गण्याची युक्ती…..

बघता बघता गण्या दहावी, बारावी पास झालं. ‘बा’ च्या घरची गरिबी असल्यानं त्यानं उसनं पासनं करून संगणकाचा कोर्स पूर्ण केला. नोकरीसाठी लई फिरलं पन बघल तिकडं पोरींनाच वाव.

गण्या अक्षरशः वैतागल. त्याच्या चार मित्रानी त्याला मोलाचा सल्ला दिला. गण्याला शहरात जाण्यास सुचवलं. गण्या इचार करू लागल. कंच्या शहरात जावं.

त्याला गंगीची आठवण झाली. एकदा ती त्याला म्हणाली होती की तू जर पुण्यात नोकरी केलीस तरच मी तुझ्याशी लगीन करीन. गण्यानं ठरवलं पुण्यालाच जायचं.

पुणं विध्येच माहेरघर हे त्याला माहित हुतं. त्याला त्याच्या वर्गातील विध्या डोळ्यासमोर दिसू लागली. त्यानं इचार केला चला गंगी हाय, इध्या हाय आणकी काय पाहिजे.

गण्याला गंगी तशी लई आवडत हुती. ती बी दिसायला अप्सराच हुती. लांबसडक काळेभोर केस, हसताना गालावर पडणारी खळी, गोरीपान, लिप्स्टिकचं लालचुटुक ओठ, स्लिम बॉडी, शहरातल्या बायांना लाजवल असं देखणं रूप त्यामुळे गण्या तिच्या प्रेमापायी जणू घायाळ झालेला हुता. तशी दोघं बी रहायला जवळजवळ.

गंगी एक दिवस जरी भेटली नाय तरी गण्याची आवस्था पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी होत असे. गंगिच्या बाची मात्र तिच्यावर करडी नजर हुती.

गण्या सायकलवरुन कॉलेजला निघाला की त्याच्यामागे लगेच गंगी जायची. वळण वलांडल की दोघबी सायकलवर बसायची. गंगीचा स्पर्श झाला की गण्याला स्वर्गातल्या अप्सरेचा स्पर्श झाल्यागत वाटायचं.

गण्याला वाटायचं गंगीन सायकलवरून खाली उतरूच नये. तसच अंगाला अंग भिडवून सायकलवर बसून रहावं. कृतकृत्य झाल्यागत वाटायचं.

एका बाजूला कॉलेजचं आकर्षण तर दुसऱ्या बाजूला प्रेमाचे आकर्षण वाढत गेल. गण्यानं जाणलं गंगीच प्रेम असंच अखंड मिळवायचं असलं तर आपण पुण्याला गेलं पाहिजे. तिथं एखादया कंपनीत नोकरी केली पाहिजे.

गण्यानं ठरवलं की आजच पुणे गाठायचं. त्यांन दोन चार जणांचं पत्ते घेतलं. गण्या पुण्याला गेला. त्याला एका कंपनीच चांगलं पॅकेज मिळालं. गण्या खुश झाला.

त्यानं गंगीला पुण्यात नोकरी मिळाल्याचं सांगितलं. ती देखील पुण्यात राहण्याची स्वप्ने बघू लागली. गण्या चार दिवसाची सुट्टी काढून गावी आला.

गावच्या बाहेर एका बागेत तिला भेटला. दोघबी खुश होती. खुशीत एकमेकांच्या कुशीत गेलेली चांगली दोन तासान मिठीतुन बाहेर आली.

गण्या गंगीच्या बाला भेटला. लग्नाचा विषय काढला. तिच्या खडूस बापानं जाम नकार दिला. रातच्याला त्यानं अन गंगीन पळून जाऊन लगीन करण्याचे ठरवलं.

गंगीन ‘बा’ ची नजर चुकवून घरातलं दागदागिने गोळा केले. तिच्या बाची एफडी नुकतीच संपली हुती. त्याच ४० हजार रुपये तिच्या ‘बा’ नं कपाटात ठेवलेले तिला माहीत हुतं. तिन ‘बा’ ची नजर चुकवून ते बी घेतलं. सकाळी सूर्य उगवायच्या आत दोघांनी पुण्याचा रस्ता धरला.

गण्यानं चांगला टू बीएचके फ्लॅट भाड्यानं घेतला. पुण्यात रहायचं म्हटल्यावर लूक बदलायला हवा म्हणून गंगीला मेकअप साहित्य, गॉगल, लिपस्टिक पॅक, टी शर्ट, कधीतरी घालायला स्लीव्हलेस ब्लाऊझ, साडी घेवून दिली.

स्वतःला नवीन कापडं घेतली. गण्याचा संसार सुरू झाला. सकाळी नऊ ते सायंकाळी चार गण्याची ड्युटी फिक्स हुती. पाच वाजल्यापासन दोघच घरात त्यामुळ प्रेम उफाळून येऊ लागलं. त्याचा परीणाम म्हणून घरात एक गोंडस बाळ वेळेच्या आधीच दाखल झाल.

बघता बघता गण्या अन् गंगीचा लूक पार बदलून गेला होता. दोघ बी पक्क पुणेकर झालं हुतं. घरात रूम फ्रेशनरचा वास दरवळू लागला.

सेंटच्या बाटल्यांनी कपाट भरलं. बाळ देखील आता मोठं झालं. त्याला शाळेत घालायचं ठरलं. खर्चाचा एकूण आवाका बघून गण्यानं जी.प.ची शाळा निवडली.

गंगी मातूर इंग्लिश मिडियमला घालायचं म्हणून हटून बसली. गण्याचं काय बी चाललं नाय अन् पोरग आई बा पेक्षा हुशार होण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊ लागलं. गण्यानं कशीबशी फी भरली. ते खर्चान अगदी मेटाकुटीला आलं हुतं.

गण्याच्या बायकोनं संसाराला हातभार लावण्याचं ठरवलं. तीन शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. गंगी कमवायला लागली म्हटल्यावर गण्याची जबाबदारी आणखीनच वाढली.

सकाळी लवकर उठून पोराचे आवरण त्याला शाळेत सोडणे, पिठाच्या गिरणीतून दळण दळून आणणे, मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला आणणे या नवीन कामांची गण्याच्या जीवनात भर पडली.

गण्या सकाळी लवकर उठून पोराला शाळेत सोडण्यासाठी जात असे. तोवर गंगी तिला जमेल तसा स्वयंपाक करत असे. गण्या गंगीने जे डब्यासाठी तयार केलं असलं ते गोड मानून डबा घेऊन नोकरीसाठी जात असे.

आल्यावर भाजी व दळण ही कामे उरकत असे. गण्याला या तिन्ही निरस कामांचा कमालीचा कंटाळा. काय करणार बिचारा? काही महिने उलटले अन् गण्याचे नशीब बदलले. त्याच्या जिवलग मित्राने त्याला नेमका उपाय सुचविला.

त्या दिवशी गण्या कंपनीतून घरी आला. गंगीनं चहाचा कप समोर आणून ठेवला. कधी नव्हे तो आख्खा बिस्किटाचा पुडा त्याच्यासमोर डिशमध्ये आणून ठेवला.

आज गंगीचं प्रेम एवढं उतू का चाललंय हे गण्याला हेरायला लई टाईम लागला न्हाय. चहा पिऊन होतो ना होतो तोच तीनं दळणाचा डबा त्याच्यासमोर आणून ठेवला. गण्या गिरणीत गेला खरा, मात्र घरी आला तो भन्नाट आयडिया घेऊनच.

गंगीला काय कळना. मघाशी तणतणत गेलेला नवरा बागडत घरी आल्याचं पाहून ती जरा साशंक बनली. पोराला शाळेत सोडायला जाताना गण्याची तीच आवस्था एवढंच काय भाजी आणताना देखील तीच स्थिती.

गंगी एकदम झालेल्या या बदलामुळे पार इचारात गढून गेली. आपला नवरा असा कसा एकदम बदलला याचाच इचार ती करू लागली.

पोराला शाळेत सोडायला जाताना, दळण आणताना, भाजीपाला आणताना गण्या पॉश कपडे परिधान करू लागला. पावडर लावू लागला.

एवढंच काय सेंट मारल्याशिवाय घराबाहेर पडेना झाला. कंपनीत नोकरीला जाताना एवढा नटायचा न्हाय पण या तीन कामासाठी मातूर चांगलाच नट्टापट्टा करून जायचा.

एक दिस गंगीनं धीर करून त्याला जाब इचारला. गण्या म्हणाला, अगं शाळेत, बाजारात, गिरणीत आसपासच्या बाया बापड्या असतात. त्या समद्या पॉशमध्ये असतात. त्यामुळं मला पण नटून थटून जावं लागतं. त्या माझ्याकडं बघतात अन् प्रेमानं बोलतात देखील.

काल तर भाजी आणताना एका बाईन दुसऱ्या बाईला हा गंगीचा नवरा म्हणून माझी वळख करून दिली. आता तूच इचार कर मी जर पॉश नाही राहिलो तर तुला खाली मान घालावी लागलं का न्हाय?

गण्याच्या या प्रश्नाने गंगी काय समजायचं ते समजली. ती काय बी बोलली नाय. तिला गण्याचं लक्षण मात्र ठीक दिसलं नाय.

त्यातच एक दिस शेजारची कमळी तिच्या घरी आली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. कमळी म्हणाली, “गंगे एक इचारु का?” गंगी म्हणाली, ”अग इचार की त्यात काय एवढं” कमळी म्हणाली “नवऱ्याला सांभाळ बाई.

काल मी रुपीला त्याच्या गाडीवरनं दळणाचा डबा घेऊन येताना पाहिलं. त्या बाईची नजर लई वंगाळ हाय. एकदा डोळ्याला डोळा भिडवला की कुठल्याही पुरुषाला काबीज करती. माझा नवरा बी तिच्या नादी लागला हुता. कसा बसा त्याला बाजूला केला.”

रातभर गंगी इचार करू लागली. या बैलाला येसन नाय लावली तर ह्यो बैल कुठं बी उधळल. सकाळ झाली. गण्या उठला पॉशपैकी आवरलं. ठीकठाक कापड घातली. पावडर लावली. सेंट मारला. पोराला शाळेत जाण्यासाठी हाक मारली.

बघतो तर काय गंगी मेकप करून पोराबरोबर बाहेर आली. गण्याला काय बी समजना. गंगी म्हणाली, गण्या आजपसनं तू पोराला सोडायला शाळत जायचं न्हाई.

भाजी आणायला बाजारात जायचं न्हाय. पिठाच्या गिरणीत जायचं न्हाय. ही समधी कामं मी करणार. माझ्या राजा तुला किती त्रास ध्यायचा?

बघ ना तुझी तब्येत बी लई हाडकलीय. तू नोकरी करतोस. दमून येतोस. तुला सुखात ठेवण माझं बायको म्हणून काय कर्तव्य हाय का नाय? “

गण्या समजला आयला आपल्या मित्रानं सुचवललेली मात्रा लागू पडली वाटतं. विश्वचषक जिंकल्याचा जेवढा आनंद खेळाडूंना झाला नसेल त्यापेक्षा जास्त आनंद गण्याला झाला.

त्याला संसारातील रटाळ वाटणारी सारी कामं आपोआप दूर झाली. गण्याला देखील आता हायस वाटू लागलं. कामं दूर झाली पण गिरणीतल्या, बाजारातल्या, शाळेतल्या बायका मात्र लई दिवस झाले त्याच्या नजरेस पडल्या न्हायत..

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय