आर्थिक गुंतवणुकीचा किचकट विषय गोष्टीरूपात सांगणाऱ्या पुस्तकाचा सारांश

आर्थिक गुंतवणुकीचा किचकट विषय

आर्थिक गुंतवणुकीसारखा किचकट विषय गोष्टीरुपात सांगण्याची सुरुवात ‘बॅबिलॉनमधील सर्वाधिक श्रीमंत माणुस’ या पुस्तकापासून झाली. याचाच सारांश आज या लेखात वाचा. पुस्तकाचा संदर्भ जरा जुना असल्याने एखादा पॉईंट आपल्याशी रिलेट होत नाही असं वाटू शकत. पण मुद्दे मात्र आर्थिक समृद्धीसाठी अगदी महत्त्वाचे आहेत.

आज मी तुम्हाला समरी सांगणार आहे, श्रीमंत होण्यासाठी काय करावं हे सांगणारं आणि माझ्या फेव्हरेट पुस्तकांपैकी एक असणारं पुस्तक, ‘The Richest Man In Babilon’, ज्याच्या मराठी अनुवादाचं नाव आहे ‘बॅबिलॉनमधील सर्वाधिक श्रीमंत माणुस’!

(हि पुस्तके खरेदी करायची असतील तर त्यांची ऍमेझॉन वरील खरेदीची लिंक लेखाच्या शेवटी दिलेली आहे.)

जॉर्ज सॅम्युअल क्लासन ह्या अमेरीकन व्यक्तीने हे पुस्तक लिहलं, पुर्ण जगभरात ते खुप लोकप्रिय झालं, रोजच्या जीवनात आर्थिक अडचणींनी तंग असणार्‍या लोकांसाठी हे पुस्तक वरदान आहे.

आर्थिक गुंतवणुकीसारखा किचकट विषय गोष्टीरुपात सांगण्याची सुरुवात ह्या पुस्तकापासुन झाली.

अंदाजे, आठ हजार वर्षांपुर्वी ‘बॅबिलॉन’ हे भव्य, समृद्ध व्यापारी शहर मध्य आशियात वसलेले होते. युफ्रेटीस नदीच्या काठावर असलेल्या, आणि सुपीक जमिन असलेल्या ह्या शहराचं जगभरातल्या लोकांना प्रचंड आकर्षण होतं.

इथले ऐतिहासिक संदर्भ घेऊन हे पुस्तक लिहले गेले आहे, त्यामुळे कथेत मन गुंतत जाते आणि उत्कंठा वाढते.

कथेचा नायक बंसीर नावाचा एक कुशल रथ तयार करणारा कारागीर आहे, दिवसभर खुप परिश्रम करुनही जेमतेम उत्पन्न कमवतोय, पण त्याची स्वप्ने मोठी आहेत, पैशाअभावी मन मारुन जगावं लागतं. ह्या विचाराने तो दुःखी होतो आणि कोब्बी नावाच्या मित्राजवळ मन हलकं करतो.

कोब्बी त्याला गावातला धनाढ्य व्यक्ती, गडगंज व्यापारी ‘अर्काद’ ह्याला श्रीमंत कसं व्हायचं ह्याबद्दलची गुपितं विचारण्याचा सल्ला देतो.

बंसीर ‘अर्काद’ कडे जाऊन गरीबीला कंटाळुन गेल्याचं आणि खुप सारे पैसे कमवुन श्रीमंतीचं आयुष्य जगण्याची इच्छा असल्याचं सांगतो, त्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती करतो.

अर्काद आनंदाने ह्या गोष्टीसाठी तयार होतो आणि काही आठवडे त्याला ट्रेनिंग देतो, ज्याप्रमाणे अर्जुनाने सर्व मानवजातीचा प्रतिनिधी बनुन श्रीकृष्णाला वेगवेगळे प्रश्न केले आणि भक्तीचं गुढ तत्व आपल्या सार्‍यांसाठी खुलं केलं, त्याच धर्तीवर, अर्कादने बंसीर ला समजवलेली ही महत्वाची तत्वं आयुष्यात आणुन अनेक लोकांचा उद्धार झाला.

श्रीमंत होण्यासाठी अर्कादने बंसीरला निमीत्त करुन आपल्या सर्वांसाठी ‘श्रीमंत कसं बनावं’, याची सात गुपित सुत्रे विस्ताराने सांगितली, अशी ही कथा!

आज त्या पुस्तकाच्या अथांग सागरातुन निवडून आणलेले हे मोती, खास तुमच्यासाठी!..

सुत्र पहीले – तुमचे पाकीट फुगु द्या!

श्रीमंत होण्यासाठीचं पहीलं आणि महत्वाचं सुत्र आहे, नियमित बचत करा, हातात पैसा आला की अनेक गोष्टी तुम्हाला आकर्षित करतील, पण त्या प्रत्येक रुपयाचं मुल्य ओळखा, जसं आपण रोजचं दही पुर्ण संपवत नाही, थोडं विरजण घालण्यासाठी, उद्याच्या दह्याची व्यवस्था म्हणुन राखुन ठेवतो, ते वाटीभर दहीच उद्या खुप कामाला येते, दही साठवल्यास त्याचं लोणी बनतं, तुप बनतं!

रोजचं दुध रोज संपवल्यास लोणी-तुप कसे बनेल? अगदी तसंच महीन्याकाठी केलेली ठराविक बचत आपल्याला आधिक समृद्ध मार्गाकडे घेऊन जाते.

बचत करा. दरमहा बचतीची सवय लावा, आधी निश्चित रकमेची बचत करुन उरलेली सर्व रक्कम खर्च करा. तुम्ही जे काही कमवता, त्यातला काही भाग फक्त तुमच्यासाठी राखुन ठेवा.

खिशातला पैसा खुळखुळ करुन खर्च होण्याआधीच, आपल्या कमाईचा ठराविक हिस्सा, अशा ठिकाणी गुंतवुन मोकळे व्हा, जिथुन तो काढता येणार नाही.

सुत्र दुसरे – खर्चावर नियंत्रण असु द्या.

पैसा कधी आला आणि कुठे गेला, कळत नाही कारण आपण आपला खर्च लिहुन ठेवत नाही.

प्रत्येक रुपया कुठे खर्च झाला, हे लिहुन ठेवायची सवय निग्रहपुर्वक स्वतःला लावुन घेतल्यास, अनावश्यक खर्च सहज लक्षात येतात.
काही खर्च असे असतात, की ते आवश्यक वाटले तरी कमी करण्याजोगे किंवा पुर्णपणे टाळण्याजोगे असतात.

इथं लेखकाला अजिबात असं म्हणायचं नाहीये की एकदम कंजुष बनुन जगा,

त्याचा आग्रह एवढांच आहे, भावनेच्या भरात खर्च करुन पुन्हा पश्चाताप करत बसण्याऐवजी ती सवय मोडा.

अत्यावश्यक खर्च नक्की करा, पण उधळपट्टी नको, जीवन संतुलित असले पाहीजे.

अनावश्यक खर्च टाळल्याने, पैसे मागे पडतात. खर्चावर नियंत्रण असण्यासाठी आधी मनावर नियंत्रण हवं.

इच्छा आणि स्वप्नं तर अनलिमीटेड असणार, पण कष्टाने कमवलेल्या सर्वची सर्व रक्कम एकदाच मनमुराद खर्चुन, पुन्हा अडचणी आल्यास तोंड पाडुन, निराश होवुन बसणं, हे त्रासदायक असतं.

सुत्र तिसरे – सोन्याचा साठा वाढवा.

जुन्या काळामध्ये सोनं हेच चलन होत, त्या अर्थाने सोन्याची नाणी म्हणजे करन्सी जमा करा, असे म्हण्टले आहे.

जमलेल्या रक्कमेतुन उत्पन्नाचे, कधीही न आटणारे, अनेक स्त्रोत निर्माण करण्यात सुरुवातीची काही वर्ष खर्ची घातली, तर उरलेलं आयुष्य आपल्याला मनमोकळं, मनमुराद, पाहिजे तसं जगता येतं.

खुप कमी पैसे ज्यांच्याकडे आहेत, त्यांच्यासाठी पुढील मार्गदर्शक तत्वे आहेत.

• स्वतःची क्षमता सर्व बाबतीत वाढवावी.
• अंगभुत गुणांचा विस्तार झाल्यास आर्थिक उत्पन्नही आपोआप वाढते.
• आपल्याशी संबंधित गोष्टीचा अभ्यास करावा.
• व्यवसायातले कौशल्य वाढवत राहावे.
• आत्मलौकिक वाढेल असेच वर्तन असावे.

फुल जसे सुर्याकडे पाहुन विनासायास उमलते तसे अपार, मनापासुन केलेल्या प्रयत्नांनी आपण आधिकाधिक श्रीमंत व्हायला हवे!

श्रीमंत होणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, आपण सारे निश्चितपणे श्रीमंत होवु शकतो.

सुत्र चौथे – आपल्या खजिन्याचे नुकसान टाळा.

गुळाभोवती मुंगळे चिटकणार तसे तुमच्या पाशी जमा असलेल्या पैशाची गुंतवणुक त्यांच्याकडे करावी म्हणुन कित्येक डिएसके, मोतेवारसारखे सुटबुटात वावरणारे चलाख पण धुर्त लोक, नाहीतर बिटकॉईनवाले आणि चिटफंडवाले, तुम्हाला भरघोस परताव्याचे अमिष दाखवतील अन् पैसा पळवतील. इथेपण मनावर नियंत्रण हवं, लालुच माणसाचा घात करते. गुंतवणुक करताना कुणावर डोळे झाकुन भरवसा ठेवायचा नाही, एकदम अलर्ट रहायचं, नाहीतर पस्तावण्याची पाळी येते.

सुत्र पाचवे – आपलं घर ही फायदेशीर गुंतवणुक होवु द्या.

भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा, कर्ज काढुन स्वतःच्या घरात राहत कर्जाचे हप्ते फेडुन टाका.

प्रवासाला प्रारंभ करताना सर्व गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, पण तुम्ही निराश होवु नका,

वाटेतुन मागे फिरु नका, पुढे जात रहा!

सुत्र सहावे – जीवनाची निश्चिंतता प्राप्त करा.

• भविष्यातील तुमच्या आर्थिक मिळकतीची खात्रीपुर्वक आणि सुरक्षित सोय करा. स्वतःचे संरक्षण व्हावे, यासाठी पुरेशी सोय करुन ठेवणे आवश्यकच नाही, अपरिहार्य आहे.

• अर्थप्राप्ती करण्याची तुमची क्षमता वाढवा.

• स्वतःची सगळी देणी माणसाने वेळेवर पुर्ण करावीत, आपल्याला परतफेड करणे शक्य होणार नाही अशी देणी माणसाने निर्माण करु नयेत.

• प्रत्येक क्षणातला सुगंध आणि संधी वेचायला विसरु नका.

• आपले काम सर्वोत्कृष्टतेने करा, उरलेले शुभदेवतेवर सोपवा!

• परिस्थिती वा नशीब मनासारखे नसतील तर कामावर श्रद्धा ठेवली पाहीजे.

• आपले कष्ट, आपण गाळलेला घाम आणि त्यातुन मिळणारा आनंद हेच आपले खरे सोबती मित्र असतात.

• सहजतेने जगा आणि आनंदी रहा! तुम्ही जर आनंदी रहाल तर तुम्ही तुमची प्रगती आनंदाने करु शकाल!

• आपण आपल्या कुटुंबाची व्यवस्थित काळजी घ्यावी, जेणेकरुन आपल्या कुटुंबातील माणसे आपल्याबद्दल चार चांगले शब्द उच्चारतील!

सुत्र सातवे – अर्थप्राप्तीची आपली क्षमता वाढवा!..

• आपल्या क्षमतेचा पुर्ण विनियोग करायला शिका.

• वेळ वाया घालवणे हे आयुष्य वाया घालवण्यासारखेच असते, वेळेचा नेमका आणि योग्य वापर जर केला, तर खुप काही आपल्या हाती लागु शकते.

• शुभदेवतेच्या कृपाप्रसादासाठी प्रार्थना करा!

• सुदैवाला आपल्याकडे आकर्षुन घ्या.

• ज्या ठिकाणी माणसे समाजउपयोगी कामे करतात, वेदनाग्रस्त लोकांची सेवा करतात, तिथे शुभदेवता नेहमीच मदतीचा हात पुढे करते.

• फळाची अपेक्षा न करता बिनबोभाट काम करणार्‍यांना दैव नेहमीच साथ देते.

• यश हे तुमच्या आतुन, जिद्दीतुन जन्माला येते, बाहेरुन नाही.

• प्रत्येकाकडे महान कल्पनाचित्रे असतात, फारच थोडे त्याचा पाठपुरावा करतात.

• आपली शर्यत अर्धवट सोडु नका.

• वाटेत भेटणार्‍या अडचणी या नेहमीच आपल्यातीक क्षमतेला वा तेजाला आवाहन करीत असतात.

• जखमी व दुर्दैवी जीवांना शक्य तितकी मदत करावी. प्रियजनांशी चांगुलपणाने वागावे, भलेपणाचा एक मोठा साठा आपल्याकडे असायला हवा!

तुम्हाला आपली इच्छित संपत्ती प्राप्त होवो, अशा शुभकामना!..

धन्यवाद!

या पुस्तकांची ऍमेझॉनची लिंक 👇

‘The Richest Man In Babilon’

‘बॅबिलॉनमधील सर्वाधिक श्रीमंत माणुस’!

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!