नरभक्षक

खरेतर शेरखानच्या हातात बाटली आणि तोंडात मासाचा तुकडा पाहूनच अंकल समजून गेला आपल्या संध्याकाळची वाट लागली आहे. नदीत छानपैकी डुंबत अंगावर सोंडेने पाणी उडवत एखाद्या तरुण हत्तीणीची छेड काढीत बसायचा त्याचा बेत होता पण आता सगळ्याचाच बट्ट्याबोळ झालाय हे लक्षात आले त्याच्या. मुकाटपणे त्याने शेरखानचे स्वागत केले.
शेरखान बाटली समोर ठेवून बसला मग एक चिरुट काढून शिलगावला आणि अंकलला ऑफर केला. नकार देत अंकलने मोठ्या बांबूपासून बनवलेला चिरुट तोंडात धरून शिलगावला.
“बोल शेरु….!! आज बऱ्याच दिवसांनी प्रोग्रॅम…??” त्याने शांतपणे विचारले.
“हो….. म्हटले तुला बरेच दिवस भेटलो नाही. म्हणून आलो” शेरखान बाटलीतील एक घोट घेत म्हणाला.
“च्यायला….. बायको घरात मुलांसमोर पिऊ देत नाही म्हणून माझी आठवण आली… अंकल मनातच म्हणाला.
“काय झाले शेरु…..?? तुझा चेहरा दुःखी दिसतोय” अंकलने हळुवारपणे विचारले.
“आज त्यांनी अवंतीला गोळ्या घालून मारले” बोलता बोलता शेरखानच्या डोळ्यातून अश्रू आले.
‘हम्मम्म….ऐकले मी ते. लग्नाआधी ती तुझ्याबरोबर फिरत होती ना…?? अचानक अंकलचा प्रश्न अंगावर येताच तो हडबडला.
“ते सर्व तरुणपणी रे….. नंतर मी इथे आलो” शेरखान लाजत म्हणाला. “पण ती अचानक नरभक्षक कशी झाली …??”. तो स्वतःशी विचार करत बोलला.
“अन्न मिळाले नाही की तुम्हा मांसाहारी प्राण्यांचे तेच होणार.. ” अंकल म्हणाला.
“मग काय करायचे आम्ही …?? उपाशी मरायचे ….?? हे बघ अंकल.. या जगात सर्वांना जगण्याचा…. आपले अन्न मिळवायचा अधिकार आहे..” शेरखान उसळून म्हणाला.
“म्हणजे तिला अन्न मिळाले नसेल आणि उपाशी असेल म्हणून तिने माणसे खाल्ली…” अंकल म्हणाला.
“माहीत नाही.. तसेही असू शकेल.. नाहीतरी इथेही हल्ली आम्हाला शिकार मिळणे कमीच झालेय. मी तर नसबंदी करायचा विचार करतोय. आयला नवीन पोर पैदा करून त्यांना खायला काय देऊ..?? आहे त्या पोरांना सांगितलंय तुमचे तुम्ही बघा. उलट मी तर सभेत असा ठराव करणार की आम्हाला अल्पसंख्याक म्हणून मंजुरी द्या..”
“काय बोलतोस ते कळते का …???” अंकल हसत म्हणाला. “अरे या जंगलाचा राजा आहेस तू…”
“मग काय झाले…. ?? आहे ते आहे. त्या माणसांची संख्या बेसुमार वाढलीय त्यांना राहायला जागा नाही. खायला अन्न नाही म्हणून ते जंगलतोड करतायत. माझ्या प्रजेची शिकार करतायत .त्यामुळे आमचे क्षेत्र कमी कमी झाले. आमचे अन्न कमी झाले. अरे साध्या कोंबड्या ही मिळणे मुश्किल झालेय. साली ती डुकरेही गावात शेतात घुसतात. मग आम्ही काय करायचे …?? आणि तुला तर माहितीय आम्ही गरज असल्याशिवाय शिकार करीत नाही. ती माणसे जंगलात येतात आणि साप दिसला की विषारी की बिनविषारी याचा विचार न करता मारून टाकतात. कोणताही प्राणी दिसला की त्याच्यावर हल्ला करतात.”
“म्हणजे तुला अवंतीला मारण्याचे दुःख नाही त्यामागे बोंबाबोंब चाललीय त्याचे दुःख आहे तर ….?? खरे आहे शेरू आपण फक्त जगण्यासाठी शिकार करतो पण हे मानव आपल्या स्वार्थासाठी शिकार करतात. पण सध्यातरी आपल्याला त्यांच्या तालावर नाचण्याशिवाय पर्याय नाही” असे म्हणत अंकलने त्याच्या हातातली बाटली आपल्या घशात रिकामी केली.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा