माहित आहेत का हि मुलं जी बालपणी मोघली सारखी जंगली प्राण्यांबरोबर वाढली!!

आपल्याला सगळ्यांना मोगली चांगलाच ठाऊक आहे. लहान असताना हे कार्टून बघण्यासाठी आपण कधी एकदा रविवार येतो याची वाट पाहत राहायचो. लहान असो नाहीतर मोठे सगळ्यांनाच ही कहाणी वेड लावून गेली होती. लहानपणी वडिलांबरोबर जंगलात गेलेला असताना हा मोगली तिथेच राहून जातो आणि मग सुरू होते ही रंजक गोष्ट…. अलीकडेच येऊन गेलेल्या एका सिनेमामध्ये सुद्धा हा छोटासा मोगली मस्त रंगवलेला आपण पहिला. कुठल्याही प्रजातीमध्ये जन्मापासून राहिला तर माणूस किती बेमालूमपणे त्यातलाच होऊन जातो हे दाखवणारी ही गोष्ट. जन्मानंतर जंगलात पोहोचलेला मोगली जगण्याच्या प्रयत्नात काही प्राण्यांचं प्रेम, काही प्राण्यांचा अस्वीकार या सगळ्यातून कसा जातो. त्याचा खट्याळ आणि जुगाडू असण्याचा मानवी स्वभाव कसा त्याला यातून अलगद तरून नेतो हे सगळंच बघण्यासारखं!!

पण ही फक्त सिनेमात दाखवलेली गोष्ट नसून हे सत्यघटनेवर आधारलेलं आहे. बरेच लोक एखादा कुत्रा, मांजर किंवा काही लोक पक्षी पाळतात. तेव्हा ते पक्षी किंवा प्राणी आपल्या मालकाच्या घरातला एक सदस्यच होऊन जातात. पेडिग्री घालणारी घरातली गृहिणी ही त्या जीवाला आपली आईच वाटते. हे असं असतं, म्हणजे आपण मालक असतो तोपर्यंत ते आपल्याला नॉर्मल वाटतं. पण जेव्हा एखादा मनुष्यप्राणी या प्राण्यांमध्ये जाऊन राहू लागतो तेव्हा मात्र हे इतकं सोपं आणि सामन्य राहत नाही.
जगभरात अशी काही मुलं आहेत ज्यांना त्यांच्या लहानपणी जंगली जनावरांनी मोठं केलं. तिथेच त्यांच्यातलं होऊन ते काही वर्ष राहिलेली. नन्तर रिहॅबिलिटेशन करून त्यांना मानवी प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. आज तुम्हाला अशाच काही खऱ्याखुऱ्या मोगलींची ओळख करून देणार आहे.

१) मरीना चॅपमॅन
१९५४ साली साऊथ अमेरिकेतील कोलंबिया मधली मरीना चॅपमॅन नांवाच्या या मुलीचे अपहरण झाले. त्यावेळी तिचं वय ५ वर्षांचं होतं. पुढे ५ वर्ष या मुलीने जंगलात माकडांच्या टोळीत काढले. या माकडांनीही मांसाहारी प्राण्यांपासून या मुलीचं रक्षण केलं. एवढंच नाही तर तिची खाण्याची गरज भागवणे हे आपले काम असल्यासारखे चक्क तिचे पालकत्व त्यांनी सांभाळले… असे होता होता मरिना आणि या माकडांची टोळी यात एका कुटुंबासारखं जिव्हाळ्याचं नातं तयार झालं. एकदा त्या जंगलात शिकारीसाठी आलेल्या काही शिकाऱ्यांनी त्या मुलीला तेथे पाहिले तेव्हा ते अचंबित झाले. हे शिकारी त्या मुलीला जंगलातून शहरात घेऊन आले. तेव्हा मरीना ना काही बोलू शकत होती ना तिला माणसांच्या जगातल्या बोलण्याचा अर्थ समजत होता. पुढे तिला वेश्याव्यवसायत सुध्दा ढकलले गेले. पुढे ती तेथून इंग्लंडमध्ये पोहोचली. सध्या हि मरिना चॅपमॅन साधारण ६० वर्षांची असावी. आज तिचा घर परिवार असून माणसांच्या जगात ती स्थरावली आहे. तिच्या आयुष्यावर एक पुस्तक सुद्धा प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकाचं नाव आहे The Girl With No Name.

मार्कोस रॉड्रिग्झ पेंटोजा
२) मार्कोस रॉड्रिग्झ पेंटोजा
मार्कोस रॉड्रिग्झ पेंटोजा नावाचा एक स्पॅनिश मुलगा अवघा ७ वर्षांचा असताना एका मेंढपाळाकडे गुलाम म्हणून त्याच्या आईवडिलांकडूनच विकल्या जातो. हा मेंढपाळ मेल्यानन्तर मार्कोसने जगण्याची लढाई लढता लढता आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींचं अनुकरण करत खूप गोष्टी शिकुन त्याचा सराव केला. मिळेल ते खात तो प्राण्यांच्या सहवासात भटकत गेला. तिथल्याच पहाडांमध्ये काही कोल्ह्यांमध्ये तो राहू लागला. आणि पुढे १२ वर्ष तो इथेच राहिला. स्पेनच्या लॉ एजेन्सीने पुढे त्याला शोधून समाजात आणलं. आता मार्कोस ६४ वर्षांचा आहे. त्याच्या आयुष्यावर आधारित एक सिनेमा पण आता बनला आहे. feral child असलेल्या मार्कोसच्या या सिनेमाचं नाव आहे ‘Entrelobos.’

३) चिंपांझींबरोबर राहिलेला नायजेरियन बेलो
नायजेरियाच्या फेलगोर जंगलात बेलोला त्याच्या आई वडिलांनीच एकटं सोडून दिलं. काही दिवसांनी चिंपांझींच्या च्या टोळीने या अनाथ बेलोला पाहिलं. आणि त्याला ते आपल्याबरोबर ठेऊ लागले. बेलोला एका मादा चिपांझिने आपल्या मुलासारखे सांभाळले. बेलो चक्क या चिमपंझिंसारखाच चार पायांवर म्हणजे दोन हात आणि दोन पायांवर चालू लागला. एवढंच नाही तर तो बोलत सुद्धा त्यांच्यासारखाच होता. त्यांच्यासारखं ओरडणं गुरगुरणं हाच त्याचा संवाद झाला. १९९६ मध्ये बेलोला तिथून सोडवलं गेलं. आणि एका अनाथ आश्रमात त्याला आणलं गेलं. तिथे बेलोला माणसासारखं जगणं शिकवण्यात खूप वेळ आणि परिश्रम लागले.

४) बर्डबॉय वान्या युदिन
सात वर्षांचा बर्डबॉय वान्या युदिन या रशियन मुलाची कहाणी अशीच मूलखावेगळी आहे. ‘वोल गो ग्रॅड’ नावाचं एक अपार्टमेंट पक्षांच्या पिंजऱ्यांनी भरलेलं होतं. आणि त्या ठिकाणी सात वर्षांचा वान्या युदिन या पक्षांमध्येच मोठा होताना आढळला. तो आवाजही पक्षांचेच काढत होता आणि तसंच फडफडायची लकब त्याच्या शरीरात होती. २००८ साली लोकांना त्याची माहिती मिळल्यानन्तर लोकांनी त्याला तिथून सोडवलं. पुढे त्याला सामान्य जीवन जगण्यासाठी त्याचं पुनर्वसन केलं गेलं.

५) जॉन सेबुन्य्या
युगंडामध्ये राहणाऱ्या जॉन सेबुन्य्याच्या वडिलांनी त्याच्या डोळ्यादेखत त्याच्या आईचा खून केला. तेव्हा घाबरून आपल्या जिवाचा धोका ओळखून छोटा जॉन जंगलात पळून गेला. जंगलात खूप दिवस एकटं भटकल्यांनंतर माकडांच्या एका टोळीने त्याला आपल्यात ठेऊन घेतलं. कित्येक वर्षे तो या माकडांमध्ये राहिला… झाडावर चढणं, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारणं हाच त्यांचा दिनक्रम झाला. १९९२ साली तो एका शिकाऱ्याच्या तावडीत सापडला. आणि शिकऱ्याने त्याला त्याच्याबरोबर गावात नेलं. तिथल्या लोकांनी अंधश्रद्धे पायी जॉनला झपाटलेली आत्मा असल्याचे समजून अघोरी उपाय सुद्धा केले. पण काही लोकांनी त्याला तिथून सोडवून त्याचे पुनर्वसन केले. आणि आज जॉन समर्थपणे समाजात त्याचे जीवन जगतो आहे.

६) डॅनियल द गोटबॉय
डॅनियल, अँडीज पर्वतरंगांवर या मुलाला एकटंच सोडून दिलं गेलं ते त्याचा घरच्यांकडून. पेरूवियन जातीच्या जंगली बकऱ्यांनी त्याला पालन पोषण करून मोठं केलं. इथेच तो आठ वर्षे राहिला. पहाडी फळं, बेरीज आणि झाडांची मुळं हे त्याचं अन्न. एक मादा बकरी त्याची देखभाल करत होती. तिचं दूध पिऊन तो वाढत होता. जेव्हा १९९० मध्ये याला शोधलं गेलं तेव्हा तो चार पायाच्या प्राण्यांसारखं चालताना आढळला. आठ वर्षे सातत्याने चार पायांवर चालून त्याची शरीररचना पुर्ण बघडून गेली होती.

७) दीना सनीचर
दीना सनीचर हा भारतातला… १८६७ मध्ये बुलदंशहरच्या एक जंगलात एका गुहेत शिरताना काही शिकऱ्यांनी याला पाहिलं. त्यावेळी तो अवघा ६ वर्षांचा होता. त्याचे रहाणे वागणे हे पूर्ण जंगली जनावरांसारखे झालेले होते. कच्चे मांस हेच त्यांचे अन्न होते. पुढे शिकऱ्यांनी त्याला आपल्या गावात आणले. पुन्हा त्याच्या आजूबाजूचं जग पाहून तो स्वतःला त्यात बदलू लागला. पण सामान्य माणसासारखं बोलणं त्याला कधीही जमलं नाही. पुढे हळूहळू त्याला तंबाखू खाण्याचं सुद्धा व्यसन लागलं. आणि ३५ वर्षांचं आयुष्य जगून तो गेला.
वाचण्यासारखे आणखी काही…
प्रासंगिक
पालकत्व
प्रेरणादायी/MOTIVATIONAL
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
Image Credits: The Indian Express