसलेली, थोडी लाजाळु, थोडी भित्री, पण खुप प्रेमळ, आणि त्यातच अशात ती त्याच्या कवितांची फॅन झालेली!

तिचे कपडेही आकर्षक रंगबेरंगी असायचे, तिच्यासारखेच!..आपल्या निरागस हास्याने कुणालाही घायाळ करेल, अशीच होती ती!

रविंद्र मात्र सतत आपल्या कोशात जगणारा, कसल्या ना कसल्या विचारात मग्न, घार्‍या डोळ्यांचा, स्वभावाने बुजरा, कुठल्याही मुलीच्या डोळ्यात डोळे घालुन बोलायची त्याची हिंमत व्हायची नाही, असा! खरं तर शाईन मारणार्‍या मुली त्याला अजिबात आवडायच्या नाहीत, मुलींचे नखरे झेला, त्यांना गोडगोड बोला, त्याला जमायचे नाही, म्हणुन मुलींपासुन तो दोन हात अंतर राखुन असायचा, कामापुरतंच बोलायचा, मात्र ऋचाच्या सहवासात त्याला वेगळाच आपलेपणा जाणवायचा, दोघांचेही मुळ स्वभाव एकदम खुलुन आले होते.

मागच्या सहा महीन्यात एखादाही दिवस आणि एकही रात्र अशी नव्हती, की त्यांनी मोबाईलवरुन एकमेकांशी चॅटींग केली नसेल, एखाद्याने प्रतिक्रिया द्यायला उशीर केला की दुसर्‍याची चिडचिड व्हायची, असं व्यसन जडलं होतं.

हा हवाहवासा सहवास इथपर्यंतच आहे का आपण आयुष्याभरासाठी जोडीदार असणार आहोत, हा प्रश्न अनुत्तरीत होता आणि म्हणुणच की काय मागच्या एक महीन्यात ते लपुन छपुन अनेकदा एकमेकांना भेटले होते, आणि गजबजलेल्या हॉटेलांपेक्षा त्या दोघांना शांत, पवित्र वातावरण असलेलं मंदीरच जास्त आवडायचं.

आज मात्र रविंद्रच्या मनात वेगळीच खळबळ चालली होती, त्याच्यातला बदल त्याच्या मित्रांना केव्हाच जाणवायला लागला होता, आणि हॉस्टेलचे सारे मित्र त्याला त्याच्या ह्या खास मैत्रीणीबद्द्ल खोदुन खोदुन विचारायचे, त्याने तोंडाला कुलुप लावलं होतं, मग त्याला अनाहुत सल्लेही मिळायचे,

“रव्या, पोरगी पटवलीस, पण काही केलंस का नाही?”

“अरे, बी ए मॅन, सहा महीने झाले, अजुन काहीच केलं नाहीस? हातात हात पण घेतला नाहीस अजुन, वेस्ट आहे लाईफ तुझी”

“एक किससुद्धा घेतला नाहीस!”

“थु तुझ्या जिंदगीवर, आम्ही असतो तर आतापर्यंत_______________”

त्याच्या पोहचलेल्या मित्रांच्या अनेक खर्‍याखोट्या, रसभर्‍या कहाण्या त्याने तिखटमीठ लावुन ऐकल्या होत्या, अनेकदा त्यांची उडवली होती, पण आज त्याची वेळ आल्यावर तो गोंधळुन गेला होता, “ती मैत्रीण आहे की नुसता टाईमपास आहे आपल्यासाठी?, छे! छे, आपण इतके थिल्लर वागु शकत नाही, असं म्हणुन तो मनात आलेले शारिरीक आकर्षणाचे विचार झटकुन टाकायचा.

पण कितीही नाही म्हणलं तरी रविंद्रला तिच्या शरीराचे आकर्षण वाटु लागले होते, एकवीस बावीस वर्षाच्या त्या कोवळ्या वयात हार्मोन्स शरीराला छळत असतात, रोज डोळे मिटले की तो तिचा हात हातात घ्यायचा, तिला कुशीत घ्यायचा, थोपटायचा, तिच्यासाठी गाणी गायचा, ते दोघे डान्स करायचे, आपण नवरा बायको आहोत, अशा स्वप्नरंजनात रंगुन जायचा.

पण हे मनाचे खेळ आता त्रासदायक ठरत होते, त्याची औरंगाबाद सोडण्याची वेळ जवळ आली होती, जाण्याआधी आज ते भेटणार होते, कदाचित शेवटचं, हे आठवुन त्याचे अश्रु पुन्हा पुन्हा पापण्यांचा बांध ओलांडण्यासाठी धडका देत होते, त्याच्या भावनिक स्वभावाला ते जास्त काळ रोखणं, शक्यही नव्हतं, पण त्याने स्वतःलाच धीर देऊन आतापर्यंत स्वतःला कसंबसं सावरलं होतं!

“नाही रविंद्र, आपली मैत्री इतकी उथळ नाहीये, भावनांच्या भरात वाहु नकोस”, त्याचं एक मन त्याला समजावत होतं. पण आज त्याचा इरादा पक्का झाला होता, संधी मिळताच तो तिला स्पर्श करणार होता, “ती माझीच आहे, माझी आहे ती, आज मी जगाला ओरडून सांगणार आहे, आणि तिलापण!..”

तो मंदीरात गेला, ती आधीपासुन तिथे त्याची वाट बघत बसली होती, आज पहील्यांदाच दोघेही एकमेकांना बघुन हसले नाहीत, एकमेकांना सोडुन जाण्याचं दुःख दोघांच्याही चेहर्‍यावर स्पष्टपणे जाणवतं होतं,

रोजच्याप्रमाणेच तिनेच बोलायला सुरुवात केली, आणि अखंड बडबड करत होती, तो मात्र तिच्या सौंदर्यांचं निरीक्षण करण्यात बेभान होता, तिच्या बोलण्याकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं,

“अरे, ऐकतोयस ना! आज काहीच बोलत नाहीस, काय झालयं तुला? तिने बरोबर त्याच्या मनाचे भाव ओळखले, ती म्हणाली, “आपण दुर जातोयत, याचे मलाही खुप वाईट वाटतयं रे, पण म्हणुन असं दुःखी उदास कशाला व्हायचं रे!”

“राहु ना, आपण फ्युचरमध्ये कॉन्टॅक्ट मध्ये, उद्यापासुन मी थोडीच मरणार आहे!”

“तुला छळल्याशिवाय अजिबात मरणार नाही मी, अजुन खुप खुप भांडायचंय तुझ्यासोबत!”

“मला तुला खुप मोठ्ठा इंजिनीअर झालेलं बघायचंय, तु लाल कलरची मर्सिडीज घेशील तेव्हा मला विसरु नकोस हा!” ती रविला हसवण्याचा अजुन एक केविलवाणा प्रयत्न करते.

तो ढीम्मच! शांत, आपल्यातचं हरवलेला!..

काय बोलावं ते तिलाही कळत नाही आणि त्यालाही.

“तुला माहीतीये, आज आत्ता या क्षणी माझ्या आईवडीलांपेक्षा तुच मला जास्त क्लोज आहेस.”

नकळत हे वाक्य त्याचं पाषाणह्रद्य चिरुन जातं, आयला, एक मुलगी आपल्यावर किती किती विश्वास टाकतेय, आपलं मानतेयं, आपल्या भविष्याची काळजी करतेय, आपल्याला धीर देतेय आणि सावरतेय आणि आपण तिच्या शरीराच्या स्पर्शासाठी आसुसलेले, भुकेले कसे असु शकतो? त्याला स्वतःला प्रचंड अपराधी वाटायला लागतं,

“नको काळजी करु रे, तुला चांगला जॉब लागेल, तुझी सगळी, सगळी एकुणएक स्वप्नं पुर्ण होतील आणि जेव्हा तु खुप खुप मोठ्ठा मोठ्ठा होशील तेव्हा तुझ्या ह्या वेड्या बेस्ट फ्रेंडला अजिबात विसरायचं नाही हं!”

“आज मी किती मोठ्ठा झालो, माहीत नाही, पण नाहीच विसरु दिलसं, ह्या मनातुन तु स्वतःला, पिल्लु!, म्हणुन तर आज हा लेख लिहतोय!”

त्या शेवटच्या भेटीला आज बारा वर्ष झाली, ते दोघे आजपर्यंत एकमेकांना भेटले नाही. त्यांच्या दोघांत प्रेम होतं का?, का फक्त आकर्षण होतं?, तीव्र ओढ होती, की ते दोघांना तेव्हा फक्त एकमेकांची मानसिक गरज होती?

जीवाला वेड लावणारी, जगावेगळी, अनोखी मैत्री, मात्र त्यांच्यात निश्चित होती,

“मैत्र जीवांचे!”

धन्यवाद!..

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

1 Response

  1. jayant buwa says:

    पंकज जी नेहमी प्रमाणे’बेस्ट’च तुम्ही दिलयं,धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!