संभाव्य आर्थिक संकटे आणि त्यांना तोंड देण्यासाठी करतायेण्यासारखी तरतूद

financial-losses
संभाव्य आर्थिक संकटे

अचानक येतात ती संकटे, त्यांच्याशी सामना करण्यास आपण कमी पडलो तर आपले नुकसान होते. संपूर्ण आर्थिक घडी विस्कळते. काहीजण यासाठी सज्ज असतात पण बरेच लोक गाफिल असतात. व्यवसाय अथवा नोकरी करीत असताना टर्म इन्शुरेन्स, आक्सिडेंट इन्शुरेन्स आणि मेडिक्लेम असला पाहिजे या संबंधी बऱ्यापैकी प्रसार आणि प्रचार होत असला तरी यास प्राधान्य देणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. काही सरकारी आणि खाजगी उपक्रमांनी यांसंबंधी विचार करून त्यांच्या कर्मचाऱ्यांना काही विशेष सोई उपलब्ध करून दिल्या आहेत. काही ठिकाणी या संबंधी सक्ती असून काही ठिकाणी या सोई घेणे न घेणे ऐच्छिक आहे. काही ठिकाणी अशा योजनांचा खर्च व्यवस्थापन करते तर काही ठिकाणी या सेवांसाठी पूर्ण अथवा अल्प रक्कम कर्मचाऱ्यास खर्च करावी लागते.

    आपली आर्थिक घडी बिघडवून टाकणारी काही संभाव्य संकटे अशी

  • नोकरी सुटणे/धंद्यातील नुकसान: सध्या सरकारी नोकऱ्या सोडल्यास शाश्वत अशा कोणत्याच नोकऱ्या नाहीत. काही कारणाने नोकरी सुटल्यास किंवा धंद्यामधे मंदी आल्यास अल्पकाळासाठी येणारे पैसे बंद होतात. असे असले तरी काही किमान खर्च जसे लाईट बिल, शैक्षणिक खर्च, किराणा माल, कर्जाचे हप्ते यांची व्यवस्था करावी लागते. या संबधित आपल्या किमान गरजा यांचा अंदाज घेवून ३ ते ६ महिन्याच्या खर्चाएवढी रक्कम अतिरिक्त व्याजाचा मोह न बाळगता एफ. डी. किंवा मनी मार्केट फंडात असायला हवी जेणेकरून संकटकाळात हे पैसे उपयोगी येतील. हे पैसे फक्त याच कारणासाठी वापरले जातील या साठी कायम वेगळे ठेवावेत.
  •  नैसर्गिक आपत्ती/युद्ध, दंगल, जाळपोळ याने होवू शकणारे नुकसान: या मुळे अचानक मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागते. या पासून काही प्रमाणात संरक्षण होण्यासाठी किमान प्रिमियममधे थर्ड पार्टी इन्शुरेन्स उपलब्ध आहे .
  • जोदीदाराचा मृत्यू: जोडीदाराचा त्यातही कमावत्या व्यक्तीचा मृत्यू हा त्या कुटुंबावर मोठा आघात असतो याची भरपाई कितीही पैशानी होवू शकत नाही आणि पैशावाचून प्रत्येक ठिकाणी अडचणी येतात. हे कटू असेल तरी सत्य असल्याने आपली दीर्घकालीन गरज ओळखून उत्पन्नच्या २० पट रकमेचा टर्म इन्शुरेन्स काढणे आणि तो वेळोवेळी वाढणाऱ्या उत्पन्नाच्या प्रमाणात वाढवणे गरजेचे आहे.
  • आजारपण/गंभीर आजार: घरातील व्यक्तीचे आजारपण किंवा असाध्य आजार याच्या उपचारांसाठी आपली सर्व पूंजी संपू शकते. किमान ५ लाख रु. आरोग्यविमा असावा आणि तो वेळोवेळी वाढावावा. असाध्य रोगांच्यासाठी उपलब्ध विशेष पॉलिसी ज्यांना शक्य असेल त्यांनी घ्यावी.
  • शैक्षणिक खर्च: शैक्षणिक खर्चात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. एकेकाळी ज्या खर्चात उच्चशिक्षण पूर्ण होत होते त्याहून जास्त पैसे मुलांना प्राथमिक शिक्षण घेण्यास लागतात. वाढत्या शैक्षणिक खर्चासाठी लवकरात लवलर ईक्विटी म्यूचुअल फंडाच्या योजनेत एस. आई. पी. चालू करावे.
  •  निवृत्तीनंतरची तरतूद: वाढती आयुर्मर्यादा आणि महागाई यासाठी निवृत्तीनंतरची 25 वर्ष विचारात घेवून ईक्विटी म्यूचुअल फंड योजनेत दीर्घकाळाचे एस. आई. पी.  चालू करावे.
  • मित्र/नातेवाईकांना मदत: आपल्या अडीअडचणीस आपल्याला मदत करावी अशी अपेक्षा आपण मित्र व नातेवाईक यांच्याकडून बाळगत असतो तशीच अपेक्षा तेही आपल्याकडून करीत असणारच. आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून आपण कोणाला फारशी मदत करु शकत नाही तसेच काहींना टाळूही शकत नाही. यासाठी वेळीच काहीतरी किमान तरतूद करून ठेवणे गरजेचे आहे .

ही यादी परिपूर्ण नाही तरीही सहज लक्षात आलेल्या या गोष्टी विचारात ठेवून त्या अनुषंगाने तरतूद करण्याचा प्रयत्न केल्यास अशी संकटे आलीच तर त्याची अंशतः आर्थिक भरपाई होवू शकते आणि आपला अर्थप्रवाह स्थिर राहण्यास मदत होते .


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.