आमची ‘Big Bazaar मोहीम!

दरवर्षी पंधरा ऑगस्ट येतो, तेव्हा आम्हा भारतीयांच्या आनंदाला भरते येतं, पण विशेषतः मध्यमवर्गासाठी, त्यातल्या त्यात स्त्रीशक्तीसाठी, ह्या आनंदांचं कारण, स्वातंत्र्यदिन नसुन, त्यानिमित्त Big Bazaar मध्ये लागलेला सेल आहे का, अशी मला दाट शंका आहे. पण काही नाजुक शंका मनातच ठेवायच्या असतात, अनुभवाने हे ज्ञान मला आले आहे.

असो!…….

तर आमच्या सौभाग्यवतींनी आज “अहो, ऐका ना” अशी नाजुक गळ घातली, ‘नाही म्हणायची’, खुप इच्छा होती पण समस्त ‘बैलोबा’ सॉरी, ‘नवरोबा’ मंडळीप्रमाणे वादळ अंगावर घेण्याची, मज पामराची काय बिशाद?😩

पहिल्यातुन सावरतोय न सावरतोय तोच, दुसरा तोफगोळा आदळला……😥😥

“Big Bazaar चा सेल आहे, तुम्ही सोबत याल का?”

आता असे शब्द वरवर लाडीक विनंती वाटत असले, तरी त्यात आदेशयुक्त आज्ञा लपलेली असते, हेही ज्ञान लग्न झाल्यावरच्या, अवघ्या, चार वर्षांच्या अनुभवानेच आले आहे.

“मला थोडे काम होते”, मी किल्ला लढवण्याचा तोकडा प्रयत्न केला, पण “काम तर रोजच आहे, चला चुपचाप!” अशी दटावणी झाली, आणि शेवटचा बुरुजही ढासाळला.

सपशेल माघार घेऊन तहात हरलेल्या हात बांधलेल्या शत्रुप्रमाणे, इच्छा नसताना, मनातल्या मनात चरफडत, मी Big Bazaar ला पोहचलो.

पाहतो तर काय? सर्व ‘रिकामटेकड्या’, ‘फुकट्या’ आणि ‘चिंगुस’ लोकांनी मॉल खचाखच भरला होता. लातुर शहरातल्या आणि आजुबाजुच्या गावातल्याही, एकुण एक ‘गृहकर्तव्यदक्ष गृहिण्या’, प्राणप्रिय अशी दुपारची झोप, किटीपार्ट्या आणि जिवलग अशा ‘रटाळ सिरीयली’ यांचा त्याग करुन इथेच एकत्र झाल्या आहेत की काय? अशी पुन्हा मला शंका आली.

क्रिकेटच्या स्टेडीयमसारखी, गर्दी बघुन मला चेव चढला, आणि एन्ट्री मारल्याबरोबर मी ट्रॉली शोधु लागलो, पण हाय रे दुर्दैव! त्या नकट्यांनी मी येण्याआधीच सगळ्या ट्रॉल्या संपवल्या होत्या, मग यौद्धाच्या आवेशात, मी पुढे होवुन, दोन वस्तु उचलल्या, एक होती मराठीतली दुरडी आणि दुसरी होती इंग्लिशमध्ये बास्केट, मुंगी शिरणार नाही, अशा महाप्रचंड गर्दीतही, हे मिळवल्याचाही आनंद काही नव्हता,

लहान मुलांना, खेळायला लेदर बॉल नाही मिळाला तर रबरी बॉल मिळाला तरी बरं वाटतं, तसं वाटलं!

तर ‘दुरडी’ मी हातात ठेवुन ‘बास्केट’ मी आठवणीने ‘सौं’ च्या हातात दिली, आणि जेत्याच्या थाटात, पण बॉसच्या नेतृत्वाखाली, पुढल्या मोहिमेवर निघालो.

पण त्यांनी कोलगेट पेस्ट ला हात लावल्याचं, दिसताच मी किंचाळलो,
“कोलगेट नको, त्यात फ्लोराईड असते, त्याने हातपाय दुखतात, श्रीं श्रीं चं सुदन्ता टुथपेस्ट वापरतोय ना आपण!”

‘बोहनीलाच लावली भणभण’ असा ‘नाजुक भाव’ व्यक्त करणारी सौं ची, आव्हानात्मक, प्रश्णार्थक त्रासदायक नजर बघुनही मी काही मिनीटे जोरकस प्रतिकार केला, विनवण्या करत, विरोध जारी ठेवला, आणि अनपेक्षितरित्या पदरात यश पडले, “नक्की आणा हं!” अशी ऑर्डर देऊन एकदाची ‘मांडवली’ झाली.

एव्हाना गर्दीतुन धक्काबुक्की करुन, ढकलाढकली करत, रस्ते बनवण्यात, आम्ही तरबेज झालो होतो, मग आमचा मोर्चा खाण्यापिण्याच्या वस्तुंकडे वळाला आणि टेबल टेनिसची मॅच सुरु झाली.

“प्रविणचे लोणचे घ्या.”

“अरे, हे तर शॉर्ट एक्स्पायरी आहे! सेलच्या नावाखाली लुटायचे धंदे!”

“मुलांना चोकोज आवडतात”,

“अरे बापरे, पाचशे पासष्ट रुपयाला पोतेभर चोकोज!”

“चॉकलेट बिस्कीट घ्या!”

“चांगले नसते, हे एवढे गोड खाणे!” (अशा महत्वाच्या वेळी, मला माझा गोड वस्तु किती घातक आहेत यावर लिहलेला लेख, अगदी शब्दशः आठवतो.)

डिस्कांउंटच्या नादात बराच्यश्या निरुपयोगी वस्तु खरेदी केल्या जात आहेत, हे माझ्या तीक्ष्ण बुद्धीला लगेच कळते.

Big Bazaar चा मालक ‘किशोर बियाणी’ फक्त अशा डोकेबाज स्किम चालवुनच, ‘अब्जोपती’ बनलाय का? अशीही एक भाबडी शंका मला येते.

अर्थातच, माझे सारे केविलवाणे प्रयत्न वाया जातात, आणि व्हायची ती खरेदी, लड फुटते तशी तड तड तड अशी होतच असते, मला माझा खिसा जळताना उघड्या डोळ्यांनी दिसु लागतो.

अशातच ह्या भुलभुलैय्यामध्ये, इंडीया गेट, बासमती राईस, एक किलो पॅकमध्ये शोधण्याची अवघड जिम्मेदारी मला सोपवली जाते, आणि जीवावर खेळुन मी तो शोधुनही काढतो, आणि आनंदाने माझा उर भरुन येतो, पण माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याऐवजी माझी प्रिया चहापत्तीच्या स्किम शोधण्यात बिजी असते.

माझी स्वतःच स्वतःचं कौतुक करायची महत्वपुर्ण सवय अशाप्रसंगी कामाला येते. थोडी फुटकळ खरेदी होवुन ‘दुसर्‍या मजल्यावर जाऊया’ असे शब्द कानावर पडतात,
“आपल्याला तीन हजारांची खरेदी केल्यावर सहाशे रुपयांचे व्हाऊचर्स मिळणार आहेत.”

आता आमचा क्रिकेटचा सामना सुरु झाल्याची दाट शंका मला येते.

“पण आपण आवश्यक आहे तेवढेच खरेदी करुया ना! उगीचच जबरदस्तीने तीन हजारांची खरेदी कशाला?” मी फुलटॉस सुरक्षितपणे ‘प्लेड’ करतो.

“एसबीआय डेबीट कार्ड स्वाईप केल्यास अजुन तीनशे रु डिस्काऊंट आहे,” अजुन एक बाऊंसर धप्पकन आदळतो.

मग स्वारी लेडीज सेक्शनकडे वळते, छान छान टॉप्स आहेत, तीनवर दोन फ्री! ती कपडे बघण्यात रंगुन जाते आणि इकडे माझा बी.पी. वाढतो.

मी ही आहे हाडाचा लढवय्या, फटकेबाजी चालुच ठेवतो. “मागच्याच महिन्यात दोन हजारांची खरेदी झाली ना तुझी, आणि त्याच्या मागच्या महिन्यात पाच हजार दिले होते कपड्याच्या शॉपींगला.”

“इथे गाऊन्स खुप मस्त मस्त असतात.” बाईसाहेब रन-अप घेत चाल करुन येत आहेत, असा माझा संशय बळावतो.

आजुबाजुला छान छान, सुंदर सुंदर, कॉलेज तरुणी आणि ललना आपापल्या खरेदीत मग्न असतात, आणि मला नैत्रसुख 😍 भेटत असल्याचं, आमच्या चाणक्ष ‘सौं’ च्या अचानक लक्षात येतं.

अचानक काय घडतं ते समजत नाही आणि पुस्तकं चाळल्यासारखी, कपडे चाळुन, माझी ‘बेटर हाफ’ कसलीच खरेदी न करता, मला हाताला धरुन, भराभर लेडीज सेक्शनबाहेर काढते.😉

आता आम्ही जेन्ट्स सेक्शनमध्ये येतो, “तुम्ही टि शर्ट्स घेता का? खुप छान स्टॉक आहे इथे!” ह्या गुगलीने मी क्लिन बोल्ड होतो, “नाही म्हणवत नाही, आणि हातातुन पैसेही सुटत नाहीत.”

“तुम्ही ना, नाईट पॅंट घ्या एक, ही बघा ना, ही छान आहे,” “ओ भय्या, इसमे कलर दिखाओ ना!” वरवर कडक वाटणार्‍या माझ्या बायकोचे हे प्रेमळ रुपाचे, आता कुठे, मला खरे दर्शन होऊ लागते.

मी उत्साहाच्या भरात, बाराशेची ट्रॅक पॅंट पसंत करतो, ती अगदी सेम तश्शीच आठशेचा टॅग असलेली शोधुन काढते🤥 आता मात्र तिच्या निरीक्षणशक्तीची दाद देऊन, मी तिला मनोमन वंदन करतो…

अपुरी जागा होती नाहीतर तिथल्यातिथे मी तिला ‘साष्टांग दंडवंत’ घालणार होतो.🙏

हिरो घालतात, तश्या रंगबेरंगी बनियनच्या कपाटासमोर मी कन्फ्युज होवुन, ‘घेऊ का नको’ न्याहाळत असतो, “तुम्ही ना पांढर्‍या रंगाच्याच बनियन घ्या”, गोड आवाजात ती म्हणते, स्वतःहुन स्क्रिजबाहेर पाऊल ठेवल्याने, यावेळी मी ‘यष्टिचित’ होतो! (म्हणजे स्टंपिंग.)

खरेच तिला माझ्याबद्द्ल प्रेमाचा उमाळा आलेला आहे? का तीन हजारांचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी ही खरेदी चालली आहे? पुन्हा पुन्हा असा प्रश्ण मला पडतो.

नेहमीप्रमाणे अशा निरर्थक प्रश्णांकडे दुर्लक्ष करुन, पायर्‍या उतरुन, मी हनुमानाच्या शेपटीएवढ्या लांबलचक, बिलाच्या लाईनमध्ये उभा राहतो.

माझ्यापुढे तुडुंब ट्रॉल्या भरलेले फक्त पन्नासेक कस्टंबर असतात फक्त!..

“होईल, होईल लवकर, धीराने घे पंकज!” मी स्वतःलाच धीर देतो,

भरगच्च भरलेली एका हातातली दुरडी आणि दुसर्‍या हातातले बास्केट यांनी माझे हात गळुन आलेले असतात.

अचानक आमच्या ‘सौ’ पाच मिनीटे दिसेनाशा होताता आणि लगेच कॉल करतात, “पटकन इकडे व्हेजीटेबल सेक्शनजवळच्या काऊंटरला या, ह्या काऊंटरला गर्दी नाही.”
मला एकदम शत्रुच्या गोटात शिरुन, बरोबर त्याचा कच्चा दुवा हेरुन, गनिमी कावा करणारे, मावळे आठवतात. मला पण ना, कधीपन काहीपण आठवते.

पाच मिनीटात बिल बनते, लवकर शिक्षा भोगुन, सुटका झालेल्या कैद्यासारखा, मी जल्लोष साजरा करतो, आणि खटाखट सेल्फ्या काढतो.

किती खुश असतो मी, का? म्हणुन काय विचारताय?

आज चौदा ऑगस्टलाच माझा स्वातंत्रदिन साजरा झाला असतो, आणि Big Bazaar वर केलेली स्वारी उर्फ मोहिम फत्ते झालेली असते.

धन्यवाद!….


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय