कविता: बाप

बाप तुझ्या जाण्याचं
फारसं मला खुपत नाही
पण पांढरं सारं कपाळ तिचं
मनी माझ्या खुपत राही
बाप विना पोर मी
याचं फार दु:ख नाही
न पाहिलेलं कुंकू तिचं
मनी माझ्या सलत राही
बाप तुझ्या जाण्यानं
कपाळ तिचं पांढरं होणं
अन् माझं अनाथ होणं
सगळं व्यर्थ उरलं जगणं
बाप तुझ्या वाटेवरती
येण्याची खूप इच्छा आहे
पण एका अनाथ मुलाचं हे
दु:ख तिला देणं नको आहे
बाप तुझी भूमिका
आजही ती रंगवत आहे
व्यर्थ साऱ्या जगण्याला
अर्थ थोडा देत आहे
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करूनव्हाट्स ऍप ग्रुप वर जॉईन व्हा.