गोष्ट एका फोटोची

गोष्ट

खूप आधीची गोष्ट आहे म्हणजे मी दहावीत होतो. बोर्डाच्या परीक्षेचे फार अप्रूप राहायचे त्याकाळी. या परीक्षेसोबत आणखी एका गोष्टीची ओढ लागून राहिली होती ती म्हणजे पासपोर्ट फोटोची. स्टुडिओत स्वतंत्रपणे जाऊन फोटो काढणे म्हणजे बऱ्यापैकी चैनीचा भाग होता तेव्हा. घराच्या भिंतीवर बहुतेक देवांचे फोटो राहायचे क्वचित एखादा लग्न झाल्यावरचा नवरा बायकोचा फोटो, नाहीतर एखाद्या जत्रेत ताजमहालच्या चित्रासमोरचा फोटो हेच काय ते घरात फोटो राहायचे. फोटो अल्बम फारसे दिसत नव्हते.

परीक्षेच्या निमित्ताने पासपोर्ट फोटो का होईना काढायला मिळणार म्हणून मी फार खुश होतो.आयुष्यातला पाहिला पासपोर्ट फोटो होता तो. एकदम तीन ब्लॅक अँड व्हाइट पासपोर्ट मिळायचे. फोटो काढण्यासाठी मोठया उत्सुकतेने फोटो स्टुडिओत गेलो, छान केसं लावून, पावडर वैगरे करून झाले व फोटो काढण्यास जाऊन बसलो. फोटोग्राफर काका बरेच गम्भीर चेहऱ्याचे होते, खरंच होते की त्यांनी केला होता काय माहीत. नंतर सुरू झाली फोटो काढण्याची जटिल प्रकिया.

एका स्टुलवर सरळ बसवण्यात आले. सुरवातीला त्यांनी मान इकडे तिकडे करण्यास सांगितली, नेमकी त्यांना हवी तशी मान होत नव्हती बरेच प्रयत्न करून झाले कधी डावीकडे जास्त व्हायची, तर कधी उजवीकडे, दोन्हीकडे योग्य झाली की ते थोडे खाली पाहण्यास सांगायचे, थोडे खाली म्हणजे नेमके किती खाली पाहायचे हे मात्र समजत नसे. शेवटी डोके त्यांनी ताब्यात घेतले एका विशिष्ट कोनात डोकं सेट करून दिलं व ओके ओके करत कॅमेरा जवळ गेले.

मला एकदम सुटल्या सारखे वाटते न वाटते तर एकदम नो नो करत त्यांनी माझे डोळे थोडे तिरपे झाले म्हणून माझ्यावर डोळे वटारले. माझ्या या तिरप्या पाहण्याच्या सवयीने त्याकाळात माझा बराच घात केला आहे. यांच्यापेक्षा सलून वाल्यांचं बरं असतं त्यांना हवी तशी मान करतात व भराभर कात्री चालवतात. बराच प्रयत्न करून सुद्धा माझे डोके ठिकाणावर येत नव्हते. शेवटी एकदाचे माझे डोके, डोळे व मान एकदम सेट झाली.

आता जमलं एकदाचं वाटत होतं, पण कसलं लगेच खांदे थोडे खाली झाले होते. विशेष म्हणजे माझ्या सर्व गोष्टी मात्र थोडक्यातच चुकत होत्या. पुढे दहावीच्या परीक्षेतही माझ्याकडून सर्व चुका थोडक्यातच झाल्याने मी अपेक्षे एवढे गुण मिळवू शकलो नाही. हे थोडक्यात चुकण्याचे माझे ग्रहयोग मला आयुष्यभर पुरत आहेत. जसे लाईन मध्ये माझा नंबर आल्यावर वस्तूचा स्टॉक संपून जाणे, स्टेशन वर पोहचण्याच्या थोड्या आधीच बस निघून जाणे व त्यानंतर एकतास त्या गावाची बसच नसने. मी क्रीडापटू असतो तर माझे पदकही थोडक्यातच हुकले असते, त्यामुळेच मी कधी क्रीडा स्पर्धेत भाग घेतला नाही….. असो.

शेवटी एकादाच्या सर्व गोष्टी जुळून आल्या, त्यांनी ओके ओके करत स्माईल म्हटले व माझी परत गोची झाली. हे स्माईल नेमके कसे करावे हे मला कळत नव्हते, आणि परत थोडे कमी किंवा जास्त होईल त्याचे काय. मी कसा बसा हसण्याचा प्रयत्न केला, मी थोडा जास्तच हसत होतो. हे थोडं जास्त किंवा थोडं कमीचं प्रकरण परत परत पिच्छा पुरवत होतंं. नको तो पासपोर्ट अन् नको ती परीक्षा असे वाटू लागले. शेवटी तेही कंटाळले व त्यांनी क्लीक केले. मी सुटकेचा निश्वास टाकला. फोटोसाठी कधी येऊ विचारल्यावर आठ दिवसानंतर बोलावले.

मी एक एक दिवस कसा तरी काढला शेवटी तो फोटो भेटण्याचा सुदिन आला मी मोठया उत्सकुतेने फोटो घ्यायला गेलो व फोटो पाहतो तर काय फोटो बराच काळा आला होता. मी लगेच म्हटले “काका फोटोत मी जरा काळा नाही दिसत काय?” तर म्हणतात कसे “एकदम ओरिजिनल काढलाना बाबू”…..

“ओरिजिनलच काढायचा होता तर एवढे मानेचे व्यायाम करून, माझ्या मनाला त्रास दिलास कशाला?” मी बापडा मनातल्या मनातच बोललो.

लहान होतो, जास्त बोलता येत नव्हते. तशीही त्यांची फार चूक नव्हतीच मी होतोच सावळा अर्थात आताही आहे. काळा म्हणणे चांगलं वाटत नसावे म्हणून सावळा हा सन्मानजनक मध्यममार्गी शब्द आपल्या भाषेत आला असावा का? असे मला बऱ्याच वेळा वाटत असते. त्यात आपला देव श्रीकृष्णच सावळा होता, म्हटले की आम्हा काळ्या, नाही… नाही सावळ्या लोकांना फार बरे वाटते. हल्लीच्या या पिढीची मात्र फोटो काढतानांची सहजता पाहिली की मोठं कौंतुक वाटतं. अलीकडे तर नवजात बाळाला सुद्धा बाबा शेल्फी शेल्फी (आपण या लहान बाळाशी तोतरं का बोलत असावं तो तर बिचारा काहीच बोलत नाही) म्हटले की तोही खुदू खुदू हसू लागतो.

वाचण्यासारखे आणखी काही…

कटींग, पाटली व हिप्पीकट
Wedding Photography – एक गम्मत

वाचनकट्टा...
वाचनकट्टा

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!