पहिले महायुद्ध! (प्रशियन युद्ध ते राणी विक्टोरियाचा इंग्लिश द्वेष्टा नातू कैसर विल्हेल्म दुसरा)

पहिले महायुद्ध

मागील भागात – पहिले महायुद्ध!….. संघर्षाचा आरंभ आपण बिस्मार्कच जर्मनीत उदय (म्हणजे तेव्हाचा प्रशिया) आणि त्याचे जर्मन एकीकरणाच्या दृष्टीने सुरु असलेले प्रयत्न इथपर्यंत आलो होतो. जर्मन एकीकरणासाठी त्याने एकूण ३ युद्धे छेडली त्यातली दोन आपण पाहिली आता शेवटचे आणि निर्णायक युद्ध फ्रांसशीच होणार होते कारण सगळ्यात जास्त जर्मन एकीकरणाला कुणाचा विरोध असेल तर तो फ्रान्साचाच होता जरी तो उघडा नसला तरीही…

फ्रांको प्रशियन युद्ध १८७०-७१

पहिले महायुद्ध

१८७० साली स्पेनची राणी इझाबेला हिला अंतर्गत बंडाळीमुळे गादीवरून पायउतार व्हावे लागले आणि स्पेनची गादी रिकामी झाली. प्रशियाचा राजा विल्हेल्म चा पुतण्या प्रिन्स लिओपोल्ड ह्याला स्पेनचा राजा होण्याची शिफारस केली गेली. बिस्मार्काचा ह्याला पाठींबा होता नव्हे  त्यानेच त्याचे लागेबांधे वापरून लिओपोल्ड चे नाव पुढे करवले होते. स्वत: लिओपोल्ड आणि त्याचा काका सम्राट विल्हेल्म ह्यांची लिओपोल्द्ने स्पेनचा राजा व्हायला फारशी इच्छा नव्हती. फ्रांस नाराज झाले असते हेतर झालेच पण गेली १०० एक वर्षे स्पेन मध्ये सतत कुरबुरी, बंडाळ्या, उठाव  चालूच होते ही असली सुळावरची  पोळी खाण्यात त्यांना काही स्वारस्य नव्हते पण बिस्मार्कने मोठ्या मिनतवाऱ्या करून त्यांचे मन वळवले. कारण लिओपोल्ड स्पेनचा राजा  झाल्यावर  फ्रान्सच्या पश्चिमेकडून प्रशियाला अनुकूल असणारे एक राज्य तयार होणार होते. अखेर १९ जुन १८७० रोजी लिओपोल्ड तयार झाला आणि तशी तार (सांकेतिक भाषेतली) त्याने स्पेन ला केली कि राज्यग्रहण करण्याच्या ठरवला उपस्थित राहायला तो २९ जून ला येत आहे. इथे एका छोट्याश्या घटनेने बिस्मार्कच्या सगळ्या योजनेवर पाणी पडले. झाले असे कि सांकेतिक भाषेतली तार भाषांतरीत करणारा जो कुणी होता त्याने २९ जून ऐवजी चुकून ९ जुलै केले. त्यामुळे स्पेनमधील मंत्री मंडळ/ कायदेमंडळाची सभा त्याने तो पर्यंत तहकूब केली आणि इकडे लिओपोल्ड  २९ जूनला पोहोचला तेव्हा सगळा गोंधळ उडाला आणि ती बातमी साहजिकच बाहेर फुटली. तो राजा होईपर्यंत ही बातमी गुप्त विशेषत: फ्रांस पासून लपून राहणे गरजेचे होते, पण आता सगळेच बिंग फुटले आणि फ्रांस मध्ये खळबळ उडाली. त्यांनी ह्यावर तीव्र नापसंती दाखवली आणि भांडण नको म्हणून राजा विल्हेल्मने त्यांचे म्हणणे मान्य करत लिओपोल्डला असलेला आपला पाठींबा काढून घेतला. लिओपोल्डने देखील लगोलग आपली उमेदवारी मागे घेतली आणि तसे स्पेन आणि फ्रान्सला कळवले. हा खरेतर फ्रान्सचा राजनयिक विजयच होता ( आणि बिस्मार्कच्या मनसुब्याचा पराभव) पण तेवढ्यावर समाधान मानायला ते तयार नव्हते. त्यामुळे ह्या प्रकरणाची चर्चा करण्यासाठी फ्रांसने पाठवलेला राजदूत काउंट बेनेडेटी ह्याने चक्क राजा विल्हेल्मकडे त्याने प्रिन्स लिओपोल्डला दिलेला पाठींबा काढून घेण्याचे आणि पुढे भविष्यात देखिल स्पेनच्या मामल्यात दखल देणार नाही असे लिखित आश्वासन मागितले.

खरेतर ह्यातली पहिली गोष्ट आधीच झालेली होती आणि असा काही विषय परत येणे संभाव नव्हते. (लोकांना राजा व्हायची ऑफर काही रोज रोज मिळत नाही.) पण अशा प्रकारे लिखित आश्वासन मागणे ते सुद्धा एक राजदूताने राजाकडे अशी मागणी करणे हे अपमानजनक होते आणि राजा विल्हेल्म ने त्याची दुसरी मागणी साफ धुडकावली. जे काही घडले ते सांगणारी तार सम्राट विल्हेल्मने शिष्टाचार म्हणून बिस्मार्काकडे पाठवली. बिस्मार्क अशा एका संधीची वाटच पाहत होता जिने त्या तारेतले फक्त काही शब्द असे काही फिरवले कि त्यातून फ्रेंचांचा उद्दामपणा तर अधोरेखित झालाच पण प्रशिया अशा कुठल्याही दबावाला बळी पडणार नसुन आता उलट स्पेनच्या मामल्यात नक्कीच हस्तक्षेप करणार आहे असा देखावा तयार झाला, इतिहासात ही तार किंवा टेलिग्राम एम्स टेलिग्राम म्हणून प्रसिद्ध आहे. (ही भेट झाली तेव्हा राजा विल्हेल्म एम्स राजवाडा, ऱ्हाईनलंड इथे होता म्हणून हा एम्स टेलिग्राम, तारीख होती २३ जुलै १८७०) झाले, आता  फ्रान्सचे पित्त ह्याने खवळले आणि त्याने ही म्हणजे प्रशियाची आपल्याला दोन बाजुने घेरण्याची एक चाल आहे असे ओळखून प्रशियावर युद्ध पुकारले. बिस्मार्कची हीच इच्छा होती. ह्या एका गोष्टीमुळे त्याने एकाच दगडात किती पक्षी मारले पहा. ह्यामुळे युरोपात आगळीक फ्रान्सनेच काढली हे सिद्ध झाले, फ्रांस आपल्याला शांतपणे जगू देणार नाही ह्याची दक्षिण जर्मन राज्यांना खात्री पटली, नुकतेच हरल्यामुळे नाराज असलेल्या पण जर्मनच असलेल्या ऑस्ट्रियाला फ्रान्सच्या उद्दामपणामुळे  गप्प बसावे लागले आणि आपली तार पाहून फ्रांस असा आततायी पणा करणार ह्याची पूर्ण कल्पना असल्याने युद्धाच्या पूर्ण तयारीत असलेला प्रशिआ आता अगदी शड्डू ठोकून युद्धात उतरला. तार प्रकरण अचानक उद्भवल्यामुळे फ्रेंच सैन्याची तशी लगोलग युद्धाला जायची तयारी नव्हती. त्यामुळे  युद्ध पुकारल्यावर पूर्ण तयारीत असलेल्या प्रशियाने फ्रांसची अगदी धूळधाण केली. वैझेन्बार्ग, ग्रेवेलोट,मार्त्झ नदीजवळ, अशा ठिकाणी लढाया झाल्या मुख्य लढाई सेदान इथे झाली आणि त्यात मात्र फ्रान्सचा पूर्ण पराभव झाला चक्क राजा नेपोलीयानच स्वत: कैद झाला आणि त्याला सत्ताभ्रष्ट व्हावे लागले. तीन वर्षानी तो निर्वासित अवस्थेत इंग्लंड मध्ये मरण पावला. प्रशियन सैन्य तिथे थांबले नाही. झाले असे कि स्वत: राजा नेपोलियन कैद झाल्याने फ्रांस मध्ये गोंधळ झाला आणि फ्रांस मध्ये तत्पुअरते हंगामी सरकार स्थापन केले गेले . त्यानी लगोलग प्रशियाशी बोलणी करायला हवी होती पण नक्की किती नुकसान झालेले आहे, सध्या आपल्या राखीव सैन्याची अवस्था काय आहे ह्याबाबत गोंधळ असल्याने त्यांच्यातच एकमत होत नव्हते. इकडे मोल्टके काही शांत बसला नव्हता. त्याच्या अधिपत्याखालील प्रशियन सैन्याची आगेकूच चालूच होती त्याने चक्क फ्रेंच राजधानीलाच वेढा घातला आणि तो चांगला १३० दिवस चालला. ५ दशकांपूर्वी अख्ख्या युरोपला धूळ चरणाऱ्या फ्रांसची केवढी मानहानी! आणि ती पण अजून पुरते राष्ट्रदेखील न झालेल्या जर्मन-प्रशियाकडून. सगळा युरोप बोटे तोंडात घालून पाहतच राहिला. आता प्रशियाच्या सामर्थ्यापुढे  बोलायची कुणाची टाप नव्हती. अखेर २४ जाने १८७१ रोजी फ्रन्कफुर्ट इथे तह झाला आणि सर्व जर्मन राज्यांचा प्रशियात विलय होऊन जर्मनी हे नवे राष्ट्र उदयाला आले. त्याचा राजा होता विल्हेल्म पहिला, त्याने कैसर (सम्राट) ही पदवी धारण केली. पराजित फ्रांसने मागे बळकावलेले अल्सेस आणि लॉरेनहे प्रांत परत केले शिवाय युद्धखोरीची भरपाई म्हणून ५ अब्ज रुपयांची भरपाई दिली. अशा प्रकारे मोठ्या मुत्सद्देगिरीने आणि चलाखीने बिस्मार्कने आपले उद्दिष्ट पूर्ण करून दाखवले. पण ह्याबरोबरच स्वत:च्या सामर्थ्याबद्दल भरमसाट गर्व आणि युद्ध करून आपल्याला हवेते पदरात पडून घेता येईल हा आंधळा विश्वास जर्मन जनतेच्या मनात भरला गेला.

बिस्मार्क जितका धोरणी आणि काळाची पावले ओळखणारा होता तितके मुत्सद्दीपण पुढील पिढीतल्या कुणात असणार नव्हते . अगदी ५०-५५ वर्षापूर्वी ज्यांना आपण मंडलिक केले होते त्यांनी आपला लाजीरवाणा पराभव केलाच पण अल्सेस आणि लॉरेन प्रांत हाताचे गेल्याने, आणि चक्क राजधानी पॅरिसला ५ महिने वेढा पडल्याने झालेला अपमान फ्रेंचांच्या जिव्हारी लागला. (खरेतर सेदान आणि वेर्डून इथे पराभव झाल्यावर बिस्मार्कने थांबायला हवे होते पण पुढे त्याने जे केले त्यामुळे फ्रांस जर्मनीचे कायमचे वैरी बनले आणि हे वैर पुढचे जवळपास ७५ वर्षे आणि दोन महायुद्धे, दोघानाही पुरले… असो हे आपण आता म्हणतो आहोत). ह्या एका युद्धाने युरोपचा भूगोलच नाही तर सत्ता समतोल पार बदलून/बिघडून गेला. पहिल्या मह्युद्धाचे बीज इथे पडले आणि आता सर्वनाश, संहाराकडे वाटचाल सुरु झाली. ह्या युद्धात जर्मनीचा सेनापती होता हेल्मुट फॉन मोल्टके. पहिल्या मह्युद्धात भाग घेतलेल्या जर्मन सेनापती हेल्मुट फॉन मोल्टकेचा काका.

अशाप्रकारे एकीकृत जर्मनीचे स्वप्न पूर्ण झाल्यावर मात्र बिस्मार्कने कोणतेही विस्तारवादि धोरण आखले नाही. नव्यानेच अस्तित्वात आलेल्या जर्मनीची भरभराट, प्रगती साधण्यासाठी त्याला स्थैर्य आणि शांती हवी होती. देशातल्या स्वातंत्र्य प्रेमी समाजवादी राष्ट्रवादी अशा निरनिराळ्या गटांना शांत करण्यासाठी म्हणून का होईना, त्याने काही प्रमाणात लोकशाही आणली. १८७१ सालीच जर्मन संसद म्हणजे राईश्टाग स्थापन करून २५वर्षे वयावरील  प्रत्येक जर्मन नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला गेला. हे तेव्हाच्या इंग्लंड मध्ये ही नव्हते. आरोग्य विमा आणि कामगारांना पेन्शन अशासारख्या योजना त्याने आणून जर्मन देश हे एक कल्याणकारी राज्य आहे असे ठसवले. राजेशाही जरी पूर्ण बरखास्त नाही केली आणि पंतप्रधान किंवा त्यांच्या भाषेत चान्सेलर जरी लोकनियुक्त नसला तरी लोकांचा राज्यकारभारातला सहभाग लक्षणीय रीत्या वाढला. कायदे करणे, करप्रणाली आणि एकूण शैक्षणिक आणि आर्थिक धोरण ठरवणे अशा बाबीत लोकाना सहभाग दिला गेला. औद्योगिकरणाला प्रोत्साहन आणि कल्याणकारी कामगार धोरण ह्यामुळे लवकरच जर्मनी एक बलाढ्य औद्योगिक राष्ट्र बनले. शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या उद्योगधंद्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांपेक्षा कमी झाली. २० लाख लोकसंख्या असलेले बर्लिन १९१२ पर्यंत ४० लाख लोख संख्या असलेले मोठे शहर बनले. ते जगात चार नंबरचे मोठे शहर होते.

एकीकरणानंतर जर्मनीच्या औद्योगिकरणाला नवे बळ मिळाले आणि जर्मनीचे सकल राष्ट्रीय उत्पन्न १० वर्षात तिपटीने वाढले. औद्योगिकरणामुळे कामगार वर्ग शहरात, ओउद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात संघटीत झाला त्यातून कामगारहक्क चळवळी मूळ धरू लागल्या त्यामात्र त्याने निष्ठुरपणे मोडून काढल्या. राजेशाही आणि सामंत शाही हे कालबाह्य झालेले असून शेतकरी कामगारांचे लोकसत्ताक राज्य हे आजची गरज आहे असले विचार त्याला खपत नसत. असले विचार व्यक्त करणाऱ्या पक्षांवर त्याने बंदी आणली, नेत्याना तुरुंगात टाकले, हद्दपार केले पण त्या पक्षाच्या अनुयायांना  मतदानाचे अधिकार तर होतेच ना. त्याचे तुष्टीकरण करण्यासाठी म्हणून का होईना त्याने कामगार पेन्शन, अपघात विमा, सुट्ट्या कामाचे साप्ताहिक तास अशा मुलभूत सुधारणा केल्या. खरेतर कल्याणकारी राज्य होण्याच्या दिशेने पडलेले एक पुरोगामी पाउल होते पण समाजवादी चळवळींना शह देऊन जनतेत उदारमतवादी राजेशाहीची लोकप्रियता वाढवण्याचा छुपा उद्देश त्याच्या अंगलट आला. पक्षावर बंदी आलेली असली तरी ह्या लोकांचे मताधिकार शाबूत होते. बिस्मार्कने धर्माला देखील राज्ययंत्रापासून दूर ठेवले होते. इतिहासाचा दाखला घेतला तर मोठ मोठ्या कटकटीना, संहाराला राज्य यंत्र आणि धर्म ह्यांची अभद्र युती कारणीभूत असते  ह्या मताचा तो होता. (त्यात तथ्य होतेच आणि आहेही…) त्यामुळे बिस्मार्क वर नाराज असलेले चर्च चे लोक आणि त्यांचा मोठा अनुयायी वर्ग आणि हे वर उल्लेखिलेले समाजवादी लोक ह्यांची बिस्मार्क विरोधात एक अघोषित युती झाली आणि १८७०-८० मध्ये राईश्ताग मधले त्यांचे एकूण मताधिक्य जे ६ टक्क्यापेक्षा खाली होते ते वाढून १८९० येईतो २५ टक्के पर्यंत गेले. चान्सेलर जो लोकनियुक्त नसून राजनियुक्त होता त्याच्या सार्वत्रिक अधिकाराला  ह्याने खीळ बसली. आता गेली १७ वर्षे तो जर्मनीचा चान्सेलर -पंतप्रधान होता (आणि प्रशियाच्या पंतप्रधानकिचा काळ जमेला धरला तर २६ वर्षे) पण त्याचा खंदा आधारस्तंभ कैसर विल्हेल्मही थकला होता. ९ मार्च १८८८ रोजी तो वारला. त्याचा मुलगा फ्रेडरिक तिसरा (पुन्हा फ्रेडरिक!) गादीवर आला खरा पण गादीवर यायच्या अगदी तीन दिवस आधीच त्याला घशाचा आणि फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. तो गादीवर आला तेव्हा त्याचे वय होते ५७ वर्षे म्हणजे काही फार नाही पण विकोपाला गेलेल्या आजारामुळे तो फक्त ९९ दिवस राज्य करून १५ जून १८८८ ला तो वारला आणि त्याचा मुलगा विल्हेल्म दुसरा गादीवर आला. नवीन राईश्ताग जे कैसर विल्हेल्म दुसरा ह्याच्या अध्यक्षते खाली सुरु झाले त्याचे त्यावेळी काढलेले हे चित्र मोठे  सूचक  आहे.

पहिले महायुद्ध

चित्रात दाखवल्या प्रमणे  कैसरच्या पायाशी एकटाच उभा असलेला चान्सेलर बिस्मार्क खरोखर एकटा पडला होता. त्याला राईश्तागमध्ये बहुमत नव्हते आणि नव्या राजाचा पाठींबा नव्हता. कैसर विल्हेल्म ला जुना आणि त्याच्यावर प्रभाव गाजवणारा चान्सेलर नको होता. मार्च १८९० मध्ये म्हणजे गादीवर आल्यावर दोनच वर्षात त्याने बिस्मार्काची बोळवण केली. अगदी एक दिवसाच्या नोटिशीवर त्याला हाकलले गेले. बिस्मार्क त्यानंतर निवृत्त होऊन हाम्बुर्ग जवळ आपल्या वडिलोपार्जित इस्टेटीवर जाऊन राहिला . पुढे तो आणखी ८ वर्षे जगला. त्याचे जर्मनीच्या पंतप्रधानपदावरून पायउतार होणे हे एका युगाचा अंत आणि आणि इतिहासाच्या प्रवाहाला  एक निश्चित वळण देणारे ठरले. तसे युरोपात मानलेही गेले, इंग्लंड मधील पंच नावाच्या मासिकात २९ मार्च १८९० रोजी Dropping The Pilot  ह्या नावाने एक व्यंग चित्र प्रसिद्ध झाले जे मोठे भविष्य दर्शक आहे. शिडात वारे भरलेले हे जर्मनीचे जहाज आता चाणाक्ष, अनुभवी  पायलट(!) नसल्याने कसे आणि कुठे जाणार ह्याविषयी अनेकांना त्यावेळी सार्थ शंका वाटली असणार.

पहिले महायुद्ध

बिस्मार्क पश्चात

१८५३-५६ मध्ये झालेल्या क्रिमियन युद्धात रशिया विरोधात इंग्लंड फ्रांस ह्यांनी एकत्र येऊन तुर्कस्तानला मदत केली होती आणि रशियाच्या युरोपातल्या वाढत्या प्रभावाला खीळ घातली होती. ह्या वेळी रशियाने ऑस्ट्रियाकडे मदत मागितली होती पण ऑस्ट्रियाने नकार दिला. ही त्यांची चूक झाली. युरोपात ऑस्ट्रिया एकटा पडला असताना  त्यांना रशियाच्या मदतीची गरज होती आणि तसेही १८४९ मध्ये हन्गेरीशी युद्ध करून त्याला आपल्या साम्राज्यात सामावून घेताना एकट्या  रशियाने त्यांना समर्थन दिले होते ज्यामुळे इतर युरोपियन देश गप्प बसले होते. असो, ह्या क्रिमियन युद्धाच्या निमित्ताने रशियाच्या अनेक मऱ्यादा आणि कमतरता उघड झाल्या, इंग्लंडला अफगाणिस्तानात युद्धात गुंतवून चांगलेच दमवलेल्या रशियाबद्दल युरोपात भीतीचे अन् संशयाचे वातावरण होते. अनेकांची खात्री झाली होती कि रशिया आणि इंग्लंडचे युद्ध अटळ आहे. ह्या क्रिमियन युद्धाने मात्र बऱ्याच शंका भीत्या दूर झाल्या.

चान्सेलर असताना बिस्मार्कने मात्र रशियाशी सामंजस्य राखण्याचे धोरण ठरवले होते. जसे फ्रांस चे जर्मनीशी वैर होते तसेच नेपोलियानिक युद्धे आणि क्रिमियन युद्धामुळे फ्रांस आणि रशियाचेही वैर होते त्यामुळे फ्रांस विरुद्ध हे दोघे देश एकत्र आले आणि १८७९ मध्ये त्यांच्यात मैत्रीचा करार झाला. दक्षिणेकडे जर्मन भाषक ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्याशी देखील बिस्मार्क ने सामंजस्य पूर्ण व्यवहारच ठेवला होता. तसा मैत्रीचा करार १८७९ सालीच केला गेला. स्पेन इटली तुर्कस्तानशी भांडण उकरून काढायची गरजच नव्हती. १८८२ साली ऑस्ट्रिया हंगेरी, जर्मनी आणि इटलीने एकत्र येऊन मैत्रीचा करार केला. (हा पहिले महायुद्ध सुरु होई पर्यंत टिकला पण युद्ध सुरु झाल्यावर इटलीने त्यातून अंग काढून घेतले.) युरोपातला आजारी मरणासन्न म्हातारा म्हणून हिणवले जाणारे ओट्टोमान साम्राज्य खिळखिळे झाले होते त्याच्या पासून फुटून वेगळे स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या राज्यांवर रशिया आणि ऑस्ट्रिया दोघांचही डोळा होता त्यामुळे अर्थात ऑस्ट्रिया आणि रशियात तणाव वाढू लागला तेव्हा ह्या रस्सीखेचीत फ्रांसने रशियाच्या बाजूने उडी घेऊन सत्तेचा समतोल आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न केला पण बिस्मार्कने शिताफीने रशियाशी १८८७ मध्ये गुप्त करार करून, ऑस्ट्रियाला समजावून गप्प केले आणि फ्रांसला दूर ठेवले. ह्यामुळे तुर्की समुद्रात तसेच बाल्कन प्रदेशात नव्याने स्वतंत्र होऊ घातलेल्या राष्ट्रांवर रशियाचा प्रभाव वाढला. ही गोष्ट जशी ऑस्ट्रियाला फारशी आवडली नाही तशीच जर्मनीतही अनेकांना आवडली नाही. (खरेतर असा मैत्री करार करून रशियाला तंत्रज्ञान, लष्करी, औद्योगिक, शैक्षणिक सुधारणात होऊ शकणारी युरोपातील इतर देशांची मदत बिस्मार्कने अडवली. ह्या क्षेत्रात रशिया मागासलेला होता. नैसर्गिक साधनसम्पत्तीने समृद्ध, प्रचंड भूविस्तर आणि अमऱ्याद मनुष्यबळ असलेला रशिया जर तंत्रज्ञान,पायाभूत सोयी, अवजड उद्योग आणि लष्करी दृष्ट्या बलवान झाला असता तर ते भयावह ठरणार होते. त्यामुळे ही त्याची उपलब्धी मोठी होती पण ती कुणाला समजली नाही.)

इंग्लंडला, त्यांच्या साम्राज्याला आणि त्यांच्या सागरी प्रभुत्वाला आव्हान दिले जाईल अशी कुठलीही योजना त्याने आखली नाही, तसे कुठलेही कृत्य केले नाही. बिस्मार्कने अशा प्रकारे १८७१ पर्यंत असलेले आक्रमक धोरण बदलून पूर्णपणे सामंजस्यवादी, सलोख्याचे धोरण बिस्मार्कने आखले आणि अमलात आणले. ह्या मिळालेल्या १७ वर्षांच्या काळात त्याने जर्मनीच्या अंतर्गत बाबीत काय केले त्याचा उल्लेख वर आलेलाच आहे. एका अर्थी आर्थर बाल्फोर ह्याने म्हटल्या प्रमाणे बिस्मार्क खरोखर जर्मनीचा नव्हे तर अख्ख्या युरोपचा पंतप्रधान होता. पण १८८८ साली गादिवर आलेल्या कैसरने ह्या सगळ्या व्यवस्थेला सुरुंग लावायला सुरुवात केली.

एकंदरीत बिस्मार्क हे मोठे गुंतागुंतीचे रसायन होते. म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे त्याने आरोग्य विमा, अपघात विमा  आणि कामगाराना पेन्शन अशासारख्या कल्याणकारी योजना आणल्या पण मुख्यत्वे करून त्या समाजवादी गटांना मिळणारा पाठींबा कमी करायला वापरल्या. कामगार संघटनांवर बंदी घातली पण कामगारांचा मतदानाचा अधिकार शाबूत ठेवला. अशा प्रकारे राजेशाही आणि पुरातन समाज व्यवस्था समाजवादी, लोकशाहीवादी गटांना थोड्याफार सवलती देऊन किंवा त्यांच्या मागण्या अंशत: मान्य करून आपण टिकवू शकतो असे त्याला वाटले. एक प्रकारे उदारमतवादी राजेशाही किंवा सामंतशाही म्हणाना! अर्थात ती चूक होती. आंतरारष्ट्रीय राजकारणात जर्मनीचे हितसंबंध जपताना त्याने ज्या राष्ट्रांशी मैत्रीचे करार केले त्या रशिया इटली ऑस्ट्रिया सारख्यांना कमजोर किंवा मागास कसे ठेवता येईल हे पहिले. ह्याचा दोष त्याला द्यायचा कि श्रेय हे आज ठरवणे मोठे कठीण काम आहे पण एका गोष्टीचा दोष त्याला नक्की देता येईल कि त्याच्या कडे व्यापक दूरदृष्टी होती आणि तरीही आपण गेल्यानंतर आपले धोरण शिताफीने चालवू शकेल असा कुणी उत्तराधिकाकारी तो तयार करू शकला नाही. बिस्मार्क नसलेल्या जर्मनीचे युरोपात  काय होणार होते ह्याचा त्याला अंदाज आला होता पण त्याने काही केले नाही किंवा करू शकला नाही. कदाचित हे जाणवले तेव्हा फार उशीर झाला असावा.

आता वाचून ऐकून आश्चर्य वाटेल पण विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जर्मनी इतका प्रभावी बनला होता कि जर्मनमय युरोप ही संकल्पना इतर युरोपीय राष्ट्रात पसरू लागली होती. आणि जर्मनमय म्हणजे पुढे बळाच्या जोरावर  हिटलरने जवळपास संपूर्णपणे पादाक्रांत करून मांडलिक बनवलेला युरोप नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्या जर्मन प्रभावाखाली असलेला युरोप. फ्रेडरिक न्यूमन ह्याचे ‘मिटलयुरोपा’ हे पुस्तक वाचले तर समजून येते कि आज आपण जी युरोपियन युनियन पाहत आहोत त्याची रुपरेषा त्याने त्यात तपशीलवार मांडली आहे आणि आश्चर्य म्हणजे त्यात इंग्लंडला स्थान नव्हते आणि आता हल्लीच इंग्लंड युरोपियन युनियन मधून बाहेर पडतोय. (Brexit), असो… पण तेव्हा हि संकल्पना काही फलद्रूप झाली नाही कदाचित काळाच्या खूप पुढे असल्याने असेल.

पहिले महायुद्ध

बिस्मार्कने मोठ्या हिकमतीने १८७१ सालि सर्व जर्मन भाषकांचे एकसंघ जर्मन राष्ट्र निर्माण केल्यावर, (अर्थात ऑस्ट्रिया हंगेरीला बाहेर ठेवून) अल्पावधीतच हा जर्मनी समृद्ध, संपन्न प्रचंड प्रबळ आणि मग साहजिकच महत्वाकांक्षी बनला. राष्ट्रवादाचे वारे शिडात भरलेले त्याचे जहाज अगदी सुसाट निघाले पण त्याला पाय उतार व्हायला हक्काची बाजारपेठ कुठे होती.

ह्या नव्याने स्थापित झालेल्या  जर्मन राष्ट्राला सुरुवातीला तरी इंग्लंडचा पाठींबा होता. युरोपात सत्तेचा समतोल राहायचा असेल तर रशिया आणि फ्रांस ह्या तुल्यबळ सत्तांच्या मध्ये एक, दोघांनाही टक्कर देऊ शकेल असे (आणि एव्हढेच- ते महत्वाचे) सामर्थ्यवान जर्मनसंघराज्य असेल तर ते इंग्लंडला हवे होतेच. १८३० पर्यंत जर्मन संघराज्य अजुनही ओद्योगिक क्षेत्रात मागेच होते पण हळू हळू फरक पडू लागला होता. १८७१ नंतर प्रशिया, साक्सनी, ओस्टररिश अशा जर्मन घटक राज्यांनी भूसुधार कायदे केले, जमीन शेतकऱ्यांसाठी मोकळी केली. फ्रांस आणि अमेरिकेतल्या तज्ञांच्या मदतीने पिक पद्धतीत सुधारणा करून कृषी क्रांती घडवली. आता शेतावर कमी माणसात भरपूर उत्पन्न होऊ लागल्याने, उद्योग क्षेत्रात काम करायला मनुष्यबळ उपलब्ध होऊ लागले. १८व्या शतकाची अखेर येई पर्यंत उद्योग, कला, शिक्षण, तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात जर्मन लोक आघाडीवर येऊ लागले होते. अल्पावधीतच हे नवीनच जन्माला आलेले जर्मन राष्ट्र भरभराटीला आले. व्यापार आर्थिक सामाजिक सांस्कृतिक, कला सर्व क्षेत्रात त्याने घेतलेली झेप नेत्रदीपक होती इतकी कि थोड्याच काळात जर्मनी, त्याची राजधानी बर्लिन ही  युरोपची सांस्कृतिक राजधानी बनली. कुणालाही काहीही गंभीर, मूलगामी संशोधन करायचे असेल अध्ययन करायचे असेल तर त्याची पावले बर्लिन च्या विद्यालयाकडे  वळू लागली. उद्योग धंद्यात – औद्योगिक उत्पादनात तर जर्मनी लवकरच इंग्लंडला टक्कर देऊ लागला.

मात्र ह्या जर्मनीचा एक मोठा प्रोब्लेम होता. अक्ख्या युरोपात तो एकटा पडू लागला होता. वर्गात मध्येच नवीनच दाखला घेतलेल्या हुशार मुलाकडे जसे सगळे संशयाने पाहतात आणि सुरुवातीला त्याला सवंगडी मिळायला त्रास होतो तो एकटा पडतो तसे त्याचे झाले होते. पश्चिमेला असलेला फ्रांस तर त्याचा आधी पासूनचा वैरी त्यातून १८१५ आणि नंतर १८७० साली फ्रान्सचा पराभव करून तसेच यांचे आल्सेल आणि लोरेन हे प्रांत जिंकूनच तर जर्मनीचा जन्म झालेला होता पण वर सांगितल्याप्रमाणे फ्रांस काही अगदी पुचाट राष्ट्र नव्हते उलट इंग्लंड नंतर युरोपात तेच सगळ्यात जास्त वसाहती असलेले साम्राज्यवादी राष्ट्र होते . इंग्लंड म्हटले तर युरोपियन म्हटले तर युरोप बाहेरचे राष्ट्र पण त्याना युरोपातल्या सत्ता संघर्षात फारसा रस नव्हता फक्त युरोपातील कोणतीही शक्ती त्यांच्या साम्राज्याला , आरमाराला आणि सामूद्री व्यापारावरच्या वर्चस्वाला आव्हान देण्याइतकी प्रबळ होत नाहीना हे फक्त ते पाहत.

थोडा विषयांतराचा दोष पत्करून सांगायचे तर इंग्लंड हे जरी युरोपीय राष्ट्र असले तरी ते भौगोलिकदृष्ट्या मुख्य युरोपीय भूमी पासून जसे तुटून आहे तसेच मानसिकरीत्याही… ते युरोपच्या मुख्य भूमीतल्या सत्तास्पर्धेपासून गेली अनेक शतके दूरच होते (व आहे). पण आंतराष्ट्रीय राजकारणातली त्यांची भूमिका, त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे आपले जगभर पसरलेले साम्राज्य बिनबोभाट सांभाळणे आणि त्याकरता व्यापार व समुद्री संचारावर त्यांचे निर्विवाद प्रभुत्व कायम ठेवणे. गेल्या किमान ५०० वर्षांच्या युरोपच्या इतिहासाचा अभ्यास करताना ही बाब सतत जाणवते कि इंग्लंड ने कधीही एकाच युरोपीय सत्तेला युरोपात डोईजड होऊ दिलेले नाही. तसेच दोन किंवा अधिक युरोपीय सत्ता एक होऊन त्यांना, त्यांच्या साम्राज्याला  आव्हान देतील अशी परिस्थिती उत्पन्न होऊ न देणे हे तर त्यांच्या परराष्ट्र धोरणाचे अपरिवर्तनीय सूत्र राहिले आहे. त्यामुळे कधी ते स्पेनशी लढले, तर कधी पोर्तुगीजाशी, कधी फ्रान्सशी तर कधी रशियाशी, नंतर वेळ पडल्यावर जर्मनीशी आणि हे करताना त्यानी नेहमीच इतर युरोपीय सत्तांची मोट बांधून ज्याला नामोहरम करायचे त्याला एकटे पाडायचा प्रयत्न केला. ह्यात त्याना कधी यश आले तर कधी अपयश, पण धोरण मात्र तेच राहिले. बाकी न्याय, लोकशाही, दमनाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध लढा, मानवतेचा कैवार ह्या फक्त बाता. आजही युरोपियन युनियन मध्ये राहायचे कि बाहेर जायचे ह्याचे निर्णय इंग्लंड ह्याच सूत्राने घेते. खेळ्या बदलल्या तरी तत्व अपरीवर्तनियच आहे-गेली किमान ५०० वर्षे

असो तर परत जर्मनी कडे – मागे सांगितल्या प्रमाणे ९ मार्च १८८८ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी जर्मनीचा सम्राट विल्हेल्म पहिला वारला आणि त्याचा मुलगा फ्रेडरिक तिसरा (पुन्हा फ्रेडरिक!) गादीवर आला खरा पण गादीवर यायच्या अगदी तीन दिवस आधीच त्याला घशाचा आणि फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. तो गादीवर आला तेव्हा त्याचे वय होते ५७ वर्षे म्हणजे काही फार नाही पण विकोपाला गेलेल्या आजारामुळे तो फक्त ९९ दिवस राज्य करून १५ जून १८८८ला तो वारला आणि त्याचा मुलगा विल्हेल्म दुसरा गादीवर आला. खरेतर फ्रेडरिक तिसरा हा एक समंजस माणूस होता आणि युद्ध, त्याचे भयावह दुष्परिणाम, राष्ट्रवादाचा अगदी उगम ते हिंसक राष्ट्रवादापर्यंतची उत्क्रांती ह्याचा तो साक्षीदार होता. त्याला काही काळ अगदी १०-१२ वर्षे राज्य करायला मिळाली असती तर युरोपचा आणि जर्मनीचा इतिहास वेगळा असता पण जर तर च्या गोष्टीना इतिहासात अर्थ नसतो म्हणून हे स्वप्न रंजन बाजूला ठेवून आपण परत १८८८ मधल्या जर्मनी कडे येऊ

पहिले महायुद्ध

कैसर विल्हेल्म दुसरा

हे पहिल्या महायुद्धातले कदाचित सगळ्यात जास्त प्रसिद्ध पात्र असेल आणि तो एक पात्रच होते म्हणाना.

कैसर विल्हेल्म दुसरा – विकलांग आणि काहीसा छोटाच राहिलेला डावा हात झाकून घेत – ह्याचे बहुतेक सगळे फोटो तसेच आहेत

विल्हेल्म दुसरा ही व्यक्तिरेखा आपल्याला इतिहासात कैसर विल्हेल्म दुसरा म्हणून माहितीं आहे. हा जर्मनीचा शेवटचा कैसर. ह्याचा जन्म झाला २७ जाने १८५९ रोजी. वडील होते फ्रेडरिक तिसरा तर आई विक्टोरिया. तिला विकी म्हणत आणि ती इंग्लंडची सुप्रसिद्ध राणी विक्टोरिया हिची थोरली मुलगी तसेच तिचे वडील म्हणजे राणी विक्टोरियाचे पती होते जर्मन भाषक छोटे राज्य साक्स-कोबर्ग-साल्फिल्ड ह्या जर्मन राज्याचा प्रिन्स अल्बर्ट. आहे कि नाही गम्मत! तर हा कैसर विल्हेल्म दुसरा पायाळू म्हणून जन्मला  आणि जन्म होताना डॉक्टरच्या चुकीमुळे ह्या विल्हेल्मचा डावा हात कायमचा जायबंदी झाला.

आई विक्टोरिया (विकी) करता हा मोठा धक्का होता. जर्मन राष्ट्राचा भावी सम्राट आणि डाव्या हाताने अधू! ही कल्पना त्या कर्मठ स्त्रीला सहन झाली नाही. त्यामुळे लहानपणापासून विल्हेल्मवर आधी अनेक प्रकारचे औषधउपचार- ज्यातले अनेक क्रूर वेदनादायी आणि तरी परिणामशून्य होते आणि  मग नंतर व्यंगावर मात करण्याकरता कडक शिस्तीतले प्रशिक्षण ह्यांचा मारा केला गेला. त्यातून इंग्लंडच्या राणीचा पहिलाच नातू असल्याने आणि त्यात असा अपंग असल्याने  आजीने मग त्याचे अती लाड केले लहान वयाच्या विल्हेल्म करता हे सगळे  फार जास्त झाले आणि त्याचा स्वभाव हेकट, शीघ्रकोपी, दुसऱ्यांचे न ऐकणारा असा झाला. आईच्या अतीशिस्तीमुळे असेल किंवा जन्माच्या वेळी त्याचा हात ज्याच्या चुकीने दुखावला गेला तो  डॉक्टर इंग्लिश असल्यामुळे असेल पण विल्हेल्म तरुणपणी इंग्लिश द्वेष्टा बनला. असे सांगतात कि एकदा शिकार करताना त्याला जखम होऊन रक्त वाहू लागले जे लवकर थांबेचना तर तो म्हणाला कि जाऊदे वाहून जितके जायचे तितके, हे घाणेरडे इंग्लिश रक्त.

युरोपच्या रंगमंचावर ह्या कैसर विल्हेल्म नंबर २ चे आगमन झाल्यानंतरच्या आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या महत्वाच्या काही घडामोडी आपण पाहू पुढच्या भागात.

क्रमश:


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!