दत्तकप्रक्रियेतले वास्तव…. मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया सोपी कधी होणार?

dattakprakriya kashi aste

दोघांच्या मध्ये घेतले तेव्हा ती तिच्या नव्या आईच्या कुशीत शिरून एकदम शांतपणे झोपली, जणू जन्मल्यापासून ती आईच्या कुशीतच झोपत आली आहे. त्यानंतर आजतागायत ती आईच्या कुशीतच झोपत आली आहे. आता ६ वर्षांची झालीये, वेगळा बेड, वेगळी खोली केली तरी रात्री कधीतरी झोपेत उठून माझ्या किंवा आईच्या कुशीत शिरते, बरं वाटत! तिची आई वसू तिच्याशी कधीमधी बोलताना, तुला ९ महिने पोटात वाढवलंय… वगैरे बोलुन जाते, तेव्हा मला जरा तिला जमिनीवर आणावं लागतं.

लेख वाचण्याआधी- हा लेख केवळ आमचे मुल दत्तक घेताना आलेले अनुभव सांगण्यासाठी लिहिलेला आहे. स्मरण रंजन म्हणा हवेतर. ह्यातील अनुभव वाचून कोणी मुल दत्तक घेण्याच्या विचारापासून परावृत्त होऊ नये. तसे झाल्यास मला मनापासून दु:ख होईल. ह्याबाबत मला आलेले अनुभव सगळ्यांनाच येतील असे नाही.

(शिवाय ह्या घटनेला आता ६ वर्षे उलटून गेली आहेत. मध्यन्तरीच्या काळात सरकारी नियम आणि दत्तक घेण्याची प्रक्रिया ह्यात बरेच फरक झालेले आहेत ज्याबद्दल मी अनभिज्ञ आहे.)

vsudha and mihika

सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो कि हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे. पण तो मला पडलेला नाही. वसुधाने(बायको) मानसिक समुपदेशक म्हणून काम करायला सुरुवात केल्यापासून एक एक वल्ली येऊन भेटतात त्यातल्याच एकाने विचारलेला हा प्रश्न.

आता बायकोकडे येणाऱ्या रुग्णांबद्दल लिहिणे नैतिकतेला धरून नसल्याने त्याबद्दल जास्त लिहित नाही पण या प्रश्नाने विचारचक्र सुरु झाले.

आम्ही आमची एकुलती एक मुलगी दत्तकच घेतली आहे आणि त्या सगळ्या सरकारी प्रक्रियेतून जाताना अनेक अनुभव आले, अनेक लोक भेटले त्यांच्या प्रतिक्रिया, अनुभव (बऱ्याचदा अननुभव).

न मागता दिलेले सल्ले आणि मतं ह्या क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार, सरकारी लोकांचा तुच्छ आणि बेदरकार असा attitude, सगळ्याचा यथेच्छ अनुभव घेतला आणि मूल दत्तक घेणं हा एक मूर्खपणा आहे असं काहीकाळ मलाही वाटू लागलं होतं. (अर्थात वसूच्या पेशंटला काही हि अशी खुदाई खिन्नता नव्हती आली!

त्याच्या दत्तक घेतलेल्या मुलामध्ये आणि त्याच्या मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि तो हे मूल जैविक दृष्ट्या आपलं नाही म्हणून असं झालंय म्हणून मूल दत्तक घेणे मूर्ख पणा असतो का? असे विचारत होता.)

याबाबतीतला आमचा सरकार/ कोर्ट विषयीचा अनुभव दिव्य आहे. एकतर ह्यातला भ्रष्टाचार भयानक आहे. मला आश्चर्य वाटले, पण पुण्यात मुलगा दत्तक हवा असेल तर ३-४ लाख रुपये मोजावे लागतात आणि मूल जर १ वर्षापेक्षा कमी वयाचे असेल तर हि रक्कम वाढते.

नाहीतर ३ ते ५ वर्षाची प्रतीक्षा करावी लागते. मुलीला दत्तक घ्यायचे असेल तर काही पैसे लागत नाहीत. मुलगा असो मुलगी आम्हाला काही फरक पडत नव्हता आणि आम्ही पैसे मोजून काही मूल दत्तक घेणार नव्हतो म्हणून मग अहमदनगरच्या स्नेहालय या प्रसिद्ध अनाथालयाचे गिरीश कुलकर्णी (हीच ती आमीर खानच्या सत्यमेव जयते मध्ये दाखवली गेलेली संस्था-त्यावेळी त्यांच्याकडे एकही लहान मुल नव्हते) यांनी सल्ला दिला कि तुम्ही एक युनिवर्सल असा अर्ज तयार करून सगळ्या महाराष्ट्रात जिथे तुम्हाला माहिती मिळेल तिथल्या अनाथाश्रमात नेऊन द्या.

तिथल्या कोर्टात वारंवार जायची तयारी ठेवा. मी देखील माझ्या ओळखी मध्ये सांगून ठेवतो पण सगळी सरकारी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल त्यात काही पळवाट/ लाच देऊन काम करून हवे असेल तर माझी मदत अपेक्षु नका.

झालं, मग आमची धावपळ सुरु झाली. पहिलं म्हणजे दोघांच्या चारित्र्याचा दाखला तो पोलिसांकडून घ्यायचा त्याकरता पुण्याच्या कामिशनर हाफिसात खेट्या मारल्या.

मग तिथून आम्ही जिथं राहत आहोत तिथल्या पोलीस ठाण्यापर्यंत वाऱ्या केल्या २ महिन्यांनी माझा दाखला आला पण बायकोचा नाही, कारण ती मुळची नगरची, लग्न होऊन २-३ वर्षच झालेली, मग इथल्या पोलिसांना कसे कळणार कि ती कोणी डॅम्बीस गुन्हेगार वगैरे तर नाही ना!

मग पुणे ते नगर अन् नगर ते पुणे अशा खेट्या झाल्या. अखेरीस तो दाखला मिळाला. मग केस पेपर, आम्ही दोघांनी “मला मुल दत्तक का घ्यायचे आहे” हे सविस्तर सांगणारा वेगवेगळा लिहिलेला निबंध वजा शपथनामा, आमचे वैद्यकीय अहवाल (फक्त ससून च्या डॉक्टरांनी सही केलेलेच, का? हा प्रश्न विचारायची सोय नाही) उत्पन्नाचे दाखले, मालमत्ता, कर्ज, विमा, गुंतवणुकीची कागद्पत्र वगैरे सोपस्कार झाले.

बायकोच्या आणि माझ्या ओळखीच्या दोघा मित्रांचे (म्हणजे वेगवेगळ्या हां, नवरा बायकोला ओळखणारा समान मित्र असला कि त्याची विश्वासार्हता संपते) आम्ही चांगले लोक असल्याची नोटरी समोर दिलेली ग्वाही (मग पोलिसांचे character certificate कशाला?…… सुरळी करून….. जाऊ दे…)

त्यांनी फोन केला म्हणून धावत गेलो. बायकोची मावशी तिकडे राहते त्यांनीच सगळी माहिती काढली होती. तिथल्या राठोडनावाच्या समाजसेवकाने सांगितले कि मुलगी दत्तक मिळेल पण प्रक्रिया पूर्ण करायाला २-३ वर्ष जातात.

पण मधल्या काळात फोस्टर केअर (यशोदा नन्दासारखं) म्हणून मुलगी तुंमच्या कडे देऊ पण काही घोळ झाला तर मुलगी काढून घेऊ (जशी हप्ते नीट भरले नाहीत कि गाडी उचलून नेतात तसे) शिवाय त्याची अपेक्षा होती कि त्याच्या अनाथालयाला आम्ही काही तरी देणगी द्यावी.

नसती दिली तर समाज सेवकाचा सर्च रिपोर्ट आणि न हरकतीचा दाखला त्याने अडकवला असता हे सांगणे नकोच (अनाथालय नांदेडच्या तत्कालीन नायब तहसिलदाराच्या बायकोच्या वडिलांचे होते हेही इथे मुद्दाम सांगायाला हवे).

मी म्हटले देतो, पण चेकने देणार आणि रीतसर पावती घेणार, तो आढेवेढे घेऊन तयार झाला… हे काय चेकने दिलेले पैसे लंपास करू शकत नाहीत कि काय!

आमची आपली मनाची एक समजूत झालं अन् काय! मग देणगी दिल्यावर त्याने बाकी सगळी शहानिशा करून, घरी पुण्याला भेट वगैरे देऊन त्याचे रिपोर्ट तयार केले आणि मग फोस्टर केअर अग्रीमेंट नांदेडला करून मुलगी आमच्या हाती सुपूर्द केली. ती तारीख होती ८ मार्च २०११ जागतिक महिला दिन पण हा मात्र खरोखर एक योगायोगच होता.

राठोड ने त्याचे काम बरोबर दीड महिन्यात पूर्ण केले. मग आमच्या कोर्टाच्या वाऱ्या सुरु झाल्या. विशेष गोष्ट म्हणजे कोर्टात हि केस म्हणून उभी राहते.

कौटुंबिक न्यायालय वगैरे नाही, आपलं (आपलं कसलं डोम्बल्याचं..) नेहेमीचं सत्र न्यायालय. तिथे मी, सासू, सासरे, बायको, तिची मावशी, मावशीचे यजमान दीपक काका आणि ३ महिन्याची हि पोरगी घेऊन आम्ही उभे.

न्यायाधीशाला पुरावा म्हणून जिवंत पोर दाखवायला नको? शेजारी हातकड्या घातलेले गुन्हेगार येजा करतायत, त्यातले कोणी आमच्या शेजारी येऊन बसतात (आपली काय हिम्मत त्यांना इथे बाई माणसाच्या शेजारी बसू नका म्हणायची).

संडास लघवी करायची सोय तर दिव्यच. वकील म्हटला सकाळी ११ वाजता कोर्ट सुरु होते तुम्ही १०.३० ला या पहिली तुमचीच केस घेऊ १० मिनिटात सोडतो. म्हटलं १०.३० का १०.०० वाजता येतो पण लवकर मोकळं करा.

न्यायाधीशाला काय सुरसुरी आली काय माहित, आमच्या ऐवजी त्याने त्याच्या मनानेच एक दरोड्याची केस पहिली घेतली. मग दुसरी असं करत तिथे बाहेरच ४.०० वाजले.

तिथे आम्ही १० ते ४.०० काहीही न खाता पिता (म्हणजे चहा आणि बिस्कीट फक्त, आणि मी आणि दीपक काका मध्ये मध्ये खाली जाऊन सिगारेटी ओढून यायचो तेवढच) उभे.

आपण कुठे गेलो आणि आपल्याला पुकारले तर! नकोच ते म्हणून. शेवटी माझा संयम तुटला, वकिलाला म्हणालो तुम्ही तर म्हणाला होतात १० मिनिटात सोडतो, ३ महीन्याचं लहान पोर घेऊन हे इथे आम्ही असे ६-६ तास उभे आहोत. तुम्हाला काही लाज वाटत नाही?… वगैरे वगैरे बराच बोललो असेल.

वकील शांतपणे म्हणाला “माझ्यासमोर काय चिडायचं ते चीडा आत जाऊन काही बोलू नका. माझा एक अशील होता. म्हणजे आहे अजून, त्याने अशीच मुलगी दत्तक घेतली आणि त्याची बदली झाली मद्रासला. खेट्या घालाव्या लागतात म्हणून जज समोर कटकट केली.

माझे ऐकले नाही, आज ७ वर्ष झाली, ७ वर्षाच्या मुलीला घेऊन दर ६-७ महिन्यांनी येतो. त्या मुलीला काय वाटत असेल? तिला काय काळात नाही? त्यांची तिला सांगायची इच्छ होती का?

असेल तर कधी आणि कशाप्रकारे सांगायचे होते? ह्या असल्या गोष्टींशी कोर्टाला घेणं देणं नाही. बघा बुवा!“ झालं, आपण गार. सगळी हवाच निघून गेली.

शेवटी बेलीफाने ४.३० ला आत घेतले. तिथे मागे उभे राहिलो. अशीच काहीतरी दोन भावांच्या भांडणाची केस चालू होती. मी आता आजचा दिवस गेलाच आहे, आता जरा हि मजा ऐकून मनोरंजन तरी होईल. अशी मनाची समजावणी करून केस ऐकायला लागलो.

जजचं काही आमच्याकडे लक्ष नव्हतं. पण अचानक मिहीकानी (आमची मुलगी) आईच्या गळ्यातले मंगळसूत्र ओढले (माझी बायको मंगळसूत्र घालत नाही पण वकील म्हटला, “तुमचे पुढारलेले विचार घरी ठेवा पुण्याला आणि नवऱ्याकरता नाही तर जज करता म्हणून मंगळसूत्र घाला”) म्हणून बायकोने ते सोडवून घेतले तसं तिने जोरात भोकाड पसरले. आता जजच काय, अख्ख्या कोर्टाचं लक्ष गेलं आणि जजने आम्हाला पुढे बोलावलं म्हणाले, “अरे यांची केस तर आजची पहिलीच होती ना, मग हे वेळेवर आले नाहीत का?”

घ्या आता कमाल झाली पण मी काही बोललो नाही कसनुसं हसलो फक्त….

“हा, घ्या ह्यांचे पेपर्स”…..  जज म्हणाला “काय करता तुम्ही?.”…

“टाटा मोटर्स मध्ये नोकरी करतो सर, पुण्याला.”

“टाटा मोटर्स ते काय आहे?”…..  जज

“(अहाहा ! काय विद्वान, बहुश्रुत माणूस जज बनतो. – हे आम्ही मनात) सर आम्ही गाड्या बनवतो ते सुमो, इंडिका
वगैरे.”

“बरं बरं. मुलीला सांभाळणार ना नक्की. टाकणार तर नाही ना?”

“(वा काय प्रश्न आहे!) नाही सर, नीट सांभाळू”…. मी

“अहो पण नाही सांभाळले तर, आम्ही काय करणार?”

आता याचं काय उत्तर देणार! मी कसनुसा चेहरा करून म्हटलं, “नाही नाही, नीट सांभाळू.”

“पण टाकली तिला तर, तिने काय करायचे? काही पैसे ठेवले का तिच्या नावाने?”

हे असे काही असते हे आम्हाला काही माहित नव्हते? म्हटले नाही ठेवले

मग ठेवले पाहिजेत कि नाही? किती ठेवाल?”……  जज म्हणाला (sorry म्हणाले)

म्हटले माझी साधारण ३-४ लाख ठेवायची तयारी आहे.

जज म्हटला, “ठीक आहे १ लाखाची FD करा तिच्या नावाने, १८ वर्षाची आणि पावती जमा करा कोर्टात आणि मग ६ महिन्यांनी कोर्ट ऑर्डर घेऊन जा. (का? ६ महिन्याने का ? मनात… मनात, सगळं मनात) आता प्रोविजनल ऑर्डर द्या ह्यांना”(हुश्श!)

आश्चर्य म्हणजे वसुधा म्हणजे जी बाई मिहीकाची आई होणार होती तिच्याकडे मिहीकाच्या काळजीने प्रश्न विचारणाऱ्या जजने ढुंकूनही पाहिले नाही.

आता हि FD फक्त सरकारी बँकेतलीच लागते बरं का! खाजगी किंवा सहकारी बँकेतली चालत नाही. मग पुण्याला आलो आणि SBI मध्ये गेलो FD करायला तर ते म्हणाले जास्तीजास्त ८ वर्षांची FD होते. त्यांना कोर्टाची ऑर्डर दाखवली पण ते पण सरकारी कर्मचारीच, नाही म्हणजे नाहीच बधले.

मग महाराष्ट्र बँकेत गेलो. तिथे माझी ओळख होती. तिथले ओळखीचे काका म्हणाले FD १८ वर्षाची होणार नाही पण मी त्यावर शिक्का मारून शेरा देतो कि PAYABLE TO THE RECEIPT HOLDER ON OR AFTER HER 18 TH BIRTHDAY’ आणि तू एक बाहेरून नोटराइज्ड प्रतिज्ञापत्र करून घे बँक १८ वर्षाची FD देत नाही म्हणून असा शेरा घेतला आहे त्यावर मी सही शिक्का देतो.

मग मी तसे करून ती FD घेऊन कोर्टात (नांदेडला) गेलो आणि त्यानंतर परत ६ महिन्यानंतर जाऊन ऑर्डर घेतली. तुम्हाला वाटेल झालं सगळं, गंगेत घोडं न्हालं एकदाचं, पण नाही आता तिचा जन्म दाखला तो काढायचे आणि बाप म्हणून माझे नाव लावायला गेलो.

तर नांदेड महानगर पालिका म्हणते तिचा जन्म दाखला कांचन राठोड ह्या नावाने आधीच बनला आहे. (काय असते…. हे अनाथ आश्रमवाले मुलांची काही नावं ठेवून त्यांचे दाखले आधीच काढून ठेवतात. त्यांचा दोष नाही) मग पुन्हा निरनिराळी कागदपत्रं, ना हरकत दाखले हे अन् ते असले सगळे सोपस्कार केले.

त्याकरता नांदेडला ७-८ दिवस राहिलो. मे महिन्याच्या चांदण्यात फिरलो आणि ते काम केले. सगळं होऊन तो जन्मदाखला हातात घेतला तर त्या जन्ममृत्यु नोंदणी कार्यालयातली बाई म्हणते कशी, “घ्या झालं सगळं तुमचं काम. आता नीट काळजी घ्या मुलीची?”

एरवी मी चिडलो असतो काहीतरी खारट तुरट बोललो असतो. पण मी इतक्या कष्टानंतर मिळालेलं ते मिहिकांच Birth Certificate डोळे भरून बघण्यातच गुंगलो होतो.

जाता जाता आणखी एक, कोर्टात भिंतीवर दिशा लिहितात तिथे उत्तरच्या ऐवजी डोंगराकडे, पूर्वेच्या ऐवजी रानाकडे, पश्चिम च्या ऐवजी नदी कडे आणि दक्षिणच्या ऐवजी समुद्राकडे असे लिहिल होतं. त्याऐवजी तुरुंगाकडे, फाशीघराकडे अंदमानकडे असे काहीतरी लिहायला हवं होतं नाही का?

mihikaमूल दत्तक घेणे हा एक मूर्खपणा खरंतर नाही. पण तयारी नसताना मूल दत्तक घेणे हा ठार मूर्खपणा आहे. म्हणजे समुद्रात पोहायला जाणे हा मूर्खपण नाही पण पोहायला येत नसताना पोहायला जाणे हा नक्कीच मूर्खपणा आहे.

आमच्या आयुष्यात मिहिका आल्यापासून ती आमची जैविक (कसला भंगार शब्द आहे का – Biological Child जरा तरी बरं आहे.) मुलगी नाही हे जणू विसरूनच गेलो आहोत.

म्हणजे पाहिल्या रात्री, सासुबाईंनी जुन्या साडीची झोळी करून त्यात तिला झोपव म्हणून सांगितले, आम्ही तिला झोळीत घातले तेव्हा तिने रडून हलकल्लोळ केला होता.

शेवटी तिला झोळीतून काढून दोघांच्या मध्ये घेतले तेव्हा ती तिच्या नव्या आईच्या कुशीत शिरून एकदम शांतपणे झोपली, जणू जन्मल्यापासून ती आईच्या कुशीतच झोपत आली आहे.

त्यानंतर आजतागायत ती आईच्या कुशीतच झोपत आली आहे. आता ६ वर्षांची झालीये, वेगळा बेड, वेगळी खोली केली तरी रात्री कधीतरी झोपेत उठून माझ्या किंवा आईच्या कुशीत शिरते.

बरं वाटतं! तिची आई वसू तिच्याशी कधीमधी बोलताना, तुला ९ महिने पोटात वाढवलंय… वगैरे बोलुन जाते, तेव्हा मला जरा तिला जमिनीवर आणावं लागतं.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!