आख्ख जंगलंच उभं करणारा फोरेस्ट मॅन ऑफ इंडिया – पद्मश्री जादव मोलाई पयंग

जादव मोलाई पयंग हे नाव भारतीयांच्या कानावर पडण्याची शक्यता तशी कमीच आहे. कारण देशातील मिडियाला कलाकार, त्याचं खाजगी आयुष्य, राजकारण आणि निरर्थक चर्चा ज्यातून काही निष्पन्न होतं नाही त्यातून उसंत मिळतच नाही. आपल्याला सगळं काही माहित असण्याच्या अविर्भावात असलेला भारतीय भारतातील असामान्य हिरोंना ओळखत नाही ही आपली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. कोण आहेत हे जादव मोलाई पयंग?…..

पद्मश्री जादव मोलाई पयंग

जादव मोलाई पयंग हा एक पर्यावरण कार्यकर्ता आहेत. सोशल मिडियावर दोन, तीन झाड लावून आणि मुक्या प्राण्यांसोबत फोटो टाकून स्वतःला पर्यावरण कार्यकर्ता म्हणवणाऱ्या अनेकांच्या यादीमध्ये न रमता खरोखर झाडे लावून तिथवर न थांबता एक दोन नाही तर १३६० एकर जागेवर एकट्याच्या हाताने जंगल उभारून त्या जंगलात प्रसिद्ध अश्या बंगाल वाघांच घर, रायनो, ११० पेक्षा जास्त हत्ती, १०० पेक्षा जास्त हरण आणि ससे आणि त्या सोबत अनेक साप, पक्षी इतर सर्वच प्राणिमात्रांना हक्कचं घर देणारे हे जादव मोलाई पयंग भारताचा फोरेस्ट मॅन म्हणून ओळखले जातात. अश्या अवलियाची कल्पना किती भारतीयांना आहे? त्याच्या कार्याची दखल म्हणून त्यांना तब्बल १४ देशातून पर्यावरणावर बोलण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. बी.बी.सी. ने एक स्पेशल डॉक्युमेंट्री त्याच्या आयुष्यावर करताना असं म्हंटल आहे की न्यूयॉर्कच्या च्या सेन्ट्रल पार्क पेक्षा जास्ती क्षेत्रफळाचं जंगल निर्माण करणारा एक अवलिया. तर अश्या ह्या हिरोचा सन्मान भारत सरकारने उशिरा का होईना २०१५ साली पद्मश्री पुरस्काराने केला आहे.

१९७९ साली जादव मोलाई पयंग अवघे १६ वर्षाचे तरुण होते. ब्रह्मपुत्रेला दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे संदाबर येथील सगळी झाडे वाहून गेली होती. ओसाड झालेल्या संदाबर च्या मातीत जादव मोलाई पयंग ह्यांनी अनेक सापांना तीव्र उष्णतेमुळे जीव जाताना पाहिलं. त्या तरुण जादव मोलाई पयंगच मन हे बघून विदीर्ण झालं. आपण काय करू शकतो? हा विचार त्याला झोपू देईना. त्याने ठरवलं की आपण झाडं लावायची. झाडं लावली की तिकडे पशु पक्षी येणार. सापांना राहण्यासाठी जागा मिळेल. झाड लावलं की मातीची धूप कमी होईल. प्राणिमात्रांना हक्काच घर मिळेल. एक गरीब साधा १६ वर्षाचा मिसरूड फुटलेला तरुण मनात ठरवतो की झाडं लावायची काहीही झालं तरी मागे हटायचं नाही. ३६ वर्षाच्या त्याच्या निरंतर तपश्चर्येचं फळ म्हणजे १३६० एकर जागेवर उभं राहिलेलं घनदाट जंगल. आपण विचार करू शकतो का?

पद्मश्री जादव मोलाई पयंग

२००८ साला पर्यंत वन विभागालाही त्याच्या कार्याची पुसटशी कल्पना पण नव्हती. एकदा इकडे नित्यनियमाने येणारे ११० हत्तींचा मागोवा घेताना वन विभागाचे अधिकारी ह्या जंगलात आले. इकडे ओसाड भागात वाढलेलं जंगल बघून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विश्वास बसला नाही. मग प्रकाशझोतात आले ते जादव मोलाई पयंग. आपल्या एकट्याच्या जोरावर हे जंगल निर्माण करून तिथल्या प्रत्येक झाडाची काळजी घेणारे जादव मोलाई पयंग ह्यांच कर्तुत्व सातासमुद्रापार गेलं. आपल्याकडे असलेल्या गाईचं दुध विकून त्यातून आपली उपजिविका करून फक्त आपल्या जिद्दीच्या जोरावर १३६० एकराच जंगल निर्माण करणाऱ्या जादव मोलाई पयंग ह्यांची कहाणी वाचून २०१२ साली भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांनी त्यांचा मुंबईत सत्कार केला. २०१३ मध्ये इंडियन इन्स्टीट्युट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंटने ने सत्कार केला. २०१५ साली भारत सरकारने उशिरा का होईना ह्या हिरोचा पद्मश्री देऊन सत्कार केला. पद्मश्री पुरस्काराचं वजन नक्कीच जादव मोलाई पयंग ह्यांच्या कर्तुत्वाने वाढलं असेल ह्यात शंका नाही.

पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावर जादव मोलाई पयंग ह्यांनी काढलेले शब्द खूप काही सांगून जातात.

The Padma Shri is an award for encouragement, but “My aim has always been to do good for the country. Even the President of India has to do something for the earth; otherwise, there will be nobody left, nothing.”

ह्या ही पुढे जाऊन पद्मश्री जादव मोलाई पयंग म्हणतात,

If every schoolchild is given the responsibility to grow two trees, it will surely lead to a Green India.

आपल्याला मिळालेली सर्वच्या सर्व रक्कम त्यांनी जंगलासाठी खर्च करण्याच ठरवलं आहे. आपल्यासोबत ४ लोकांना नोकरी देऊन तब्बल ५००० एकराच जंगल निर्माण करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यांची मुलाखत घ्यायला आलेल्या बी.बी.सी. च्या टीम मेंबर ला पण एक झाड त्यांच्या हाताने लावताना ते वाढल्यावर त्या झाडाला तुमचं नाव दिलं जाईल अस सांगण्यास ही पद्मश्री जादव मोलाई पयंग विसरलेले नाहीत.

माणसाने ठरवलं तर तो काहीहि करू शकतो ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पद्मश्री जादव मोलाई पयंग. गरिबी, शिक्षण नसताना कोणत्याही सुविधा नसताना फक्त एक हाती आपल्या ध्येयाचा पाठलाग करताना त्यांनी निर्माण केलेलं वैभव येणाऱ्या कित्येक पिढ्यांना त्याची फळ देत राहील. हे नुसतं माणसांपुरतं मर्यादित नाही तर तिकडे राहणाऱ्या प्रत्येक प्राणीमात्र्याचं आयुष्य ह्या अवलिया ने समृद्ध केलं आहे. असे हे हिरो आपल्या मिडियाला न दिसतं, न त्यांचे आदर्श आपण आपल्या आयुष्यात बाळगतो. म्हणून घसरलेलं राहणीमान हे आपल्या घसरलेल्या आदर्शांच लक्षण आहे. पद्मश्री जादव मोलाई पयंग ह्यांच्या कर्तुत्वास माझा साष्टांग दंडवत. सर तुम्ही खरे पर्यावरण प्रेमी. ज्यांनी ह्या भारताला वसुधैव कुटुंबकम खरोखर बनवण्याचा नुसता संकल्प केलेला नाही तर आपल्या कर्तुत्वाने ते प्रत्यक्ष उतरवलेलं आहे. तुमच्या ह्या कार्यास माझा सलाम.

वाचण्यासारखे आणखी काही…

कथा
प्रेरणादायी/MOTIVATIONAL


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. Pandurang abhang bhure says:

    Khup Chan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!