दैव

daiv-marathi-story-ktha

“जातंय गो मिया भटांगेर, बेगीना बोलवाल्यानी हा, टायम झालो तर वगीच आराडतले ”

भीमा घराच्या बाहेर पडता पडत बोलला पण कावेरीने त्याला अडवलं.

“पेज केलंय ती जेवन चला, थय कितक्या काम आसत देवाक म्हायती आणि ती भटीण जेवक दीयतच ह्याचो काय इश्वास नाय”

“पेज कशी केलंय तू,तानुळ तर नाय मगो घरात ?”

घरातले तांदूळ कधीच संपलेले होते. कावेरीने रात्री मुलांपुरताच भात केलेला आणि ते दोघे तसेच झोपले होते.

“चमच्याभर होते हो ते पाणी घालून उकडलय. निस्ता पाणी पिण्यापेक्षा ता बरा पोटाक जरा थंडाय येतली”

कावेरीने चूलीवरचं मडकं खाली काढलं. त्यात जेमतेम चमचाभर तांदूळ होते पण तिने चांगलं चार तांबे पाणी टाकून ते शिजवलं होत. ते पेल्यात ओतून भीमाला देत तिने कालपासून मनात घोळत असलेला विषय काढला.

“पोरग्यांचे शाळा सुरु जातत चार दिसानी, काय करुचा माझा तर डोक्याच चलना नाय. पुस्तका शाळेतसून दितले पण कपडे, बाकी बारीकसारीक सामान ह्या खयसून हाडायचा. ह्य तर तानुळ हाडूक पण पैशे नाय”

“बगुया कसा जाता ता,देवाच्या मनात आसत तर शिकतली पोरा नायतर काय एक वरास घराकडे बसवया आणि फुडल्या वर्सा घालूया शाळेत. ह्या वर्सा निस्ती पनवती लागली हा तर मिया तरी काय करू त्याका.

रोज सकाळी देवळात नौबत करून, जत्रेक आणि शिगम्याक ढोल बडवन कायतरी गावायचा पण गावात झाली दुफळी आणि देवळाक लागला कुलूप.

जत्राय नाय,शिगमोय नाय आणि नौबतय नाय. केवा ह्यांचा झगडा मिटतला कोणाक म्हायत. आसो.  बगुया करतय कायतरी आज भटांगेर त्यांच्या संडासाची टाकी उसपूक बोलवल्यानी हा थय गावतीत चार-पाचशे दोन दिवसांचा काम आसा”

गावाबाहेरच्या त्या वाड्यातल्या जवळपास सगळ्याच घरांची अशीच अवस्था होती. भीमा आपल्याच तंद्रीत गावाची वाट तुडवत होता.

“वो काकीनू घोटभर च्या तरी दिया आदी,इल्याबरोबर कामाक काय लायतात”

पोटात पडलेला भुकेचा आगडोंब चहाने थोडा तरी शांत झाला असता म्हणून भीमाने चहा मागितला.

“दे त्यास लवकर चहा, काम सुरु करुंदे एकदाचा तो, दोन दिवस झाले परसाकडे जायस मिळत नाहीये. मज ह्या आमच्या संडासाची सवय दुसरीकडे धड होतच नाई. जा रे भीमा पाठल्या पडवितली करटी घेऊन ये देणार ती तुज चहा”

काकू पेल्यातून चहा घेऊन आल्या. लांब उभं राहून त्यांनी शक्य तितक्या वरून चहा त्याच्या करवंटीत ओतला. एवढ्या वरून ओतल्यामुळे थोडा चहा बाहेर पडला थोडा भीमाच्या हातावर पडला पण फुsssर फुsssर करून भीमाने तो चहा पिला.

असला दुध घातलेला चहा तो कित्येक महिन्यांनी पीत होता.  चहा पिऊन झाल्यावर करवंटी लांब फेकून भीमा उठला. त्याने कुदळ हातात घेतली.

संडासाची टाकी खूप जुनी होती. त्यावर भरपूर माती होती ती काढून झाल्यावर फरशा दिसणार होत्या आणि त्या काढल्यावर ती टाकी उघडी झाली असती.

भीमा हळूहळू कुदळ मारून माती फावड्याने बाजूला काढत होता पण त्याच्या डोक्यात मात्र मुलांचाच विचार होता. त्याला त्याच्या दोन्ही मुलांना चांगल शिकवायचं होतं.

त्याचं आयुष्य जसं फुकट गेलं तसं मुलाचं जाऊ नये असं त्याला वाटत होतं.. विचाराच्या तंद्रीत मारलेली कुदळ सरळ फरशीवर बसली आणि ती जुनी फारशी तुटून भीमा त्या संडासाच्या टाकीत पडला.

अंतुकाका ओरडतील म्हणून तो कसातरी पटकन बाहेर आला पण त्याच्या पायाला तुटलेली फारशी बऱ्याचठिकाणी लागलेली होती. फरशीचा एक टोकदार तुकडा पोटरीत घुसला होता, पोटरीतून भळाभळा रक्त वाहत होत.

आवाज ऐकून अंतुकाका बाहेर आले. त्यांनी तो घाणीत बरबटलेला भीमा आणि त्याच्या पायातून वाहणारं रक्त बघितलं आणि त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला.

“एक काम करायस सांगितले तर ह्याने दहा कामे वाढवून ठेवली माझीच. आता हा इथे मेला बिला तर त्यास कोण बघणार, आता काय मी जाऊ ह्यास हात लावायस आणि बाटवून घेऊ स्वतःस. एक एक त्रास आहे नुसता माझ्यामागे.

अगो ह्या भीमाच्या घरी जाऊन त्याच्या बायकोस सांगून येतो तो पडलाय म्हणून, तीच काय करायचं ते बघेल आणि येताना रामास सुद्धा बोलावतो. तरी तुझ आधीच सांगत होतो रामास बोलावूया कामास म्हणून पण तुझ भीमाचे कौतुक खूप.”

अंतुकाका आपली गाडी स्टार्ट करून भीमाच्या घरी जायला निघाले. हे काम सुद्धा आता रामाला मिळणार हे त्यांच्या बोलण्यातून भीमाला समजले होते.

हळूहळू त्याची शुध्द हरपू लागली. ती पायातून जाणाऱ्या रक्तामुळे होती की मुलांच्या शाळेच्या चिंतेने ते मात्र त्याला समजत नव्हते.

लेखन- सचिन अनिल मणेरीकर

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!