तुमचा पैसा सुरक्षित आहे का? प्रोप्रायटरी ट्रेडिंग बद्दलची हि माहिती असू द्या.

प्रॉपायटरी ट्रेडींग

मी शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली ती साधारणतः मार्च १९८४ मध्ये. तेव्हा व्यवहार कागदी प्रमाणपत्राच्या स्वरूपात होत होते. तेव्हापासून आजपर्यंत या पद्धतीत झालेले बदल, अनेक तेजी मंदीच्या लाटा , विविध घोटाळे त्यानंतर आलेले विविध कठोर नियम यांचा मी साक्षीदार आहे. या सर्वच बदलात सर्वात आमूलाग्र बदल म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार कागदविरहित होणे. यामुळे बाजारात होणारे व्यवहार हजारो पटींनी वाढले. अनेक नवगुंतवणूकदार बाजाराकडे आकर्षित झाले. डिस्काऊंट ब्रोकर्स अस्तित्वात आल्याने अनेक नियमित ब्रोकर्सचे व्यवसायावर परिणाम झाला आणि दलालीचा दर किमान पातळीवर आला त्यामुळेच आपले अस्तित्व टिकवण्यासाठी उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधणे त्यांना भाग पडले. यात पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस, डिपॉजीटरी सर्व्हिस, एसेट मॅनेजमेंट, ईश्शु अंडररायटिंग, इन्शुरन्स विक्री यासारखे अन्य मार्ग शोधावे लागले ज्यांना हे जमले नाही त्यांनी आपला व्यवसाय बंद केला. यात अजून एका फायदेशीर व्यवसायाची भर पडली आहे ती म्हणजे प्रोप्रायटरी ट्रेडिंग.

ब्रोकरेज फर्मने स्वतः साठी केलेले खाजगी ट्रेडींग म्हणजे प्रोप्रायटरी ट्रेडिंग होय. याचा थोडक्यात उल्लेख ‘प्रो ट्रेडींग’ असाही करतात. ज्यांना हे जमले त्यांनी किरकोळ व्यवसाय बंद करून कॉर्पोरेटसाठी आणि स्वतःसाठी प्रोप्रायटरी ट्रेडिंग फर्म स्थापन केल्या तर काहींनी किरकोळ व्यवसायासपूरक म्हणून प्रो ट्रेडिंग चालू केले. मोठया प्रमाणात नफा मिळवण्यासाठी हे अपरिहार्य झाले आहे. एके काळी माझ्या ब्रोकरच्या स्टाफला त्याच्या मालकाकडे ट्रेडिंग अकाउंट काढता येत नव्हते कारण त्यामुळे नियमित गिऱ्हाईकाकडे दुर्लक्ष होईल असे त्यांना वाटत असे. आता ब्रोकर्सना दलालीतील किरकोळ नफ्याचे आकर्षक राहिलेले नाही, हा काळाचा महिमा आहे. प्रो ट्रेडिंग शेअर डिरिव्हेटिव्हजच्या एकूण उलाढालीच्या ५०%, शेअर कॅश मार्केटच्या उलाढालीच्या २०%, ऍग्री कमोडिटी ट्रेडींगचे उलाढालीच्या ४३% नॉन ऍग्री कमोडिटीच्या २१% एवढया मोठया प्रमाणात होते. सध्या बाजारात रोज प्रत्येकी ६ ते ८ लाख कोटी रुपयांचे व्यवहार शेअर आणि कमोडिटी या दोन्ही सेगमेंटमध्ये होतात. यावरून याची व्याप्ती लक्षात येते.

वाचनकट्टा...

वाचनकट्टा… शेअरमार्केट विषयी मराठी पुस्तकांचा

अनेक दलाल कंपन्यांचा १० ते ४० % फायदा प्रो ट्रेडींगमुळे झाला आहे. ब्रोकरचे हाताखाली तज्ञ लोकांची टीम असते, बाजाराच्या दिशेचा त्यांना अंदाज बसतो. त्यांची स्वतः ची वैयक्तिक मालमत्ता जास्त असते, काही अंतर्गत माहिती त्यांना उपलब्ध होते. त्यामुळे अशा तऱ्हेने मिळणाऱ्या माहितीचा ते उपयोग करून घेतात, इतपर्यंत ठीक आहे परंतु काही ब्रोकर त्यांच्याकडे असलेल्या ग्राहकांचे पैसे आणि शेअर्सचा वापर आपल्या वैयक्तिक ट्रेडींगसाठी करतात. ही एक अनुचित व्यापारी प्रथा असून असे करण्यात ग्राहकाहित नाहीच पण ते बेकायदेशीरही आहे. असे व्यवहार करणाऱ्या प्रत्येक ब्रोकर्स फर्मने यासंबंधी माहिती जाहीर करणे सेबीच्या नियमानुसार बंधनकारक आहे. कितीही काळजीपूर्वक असे ट्रेडींग केले तरी यातील एक चूक ब्रोकिंग फर्मचे प्रचंड नुकसान करून तिचे अस्तित्व नाहीसे करू शकते. त्याचे दिवाळे वाजू शकते किंवा लायसन्स रद्द होऊ शकते. त्यामुळेच आपला ब्रोकर प्रो ट्रेडिंग करतो का? हे आपणास माहीत असणे जरुरीचे आहे. या सर्वच परिस्थितीत जे ब्रोकर प्रो ट्रेडिंग करीत नाहीत तेथे आपले खाते अधिक सुरक्षित आहे असे म्हणता येईल. सध्या अनेक नामवंत दलाल आणि डिस्काउंट ब्रोकर्स प्रो ट्रेडिंग करतात त्यामुळे आपले अकाउंट त्यांच्याकडे असेल तर आपले पैसे आणि शेअर्स यांचा वापर ब्रोकरने करू नये म्हणून खालील विशेष काळजी प्रत्येकाने घ्यावी.

  • ब्रोकरने तो प्रोप्रायटरी ट्रेडिंग करतो का हे जाहीर करणे सेबीच्या नियमानुसार आवश्यक आहे. SEBI/HO/CDMRD/DMP/CRP/P/2016/49 Dated April 25, 2016. ते एका ठिकाणाहून की अनेक ठिकाणांहून तेही जाहीर करणे जरुरीचे आहे. आपणास हे माहीत नसेल तर आपण त्याला ही माहिती विचारु शकता.
  • आपल्या ट्रेडिंग खात्यात कधीही अतिरीक्त रक्कम ठेवू नये. जेव्हा खरेदी करायची असेल तेव्हाच पैसे द्यावेत आणि विक्री केल्यावर देय तारखेस पैसे मागून घ्यावे. नको असल्यास पैसे लिक्विड फंडात गुंतवावे.
  • ब्रोकरने आपल्याकडून घेतलेल्या अधिकारपत्राद्वारे आपले पैसे आणि शेअर्सचा वापर प्रो ट्रेडिंगसाठी करण्याचे एकतर्फी अधिकार त्यांना देऊ नये. खर तर अशी अट करारपत्रात टाकण्यास सेबीने बंदी करणे अपेक्षित आहे कारण करारपत्रातील छोट्या अक्षरात लिहिलेल्या असंख्य अटी कोणी वाचत असेल असे मला वाटत नाही.
  • खरेदी केलेल्या शेअर्सचे पैसे देऊन झाल्यावर ते शेअर्स आपल्या खात्यात वेळेत जमा होतात यावर लक्ष ठेवावे. आपले शेअर्स ब्रोकरचे पूल अकाउंटमध्ये ठेऊ नयेत कारण त्याचा वापर ब्रोकरला करता येऊ शकतो. आपल्या खात्यात वेळेवर शेअर जमा होत नसल्यास लक्षात आणून द्यावे. आपले लक्ष आहे हे त्यांच्या लक्षात आले की मग ते आपले सर्व व्यवहार वेळच्या वेळी करतात. आपण लक्ष देत नसलो की त्यांना आयती संधी मिळते. आपल्या डी मॅट खात्यातील शेअर्सचा वापर ब्रोकरला आपल्या अधिकारपत्राशिवाय प्रो ट्रेडिंगसाठी करता येत नाही.

शेअर मार्केट बद्दल महत्वाचे…

डे ट्रेडिंग (Day Trading)
निर्देशांक (Index) म्हणजे काय? आणि तो कसा मोजतात
कंपन्यांचे वर्गिकरण आणि सामान्य गुंतवणूकदारांसाठी त्यानुसारचा कानमंत्र


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!