महाराष्ट्रीयन स्त्रियांचा पारंपरिक पोशाख नऊवारी लुगडं आणि त्याचा इतिहास..

‘लुगडं’ म्हटलं की अनेकांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना जागृत होत असतील. कुणाला आजीच्या, आईच्या जुन्या लुगड्यापासून बनवलेल्या उबदार गोधडीची आठवण येईल, तर कुणाला आठवणीतल्या कुणाच्या तरी शालुरूपी लुगड्यावरील ‘पदरावरचा जरतारीचा मोर..’ उगाचंच अस्वस्थ करेल.

मला मात्र लुगडं हा शब्द ऐकला की, नऊवारी साडीच डोळ्यासमोर येते. वास्तवीक नव्वार किंवा नऊवार हे कापडाच्या लांबीचं माप आहे, नेसायची पद्धत नाही.

स्त्रीयांनी परिधान करायच्या पाचवारी-सहावारी साडीलाही लुगडं हाच शब्द आहे. परंतू माझी मात्र लुगडं म्हटलं की ते नऊवारीच अशी धारणा आहे.

माझ्या मनातलं नऊवारी आणि लुगडं हे द्वैत, चितळे आणि बाकरवडी (हा शब्द नेमकी कसा लिहितात हे मला माहित नाही. त्यामुळे तुम्हाला हवा तसा उच्चार आपण करु शकता) सारखं अगदी पक्क आहे.

बाकरवडी म्हटलं की चितळे आठवतातच, तसं लुगडं हा शब्द कुठेही कानावर पडला की मला नऊवारीच आठवते.

नऊवारी लुगड्याला जगात तोड नाही.. पाहाणाऱ्याच्या दृष्टीनुसार एकाच वेळी खानदानी शालीन आणि शृंगारीक मादक भावना जागृत करण्याचे सामर्थ्य या एकमेव महाराष्ट्रीय वस्त्रात आहे.

कुठल्याही स्त्रीने नेसल्यावर अत्यंत देखण्या दिसणाऱ्या व सर्व काही झाकूनही स्त्री देहाची सर्व सर्व वळणं विलक्षण नजाकतीने दाखवूनही तिला सुरक्षित वाटायला लावणाऱं नंऊवारी लुगडं हे एकमेंव वस्त्र. उगाच नाही महाराष्ट्रीय पैठणीला महावस्त्राचा मान मिळालाय.

मऱ्हाठी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्याचा नऊवारी लुगडं हा अविभाज्य भाग झालाय. नऊवारी लुगड्याशिवाय मराठी स्त्री मला तरी मऱ्हाठी वाटतच नाही.

तशी नऊवारी लुगडी ओरिसा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्येही नेसली जातात, परंतु आपल्या मराठी स्त्रियांच्या नऊवारी लुगडं नेसण्याच्या पद्धतीची नजाकत आणि सर त्यांना नाही.. माझे देवगड निवासी कविमित्र प्रमोद जोशींच्या शब्दांत सांगायचं तर,

एकमेव हे वस्त्र असे की,
दिसते सात्विक हरेक नारी!
या ओळीला यमक म्हणुनही,
किती शोभते बघ नऊवारी!

या साडीने मंचावरची,
देवघरातच दिसते बाई!
या साडीने नदीत साध्या,
दिसू लागते गंगामाई!

ठेवत नाही झाकुन सौष्ठव,
तरीही नजरा झुकती खाली!
भास असा की स्वर्ग सोडुनी,
स्वतः शारदा भूवर आली!

किती यथार्थ वर्णन आहे नाही?

नऊवारी लुगडं

महाराष्ट्रीयन पद्धतीने नऊवारी लुगडं नेसण्याच्या पद्धतीचं अनेक चित्रकार- शिल्पकारांना आकर्षण होतं, आहे.

मराठी धाटणीचं लुगडं सर्वात सौष्ठवयुक्त आणि शिल्पात कोरायला आणि चित्रात उतरायला आव्हान देणारं आहे, असंही त्यांना वाटायचं. नऊवारी साडीचं ओटीपोटा जवळचं केळं, ओचा, निऱ्या, कासोट्याच्या पट्टीची रुंदी, दोन्ही पायांच्या टाचांपर्यंत समान नेसणं हे प्रमाण जिला जमलं, ती ललना दिसायला कशीही असु द्या, ती देखणीच दिसणार.

आपल्या नऊवारी लुगड्याच्या देखणेपणाचं हिन्दू देव-देवतांना चेहेरा देणाऱ्या सुप्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मालाही प्रचंड आकर्षण होतं. म्हणून तर त्याने रंगवलेल्या आपल्या देवता-अप्सरा बहुतकरुन नऊवारी लुगड्यात दिसतात.

आज आपण पुजत असलेल्या बहुतेक देवी प्रतीमा ह्या मुळच्या राजा रविवर्माच्या कुंचल्याने जन्म दिलेल्या आहेत. सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या आजही आपण पुजत असलेल्या प्रतिमा मुळात राजा रविवर्माच्या कुंचल्यातून उतरलेल्या आहेत.

या देवी चितारताना राजा रविवर्माने माॅडेल म्हणून एक सुंदर गोवेकरीण नऊवारी लुगडं नेसवून समोर बसवली होती, अशी माहिती डाॅ. अरुण टिकेकरांच्या ‘जन-मन’ या पुस्तकात मिळते.

देवी म्हणून अप्रत्यक्षरित्या पुजनाचा मान मिळालेल्या या देखण्या गोवेकरणीचा, पुढे तिच्याच घरातील नोकराने कामवासनेपायी खुन केला, अशी माहितीही टिकेकर देतात. बाईपण देवीलाही सुटलं नाही.

नऊवारी लुगड्याच्या काष्टा पद्धतीमुळे देवघर, स्वयंपाकघर, माजघर, शेतघरातला रोजचा वावर ते थेट घोड्यावर मांड ठेकून रणांगण गाजवण्यापर्यंत ही काष्टा पद्धतीचं हे नऊवारी लुगडं अत्यंत सोयीचं आणि तेवढीच सुरक्षितही.

राजा रविवर्माने चितारलेल्या द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगातली द्रौपदी नऊवारीत दिसते ती त्यामुळेच असावी. वस्त्रहरण करणाराना थोडेसे कष्ट पडून लज्जारक्षणार्थ कान्हा येई पर्यंत द्रौपदीची अब्रू रक्षणाचं काम या नऊवारीनेच केलं असावं.

या नऊवारी लुगड्याच्या सुरक्षिततेचा येवढा विश्वास की, घरगुती कष्टकरी स्त्रीया ते इतिहासात होऊन गेलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराराणी इत्यादी त्याकाळच्या लढवय्या स्त्रीयांनी घोड्यावर मांड ठोकली, ती नऊवारी लुगड्यातच.

आजही या नऊवारी लुगड्याची भुल कमी झालेली नाही. गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत तरुण मुली आवर्जून नऊवारी लुगडं नेसताना दिसतात. आता घोडा गेला आणि बुलेट-अक्टीव्हा आली हाच काय तो फरक..!

महाराष्ट्राचं लोकगीत असलेल्या लावणीचा फड तर नऊवारीशिवाय कल्पनेतही पाहाता येत नाही. हे वाक्य लिहिताना माझ्या नजरेसमोर ‘फेरारी की सवारी’ या हल्लीच येऊन गेलेल्या चित्रपटातील लावणी सादर करणारी विद्या बालन आहें तुम्ही तुमच्या मनात बसलेली कोणतीही लावणी आणू शकता.

नऊवारी लुगड्या शिवाय इतर साडीत लावणीची कल्पनाही करु शकत नाही.

नऊवारी साडीची उत्क्रांती नेमकी कुठून आणि कशी झाली ते सांगता येणार नाही, परंतू त्याच्या जोडीने येणारा आणि अस्सल मराठी वाटणारा ‘लुगडं’ हा शब्द मुळचा मात्र गुजरातचा.

व्यापारानिमित्त सर्व दूर जाणाऱ्या गुजराथी व्यापाऱ्यांनी हा शब्द त्यांच्या सोबत आपल्या महाराष्ट्रात आणला आणि आपण त्यात किंचितसा बदल करुन, म्हणजे ‘लुगडू’चं ‘लुगडं’ करून, तो संपूर्णपणे आपलासा केला. गुजरातेत स्त्रियांच्या साडीलाच नव्हे, तर पुरुषाच्या धोतरालाही लुगडू असंच म्हणतात.

किंबहूना पुरुषाच्या धोतरावरूनच स्त्रीयांच्या काष्टा असलेल्या साडीचा शोध लागला आणि तिलाही धोतराप्रमाणेच ‘लुगडू’ असं म्हणण्यास सुरुवात झाली.

महाराष्ट्राच्या उत्तर सिमेला लागून असलेल्या वलसाडी-वापी इत्यादी दक्षिण गुजरातेतल्या गुजराथी बायकाही आपल्यासारख्याच, परंतु थोड्या वेगळ्या पद्धतीने कासोट्याच्या साड्या नेसतात, ते लुगडं.

माझ्या लहानपणी मुबईत माझ्या शेजारी राहाणारे बलसाड गावचे गुजराती त्यांचं वाळत घातलेलं धोतर शोधताना ‘मारू लुगडु क्यां गयु..’, असं त्यांच्या बायकोला विचारताना मी ऐकायचो, तेंव्हा मला भारी मौज वाटायची.

हा माणूस धोतराला लुगडूं का म्हणतो, असा विचार तेंव्हा मनात यायचा, कारण माझ्या तेंव्हाच्या ठाम समजुतीप्रमाणे लुगडं म्हटलं की, ते नऊवारी असतं.

तो तसं का म्हणायचा, हे आता समजू लागलंय आणि त्यातून हे स्फुट साकार झालं. मी इथे नऊवारी लुगडं हा शब्द सर्वसाधारण म्हणून वापरला आहे.

मराठी पद्धतीचं नऊवारी लुगडं नेसण्याच्या नउवारीत पण खूप प्रकार आहेत . ब्राम्हणी, कोळी, कुणबी, कोकणी, तमाशातील इत्यादी नेसण्याचे अनेक प्रकार आहेत याची मला माहिती आहे.

तसंच नऊवारी साड्यांचेही चंद्रकळा, रास्ता, गुलाली, अंजिरी, रुद्रकाठी, पोफळी, धावडी, येवली, अमदाबादी, कर्नाटकी, नारायणपेठी, पैठणी, शालू इत्यादी अनेक प्रकार आहेत याचीही कल्पना आहे.

या लेखात मला नऊवारी लुगड्याची माझ्या डोक्यातली समजूत काय, हे दाखवणं एवढाच मर्यादीत हेतू होता..!!

वाचण्यासारखे आणखी काही…

खगोल / अंतराळ
ललित
प्रॉपर्टी/मालमत्ता खरेदी

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय