​मराठी माणसाचे प्रोसेस इंजिनिअरिंग 

Motivational

मानवी मानसिकता आणि विशेषतः आपली भारतीय मानसिकता फळाला अधिक महत्व देते. मराठी माणसातही हा गुण आढळतो. वास्तविक आपल्या कार्यसंस्कृतीचा ठसा उमटवलेली अनेक माणसे आणि राष्ट्रही, अंतिम फळापेक्षा कार्यपद्धतीला (प्रोसेस) अधिक महत्व देतात, आणि ती जितकी अचूक (एक्सलन्स) असेल तितके मिळणारे फळ अधिक साजिरे असते, हा सिद्धांत आधुनिक गुणवत्ता व्यवस्थापनाने सुद्धा मान्य केला आहे. मराठी माणसाला येत्या काळात प्रगती करायची असेल तर आधी हा एक्सलन्स मिळण्याचा यत्न केला पाहिजे. मराठी माणसाने प्रोसेस इंजिनिअरिंग केले पाहिजे.

मराठी माणसाने प्रोसेस इंजिनिअरिंग केले पाहिजे म्हणजे काय? 

मराठी माणसाने आपल्या कार्यावर आणि कार्यपद्धतीवर अधिक भर द्यायला सुरुवात केली पाहिजे. आपण जे करीत आहोत त्याचे फळ काय असेल यापेक्षा उत्तम रीतीने केलेले कार्य उत्तम फळ देतेच हा विचार मनी बाणवला पाहिजे. आपली कार्यपद्धती जितकी नाविन्यपूर्ण, बिनचूक आणि गुणवत्तापूर्ण असेल, तितकेच आपल्याला मिळणारे फळ अधिक सुंदर आणि शाश्वत असते.

उदाहरणादाखल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमा पहा. अफझलखानच्या वधावेळेस महाराजांनी फुल प्रूफ प्लॅन बनवला होता. प्लॅन ए आणि बी सुद्धा त्यात असणारच. आपल्या नियोजनाबरहुकूम शारीरिक आणि मानसिक परिस्थिती जुळवून घेतली होती. या प्लॅन मध्ये चूक होण्याची शक्यता फार कमी होती. हीच आधुनिक सिक्स सिग्मा सिस्टीम. त्यानंतर महाराजांनी योग्य व्यक्ती योग्य कामांसाठी नेमून दिले, आणि प्रत्येकाला सांगितले, फक्त जेवढे काम दिले आहे, तेवढे अचूक करा. स्वतः पूर्ण विचारांती, वेष अन शस्त्रे बाळगून आणि आवश्यकता वाटली तेव्हा जिवा महालाला घेऊन निघाले होते. याला आपण म्हणतो प्रोसेस. महाराजांनी अनेक मोहिमा केल्या. त्यामध्ये नियोजन हा भाग, पण ही प्रोसेस तीच राहिली का? आवश्यकतेप्रमाणे विविध मार्गांचा अवलंब केला. याला आपण म्हणतो इंजिनिअरिंग. मराठी माणसाने हा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.

आपल्या उद्दिष्टयावर फोकस ठेऊन, आपली कार्यपद्धती निश्चित करावी. हे करताना फक्त एकच गोष्ट कायम असली पाहिजे ती म्हणजे एक्सलन्स. तुमच्या प्रोसेस मध्ये हा एक्सलन्स जितका अधिक तितके तुमचे कार्य अधिक खुलून दिसते.

आता एक्सलन्स म्हणजे काय? योग हा शब्द या एक्सलन्सचे वरचे टोक आहे. योग म्हणजे तुम्ही तुमचे कार्य शक्य तितक्या अचूकतेने, कमीत कमी साधनांनी आणि अधिकाधिक उच्चतम गुणवत्तेने पूर्ण करणे. एक्सलन्स म्हणजे हे करण्याच्या तुमच्या पद्धतीत किंवा तंत्रात प्रत्येक कामागणिक सफाई येत जाणे. यासाठीसुद्धा आपण महाराजांचेच उदाहरण घेऊ शकतो. प्रत्येक मोहिमेगणिक महाराजांकडे आणि मावळ्यांकडे अनुभव साठत होता. पहिले पुरंदर युद्ध ज्यात बाजी पासलकर कामी आले, आणि तानाजींनी सिंहगड घेतला ते युद्ध, दिन्हीन्मध्ये तुम्हाला घडत गेलेली प्रगती दिसून येते. दोन्हीकडे विजयच मिळाला. पण पुरंदर यशापेक्षा, सिंहगडाच्या यशामध्ये कमीत कमी साधनसंपत्तीमध्ये अधिकाधिक प्राप्य मिळवल्याचे दिसते. पन्हाळा जिंकताना अवघ्या ६० मावळ्यांनिशी कोंडाजीने तो घेतला. गनिमी काव्याने लढणाऱ्या मराठी सैन्याने, नंतर साल्हेरच्या लढाईत उघड्या मैदानात मुघलांना हरवले. हे एक्सलन्स चे उदाहरण आहे.

आधुनिक काळात उदाहरण द्यायचे तर, मराठी विद्यार्थी इंग्रजीवर हुकूमत यावी म्हणून इंग्रजी माध्यमातून शिकण्याची चूक करतात. इथे आपल्या साध्यासमोर आपण अंगिकारणारी प्रोसेस अतिशय चुकीची आहे. मातृभाषेत शालेय शिक्षण न झाल्याने भोगावे लागणारे सर्व दुष्परिणाम एका इंग्रजीसाठी आपण विद्यार्थ्याला भोगायला लावीत आहोत.

Process Engineeringज्यांच्या महानतेचे गुण आपण गातो, त्यांनी ह्या प्रोसेस वर अधिक लक्ष दिले आहे हे जाणवते. भीमसेन जोशी हे पाच वर्ष फक्त यमन राग आळवीत होते. सचिनच्या कष्टाची जाणीव पुस्तक आणि चित्रपटातून आपल्याला येते. बालगंधर्वांपासुन ते लतादीदी-आशाताईंपर्यंत आणि दादासाहेब फाळकेंपासून बाबा आमटेंपर्यंत विविध विषयात वाहून घेतलेली माणसे, याच प्रोसेस इंजिनिअरिंग ने मोठी झाली आहेत.

यासाठी आपण करीत असलेल्या लहानापासून मोठ्या कार्याचे योग्य नियोजन, टप्प्यात विभाजन आणि अधिक गुणवत्तेने ते साध्य करण्याचे प्रयत्न यावर आपण लक्ष दिले पाहिजे. यातूनच, आपल्या समाजाची “एक्सलन्स साठी झगडणारा” अशी ओळख निर्माण होउ शकेल.

स्वामी विवेकांनदांनी म्हटले आहे, एक स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी आपले तन-मन त्यासाठी झोकून द्या. दिवसरात्र फक्त त्याचाच विचार करा!
मराठी समाज एक्सलंट होऊ दे!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!