विमानाचा शोध राईट बंधूंनी कसा लावला याची रंजक माहिती

Wright Brothers

आपण बरेचदा म्हणत असतो की माझ्याकडे पैसे नाहीत, किंवा पुरेसं शिक्षण नाही, किंवा मी खेड्यात जन्मलो, किंवा नशिबानं साथ दिली नाही म्हणून मला हवं तेवढं मोठं होता आलं नाही. बरोबर?

तर ऐका राईट बंधूंची कहाणी. आपणा सगळ्यांना माहित आहे कि जगात विमान उडवणारे ते पहिले. पण त्यामागचे कष्ट आणि जिद्द किती जणांना ठावूक आहेत?

ओर्विल आणि विल्बर राईट हे बंधू (Wright Brothers) नव्या सायकली जोडणारे आणि जुन्या दुरुस्ती करणारे मेकॅनिक होते. त्यांचं सायकली विकण्याचं दुकान होतं.

wright-cycle-shop
राईट बंधूंचे सायकलचे दुकान.

हे ऐकल्यावर पहिला प्रश्न आपल्या डोक्यात साहजिकच येतो, ‘सायकल मेकॅनिक विमान बनवणार? अशक्य आहे!’

१८९८ सालच्या आसपास, जेव्हा तंत्रज्ञान अगदी प्राचीन होतं आणि वायुगती शास्त्र हा विषय कोणालाही समजलेला नव्हता, तेव्हा या दोन तरुणांनी आधी सायकलला वेगवेगळ्या गोष्टी जोडून प्रयोग केले आणि विमानाच्या पंखांचा आकार कसा असावा याचा अंदाज बांधला.

त्यानंतर त्यांनी एक लाकडी बोगदा बांधला, घरच्या घरी छोट्या जागेत प्रयोग करण्यासाठी. त्या बोगद्यात ते छोटी विमानं ठेवायचे आणि एका बाजूने पंख्याचा वारा सोडून त्या विमानांचं निरीक्षण करायचे.

मग त्यांनी ‘ग्लायडर’ म्हणजे इंजिन नसलेलं विमान बनवून फक्त आपण पतंग उडवतो तसे उडवून पाहीले.

wright-glider-unmannedत्यामध्ये अनेक प्रयोगांनंतर खूप सुधारणा केल्यानंतर मग त्यांनी टेकडीवरून उड्डाण घेऊन ग्लायडर सुरक्षितपणे उतरवण्याचा सराव केला.

अनेक वेळा त्यांचे छोटे छोटे अपघात झाले, पण सुदैवाने ग्लायडरचं वजन आणि वेग अगदी कमी असल्यामुळे त्यांना फार मोठ्या जखमा झाल्या नाहीत. पण त्यांच्या वडिलांनी त्या दोघांना एकत्र उड्डाण करायचं नाही अशी सक्त आज्ञा दिली होती आणि त्या बंधूंनी शेवटपर्यंत तिचे पालन केले. फक्त एकदाच, आणि वडिलांच्या परवानगीनेच, ते दोघ एकत्रं उडाले.

मग त्यांनी पक्षांचं निरीक्षण करून पक्षी आपले पंख वाकवून कसे वळतात ह्याचा अभ्यास केला आणि ग्लायडरला हवेत वळवण्याची कला हस्तगत केली.

आता त्यांना गरज होती एका इंजिनाची, जे विमानाला उड्डाण घेण्यासाठी पुरेसा वेग देऊ शकेल. अडचण अशी होती कि इंजिन जास्तं जड असेल तर लाकूड आणि कापड वापरून बनवलेलं त्याचं नाजूक विमान जमीन सोडणार नाही, आणि इंजिन जर शक्तिशाली नसेल तर त्यांचं विमान उडण्याइतका वेग घेऊ शकणार नाही.

पण त्या काळी इंजिन बनवणारे जे उत्पादक होते, ते म्हणाले, कमी वजन अन तरीही जास्त शक्ती असलेलं इंजिन बनवण अशक्य आहे!

मग राईट बंधूनी काय केलं असेल?

‘आमचं नशीबच फुटकं!’ असं म्हणून ते तंबाखू चोळत बसले?

नाही.

त्यांनी चार्ली टेलर नामक एका सहायकाच्या मदतीने त्यांना हवं होतं तसं इंजिन स्वतः बनवलं, अन तेही फक्त सहा आठवडयात!

त्या दोघांनी विमानासाठी लाकडी प्रोपेलर, म्हणजे गोल फिरून हवा मागे फेकणारे पंखे सुद्धा स्वतः बनवले, पण चाचण्या करताना बऱ्याच वेळा इंजिनच्या वेगामुळे प्रोपेलरचा दांडा तुटून जायचा. अनेक चाचण्या आणि चुकांनंतर त्यांना चांगले प्रोपेलर बनवता आले.

थोडक्यात, प्रत्येक ठिकाणी त्यांना अडचणी आल्या, आणि प्रत्येक वेळी त्यांनी त्यांवर मात केली.

पाच वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर शेवटी जय्यत तयारी करून १४ डिसेम्बर १९०३ रोजी त्यांनी पाहिलं उड्डाण कोणी करायचं हे ठरवायला नाणेफेक केली. थोरला भाऊ विल्बर जिंकला आणि विमान उड्डाणासाठी तयार झाला, परंतु वेग पकडून जमीन सोडल्या सोडल्या विमान लगेचच कोसळलं आणि त्यात थोडी मोडतोड झाली.

दुरुस्ती करण्यात दोन दिवस गेले आणि १७ डिसेम्बर १९०३ रोजी ते पुन्हा तयार झाले. आता ओर्विल ह्या धाकट्या भावाची पाळी होती. विमानाच्या मध्यावर तो पोटावर झोपला, त्यानी दोन इंजिनांचा वेग वाढवला, दोन्ही प्रोपेलर जोरात फिरायला लागली, विमान धावायला लागलं आणि जगाच्या इतिहासात पहिल्यांदा मनुष्यानी सपाट जमिनीवरून आकाशात झेप घेतली. त्या पहिल्या उड्डाणाचा हाच तो जगप्रसिद्ध फोटो.

wright First flight

ते विमान फक्त १२ सेकंद उडालं आणि त्यानी १० फूट उंची गाठून केवळ १२० फूट अंतर पार केलं.

एखाद्या सावधपणे चालत, चार पावलांनंतर खाली पडणाऱ्या बालकाप्रमाणे ते पहिलं उड्डाण छोटंसंच होतं. बाळाच्या त्या चार पावलांमध्ये स्वतंत्रपणे चालत, आयुष्यभर उत्साहाने परिश्रम करण्याची उमेद असते त्याचप्रमाणे त्या बारा सेकंदांच्या उड्डाणात भूतलावरच्या डोंगर, दऱ्या, नद्या, जंगलं आणि समुद्रांचे अडथळे नाहीसे करून पृथ्वीला अचानक लहान बनवून टाकायची शक्ती होती.

त्या दिवशी आलटून पालटून दोन्ही बंधूनी मिळून चार उड्डाणं केली आणि त्यातल्या सगळ्यात मोठ्ठ्या फेरीत त्यांनी ५९ सेकंदात ८५२ फूट अंतर पार केलं.

त्यानंतर थोड्या वेळानी एक वाऱ्याचा तीव्र झोत आला आणि त्याचं ते ‘राईट फ्लायर १’ नावचं विक्रमी विमान कोलांट्या उड्या मारत दूरवर फेकलं गेलं आणि त्याला दुरुस्ती पलीकडलं नुकसान झालं.

मग त्यांनी काय केलं असेल?……

‘मनुष्यानी उडावं अशी परमेश्वराची इच्छा नाही असं दिसतंय’ म्हणत ते परत सायकलींच्या धंद्याकडे वळले?????

नाही…….

त्यांनी ते तुकडे गोळा करून ते विमान घरी आणलं आणि मिळालेल्या अनुभवातून नवीन सुधारणा करत ‘राईट फ्लायर २’ बनवायला सुरुवात केली.

ते पहिलं विमान आता संग्रहालयात ठेवलेलं आहे. त्या विमानामुळे जमीन सोडून हवेत उडता आलं, त्यामुळे आत्तापर्यंत फक्त आकाशात जायचे स्वप्न बघणारा मानव काही दशकातच अंतराळात जायचा विचार करू लागला. म्हणूनच नील आर्मस्ट्राँग जेव्हा चंद्रावर यानातून उतरले तेव्हा त्यांच्या बरोबर ‘राईट फ्लायर १’ च्या कापडाचा एक छोटा तुकडा होता.

Wright Brothers
राईट बंधूंचे स्मारक

सुरवातीला लोकांनी राईट बंधूंच्या उड्डाणाच्या कहाणीवर विश्वास ठेवायला ठाम नकार दिला. बरीच वृत्तपत्रे त्यांना चक्क ‘खोटारडे’ म्हणून हिणवायचे. पण जसजसे ते सुधारित विमानं बनवत गेले तसतसे लोक त्यांच्या विमानांची प्रात्याक्षिके बघून आणि त्यांबद्दल वाचून थक्क होऊ लागले. त्यानंतर मात्र त्यांना अनेक पारितोषिके आणि सन्मान मिळत गेले. पाहिलं उड्डाण केलं त्या ‘किटी हॉक’ नामक ठिकाणी त्याचं स्मारक आहे, जिथे लिहिलंय, “आकाशावर विजय मिळवणाऱ्या राईट बंधूंच्या स्मरणार्थ. अलौकिक बुद्धिमत्तेने जन्माला घातलेल्या कल्पना त्यांनी निर्भय जिद्द आणि अजिंक्य विश्वासामुळे साध्य केल्या.”

एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, दोन्ही बंधूनी आपल्या सगळ्या कर्तृत्वाचं आणि कौतुकाचं श्रेय नेहेमी बरोबरीने वाटून घेतलं. कधीही त्यांच्यापैकी एकाने स्वतः जास्त श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. १८६७ साली जन्मलेले विल्बर वयाच्या ४५ वर्षी टायफॉईड मुळे १९१२ साली वारले आणि १८७१ साली जन्मलेले ओर्विल १९४८ पर्यंत, म्हणजे एकूण ७७ वर्षे जगले, पण इतक्या वर्षात ते कधीही स्वतःच्या कामगिरी बद्दल वाढवून बोलले नाहीत.

ओर्विल आणि विल्बर राईट श्रीमंत घरात जन्मले नव्हते. त्यांच्या वडिलांच्या घरी वीज नव्हती आणि नळाचं पाणी नव्हतं. हे बंधू इंजिनियर नव्हते, कॉलेजमध्ये गेले नव्हते आणि शाळा देखील त्यांनी पूर्ण केली नव्हती. त्यांना लहानपणी वडिलांनी एक खेळण्यातलं हेलीकॉप्टर दिलं होतं. रबर बँड पिळून सोडल्यावर ते हवेत उडायचं आणि अलगद जमिनीवर उतरायचं. त्या उडणाऱ्या खेळण्यामुळे कुतुहूल जागृत झाल्याने, लौकिक दृष्ट्या जवळ जवळ अशिक्षित असलेल्या या बंधूंनी अनेक वेगवेगळ्या विषयांवर केवळ सातत्याने वाचन आणि प्रयोग करून, प्रभुत्व मिळवून, आपले स्वप्न साकार केले आणि संपूर्ण मानवतेला एक नवीन दिशा दाखवली – आभाळाकडची.

अडचणी आल्या तेव्हा कारणे शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा अडचणींवर मात करण्यात वेळ वापरणे जास्त उपयुक्त ठरते हे त्यांनी दाखवून दिले.

Wright Brothers
राईट बंधू

आता तुमच्या डोक्यात जर असा विचार येत असेल, ‘अहो, ते सगळं अमेरिकेत होऊ शकतं, भारतात कसं शक्य आहे?’ तर आठवण करून देतो कि भारतातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या किर्लोस्कर बंधुंनीही १८८८ मध्ये सायकलच्या दुकानापासून सुरवात केली आणि भारतात पहिला लोखंडी नांगर, पहिला पाण्यासाठी पम्प, पाहिलं डीझेल इंजिन आणि पहिली विजेची मोटर बनवून एक प्रचंड उद्योग उभा केला.

जाता जाता एक शेवटची गोष्टं. दोन्ही राईट बंधूनी आयुष्यभर लग्न केलं नाही, कारण त्यांनी कामातच स्वतःला झोकून घेतलं होतं. विल्बर एकदा पत्रकारांना म्हणाले होते कि त्या दोघांना विमान आणि बायको ह्या दोन्हीसाठी वेळच मिळाला नसता.

पण हे ऐकून आपल्याला पितामह भीष्माचार्य यांच्यासारखी प्रतिज्ञा घ्यावी लागेल म्हणून घाबरून जायचं कारण नाही. त्यापुरतं आपण किर्लोस्कर बंधूंचंच उदाहरण डोळ्यासमोर ठेवूया. त्याचं घराणं गेली १३० वर्षे त्यांचा उद्योग समूह भरभराटीत चालवत आहे आणि वाढवत आहे.

सुरवात करायच्या ऐवजी कुठलंही काम अशक्य कसं आहे ह्याची चिंता करायची आपली खास महाराष्ट्रीय सवय मोडून, थोडक्यात काय, तर चला सुरुवात तरी करूया!

साडेतीनशे वर्षांपूर्वी समर्थ रामदास म्हणून गेले,

“भाग्यासी काय उणे रे, यत्नांवाचून राहिले.

केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.”

सौजन्य: www.avinashchikte.com/

पूर्वप्रसिद्धी: साहित्य चपराक


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.