शेअर बाजारा बद्दल लोकांमध्ये असणारे आक्षेप आणि गैरसमज

Share Market

शेअर बाजाराविषयी अनेक आक्षेप आणि गैरसमज आहेत. त्यातील महत्वाचे आक्षेप.

आपण मागच्या एका लेखात भारतातील गुंतवणूकदारांच्या प्रकाराबद्दल बोललो होतो. आता आपण बघूया की शेअरबाजाराविषयी जे अनेक आक्षेप आणि गैरसमज आहेत ते काय आणि त्याकडे बघण्याचा निकोप दृष्टिकोन काय असावा.

  • शेअर बाजार हा जुगार आहे: अनेक लोकांचा शेअर बाजार हा जुगार आहे असा समज आहे. हे लोक जेथे आपली बचत आणि गुंतवणूक करतात त्या संस्था मोठया प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक करीत असतात. शेअरबाजारात तुम्ही कोणत्या शेअरची खरेदी/विक्री कधी आणि कोणत्या भावाने करता यावर तुम्हाला होणारा फायदा / तोटा अवलंबून असतो. अनेक लोक आजही ज्या पद्धतीने अभ्यास न करता गुंतवणूक करतात त्यामुळे या गैरसमजाला पुष्टी मिळते. यांमधील अल्प अथवा दीर्घकालीन गुंतवणूक ही, लाभ मिळवावा या आणि याच हेतूने केली जावी. यातील लाभाचे लोभात रूपांतर झाले की व्यक्ती सारासार विचार गमावून बसते. लाभ आणि लोभ यातील सीमारेषा अत्यंत पुसट आहे. यात होणाऱ्या फायद्यामुळे अधिकाधिक फायदा मिळवावा असा मोह होवू शकतो. मात्र, केवळ आंधळेपणाने गुंतवणूक करुन क्वचित फायदा होत असेल, परंतू कायम फायदा होवू शकत नाही. अशा व्यक्तींना एक जोरदार फटका बसला की त्या बाजारपासून दूर होतात आणि भरकटल्यासारखी बाजाराबद्दल काही ठाम विधाने करत असतात. येथे अभ्यास करण्याची तयारी आणि थांबण्याची चिकाटी असेल तर निश्चित फायदाच होतो. तेव्हां गुंतवणूक करण्यासाठी पैसे आणि मनोबल असेल तर आकर्षक परतावा मिळू शकतो.

लाभाचे लोभात रूपांतर झाले की व्यक्ती सारासार विचार गमावून बसते. लाभ आणि लोभ यातील सीमारेषा अत्यंत पुसट आहे.

  • भांडवलदार आणि असामाजिक घटकांना यामुळे प्रोत्साहन मिळते: कोणतीही व्यवस्था असेल तर तिचा गैरफायदा घेणारे असतातच म्हणून व्यवस्थाच मोडीत काढायची नसते. आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि त्यात भांडवलनिर्मिती करण्याची परवानगी आहे. बाजारातील कोणाताही घटक बाजाराला सातत्याने एक दिशा दाखवू शकत नाही. आर्थिक क्षेत्र आता बऱ्यापैकी नियमित झाल्यामुळे त्यावर बाजार नियंत्रकांचे (market regulator) नियंत्रण असते. त्यामुळे सर्व व्यवहारात पुरेशी पारदर्शकता आली आहे. आपण एखाद्या शेअरचे गुणात्मक आणि संस्थात्मक मूल्य शोधून योग्य किमतीस गुंतवणूक करू शकतो आणि फायदा मिळवू शकतो .
  • शेअरच्या वाढलेल्या भावाचा कंपनीस काही फायदा नसतो: हा आक्षेप अर्धसत्य आहे. यातून सटोडीयांचा फायदा होत असला तरी शेअरचे भाव वाढले असतील तर कंपनीस अधिमूल्याने भांडवल किंवा कमी व्याजदराने कर्ज उभे करता येवू शकते. गुंतवणूकदारांना विक्री करुन किंवा नवीन खरेदी /विक्री करुन गुंतवणूक काढून घेण्याचा लाभ मिळवण्याचा पर्याय मिळतो. सरकारला कर मिळतो यात कोणतेही लपवाछपवीचे व्यवहार होत नसल्याने काळया पैशांची निर्मिती होत नाही.
  •  या व्यवहारात एकाचा फायदा हा दुसऱ्याचा तोटा असतो त्यामुळे त्याचा तळतळाट लागतो: शेअर बाजारातच नव्हे तर कोणाताही व्यवहार हा तारतम्याने करायचा असतो. प्रत्येकाने अतीलोभ आणि भय ह्यांवर ताबा ठेवून आणि दूरवरचा विचार करून तो करावा लागतो. यामध्ये जोखीम आहेच आणि जोपर्यंत विशिष्ट किंमतीत असा कोणताही व्यवहार करण्याची सक्ती होत नाही तोपर्यत ते आपल्या मर्जीने झाले आहेत आणि करणाऱ्याने ते जाणीवपूर्वक केले आहेत असे समजावे लागेल.
  • ही हरामाची कमाई आहे: हा एक अनेकांचा आवडता भडक आक्षेप आहे. यात कष्ट करावे लागत नाहीत घाम गाळावा लागत नाही. असे असेल तर सर्व बौद्धिक कामे करुन मिळवलेली कमाई ही हरामाची समजावी लागेल. बँकेत पैसे ठेवून व्याज मिळवणे, कमिशन घेवून विक्री व्यवहार करणे, अल्प भावात फ्लॅट घेवून तो भाड्याने देणे कालांतराने जास्त किंमतीस विकणे ही जर हरामाची कमाई नसेल तर पुढे भाव वाढतील या हेतूने घेतलेले शेअर हरामाचे कसे?

शेअर बाजारातच नव्हे तर कोणाताही व्यवहार हा तारतम्याने करायचा असतो. प्रत्येकाने अतीलोभ आणि भय ह्यांवर ताबा ठेवून आणि दूरवरचा विचार करून तो करावा लागतो.

तेव्हां आपण आपल्या आणि इतरांच्या गुंतवणूकीकडे नैतिक अनैतिकतेच्या कालबाह्य कल्पना झुगारून निर्मळतेने पाहू शकू तोच खरा सुदिन !

शेअर बाजाराबद्दल शिक्षण देणारी मराठी पुस्तके


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Previous article​द अपार्टमेंट- आपलासा वाटणारा हॉलिवूडपट
Next articleओळखीचं ओळखणं
१९८२ पासून "हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल" या कंपनीत नोकरी, शिक्षण बी कॉम. एवढ्यातच अकाउंट डिविजन मधे पी. एफ. विभागात उपव्यवस्थापक म्हणून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मी मुंबई ग्राहक पंचायतच्या शिक्षण विभागाचा सक्रिय कार्यकर्ता असून १९८४ पासून शेअर बाजाराशी संबधीत, गुंतवणूक करप्रणाली आणि आर्थिक विषयांच्या लेखनासाठी अलीकडेच सुरुवात केली आहे. मराठी माणसाला शेअरबाजाराबद्दल शास्त्रशुद्ध माहिती मिळावी आणि तीही आपल्या भाषेत म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न.

4 COMMENTS

  1. छान व सोप्या सर्वांना समजेल असे विष्लेशण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.