घरगुती व्यवहार चोख होण्यासाठी मासिक बजेट कसे तयार करावे?

आजच्या #30DaysChallenge4FinancialHealth #३०_डेज_चॅलेंज_फॉर_फायनान्शियल_हेल्थ मध्ये, चॅलेंज आहे मासिक बजेट तयार करण्याचे.

तसा वर्षानुवर्षे व्यवहार आपण केलेलाच असतो पण गरज आहे ती फक्त या गोष्टींमध्ये थोडी शिस्त आणण्याची. म्हणूनच हा लेख वाचा, मासिक बजेट कसे तयार करावे? याबद्दल.

पहिले आपले मासिक बजेट तयार करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण सुरुवात केल्यावर भीती जाते आणि फायदे समजतात.

फार कमी भारतीय लोक मासिक बजेट तयार करतात, दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी, कर्जातून बाहेर पडण्यासाठी, अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी बजेट तयार करणे अत्यावश्यक ठरते.

काही वर्षांपूर्वी जेव्हा मी माझे पहिले मासिक बजेट तयार केले होते तेव्हा फक्त दरवर्षी किती रक्कम मी मिळवतो हे साधारणपणे माहिती होते. परंतु माझ्या खर्चाचा व गुंतवणुकीचा ताळमेळ काही उत्पन्नाशी बसत नव्हता.

थोडक्यात पैसे खर्च करताना मी आपल्याला परवडते की नाही याचा विचार न करता केवळ खर्चच करत होतो. आर्थिक चणचण आणि क्रेडिट कार्ड चे पठाणी व्याज तसेच दंड भरावा लागल्यावर मी जागा झालो आणि माझे पहिले बजेट मांडले.

मासिक बजेट हे अपेक्षित उत्पन्न आणि खर्च यांचा निर्धारित कालावधीसाठीचा सारांश आहे. बजेट मुळे तुम्हाला तुमच्या खर्च करण्याच्या सवयी व पद्धतींचे वेगळ्या दृष्टीने आकलन होऊ शकेल.

तुम्ही पाहिल्यांदाच वैयक्तिक बजेट तयार करत असल्यास मुळीच घाबरू नका, पुढील ११ गोष्टी करा आणि निश्चिंत रहा.

१. बजेट सुरु करण्याचा निर्णय घ्या :

आपण हा लेख इथपर्यंत वाचत आले असल्यास आपले अभिनंदन. कारण आपण बजेट प्रणाली अवलंबण्याचा निर्णय नक्कीच घेतला असणार. बजेटची सुरुवात करण्याचा निर्णय घेणे ही सुद्धा अनेकांसाठी मोठी बाब असते.

२. जाणून घ्या – आपण किती मासिक उत्पन्न मिळवतो :

काही लोक म्हणजे पगारदार व्यक्ती, मासिक ठराविक उत्पन्न मिळवणारे उदा. जागा भाडे ,कन्सलटन्सी इ. मिळवणारे लोक त्यांचे मासिक उत्पन्न सहजपणे शोधू शकतात.

व्यवसाय धंदा करणारे व अनिश्चित म्हणजे सिझनल उत्पन्न मिळवणारे यांच्यासाठी मासिक उत्पन्न शोधणे थोडे कठीण असते. उदा . लग्न ,फोटोग्राफर ,मंगल कार्यालयाचे चालक इ.

तुम्ही जर फ्री लान्स काम करत असाल किंवा तुमचे काम कधी कमी ,कधी जास्त असेल तर मागील ६ ते १२ महिन्यांच्या उत्पन्नाची सरासरी काढून ते मासिक उत्पन्न म्हणून गृहीत धरु शकता. बजेट तयार करताना मासिक सरासरी फार महत्वाची आहे.

आपल्या उत्पन्नाचा आकडा हा शाश्वत व खरा असणे आवश्यक आहे. भविष्यात चांगले उत्पन्न जरी तुम्ही मिळवणार असाल तरी आताचेच खरे मिळणारे उत्पन्न आपण बजेट तयार करण्यासाठी वापरावे.

३. जाणून घ्या – आपली देणी किती आहेत :

दर महिन्याला देय असलेल्या विविध कर्जांचे हप्ते यांची एकूण किती रक्कम होते हे ठरवणे तसे सोपे आहे.

यामध्ये पुढील देण्यांचा समावेश होऊ शकेल . उदा . गृह कर्ज ,शैक्षणिक कर्ज ,वाहन कर्ज ,क्रेडिट कार्ड कर्ज.

४. आपल्या नेट वर्थ चे गणित मांडा :

नेट वर्थ म्हणजे आपल्या जवळ काय आणि किती संपत्ती आहे, देणी किती आहेत. आपल्याला कुठेही जायचे असेल तर आपण नेमके कुठे आहोत हे समजणे आवश्यक आहे.

आपली मालमता (वजा) आपली देणी = नेट वर्थ

नेटवर्थ कसे मोजावे हे जाणून घेण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा.

नेट वर्थ गणितामुळे तुम्हाला तुमच्या संपत्तीचा उपयोग उत्पन्न वाढवण्यासाठी कसा करता येईल व कर्ज देणी किती आहेत , ती कधीपर्यंत फेडायची आहेत ,त्यांची मासिक परत फेड किती करता येईल हे समजेल.

आपल्या मनातील आणि प्रत्यक्ष गणित मांडलेले नेट वर्थ यात बऱ्याच वेळा तफावत जाणवेल आणि वास्तव स्थितीची आपल्याला जाणीव होईल .

५. आपला सरासरी मासिक खर्च मांडा :

हे बऱ्याच लोकांसाठी कठीण असते. तुम्ही जर पुढीलप्रमाणे यादी तयार केली आणि त्यापुढे मागील २ ते ३ महिन्यांचा खर्च लिहिला तर साधारण खर्चाची कल्पना येते.

उदा . १ घरगुती खर्च :-किराणा, भाजी, वीज बिल, मोबाईल बिल, रिचार्जेस, दवाखाना व औषधे, जिम फी, दूध, पेपर, घरातील मदतनीस फी इ . २. गाडीचा खर्च :-पेट्रोल ,छोटे रिपेअर , मोठे रिपेअर, इन्शुरन्स इ . वरील उदाहरणाप्रमाणे तुम्ही खर्चाचे विविध शीर्षकांखाली वर्गीकरण करू शकता.

खर्चाची निश्चित व बदलता खर्च अशी विभागणी करा

निश्चित खर्च : भाडे, गृहकर्ज हप्ते, वाहनकर्ज हप्ते, केबल-इंटरनेट सेवा, सरासरी किराणा वगैरे

बदलते खर्च : करमणूक, भेटवस्तू, दवाखाना वगैरे

काही लोकांसाठी एखाद्या खर्चाची विभागणी बाकीच्यांपेक्षा वेगळी असू शकेल उदा . मधुमेही रुग्णांना औषधाचा खर्च निश्चित असतो ते सदर खर्च निश्चित खर्चात मोजू शकतात.

६. वरील माहिती कामाला लावा :

वरील १ ते ५ पायऱ्यानुसार फक्त माहिती गोळा करून उपयोग नाही. सदर माहितीची मांडणी योग्यप्रकारे करायला हवी. यासाठी तुम्ही कागदावर मांडणी करू शकता किंवा स्प्रेड शीट म्हणजे एम.एस. एक्सेल / गुगल शीट्स यांचाही वापर करू शकता. अनेक अँप्सचाही उपयोग स्मार्टफोनवर बजेट मांडण्यासाठी होऊ शकतो. शक्यतो स्प्रेड शीटचा वापर करावा.

आपल्या माहितीसाठी अनेक प्रकारया लिंक वरउपलब्ध आहेत. येथे क्लिक करा.

मासिक बजेट कसे आखावे हे जाणून घेण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा.

७. शिल्लक रक्कम तपासा : शिल्लक रक्कम = एकूण उत्पन्न (वजा) एकूण खर्च

वरीलप्रमाणे माहिती मासिक बजेट प्रणालीत मांडल्यावर आपण या प्रक्रियेतील महत्वाच्या भागाकडे वळणार आहोत.

शिल्लक रक्कम आपल्याला सांगेल की आपण पैसे जास्त खर्च करत आहात किंवा कमी खर्च करत आहात.

मराठीत म्हण आहे की ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’. शिल्लक रकमेचा विचार करता आपले पाय अंथरूणात आहेत की बाहेर येत आहेत याचा अंदाज येऊ शकेल.

जर पैसे पुरत नसतील, चणचण जाणवत असेल तर तुम्ही नक्कीच अनावश्यक मासिक खर्चांवर बंधने आणू शकता. जर उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असेल तर बदलत्या खर्चांमध्ये कपात करायला हवी. हे खर्च बऱ्याचदा गरजेचे नसतात. घरभाडे थकले असताना सिनेमाला जाऊन करमणूकीवर खर्च करण्यात अर्थ नाही.

८. आवश्यक ते बदल करा :

जर शिल्लक रकमेतून सिद्ध होत असेल की आपण आपल्या उत्पनाच्या मानाने भरपूर जास्त रक्कम खर्च करत आहोत, तर मासिक खर्च रकमेत कपात करा. एकतर उत्पनाचे स्त्रोत तरी वाढवावे लागतील किंवा खर्चात कपात तरी करावी लागेल.

९. वास्तव स्थिती स्विकारून बदलांना तयार राहा :

आपले आयुष्य आश्चर्यकारक घटनांनी भरलेले असते. महागाई त्रास देत असते, अचानकपणे घरभाडे वाढते, वैद्यकीय उपचारांचा खर्च वाढतो, अनावश्यक प्रवास करावा लागतो, सगळ्यात वाईट म्हणजे काही अनपेक्षित घटना घडतात.

पगारवाढ होत नाही, मंदी मुळे नोकरी जाऊ शकते. यांसारख्या आकस्मिक उदभवणारया अडचणींना तोंड देऊन आपण आपल्या उत्पन्नाचा करत असलेल्या खर्चाच्या तुलनेत विचार करायला हवा

१०. बचतीची सवय लावा :

आपल्या खर्चाच्या यादीमध्ये अनेक खर्च असतात. खर्चाच्या ओळी खाली जावक (Outflow) म्हणून विविध बचतीच्या पर्यायांचा विचार व्हावा.

उदा . बचत ठेव ,आवर्ती ठेव, मुदत ठेव (एफडी), म्युच्युअल फंड सिप , एलआयसी ,पीपीएफ इ. खर्च यादीखाली बचतीची यादी असल्याने खर्च करताना आपोआपच तुमचा हात आखडला जाईल.

११. दर महिन्याला पुनरावलोकन करा, मागोवा घ्या, शिस्तबद्ध व्हा !

आपल्या वैयक्तिक बजेटचे पुनरावलोकन करायला तुम्हाला आठवड्याला केवळ १० ते १५ मिनिटे लागतील.

यामध्ये आपण काय करतो आहोत याचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. मागोवा घेतल्याचे भरपूर दीर्घकालीन फायदे आहेत. बजेट तयार केल्यावर तुम्ही वास्तवात जगायला सुरुवात करता.

येथे मात्र एक पथ्य पाळायला हवे ते म्हणजे तुम्ही संतुलित व लवचिक असावे. एखाद्या महिन्यात खर्च जरी जास्त झाला तरी न घाबरता पुन्हा प्रयत्न करायला हवेत. लवचिकता नसेल तर बजेट प्रणालीचा मूळ उद्देश नाहीसा होईल.

आपल्याकडे जर वैयक्तिक बजेट नसेल तर लगेच तयार करायला घ्या. वरील ११ पायऱ्यांचा वापर करून तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य व संपत्ती निर्माणाच्या मार्गावर अग्रेसर व्हाल.

लेखन : सीए. अभिजीत कोळपकर

सौजन्य : अर्थसाक्षर.कॉम

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय