नशीब…….

music

किती चालत आलो…
कितीक योजने रिती करोनी….
रक्त आणि मन बदलत गेलो…..
किती स्वता:चे अर्घ्य देउनि……

खूप लवकर ओळख होते या शब्दाची आपल्याला……

घरातली, आजूबाजूची, शिक्षक……..

या शब्दाचा वापर खूप करतात आणि या विषयाशी न कळत्या वयात गाठ बांधतात……गरज नसताना…..

मी नववीत होते…….शाळेत, समाजात एक “स्पेशल” वागणूक…..वी. आय. पी……व्यवस्था यांचे अनुभव कळण्याच्या वयात…… {होय आमच्या काळी……नववीत सुद्धा काही गोष्टी कळत नसत ……} तर त्या वर्षी शाळेचा मोठा काही कार्यक्रम होता….. शाळा माझी थोडीशी गरीब होती….. म्हणजे तामझाम ने वार्षिकोत्सव नाही करायची …..किंवा फार काही कार्यक्रमच नसायचे … जे असायचे ते “श्रमदान” बेसिस वरच……आणि महत्वाचं…. आमची मुलं कधी “बोर्डात ” नाही यायची…… म्हणून… गरीब….!

तर त्यासाठी सांगितिक कार्यक्रम करायचं ठरलं …… अत्यंत कडक मुख्याध्यापक….. असुन सुद्धा त्या कार्याक्रमा पुरतं….”सिनेमाची गाणी” म्हणायची संमती मिळाली असं संगीत शिक्षिका म्हणाल्या…… आणि त्यांनी काही मुलं निवडली …. अस्मादिक….. पूर्ण शाळेची …. कविता गाणारी व्यक्ती म्हणून फ़ेमस होते….. मला कधीही कविता गाण्यासाठी. माझ्या वर्गातून इतर वर्गात नेलं जायचं…. आणि पाठ्य पुस्तकातील कविता गाऊन दाखवायला सांगितलं जायचं … आणि मला ते आवडायचं कारण इतर मुलांना ज्या वेळा वर्गाबाहेर पडता यायचं नाही त्या वेळी मला मस्त शाळाभर सन्मानाने फिरता येतं याचं “अप्रूप”….

तर मला निवडलं… एक युगलगीत गाण्यासाठी…. माझ्याच वर्गातला एक नव्याने शाळेत आलेला मुलगा होता बरोबर… खूप छान……. “अंतरावरचे” बोलणे असायचे मुलामुलींचे .. त्यामुळे प्रत्यक्ष न बोलता फक्त…. तालमी सुरु झाल्या….. बाबा दौऱ्यावर होते म्हणून आई ला सांगून हे सुरु झालं…. माझ्या आई ला मी फक्त “गायिका” व्हावं असंच आयुष्यभर वाटत राहिलं…… त्यामुळे तेव्हा तर ती फार आनंदात ……. मला लवंग, वेलची, गरम पाणी यांचे वेगळी पिशवी भरून देऊ लागली…. गाण्याच्या तालमीसाठी…. माझा एक मामा सोबत यायचा …… माझं गाणं म्हटलं कि जबर उत्साहात यायचा मामा …… माझी फार काळजी कार्यक्रमात तो घ्यायचा…. तो शिक्षकांना विचारून तालमीला येऊ लागला….. घरगुती वातावरण होतं सगळं…… चार ते पाच दिवस तालमी झाल्या ….. गाणं तोंडावर बसलं……. आणि बाबा दौऱ्याहून आले……

ते आले कि सकाळचा चहा …… गप्पा रंगायच्या …… कुणी न कुणी चहाला असायचंच, त्यांच्या बरोबर काय झाल, काय नाही या गप्पांमध्ये असायचा ….. मामा राहायला होता…… आईचं माहेर शेजारीच होतं……. तर त्या गप्पांमध्ये मामा रंगवून……. माझ्या नवीन गाण्याच्या तालमीबद्दल सांगायला लागला….. माझा आवाज कसा छान चढतो….. शाळेत माझं कसं कौतुक आहे असं सगळं…. आणि एक शांतता पसरली……. मला परिस्थिती खूप लवकर कळते…… कदाचित त्या वयापासूनच…… तेव्हा मला कळलं… “गडबड आहे” पण शिक्षकांनी सांगितलंय म्हणून मी करतेय सो बाबांना काही “ओब्जेक्शन” नसावं……. अशी तात्पुरती भलावण केली मनाशी….. कारण तो पर्यंत बाबांनी कायम “भजने” बसवून घेतली माझ्याकडून…… रेडीओ …… ऐकायला म्हणजे “सिनेमाची” गाणी ऐकायला संमती नव्हती ……. टी. व्ही. नव्हताच घरी ……. आणि मग शाळेत गेले…..

दुपारच्या सुट्टीत….. बाबांना …. मुख्याध्यापाकांच्या ऑफिस मधून बाहेर पडताना पहिले…. पाठमोरे….. मी हाक हि मारली नाही….. आणि त्या दिवशी…… संध्याकाळी “शुभंकरोती” म्हटल्यावर अत्यंत रुक्ष स्वरात बाबांनी विचारलं…. हिम्मत कशी होते सिनेमाची हलकट गाणी म्हणण्याची तुला?………. तिथेच गोठले मी…… कार्यक्रम माझ्याशिवाय झाला शाळेचा……. त्या कार्यक्रमाची संध्याकाळ मी घरी रडून काढली……

शाळा शेजारी असल्यामुळे ……. मला सर्व आवाज स्पष्ट ऐकू येत होते……  गाणं होतं …… “जानेमन जानेमन तेरे दो नयन …” ते गाणं आज हि ऐकू आलं कि मी “त्या” संध्याकाळ सारखी गोठून जाते…… ही माझ्या “सिनेमाच्या गाण्यांची” शाळा होती……. नंतरच्या आयुष्यात कायम एक बोच देणारी…… आज हि….. आहे ना मी ” नशीबवान”? ……(दिवस ऑर्केस्ट्रा चे मधून….)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.