‘अटल’ युगाची समाप्ती!

Atal Bihari Vajpayee

“इससे मैने पाया तन मन इससे मैने पाया जीवन,
मेरा तो बस कर्तव्य यही कर दू सब कुछ इसके अर्पण,
मै तो समाज की थाति हूं मै तो समाज का हूं सेवक,
मै तो समष्टि के लिए व्यष्टि व्यक्ती का कर सकता बलिदान अभय..!”

स्वतःला समाजाचा सेवक संबोधून देशातील जनतेसाठी ‘व्यष्टि’ चे बलिदान करण्याचा संकल्प करणाऱ्या ह्या ओळी कुण्या एका सध्या कवी किंवा लेखकांच्या नाहीत. तर, भारतीय राजकारणात एका स्तंभाच्या रूपात स्थापन झालेल्या युगपुरुष Atal Bihari Vajpayee यांच्या आहेत. ‘जगण्याला जीवन म्हणावे अशी माणसं शतकातून एखाद्या वेळेला जन्माला येतात’ या पु. ल.च्या वाक्यांची सत्यता पटविणारे जे काही मोजके दुर्मिळ व्यक्तिमत्व आहेत, त्यापैकी एक म्हणजे अटल बिहारी वाजपेयी.

प्रखर राष्ट्रभक्त, मुत्सद्दी राजकारणी, संवेदनशील कवी, मानवतावादी कनवाळू संघटक आणि राजकीय कर्तृत्वाच्या अफाट तेजाने तळपणारा अमोघ वक्ता, असा लौकिक असलेल्या अटलजींनी आपल्या आचार विचारातून देशातील राजकारणात उच्च राजकीय सभ्येतेचा मानदंड उभा करून ठेवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघ ते भारतीय जनता पक्ष अशा पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अटलजींनी अनेक पदे भूषवली. ३ वेळा ते देशाचे पंतप्रधान होते. पण, कुणाविषयी व्यक्‍तिगत द्वेष-मत्सर वा राग-लोभ आकस मनात बाळगून डावपेचाचे राजकारण त्यांनी खेळले नाही.

त्याचमुळे राजकारणात सज्जन, संयमी, निष्कलंक अन् भीष्मपितामह आदी उपाधी वाजपेयींना देण्यात येतात. ७० वर्षापेक्षा जास्त काळ राजकारणाचा अनुभव असलेल्या अटलजींची कारकीर्द केवळ मार्गदर्शक अशीच होती. भारतीय राजकारणाला दिशा देणारा हा दिशादर्शक नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात वयाच्या ९३ व्या वर्षी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अखेरचा श्वास घेतला. वाजपेयी यांच्यावर मागील ९ आठवड्यांपासून एम्समध्ये उपचार सुरू होते. काल मृत्य सोबत सुरु असलेली प्रदीर्घ झुंज अखेर संपुष्टात आली आणि नियतीने डाव साधला. अटलजींच्या निधन वृत्ताने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. अटलजींच्या जाण्याने भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक विलक्षण सर्वमान्य नेता, अमोघ वक्ता आणि कवीमनाचा सहृदयी राजकारणी म्हणून अटलजी नेहमीच आमच्या हृदयात कायम राहतील.

२५ डिसेंबर १९२४ रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पेशाने शिक्षक होते. सुरवातीच्या काळात अटलबिहारीना कम्युनिस्ट विचारसरणीने भुरळ घातली होती. मात्र त्यानंतर अटलबिहारी राष्ट्रवादी विचारसरणीच्या संघाकडे आकृष्ट झाले. जनसंघाचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. आणि संघाचे प्रचारक ते जनसंघाचे नेते असा प्रवास करत अटलजींची राजकीय कारकीर्द सुरु झाली. अटलजींचा राजकीय प्रवास सुरु झाला त्यावेळी देशात नेहरू पर्व जोरात होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलेल्या काँग्रेसच्या प्रभावी राजकारणात गैर काँग्रेसी चेहरा म्हणून जर कुणी मान्यता मिळवली असेल तर ती म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांनी. आपल्या कुशल संघटन आणि कौशल्याच्या जोरावर अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतीय जनता पक्षाला देशाच्या सत्तास्थानी नेवून बसविले. त्यांनी तीन वेळा पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली. पहिल्यांदा १३ दिवस, दुसर्यावेळी वर्षभर आणि तिसऱ्या वेळी पूर्ण पाच वर्षाचे सरकार वाजपेयींनी चालविलेले.

जगाच्या राजकारणाच्या इतिहासात २२ पक्षाच्या आघाडीचे नेतृत्व करत सहा वर्ष सरकार चालविणारे अटलबिहारी हे पहिलेच व्यक्ती. आपल्या कार्यकाळात अटलजींनी देशाला अनेक नवीन मंत्र दिले. शास्त्रीजींच्या ‘जय जवान जय किसान’ या घोषणेला ‘जय विज्ञान’ हि जोड देऊन देशाला विज्ञान तंत्रज्ञांनाचे महत्व अटलबिहारी वाजपेयी यांनी पटवून दिले. कविहृदयाचे असले तरी राजकारणात अटलजींनी कायम कणखर भूमिका घेतल्याचे दिसून येते. पोखरण येथील अणुचाचणी असो कि पाकसोबत झालेले कारगिल युद्ध असो. वाजपेयींचा कणखरपणा यावेळी किंचितही कमी झाला नव्हता. कणखर तितकेच निर्भीड आणि निष्पक्ष हे सुद्धा वाजपेयी यांच्या स्वभावाचे वैशिष्ट. इंदिरा गांधी यांना दुर्गा म्हणून संबोधताना त्यांचे शब्द कधी अडखळले नाही तर इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केल्यानंतर त्यांच्या या निर्णयाचा विरोध करताना त्यांचा स्वर कधी कापला नाही. गुजरात दंगलीच्या वेळी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना राजधर्म पाळा असा सल्ला देणारेही वाजेपायीच होते. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत वाजपेयी यांनी राजकारणाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.

संसद सभागृह असो कि राजकीय व्यासपीठ अटलजी आपल्या वक्तृत्व शैलीने सर्वांच्या हृदयावर राज्य करत. आणिबाणीदरम्यान जेलमधून बाहेर आल्यानंतर दिल्लीत एक प्रचारसभा सुरु होती. तास दोन तासाची रटाळ भाषण थंडी आणि पावसाच्या सारी सुरु झाल्यावरही लोक उठायला तयार नव्हते. त्यामुळे लोक का जात नाहीत, असा प्रश्न एका नेत्याने सहकाऱ्याला विचारला असता अजून अटलबिहारी वाजपेयी यांचं भाषण बाकी असल्याचं उत्तर त्याला देण्यात आलं. त्यानंतर अटलजी सभामंचावर आले आणि “बाद मुद्दत के मिले है दिवाने…. कहने सुनेने के बोहोत है अफसाने, खुली हवा मी जरा सास तो लेले…. कब तक रहेगी आझादी कौन जाने..!” याशब्दात आपल्या भाषणाला सुरुवात करत सभा जिंकली. यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात येऊ शकेल. गेल्या काही वर्षांपासून वाजपेयी राजकारणात सक्रिय नव्हते. प्रकृतीच्या कारणामुळे सार्वजनिक कार्यक्रमातही त्यांचा वावर कमी झाला होता. मात्र तरीही वाजपेयी यांच्या आजारपणाची बातमी येताच संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करायला लागला होता. मात्र अखेर नियतीने डाव साधला आणि एक लोकनेता आपल्यानूतन हिरावून नेला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाण्याने देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. अटलजी आज आपल्यात नसले तरी त्यांचे स्थान जनमानसाच्या हृदयात ध्रुवताऱ्यासारखे ‘अटल’ आहे.. आणि कायम राहील..!!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.