‘हाऊसवाईफ’ जशी असते तसा हा प्रसाद आहे ‘हाऊस हसबंड’

सुखी संसार

प्रसादला मॉलमध्ये खरेदी करताना पाहून आम्ही हैराण झालो. स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने मॉलमध्ये सवलत होती म्हणून मी आणि विक्रम फिरायला आलो होतो. तसाही आज ड्राय डे असल्यामुळे कुठे बाहेर बसायचा चान्स नव्हताच. कमीतकमी मॅक्डोनाल्डमध्ये विक्रमच्यासोबत बर्गर खायला मिळेल म्हणून मीही निघालो होतो.

तेव्हाच आम्हाला फूड सेक्शनमध्ये प्रसाद दिसला…… नुसता दिसला नाही तर खरेदी करताना दिसला…. आणि साधारण एका वर्षाच्या बाळाला घेऊन दिसला….!! आम्हा दोघांसाठी ते धक्कादायकच दृश्य होते.

विक्रमने जवळ जाऊन त्याच्या पाठीवर थाप मारली तो पटकन वळला आणि आम्हाला पाहून आनंदाने ओरडला. त्याला घेऊनच आम्ही कॉफीशॉपमध्ये शिरलो.

प्रसाद उते हा आमच्या कॉलेजचा मित्र. अतिशय शांत आणि संथ ही. पुढे व्यावहारिक जगात याचे कसे होणार याची आम्हाला काळजी. पुढे जो काही गायब झाला तो आज असा दिसला.

“बोला प्रसाद साहेब ……..!! कसे चालले आहे तुमचे …..?? विक्रमने नेहमीप्रमाणे सुरवात केली.

तो हसत म्हणाला “उत्तम …. ! मस्त….”

“छान ……!!” मी म्हणालो “काय करतोस सध्या .!!”

तसा पुन्हा हसत म्हणाला “घरकाम….. आणि आराम…..

आमचे प्रश्नार्थक चेहरे पाहून तो हसला “माझे लग्न ठरले ते इंटरनेटवर. बायको डॉक्टर आहे..… म्हणजे शास्त्रज्ञ आहे….. खूप शिकलेली आणि सतत अभ्यासाच्या आणि संशोधनाच्या मूडमध्ये… तिने लिहिले होते मला सहकारी हवाय जो माझ्या गरजा भागवू शकेल…… मला मदत करेल…. संसारात मला बायकोची भूमिका पाळणारा नवरा पाहिजे.

तुम्हाला माहितीय…. मी किती आळशी…… संथ माणूस…… लगेच होकार देऊन टाकला. तिने भेटायला बोलावले आणि सर्व काही सांगून टाकले….. मला ते पटले….. मी हो म्हणालो. नंतर महिन्यांनी लग्न केले आणि तिच्या फ्लॅटवर आलो “

“काय म्हणतो …??? घरजावई ….”?? विक्रम आश्चर्याने ओरडला.

“नाही रे …..! स्वतंत्र संसार ….. तुम्ही नाही का स्वतंत्र संसार करत…. आणि मी तिच्या घरी गेलो….. लग्न झाल्यावर एक स्त्री आपले घरदार सोडून नवऱ्याकडे येते तर पुरुषाने बाईच्या घरी का जाऊ नये…..?? प्रसादचा प्रश्न ऐकून आम्ही चूप झालो.

“बरे मग पुढे….. विक्रमचा प्रश्न

“पुढे…… दुसऱ्या दिवसापासून मी घरातील सर्व कामे हाती घेतली. धुणी भांडी करायला बाई होतीच. पण उठल्यावर चहा, नाश्ता जेवण सर्व मीच करू लागलो आणि ती कामावर गेल्यावर आराम. संध्याकाळी ती घरी आल्यावर चहा मग रात्रीचे एकत्र जेवण….. हेही मीच पाहू लागलो. तिच्या आणि माझ्या घरच्यांबरोबर संवाद साधू लागलो” त्याचे उत्तर तयार होते.

“बरे पैश्याचा व्यवहार कसा… ??? माझा प्रश्न.

“जसे तुमचे होते तसेच….. याबाबतीत मात्र बायको आहे ती. तिला दोघांच्याही शारीरिक गरजा माहीत आहे त्यामुळे त्यात कोणाचाही इगो आड येत नाही” प्रसाद हसत म्हणाला.

“मग ह्या मुलांसाठी तरी बायको बनली ना ती…..?? सहन केले ना बाळंतपण …???”🤰 विक्रम छद्मीपणे हसत म्हणाला.

“अरे नाही….. हे आमचे दत्तक मूल आहे…. रेडिमेड डायरेक्ट हातात….. तिने स्पष्ट सांगितले माझ्या कामात अडथळा येईल असे काही नको. तुझी मूल सांभाळायची तयारी असेल पण माझी मुलाला जन्म देण्याची तयारी नाही. एक छोटे मूल दत्तक घेऊ त्याचा सांभाळ दोघेही करू पण आई तू… बाप मी…..”

“अरे देवा ….!!” आता तर विक्रमचा धीर सुटू लागला.

“काय रे अशी वेळ येत नाही का कोणावर …?? पुरुष पत्नीला असे म्हणाला तर चालले असते पण स्त्री बोलते ते आवडले नाही का…. ??” मला पटले नाहीतरी जगात कित्येकजण आहेत ज्यांना मूल होत नाही…. ते दत्तक घेतात ना मुले …?? तसे आम्ही घेतले….. प्रसाद सहजपणे उत्तराला.

“अरे तू पुरुष ना ….मग असे कसे वागतोस बायकांसारखे ….??” विक्रमचा तोल सुटला…

“काय चुकते रे माझे …..? मी केवळ काम करून भरमसाठ पगार घरात आणत नाही की बायकोवर असेरावी करीत नाही ….?? एका बाईला वाटते आपला संसार सुखाचा असावा…. पुरेसे पैसे असावे… साथीदाराने वेळ द्यावा…. शारीरिक सुख द्यावे नातेवाईकांचा आदर करावा….. सगळी सुखें पायाशी लोळण घ्यावी….. मग हेच माझ्याबाबतीत घडत असेल तर वाईट काय…. ??? माझ्या बायकोला व्यसन नाहीत. सरळ काम संपले की घरी येते..… माझ्याशी गप्पा मारते… एकत्र बसून जेवतो….. कधी कधी एकत्र फिरायला जातो. संपूर्ण भारत फिरून आलो आम्ही. पुढच्या वर्षी परदेशात जाऊ. आमचे शारीरिक संबंध छान आहेत. ती दोघांच्याही आई वडिलांचा आदर करते. कितीही खर्च करायची मुभा आहे मला. मुलाला ही पुरेसा वेळ देते. संसार यालाच म्हणतात ना …??? फक्त स्थान बदलले. याच जागी जर एखाद्या मोठ्या पगाराच्या मुलाने गावातून कमी शिकलेली मुलगी लग्न करून आणली असती आणि तिला असे वागवले असते तर त्याची वाह वाह केली असती तुम्ही. खरेच आज मी सुखी आहे. घरातील एक प्रमुख जबाबदारी घेऊन सुखी संसार करतोय. जरुरी नाही पुरुषांनी पुरुषाचे आणि स्त्रियांनी स्त्रियांचे काम करायला हवे. शेवटी सुखी संसार महत्वाचा”

मीही मान हलवून त्याला दुजोरा दिला “तू आणि तुझी बायको सुखी आहात ना ….??तेच महत्वाचे …”

इतक्यात बिल आले तेव्हा आम्हाला अडवून त्याने खिश्यातून क्रेडिट कार्ड काढून दिले. विक्रम आ वासून त्याच्याकडे पाहत बसला.🤑


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!