हिटलर

hitlar

“ह्या देशाला हिटलरच पाहिजे…..त्याशिवाय आम्ही सुधारणार नाही…..” बंड्या हातातील बॅग कोचावर फेकून ओरडला तसा मी उडालोच.

“अरे काय झाले…..??इतका का रागावलास….?” मी शांतपणे विचारले.

“आहो…. काय चाललंय या राज्यात तेच कळत नाही. कुठेही धड सुखाने चालता येत नाही कि प्रवास करता येत नाही…. आता रस्त्यावर इतका ट्रॅफिक झालाय कि एखादा माणूस सिरीयस झाला तर हॉस्पिटलमध्ये नेतानाच मरायचा…. काय गरज आहे इतक्या गाड्या रस्त्यावर आणायची …?? बरे यातील तीस टक्के गाड्या रिकाम्याच जात असतात म्हणजे चार माणसाची जागा फुकट जात असते. ड्रायव्हर एकटाच ए. सी. लावून गाडी चालवत असतो. मग रस्त्यावर टॅक्सी साठी वाट पाहणाऱ्या वृद्धांना किंवा लहान मुलांबरोबर असलेल्या कुटुंबाला का लिफ्ट देत नाहीत….?? घ्यायचे पैसे थोडेफार. पण नाही रिकामी गाडी घेऊन जातील… सगळीकडे हेच चालले आहे.

शाळेत मुलांना ऍडमिशन घ्यायचे झाले तर सर्व एकाच शाळेत धावतात पण शेजारच्या शाळेत ऍडमिशन मिळत असून घेत नाही….. का….??? तर दर्जा खराब म्हणून …..??

हे कोणी ठरविले ….?? बोर्ड तर एकच… अभ्यासक्रम एकच …… आता तर अजून तीन चार बोर्ड आलेत. पैसे आहेत म्हणून मोठ्या शाळेत जायचे. गावातील चौथीच्या मुलाला पुस्तक नाहीत आणि इथे चौथीच्या मुलाच्या हातात टॅब आहे. असे का…..?? इथे शिक्षण पूर्ण झाले कि एकाला वीस हजार पगार तर त्याच शिक्षणावर दुसऱ्याला आठ हजार पगार असे का…..??? कोण आणि का ठरवितो हे…..?? हळू हळू बंड्याचा आवाज चढू लागला.

मी त्याला विचारले “मग हिटलर येऊन काय करणार आहे…….??”

“आहो कमीतकमी एकहाती निर्णय तरी घेईल. एखादा कायदा आणला तर त्यावर वाद … चर्चा …. खटला तर भरणार नाही. आता नवीन गाड्या घेताना काही अटी ठेवल्या तर?? भरमसाठ गाड्या रस्त्यावर येणार नाहीत. सरकारी वाहतूक नफा तोट्याची पर्वा न करता चालवली तर ?? भीतीने का होईना लोक सरकारी गाड्यातून प्रवास करतील. शाळेचा दर्जा सगळीकडे एकच ठेवला … एकच पद्धती वापरली …एकच बोर्ड आणले तर ….?? सगळ्या शिक्षकांना एकच पगार आणि तोही त्यांच्या जेष्ठते नुसार वाढत जाईल. जसे शिक्षण तसाच पगार मग तो कुठेही काम करो….”.

“पण बंड्या त्याने असंतोष माजेल. किती दिवस चालेल हे …..”? मी हादरलो

“काही नाही असंतोष माजत….. नोटबंदी केल्या तेव्हा कुठे मजला असंतोष. तोही एक हुकूमशाही निर्णय होताच ना …..?? आठ वाजता नोटबंदीची घोषणा. हातात फक्त चार तास तरीही सामान्य जनता खुश ना. इथे आपण आपल्या विभागासाठी पहिला नगरसेवक…. मग आमदार…. मग खासदार …निवडून देतो. पण आपल्या विभागाची किती प्रगती होते….?? उलट त्यांचीच संपत्ती पाच पंचवीस पट वाढते. आहो भाऊ या वेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षाच्या उमेदवारांनी इतका पैसे खर्च केला होता त्या पैशात आपल्या विभागात कितीतरी सुधारणा झाली असती…. म्हणून म्हणतो आज हुकूमशाही असती तर…..??

भलेे त्या हुकूमशहानेच पैसे खाल्ले असते दहा जणांनी तरी खाल्ले नसते. आणि आपण सर्व ते मुकाट्याने सहन केले असते. इथे संतापहि व्यक्त करता येत नाही आणि सहन हि करावे लागते म्हणून तो हिटलर बरा जर्मनीची प्रगती तरी केली तीही स्वतःच्या मतानुसार. त्याने काही केले तरी सहन करायचे विरोध करायचा नाही. पण त्यामुळे जे समोर येईल ते नाइलाजाने का होईना स्वीकार तरी करू…. बंड्या पोटतिडकीने बोलत होता आणि….. त्याच्या या संतापाला माझ्याकडे आता तरी उत्तर नव्हते.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!