गणेशाचे दुखणे

Marathi Lalit lekh

“बाबा…. आज जायलाच पाहिजे का…”?? गणेशने थोड्या नाखुषीनेचे विचारले.

“अरे बाळा…… हा रिवाज आहे. दरवर्षी दहा दिवसाची रजा मंजूर होते ना तुला. नाहीतर आम्ही बघ…. फक्त एकच दिवस जाऊन येतो” महादेव हसून म्हणाले.

“तसे नाही हो बाबा….. पूर्वी छान दिवस होते. जाण्याचा दिवस जसजसा जवळ यायचा तेव्हा किती हुरहुर व्हायची. कधी एकदा जातो आणि माझ्या भक्तांना भेटतो असे व्हायचे. काय तो टाळ मृदूंगचा ठेका धरत म्हटलेली आरती…. डोक्यावर टोपी घालून माझ्या पुढे नतमस्तक होणारे आबालवृध्द…. भरजरी शालु पैठणी नेसून…. साजशृंगार करून हातात ओवळणीचे तबक घेऊन वाट पाहणाऱ्या माझ्या माता बहिणी…… सभोवताली दरवळणारा धूप…. स्वच्छ नीटनेटके आसन….. सर्व काही छान होते” गणेश भावनाविवश होऊन बोलत होता.

“मग आता …..??” महादेवनी थोडे हसून विचारले.

“काही वर्षापासून खाली जाऊच नसे असे वाटते. हल्ली काहीजण दोन तीन दिवस आधीच मला न्यायला येतात… का ….?? तर म्हणे ट्रॅफिक असतो आणि मग मनासारखे नाचायला मिळत नाही. अरे… तुमच्या समाधानासाठी मला हि शिक्षा का…?? बरे तिथे नेऊन तोंडावर रुमाल टाकून बसवतात मग कोणी लक्ष देत नाही. साधे खायला पण देत नाहीत. समोर बसून पत्ते खेळतात आणि चहा ढोसत असतात” गणेश चिडून सांगत होता.

“अरे ….हे चालणारच….” महादेवना हि आता थोडा रस वाटू लागला. “काळ बदलला आहे मुला”

“काळ बदलला म्हणून रिवाज बदलले नाहीत ना…..” पूर्वी मी घराघरात जात होतो. त्यावेळी सगळे माझ्या सेवेसी असायचे. कोणी बाहेर पडत नाही आणि स्वातंत्रलढ्यास जनजागृतीची गरज होती म्हणून लोकमान्य टिळकांनी मला घराबाहेर काढून सार्वजनिक ठिकाणी बसविले. तेथे इंग्रजांविरुद्ध नाटके व्हायची. राष्ट्रभक्तीचे पोवाडे गायले जायचे…… माझ्या पाठींब्याने लोक पेटून उठले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सर्वत्र बोलले जाऊ लागले. भक्तांना स्वातंत्रलढ्यासाठी एक नवीन दिशा मिळाली. कित्येक शाहिरांनी माझ्या पुढ्यात पोवाडे गायले. बालगंधर्वांनी आपल्या गाण्यांनी रात्रभर मंडप भारावून टाकला. टिळक आगरकर सावरकरांची अंगावर काटा आणून देशभक्ती फुलवणारी भाषणे ऐकली. दशावतार बघितला. खूप मज्जा असायची त्यावेळी असे वाटायचे कि घरी जाऊच नये. दहा दिवसांनी परत येताना डोळ्यात पाणी यायचे. अनेक भक्त तर हमसाहमशी रडताना पहिले आहेत मी. इथे आल्यावर खूप चुकल्यासारखे वाटायचे. परत कधी जातोय याची वाट पहायचो…”

“अरे मग आता काय झाले…. “?? महादेवानी विचारले.

“बाबा… हळू हळू लोक सर्व रिवाज विसरू लागले. टिळक, आगरकर, बालगंधर्व गेले, स्वातंत्र मिळाले. मग माझा वापर करमणुकीसाठी होऊ लागला. रात्र रात्रभर गाणी वाजवली जाऊ लागली. आजूबाजूला कोण आजारी आहे का ..?? म्हातारी माणसे आहेत का..?? याचा विचारही केला जात नाही. मोठमोठे फटाके फुटू लागले. माझा उंदीर तर आता माझ्याजवळही राहत नाही. माझेही कान दुखतात हो… कारण माणसे बदलतात मी नाही. आता तर माझा मंडप राजकीय पक्षांसाठी आयते व्यासपीठ झाले आहे. कोणीही येतो आणि माझ्या बाजूला उभे राहून मनात येईलते बोलतो…… आता इथे लोकांची मने पेटवली जातात पण ती आपल्याच लोकांवर वार करण्यासाठी. रात्री आरती म्हणण्याच्या नावावर जो धुडगूस चालतो तो तर बघण्यासारखा असतो. एखादे गाणे हिट झाले कि त्या चालीवर माझी आरती सुरु होते. माझ्या नावावर हवे ते खपविले जाते. जनजागृती होतंच नाही…

महादेव खरेच आता विचारात पडले “बाळा …ह्याला कुठेतरी आपण हि जबाबदार नाही का.. ? आपण त्यांना बुद्धी दिली. पण त्यावर कॅट्रोल ठेवला नाही. त्यांनी त्या बुद्धीचा वापर चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टीसाठी केला. पण वाईट गोष्टी लवकर पसरल्या जातात. आपण त्यांच्यापुढे ध्येय ठेवलेच नाही. मानव प्रगतीच करत गेला पण कुठे थांबायचे तेच अजून कळले नाही”.
“होय बाबा…. खरे आहे याला आपणही जबाबदार आहोत. भक्तांचे आपण ऐकतो आणि ताबडतोब नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध होतो. मला भेटायला येणारे सर्व सारखेच. पण लोकांच्याच मते काही सेलिब्रेटी असतात म्हणूनही मी प्रसिद्ध होतो. दहा दिवसांनी पोट भरत नाही म्हणून पुन्हा माघी गणेश नावाने पुन्हा मला बोलावण्यात येते. मला माझी सुट्टी कधीच एन्जॉय करता येत नाही. मंडपात हल्ली काही कार्यक्रम होतच नाहीत… काय करू मी बाबा…??? आता ह्या वर्षी त्या सैराटच्या तालावर आरती ऐकायला लागेल ”

“तुला जावेच लागेल गणेशा नाहीतर हि लोक तुला इथे येऊन घेऊन जातील…… त्यापेक्षा तू स्वतः निघ” महादेवन निक्षून सांगितले आणि गणेश नाईलाजाने निघाला भक्तांना भेटण्यासाठी.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!