पानिपतची (न झालेली) ४थी लढाई….

Panipat

संदर्भ –

१.कायदे आझम- आनंद हर्डीकर

2. jinnah of Pakistan- Staneley Wolpart


दरवर्षी जानेवारी १४ जसजसा जवळ येतोतशा पानिपतच्या आठवणी निघु लागतात. इथे फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर म्हणू फार झालं तर, भावनोत्कट अवाहनं, भांडण, शेरेबाजी अगदी खालच्या थराला जाऊन केलेली शिवीगाळ सगळं सगळं होतं. काहीजण काही नवी जुनी माहितीही देतात  पण हे सगळे सोशल मिडिया वगैरे काही नसताना म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळात एक बालिश वाटावा असा वाद ह्या पानपताच्या युद्धानिमित्ताने उफाळला होता. साल होते १९२६. नुकताच खिलाफत चळवळीचा (१९१९-२४) बोजवारा उडालेला होता आणि त्यानिमित्ताने हिंदू मुसलमान ऐक्याच्या शक्यताही धूसर झालेल्या होत्या. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होऊ लागली होती कि इंग्रज आणि त्यांचे राज्य काही इथे आता फार काळ टिकणार नाही . ते आज न उद्या आपला गाशा गुंडाळून मायदेशी निघून जाणार. आणि ते यायच्या आधी असलेली परिस्थिती बहुधा इथे पुन्हा उद्भवणार.

इंग्रज इथून गेल्यावर त्यांचे उत्तराधिकारी कोण होणार? त्यांच्या नंतर भारताच्या राष्ट्रीय क्षितिजावर सत्ता कुणाची येणार? असे प्रश्न समोर येऊ लागले होते. त्यातच हा देखिल ऐतिहासिक प्रश्न समोर आला कि ब्रिटीशांनी हा देश नक्की कुणाला हरवून काबीज केला? ह्याचे स्पष्ट, सरळ असे एकच एक उत्तर नव्हते. हिंदू लोक मुसलमानांची शेकडो वर्षांची सत्ता झुगारून देण्याच्या प्रयत्नात असताना आणि त्यात त्याना यश येऊ लागले असतानाच  ब्रिटीश इथे आले. असे बहुसंख्य हिंदूंचे मत होते तर मोगल सत्तेला नामोहरम करूनच ब्रिटीशांचे राज्य इथे आले असा मुस्लिमांचा दावा होता. आता खरेतर दोन्ही दाव्यांमध्ये सत्यांश होता, पण प्रत्येक बाजू आपला सत्यांश हेच पूर्ण सत्य मानून चालली होती . आणि मागे हटायला कुणीच तयार नव्हते. त्यामुळे हिंदू मुस्लीम ऐक्याच्या, सौहार्दाच्या शक्यता धूसर होऊन संघर्षाच्या शक्यता ठळक होऊ लागल्या

अशातच काही कारणाने पानिपतच्या शेवटच्या म्हणजे मराठा – अफगाण युद्धात नक्की जय कुणाचा झाला हा वाद रंगला आणि भारतभर चांगलाच गाजलाही होता. झाले असे कि मुस्लिम नेत्यांचे म्हणणे असे कि अहमदशहा दुराणी हा जवळपास १ ते १.२५ लाख  सैन्य घेऊन आला होता व त्याने संख्येने ३ ते ३.५ लाख असलेल्या हिंदू- मराठा सैन्याला पानिपतच्या युद्धात १७६१ साली  हरवले. आता ह्या युद्धात सामील झालेल्या बाजूंचे मनुष्यबळाचे व्यस्त प्रमाण जर ध्यानात घेतले तर ह्या युद्धात मुसलमानांना मिळालेला जय हा निर्णायक मानावा असा त्यांचा दावा होता तर हिंदू गटाचे म्हणणे असे कि जरी हिंदुंचा ह्या युद्धात जय नाही झाला आणि त्यामुळे काही काळ मराठ्यांचा  उत्तरेकडील साम्राज्यविस्तार थांबला तरी अफगानिस्तानकडून भारतावर परत दुसरे आक्रमण होऊ शकले नाहीच इतके त्यांचे कंबरडे ह्या युद्धातील हानीने मोडले होते. ह्याउलट मराठ्यांनी पेशवा माधवरावाच्या कारकिर्दीत पानिपतच्या पराभवानंतर झालेली हानी भरून काढून सत्ता स्थिर केली. म्हणजेच हा पराभव काही निर्णायक पराभव नव्हे. एवढेच नाहीतर लवकरच रणजीत सिंघाने आपले साम्राज्य स्थापन करून अफगाणी मुस्लिमांना भारतबाहेर  हुसकावूनच लावले होते. आणि ब्रिटिशांनी जरी मोगल साम्राज्य खालसा करून भारताची सत्ता ताब्यात घेतली असली तरी बादशाह बहादुरशाह जफर हा नामधारी राजाच होता आणि मोगल सत्ता हि प्रतीकात्माकच होती.

आता हे असले आरोप प्रत्यारोप चालू असताना, ह्या प्रश्नाचा एकदाचा कायमचा निकाल(?) लागावा म्हणून  नजीबाबाद चे मौलाना अकबर शाहखान यांनी एक मोठी विचित्र योजना समोर मांडली. त्यावेळी वादात हिंदूंची बाजू लावून धरणारे मवाळ हिंदू पंडित मदन मोहन मालवीय ह्याना मौलाना अकबर शाहखान यांनी सांगितले कि ह्या प्रश्नाचा एकदाचा सोक्ष मोक्ष लावण्यासाठी त्यांनी (म्हणजे मदन मोहन मालाविय ह्यांनी) आपली पत, ओळख, प्रतिष्ठा वगैरे पणाला लावून ब्रिटिशांकडून कोणताही हस्तक्षेप होणार नाही अशी ग्वाही मिळवावी. आज (म्हणजे १९२६ साली) भारतात ७ कोटी मुसलमान आणि २२कोटी हिंदू आहेत त्याप्रमाणात म्हणजे ७०० मुसलमान योद्धे स्वत: अकबर शाह उभे करतील आणि मालवीय ह्यांनी जास्तीजास्त २२०० हिंदूंचे सैन्य आणावे. आपण पुन्हा एकदा आणि एकच दिवस पानिपतच्या रणांगणावर युद्ध करावे. ते करताना जुनी शस्त्रेच म्हणजे तलवार भाले धनुष्य बाण वगैरे वापरावे. आधुनिक बंदुका वगैरे नको. अगदी तोफा आणि घोडे सुद्धा नको. स्वत: मालवीय ह्यांनी सेनापती पद सांभाळावे किंवा कुणाही योग्य माणसाला ती जबाबदारी द्यावी. ह्या लोकांशिवाय इतर कुणीही ह्या युद्धात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाग घेऊ नये. पण आपापल्या धर्मबंधूंचा पराक्रम पाहण्यासाठी तिथे उपस्थित असावे, व जो काही निर्णय लागेल तो उभय पक्षानी स्वीकारून स्वस्थ चित्ताने घरी जावे.

एखाद्या चित्रपटात शोभावे किंवा नाटक/कादंबरीचे विषय वस्तू व्हावे अशी ही बालिश संकल्पना ऐकून पं. मालवीय ह्यांनी नक्की काय केले! ते माहिती नाही. पण झाले मात्र काहीच नाही. एवढे मात्र खरे कि लवकरच म्हणजे २० वर्षातच ही प्रस्तावित लढाई हिंदू मुसलमान खरेच खेळले. फक्त ती मौलानासाहेबांच्या इच्छेप्रमाणे प्रतीकात्मक, एक दिवसाची आणि फक्त पानपताच्या रणांगणावर खेळली न जाता अख्ख्या भारत भर खेळली गेली. ज्यांना वाद विवादात अतिरिक्त रस होता आणि युद्ध करून ह्या प्रश्नाचा सोक्ष मोक्ष लावायची खुमखुमी होते. ज्यांनी त्या प्रतीकात्मक युद्धात भाग घ्यावा असे मौलाना साहेबानी सुचवले होते असे दोन्ही पक्षाकडचे लोक ह्या अखिल भारतीय समरात गुपचूप बघ्याच्या भूमिकेत जाऊन बसले, तर ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ह्या प्रतीकात्मक युद्धात सामील व्हायचेच नव्हते अशी जनता मात्र आपल्या सर्वस्वासकट ह्या युद्धात सामील झाली आणि सर्वस्व गमावूनही बसली. एवढ्या अल्पावधीत आणि एवढ्या प्रचंड प्रमाणावर एवढा प्रचंड हिंसाचार झाला कि त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. भले भले ह्या संघर्षाकडे पाहून भयचकित होऊन गेले. पानपताच्या आधीच्या ३ युद्धात झाला नसेल एवढा प्रचंड संहार ह्या एका युद्धात आणि अल्पावधीत झाला आणि हो परत एकदा निर्णायक पराभव किंवा विजय कुणाचाच झाला नाही. पानपताचे  ४ थे युद्ध अशा रीतीने खेळले गेलेही आणि खेळले गेले नाहीही..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.