कल्पनांना वास्तवात बदलवणारा जादुगर – आर्किटेक्ट बी. व्ही. दोषी

आर्किटेक्ट बी. व्ही. दोषी
  • पुण्यामध्ये मध्यमवर्गीय गुजराती घरामध्ये तो जन्मला.
  • जन्मल्यानंतर दहाव्या महीन्यात त्याची आई जग सोडुन गेली.
  • बाराव्या वर्षी सावत्र आईने त्याला आणि त्याच्या भावाला घराबाहेर काढले.
  • चौदाव्या वर्षी स्टोव्ह पेटवताना पाय भाजला, सात महीने गंभीर अवस्थेत अंधार्‍या खोलीत तो झोपुन होता, डॉक्टरांनी सांगीतले, पाय कापावा लागेल, पण कसेतरी (त्याच्या म्हणण्यानुसार आईच्या आशिर्वादाने) त्याचा पाय बरा झाला.
  • एका मित्राच्या सांगण्यावरुन त्याने चित्रकलेचा क्लास लावला आणि ड्रॉईंग शिकला.
  • योगायोगाने, चित्रं रेखाटण्याच्या हातोटीमुळे, पुढे जेजे कॉलेज मुंबईत आर्कीटेक्टरला गेला,
  • एका अनोळखी, पण प्रेमळ सिनीअरच्या आग्रहावरुन (चांगली इंग्लिश येत नसताना) लंडनला जाऊन जगप्रसिद्ध आर्किटेक्ट ‘ली कार्बोजियर’ च्या ऑफीसात तो काम करु लागला.
  • अमेरीकेत वॉशिंग्टन आणि एम आय टी ला जाऊन पुढचे शिक्षण घेतले.
  • ली कार्बोजीयरच्या भारतातल्या प्रोजेक्टवर सुपरव्हिजन करण्यासाठी त्याला भारतात पाठवले गेले.
  • त्याने भारतात येऊन एकाहुन एक सरस अशा इमारतींच्या रचना केल्या. उदा. आय. आय. एम. बेंगलोर आणि आय. आय. एम. लखनौ.
  • अहमदाबाद मध्ये देशातलं नामांकित आर्किटेक्चर कॉलेज स्थापन करुन मागची पन्नास वर्ष तो तिथे तळमळीने शिकवतोय, कित्येक नवे आर्किटेक्ट घडवतो्य, निसर्गाशी जवळीक साधणारे रोज नित्य-नवे विचार मांडतोय. अवतीभवती सतत वेगळ्या दृष्टीकोणाने बघण्याचा दृष्टीकोण देतोय.

ही गोष्ट आहे सगळ्या जगाला आपल्या आगळ्यावेगळ्या बिल्डींग डिझाईन्सने वेड लावणारे प्रसिद्ध आर्किटेक्ट बी. व्ही. दोषी यांची. (Architect B.V. Doshi)

Husain Doshi Gufa, Ahmedabad

Husain Doshi Gufa, Ahmedabad

अगदी परवा परवा आलेला ‘ओके जानु’ आठवतोय का? तोच हम्मा, हम्मा वाला. त्यात एका दृश्यात बाहेरुन पांढरीशुभ्र आणि आतुन रंगबेरंगी गुहा दाखविली होती. त्याला अमदावादनी गुफा असंही म्हणतात. आर्किटेक्ट बी. व्ही. दोषी हेच त्या इमारतीचे कर्ताधर्ता आणि जनक. ते डिझाईन बनवण्यासाठी त्यांनी तब्बल दिड वर्षांचा वेळ दिला होता तर ती बांधण्यासाठी तीन वर्ष लागली होती. आपल्या भन्नाट कलाकृतीसोबत ते त्या चित्रपटातही पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत दिसले होते.

त्यांनी केलेल्या असाधारण कार्यामुळे आर्किटेक्ट बी. व्ही. दोषी आधुनिक भारतीय वास्तुकलेची ओळख बनले आहेत. त्यांच्या डिझाईन अत्यंत लक्षवेधक आकाराच्या असतात, त्यांच्या प्रत्येक इमारतीत उन सावलीचा खेळ असतो, रणरणत्या उन्हात हवेचा थंडावा असतो, टाकाऊ वस्तुंचा वापर करुन सुंदर कलाकृती बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे.

बिल्डींग डिझाईन विषयी ते सांगतात, तुम्ही फक्त बिल्डींग डिझाईन करत नाही तर तुम्ही तिथे येणार्‍या लोकांची वागण्याची पद्धत, त्या जागेत राहणार्‍या लोकांची जीवनशैलीही, तुम्हीच ठरवता.

त्यांचा स्वतःचा अहमदाबाद इथला निसर्गरम्य डीझाईन स्टुडीओ “संगत” त्यांनी इतका सुरेख बनवला की तो पहायला आजही जगभरातुन कुतुहलाने लोक येतात आणि देशविदेशात, त्यावर रिसर्च पेपर लिहले जातात.

शिक्षण घेतानाचा त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग खुप उद्बोधक आहे.

Amdavad Ni Gufa

Amdavad Ni Gufa

“शिक्षणासाठी पहील्यांदाच मी पुणे सोडुन मुंबईत आलो होतो, पण होमसिकनेस आणि मुंबईची दमट हवा आणि घाम यांच्यामुळे मी त्रासुन जायचो, तसंचं एकत्र कुटुंबात वाढलेला असल्यामुळे मुंबईत एकट्याला अजिबात करमायचं नाही. पैशाच्या कमतरतेमुळे एका छोट्याश्या कोंदट खोलीत राहणे, जीवावर यायचे, मग मी दर शुक्रवारी दुपारी पुण्याला पळायचो, आणि पुन्हा मुंबईत आलो की मनाला समजवायचो, बस, ह्या शुक्रवारी आपल्याला पुन्हा जायचं आहे. आणि शुक्रवार लगेच येणार आहे, मनाला फक्त कल्पनेत रमवुन आनंदी ठेवायचो, तेव्हापासुन माझी कल्पनाशक्ती खुप दृढ झाली. पुढे हा कल्पनाविलास करण्याची शक्ती मला खुप कामाला आली. त्यामुळेच मी सुरवातीला इतरांना अशक्य वाटलेल्या कल्पनांना प्रत्यक्षात आणु शकलो.”

शेवटी आयुष्य म्हणजे भास आणि आभासांचा खेळ आहे.

बी. व्ही दोषींच्या मते, त्यांचे गुरु ‘ली कार्बोजीयर’ ह्या जादुगराचा त्यांना परीसस्पर्श झाला आणि म्हणुन ते यशस्वी झाले. कार्बोजियरसोबतच्या आठवणी सांगताना ते भावुक होतात.

“जवळ फारसे पैसे नव्हते आणि मला नीट इंग्लिशही यायची नाही तरीही मी धाडस करुन एकटाच लंडनला गेलो, मला फक्त बघण्यासाठी म्हणुन ली कार्बोजियरच्या ऑफीसमध्ये जावु दिले गेले, तिथे चंदीगडच्या प्रोजेक्टवर काम चालु होते, मी भारतीय असल्याचे समजताच मला खुपसे प्रश्न विचारले गेले. मग मी ही भीड चेपुन एक प्रश्न विचारला, मला तुमच्याकडे नौकरी मिळेल का?

तेव्हा मला सांगण्यात आले, स्वतःच्या हस्ताक्षरात अर्ज लिहुन द्या, विचार केला जाईल.

IIM Bangalore

IIM Bangalore

माझी इंग्लीश बेताचीच होती, मी सहा वेळा अर्ज लिहला, आणि एकदाचा दिला. आणि अहो आश्चर्यम! मला नौकरी मिळाली, पण एका अटीवर, पहीले आठ महीने फुकट काम करावे लागेल.” खिशात पैसे नव्हते तरीही मी आनंदाने तयार झालो, मला फ्रेंच काय इंग्लीशही नीटशी यायची नाही, पण तरीही ली-कार्बोजियर माझ्याशी तासन्तास बोलायचे, फक्त ड्रॉईंगच्या भाषेत आम्ही बोलायचो, ती चित्रं आणि रेखाटने सजीव, जिवंत असायची, ती मला समजायची, आवडायची.

पुढे ली-कार्बोजीयरच्याच प्रोजेक्टचे सुपरव्हिजन करण्यासाठी बी. व्ही. दोषी भारतात परतले. अहमदाबाद आणि चंदीगढच्या इमारती त्यांच्या देखरेखीखाली तयार झाल्या.

बी. व्ही. दोषींनी लुई कहान आणि अनंत राजे यासारख्या दिग्गज आर्किटेक्ट सोबतही काम केलं.

त्यांनी अहमदाबादेत स्वतःचा वास्तु शिल्प डिझाईन स्टुडिओ उभारला.

इथेच त्यांनी नवे आर्किटेक्चर कॉलेज उघडले. या कॉलेजच्या जन्मकथेविषयी बी.व्ही. दोशी सांगतात,

“जे. जे. स्कुल ऑफ आर्किटेक्चर मध्ये पदवी घेऊन मी वॉशिंग्टनला गेलो. एम. आय. टी. मध्येही काही दिवस होतो. अमेरीकेत असताना मी वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकवण्यासाठी जायचो, मला तिथलं मुक्त वातावरण खुप आवडायचं, तिथल्या संधी, सुविधा आणि भोवताली आखलेल्या मर्यादांना भेदुन वेगळं काहीतरी करण्याच्या त्यांच्या इच्छा यांनी मला भुरळ घातली.

“तिथली समृद्ध ग्रंथालयं, वेगळा विचार करण्याचं स्वातंत्र्य, रोज खुलणाऱ्या नव-नव्या संधीची क्षितीजं पाहीली, की वाटायचं की आपल्यालाही शिकताना हे मिळालं असतं तर किती छान झालं असतं, मला चर्चांतुन-परिसंवादांतुन विचार मांडायला आणि स्वतःला जाणुन घ्यायला आवडलं असतं. ह्याच विचारांनी मला आपल्या देशात नवी आर्किटेक्चर स्कुल सुरु करण्यास प्रवृत्त केले.”

त्यांना इतक्या नवनव्या कल्पना कशा सुचतात, यावर त्यांचं उत्तर गंमतीशीर आहे,

“आपल्या प्रत्येकाकडे एक एंटीना असतो, त्यावर वेगवेगळी सिग्नल्स येत असतात, त्यातलं कोणतं निवडायचं, ते आपल्याच हातात असतं, नव्या कल्पनेच्या स्वागतासाठी मी आजही सदैव सज्ज आणि उत्सुक असतो. आणि त्या जोरावरच मी इथवर पोहचलोय.”

“एखाद्याकडे फक्त पैसे कमी आहेत म्हणुन कसेकाय तुम्ही त्याला चांगल्या घराच्या डिझाईन पासुन वंचित ठेवु शकता? स्वप्ने पहा, विचार करा, मेहनत घ्या. तुम्ही कमी बजेटमध्येही चांगलं डिझाईन नक्की बनवु शकाल. वयाच्या एकोणनवद्दाव्या वर्षी उत्साहाने बी. व्ही. दोषी नव्या पिढीला संदेश देतात.

भारत सरकारने पद्मश्री एवॉर्ड देवुन त्यांचा सन्मान केला.

आपल्या कल्पनांना वास्तवात बदलवणारा हा अफलातुन जादुगर प्रत्येक कलाकारासाठी सदैव प्रेरणास्थानी राहील.

लेखक मोटिव्हेशन संदर्भात व्हाट्सअप वरती विविध कोर्सेस घेतात. त्यासाठी अभिप्रायातून त्यांना सम्पर्क करता येईल.

वाचण्यासारखे आणखी काही…..

भारतीय वास्तुकलेला पडलेलं मनमोहक स्वप्न – चार्ल्स कोरीया.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!