खरा बापमाणूस!! जगायला शिकवणारे करोडपती सावजी ढोलकिया

सावजी ढोलकिया

३८ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी स्वतःची मालमत्ता. ज्यात ७००० कोटी रुपयांपेक्षा जास्ती उलाढाल असलेल्या कंपनीची मालकी. जगातील अमेरिका, बेल्जियम, युनायटेड अरब अमिराती, हॉंगकॉंग, चायना इत्यादी देशात कार्यालय. तब्बल ७९ देशात निर्यात केला जाणारा माल.

हे सगळं कोणत्या परदेशी व्यक्तीचं कर्तुत्व आणि श्रीमंती नाही तर जगातील सगळ्यात श्रीमंत असणाऱ्या भारताच्या हिरे व्यापारी सावजी ढोलकिया ह्यांची मालमत्ता आहे. त्यांनी १९९२ मध्ये सुरु केलेली हरी कृष्णा एक्स्पोर्ट लिमिटेड कंपनी आज प्रत्येक महिन्याला ४०,००० कॅरेट्स चे हिरे जगातील ७९ देशात पाठवते.

१९९२ साली चार भावांनी मिळून स्थापन केलेल्या कंपनीत आज ६००० पेक्षा जास्ती लोक काम करतात. ह्या कंपनीने पूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं ते आपल्या कर्मचाऱ्यांना आपलं काम सचोटीने केल्याबद्दल देण्यात येणाऱ्या बक्षिसांसाठी.

सावजी ढोलकिया

१९९२ साली एक सुरवात ते २०१८ पर्यंत ७००० कोटी रुपयांची उलाढाल झाल्यावर त्या नफ्यात त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पण सहभागी केलं.

दरवर्षी दिवाळीला बोनस म्हणून सुमारे ५० कोटी रुपयांच्या बक्षिसाची भेट त्यांनी चांगल्या काम करणाऱ्या आणि आपलं ठरलेलं उद्दिष्ठ पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिली.

२०१४ मध्ये ४९१ फियाट पुंटो कार, ५२५ हिऱ्याचे जवाहीर आणि २०० घरं त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिली. २०१५ मध्येही १२६८ कर्मचाऱ्यांना जवळपास ५० कोटी रुपयांच्या बक्षिस भेट केली.

२०१६ मध्ये ४०० घरं आणि १२६० कार आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून गिफ्ट दिल्या. ह्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात आपल्या कंपनीत सचोटीने काम करून २५ वर्ष पूर्ण करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना त्यांनी चक्क मर्सिडीज बेंझ एस.यु.व्ही. भेट दिल्या. ह्या प्रत्येक गाडीची भारतातील किंमत तब्बल ३ कोटी रुपये आहे.

ह्या वर्षी तब्बल ६०० कार ते आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बक्षीस म्हणून देणार आहेत.

पैश्याने करोडपती आणि मनाने इतके उदार असणारे सावजी ढोलकिया जर आपल्या कर्मचाऱ्यांवर इतक्या कोटींची उधळण करू शकतात तर आपल्या मुलांसाठी त्यांनी किती केली असेल असा प्रश्न कोणाच्याही मनात येणं स्वाभाविक आहे. पण आयुष्य जगायला शिकवणारा हा करोडपती वेगळाच आहे.

दोन वर्षापूर्वी आपल्या २१ वर्षाचा मुलगा ज्याने अमेरिकेतून बिझनेस मॅनेजमेंट ची पदवी घेऊन भारतात पाय टाकताच त्याला खऱ्या आयुष्याची चव त्यांनी चाखायला लावली.

करोडपती असणाऱ्या बापाच्या पैश्याचा माज त्याच्या डोक्यात जाऊ नये म्हणून ३ कपडे आणि फक्त रुपये ७००० ते पण फक्त अतिशय निकडीच्या वेळी खर्च करण्याची ताकीद देऊन न सांगता त्याची रवानगी कोची केरळ इकडे केली.

अट अशी होती की जिवंत राहण्यासाठी आणि पोट भरण्यासाठी, राहण्याची सगळी सोय त्याने स्वतःहून करायची. त्याच्याकडील त्याची सगळी ओळख काढून घेतली होती.

अमेरिकेत शिकून आलेला करोडपती बापाचा मुलगा कोची मध्ये जॉब साठी फिरत होता. त्याला आयुष्याचा खरा अर्थ तेव्हा कळला जेव्हा एका वेळच्या जेवणावर भूक भागवावी लागत होती.

संध्याकाळी पार्ले जी ची बिस्कीट खाऊन पोट शांत करावं लागत होतं. जॉब शोधताना अनेक अपमानाचा अनुभव मिळाला. कधी एका सिक्युरिटी गार्ड सोबत एका खोलीत झोपण्यासाठी कोंबून घ्यावं लागलं तर कधी हॉटेल च्या किचनमध्ये ३० लोकांसोबत जेवण आणि राहणं सोबत करावं लागलं.

ह्या सगळ्यात मुलगा काय शिकला असेल तर खर आयुष्य काय असते? त्याच्या शब्दात सांगायचं झालं तर एकेकाळी मला बुटांची खूप आवड होती. खूप महागडे बूट माझ्याकडे होते. पण आता त्याची गरज वाटत नाही.

आता मला पैश्याची खरी किंमत कळाली. मला आता अनुभव आहे की जेव्हा आपल्याला हिणवलं जाते किंवा पैसा नाही म्हणून जग आपल्याला बाजूला काढते तो अनुभव काय असतो? मी हा अनुभव माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही.

सावजी ढोलकिया
सावजीभाई ढोलकीया यांचा मुलगा कोचीमध्ये आयुष्याचे धडे गिरवतांना…

आपल्या मुलाला चांगलं शिक्षण दिल्याचं कर्तव्य पूर्ण केल्यावर सावजी ढोलकिया ह्यांनी आपल्या मुलाच्या डोक्यात पैश्याची हवा जाऊ दिली नाही. आयुष्यात काळ आणि वेळ कधी कशी येईलं सांगता येत नाही.

ह्या सगळ्या काळात आयुष्याला सामोर जायची आपली तयारी असायला हवी हे सांगण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाला तो अनुभव घेऊन दिला.

अमेरिकेतील किंवा कोणत्याही विद्यापीठाची पदवी जे शिकवणार नाही किंवा समृद्ध करणार नाही त्या पेक्षा जास्त अनुभव त्यांनी आपल्या मुलाला दिला.

माणूस पैश्यानी मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवर असायला हवेत आणि पैश्याची किंमत त्याने कधीच विसरता कामा नये हा आयुष्याचा मूलमंत्र आपल्या मुलाला योग्य वयात शिकवण्यात जगातील सगळ्यात श्रीमंत हिरे व्यापारी कमी पडला नाही.

तुमच्याकडे किती पैसा आहे त्यापेक्षा त्या पैश्याला तुम्ही किती योग्य रीतीने त्याचं मुल्य जाणता ह्यावर तुम्ही मनाने किती श्रीमंत हे अवलंबून असते.

आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या नफ्यात भागीदार करताना आपल्या सोबत त्यांचा उत्कर्ष करणारे आणि त्याचवेळी आपल्या पोटच्या मुला कडून सगळी सुख काढून घेत त्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवणाऱ्या सावजी ढोलकिया ह्यांना माझा सलाम.

सर तुम्ही पैश्याने श्रीमंत आहातच पण मनाने थोडे जास्तीच श्रीमंत आहात. तुमच्यासारखा लिडर आणि एक बाप लाभण हे त्या कर्मचाऱ्यांच आणि मुलाचं भाग्यच.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.