माझी साहित्यगिरी…..

लिखाणाची आवड मला फार म्हणजे फारच पूर्वी पासून आहे. काही लोकं याला कुत्सितपणे खोड म्हणतात. (पण लिखाण हे माझ्या खोडात नसून मुळातच आहे.) माझ्या एका दूरच्या मावशीनुसार मी पहिले लिहू लागलो व नंतर बोलू लागलो. काही वाचकांचा या बाबीवर विश्वास बसणार नाही, ही बाब वेगळी परंतु लेखन करणाऱ्याने नेहमी सत्याचाच पदर धरावा भलेही तो पदर कितीही जीर्ण असला तरी. सुरवातीला वर्तमानपत्र, नियतकालिक असे करता करता मी अलीकडे आजचे आधुनिक समाज माध्यमे जसे फेसबुक व व्हाटसअॅप वर लिखाण करू लागलो. इतर माध्यमांपेक्षा ही आधुनिक माध्यमे वेगळी असल्यामुळे मला सुरवातीला फार निराशाजनक अनुभव आला, परंतु त्यावर मी कसा तोडगा काढला इत्यादी गोष्टी मी आज आपल्या सोबत शेयर करणार आहे. वास्ताविक मला अनेक वाचकांकडून तसा आग्रहच झाला आहे , नाहीतर ही बाब मी कोणालाही सांगणार नव्हतो.

अर्थात काही कुत्सित वाचकांना ही बाब बतावणी सुद्धा वाटू शकते, पण त्याला माझा इलाज नाही. फेसबुक व व्हाटस्अॅप वर प्रकाशित झालेले (अर्थात ते मी स्वत:च प्रकाशित करत होतो.) माझे लिखाण फारसे कोणी मनावर घेत नव्हते, वाचत नव्हते, त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मी फार बेचैन झालो होतो, अस्वस्थ झालो होतो, काय करावे मला काही समजत नव्हते. आपले नेमके काय चुकते आहे, काहीच कळत नव्हते. दर्जाच्या बाबतीत म्हणाल तर व्हाटस्अॅप वर फास्ट फारवर्ड होणाऱ्या इतर लीखाणापेक्षा माझे लिखाण कुठेही कमी नव्हते. कोणी वाचतच नसल्यामुळे लिखाण कसे वाटले हे विचारण्याचीही सोय नव्हती. आपली साहित्य सेवा व्यर्थ वाया जाताना पाहुन माझे हृदय भयंकर कासावीस व्हायचे.

500 pages and one masterpiece later, Stephan makes a horrifying discovery.

त्या घनघोर दुःखात माझ्याकडून अधिक दोनचार कविता प्रसूत व्हायच्या. साहित्यिक साहित्य प्रसूत करत असतो, प्रसूतीच्या कळा काय असतात त्या साहित्य निर्माण करणाऱ्याला माहीत असतात. बऱ्याच वेळा तर सिजर करून साहित्यिक अपत्ये प्रसूत करावी लागते. कधी कधी हे सीजर वारंवार होत असल्यामुळे बरीच अपत्ये अपुऱ्या दिवसाची किंवा कुपोषितच जन्म घेतात. माझ्या या प्रसूत झालेल्या कवितांचे नशीब जन्मापूर्वीच ठरले असाल्यामुळे दुसरे काय होणार? इतर लिखाणाप्रमाणे या कावितांच्याही वाटेला फारसे कोणी जात नव्हते. लिखाणाला अधिक व्याप्ती मिळण्याच्या दृष्टीने मी काही हौशी लेखकांच्या एक दोन व्हाटस्अॅप समूहामध्ये प्रवेश केला. (लिखाणाला खोली नसले तर चालते पण व्याप्ती ही असावीच लागते.) परंतु त्यामध्ये सर्व लेखकच असल्यामुळे कोणी वाचत नव्हते.

सर्व भराभर लिहणारे. आपण आपली एक कविता पोस्ट केली की लगोलग इतर सर्व आपली कविता सोडून लगेच सूड घ्यायचे. नंतर मी खास व्हाटस्अॅप वाचकांचा ‘आम्ही हौशी वाचक’, ‘वाचाल तर वाचाल’, ‘वाचे त्याचे काम ना नाचे’, ‘वाचणार तोच लिहणार’ नावाचे काही समूह प्रवेशित केले. यां समूहांमधे लीहणारे जरी कमी असले तरी फारवर्ड करणारे भरपूर होते. मी ऐक कविता पोस्ट केली रे केली की लगेच एकच व्यक्ती चार चार कविता फारवर्ड करून मला नामोहरण करायचा.

मी आजिबात नाउमेद झालो नाही. नंतर मी बालवाडीच्या पासून तर पीएचडी पर्यंतच्या मित्रांचे वेगवेगळे व्हाटस्अॅप समुह, जसे सकाळी फिरायला जाणाऱ्यांचा , फिरायला न जाणाऱ्यांचा , कार्यालयातील मित्रांचा , रोज रेल्वेने अपडाऊन करणाऱ्यांचा, मुलांच्या शाळेतील पालकांचा , स्कुलबस मधील मुलांच्या पालकांचा , मुलं शिकवणीला जातात तेथील मुलांच्या पालकांचा , आम्ही नेहमी जिथे चाट खातो तिथेच चाट खाणाऱ्या खवय्यांचा , जिथे गाडी दुरुस्त करतो, कटिंग करतो त्या ग्राहकांचा , वेगवेगळ्या थोर व्यक्तींना मानणाऱ्या व्यक्तींचा , कुंभ राशींच्या लोकांचा , ऑक्टोबर महिन्यात जन्म घेतलेल्या , एवढेच काय आमची कामवाली ज्या ज्या घरी जाते त्या घरातील सदस्यांचा, मधुमेह असणाऱ्या व्यक्तींचा (मला मधुमेह नाही पण माझ्या वडिलांना हा आजार असल्या मुळे मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून या समूहात आहे.या समूहाचे नाव ‘साखरेचं टाळणार त्याचा यम टळणार’ असेे आहे.) याशिवाय माझ्या नातेवाईकांचा, पत्नीच्या नातेवाईकांचा , जातीचा, पोट जातीचा असे एकूण ऐका समूहांमध्ये साहित्य फिरवण्याचा प्रयत्न केला परंतू प्रातिसाद शून्य. यातील बऱ्याच समूहांचा मी स्वतःच समूह संचालक आहे हे आतापर्यंत चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच व मी कुठल्या उदात्त भावनेने हे समूह सुरू केले हेही ओळखले असेल.

आपले लेख नाना पाटेकर, विश्वास नागरे पाटील, प्रकाश आमटे इत्यादी महनीय व्यक्तींच्या नावे पाठवावा असा ऐक स्वप्रसिद्धीचा त्याग करणारा महान विचार माझ्या डोक्याला स्पर्शून गेला परंतु तो विचार फक्त स्पर्शुनच गेला आंत मध्ये न गेल्यामुळे मी तो विचार बाजूला ठेवला (तसेही या तिघांच्या नावे एवढे लेख फारवर्ड होत असतात की त्यांची साहित्य संपादा आता त्यांनाही कळेेनासी झाली आहे🤦🏼‍♂️.  मध्ये मध्ये तर शेतीशास्त्र किंवा पाकशास्त्र यां विषयांची माहिती सुद्धा काही सुपीक डोके यांच्या नावाने फारवर्ड करतील का? अशी भीती मला वाटायची.) मधल्या काळात हा लेख वाचून फारवर्ड केल्यास २ GB डाटा फ्री, किंवा बॅटरी फुल, जमा झालेले व नकोशे असलेले सर्व फोटो आपोआप डीलिट (आपोआप जमा होतात तसे) अश्या तळटीप टाकायच्या, असा विचार देखील आला, परंतु विज्ञानवादी लोकं आक्षेप घेवून आपले अज्ञान उघडे पाडतील हा दुसरा विचार माझ्या डोक्यात आला, व तसे करणे टाळले.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.