दुष्काळाचे सावट!

राजकारण्यांच्या घोषणाप्रमाणेच पावसाचा अंदाजही दिशाभूल करणारा ठरला असून वरूनराजाने पुन्हा एकदा रडीचा डाव मांडल्याने जिल्ह्यावरील दुष्काळाचे सावट गडद होऊ लागले आहे. मान्सून, यंदा वेळेत आणि सरासरीत बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्यापासून स्कायमेट सारख्या संस्थांनीच नाहीतर भेंडवळच्या मांडणीत देखील वर्तवण्यात आला. जून महिन्याच्या सुरवातीला काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या. मिळेल त्या मार्गाने पैश्याची व्यवस्था करत बळीराजाने छातीला माती लावून पेरणीचा सट्टा खेळला. जमिनीत ओल असल्याने रान बहरून आले. यंदा निसर्गाची कृपा होऊन भरभराट होण्याचं हिरवं स्वप्न शेतकरी राजा पाहू लागला. परंतु सालाबदाप्रमाणे यंदाही त्याचा भ्रमनिरास ठरलेला होता.

एक-दोन पाऊस झाल्यानंतर मान्सूनचा जोर अचानक कमी झाला. जुलै महिन्यात तर पावसाने अगदीच तुरळक हजेरी लावली. ढग दाटून यायचे, आता पाऊस येणार असे वाटू लागताच हलकासा फवारा मारून पुन्हा ऊन पडायचे. आता तर १५ दिवसापासून पावसाने दर्शनच झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पेरलेले उगवण्याइतपत पाऊस झाला असला तरीही जमिनीतली ओल आटल्याने आता उगवलेल्या अंकुरांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणची पिके पाण्याअभावी करपू लागली असून काही कारपण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहेत. येत्या दोन तीन दिवसात प्रजन्यवृष्टी झाली नाही तर खरिपाची संपूर्ण पेरणी धोक्यात येण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या तीन चार वर्षापसून लहरी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त केले आहे. पेरणीच्या काळात पाऊस पडतो. मात्र ऐन दानाभरणीच्या वेळी निसर्गाची अवकृपा होते आणि उत्पदनाला फार मोठा फटका बसतो. जिल्ह्यात सोयाबीन पिकाची सरासरी सर्वाधिक आहे. कापूस, उडीद मुंग तूर मका अशा पिकांची मोट्या प्रमाणात लागवड केल्या जाते. साधारतः जून महिन्याच्या सुरवातीला शेतकरी सोयाबीनची पेरणी करतो. श्रावणात सोयाबीनचे पीक ऐन भरात येते. जसजशी पिके जोम धरू लागतात तसतशी पिकांची तहान वाढत जाते. नेमकी याच वेळी पावसाने दडी मारली असल्याने पिकांना पुरेशे पाणी असल्याशिवाय लागलेल्या शेंगांमध्ये दाणे भरणार नाहीत. परिणामी झडतीसुध्दा येणार नाही. गत चार ते पाच वर्षांपासून पुरेसा पाऊस न पडल्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यातच विहिरीला पाणी येईल किंव्हा धरणाचा आणि इतर जलस्त्रोतांचा पाणीसाठा वाढेल असा पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे कुत्रिम पाणीपुरवठ्यावर पीक जागविण्याचा पर्यायही आता उपलब्ध राहिलेला नाही. शेतातील पीक वाळून गेले तर दुबार पेरणीची एक तर परिस्थती नाही आणि वेळ निघून गेली असल्याने तीसुद्धा आशा धूसर झाली आहे. त्यामुळे, करायचे काय? या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे.

बळीराजाच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना आणून राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मात्र कर्जमाफीतील अंलबजावणीचा घोळ अजून संपायला तयार नाही. सत्ताधारी आणि विरोधकही कर्जमाफीच्या तरतुदीवरून राजकारण करताना दिसत आहे. अस्मानी संकटांचा मुकाबला करण्यासाठी राज्यकर्त्यांनी पंतप्रधान पीकविमा योजना आणली यातही ऑनलाईन आणि ऑफलाईन चा अट्टहास करण्यात आल्याने अनेकांना पिकांचा विमा उतरवता आलेला नाही. तसेही बहुतांश शेतकऱयांना मागच्या वर्षीचा पीक विम्याचा लाभ अद्यापपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे या योजनेचा भरवसा अधांतरीच म्हणावा लागेल. सरकारने कर्जमाफी केली असली तरी या योजनेतील घोळामुळे शेतकऱ्यांचा पदोपदी अपमान केला जात आहे. पीककर्जासाठी आजही शेतकरी बँकेचे उंबरठा झिजवतोय. गेल्यावर्षी बोंड अळी नावाची अवदसा शेतकऱ्यांच्या मुळावर उठली, आणि शेकडो हेक्टर मधील कपाशीत नांगर घालावा लागला. बोंड आळी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर झाले. मात्र तिचेही वाटप अजून पूर्ण झालेले नाही.सरकारी योजना अंलबजावणीच्या अभावी केवळ फार्स ठरत असताना अस्मानांनेही डोळे वटारल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून त्याला या संकटातून सावरण्यासाठी मायबाप सरकारला समोर यावे लागणार आहे.

पूर्वी शेतीला सुगीचे दिवस होते. त्यामुळे शेतकऱ्याच्या पाठीचा कणा ताठ होता. मात्र, जागतिकीकरणाच्या लाटेत धोरणात्मक सुधारणा अभावी ‘राजा’ संबोधल्या जाणाऱ्या शेतकऱयाचाच ‘बळी’ गेला. लहरी निसर्ग, वाढता उत्पादनखर्च, शेतीमालाचे अत्यल्प भाव आणि तंत्रज्ञानचा अभाव यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दाबला जाऊ लागला. नापिकी, आवर्षण, पूर, गारपीट अशा सातत्याच्या अस्मानी संकटामुळे त्याचे कंबरडे मोडल्या गेले. या दृष्टचक्रातून बाहेर निघण्यासाठी काहींनी आपल्या गळ्याला फास लावला तर काहींनी इंड्रीसाचा घोट गळ्याखाली ढकलला. पण परिस्थिती बदलली नाही. यंदाही अस्मानी संकटाचे वादळ घोंगावू लागले आहे.. ‘दुष्काळ, नावाचा ‘काळ’ शेतकऱयांना गिळंकृत करण्यासाठी आ वासून उभा ठाकला आहे.. या बिकट क्षणी रुसलेला पाऊस यावा यासाठीची प्रार्थना शेतकऱयांसह सर्वजण सृष्टीच्या निर्माणकर्त्याकडे करत आहे. मात्र, पावसावर कोणाचेच नियंत्रण चालत नाही, त्यामुळे काळाची पाऊले ओळखून संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला तयार राहावे लागणार आहे.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय