मेरी कोम चे सोनेरी यश

मेरी कोम

मेरी कोम ने वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धेत सहावं सुवर्ण पदक जिंकलं. सर्व सामान्य लोकांना ह्याचं कुतूहल नसलं तरी हा पराक्रम म्हणजे ह्या खेळातील एवरेस्ट सर करण्याइतपत उत्तुंग आहे. मेरी कोम ने ह्या स्पर्धेत सगळ्यात जास्त पदकांची कमाई करणाऱ्या क्युबा च्या फेलिक्स सेवॉन च्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. फेलिक्स ने ह्या स्पर्धेत १९८६ ते १९८९ ह्या काळात ६ सुवर्ण पदकांची कमाई केली होती. मेरी कोम ने आज ६ सुवर्ण पदक जिंकल्यानन्तर ती जगातील सगळ्यात जास्त सुवर्ण पदक जिंकणारी स्त्री बॉक्सर ठरली आहे. त्याच वेळी स्त्री – पुरुष अश्या दोन्ही विभागात तिने फेलिक्स सेवॉन शी बरोबरी केली आहे.

२००२, २००५, २००६, २००८, २०१० आता २०१८ साली ह्या स्पर्धेत तिने सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. तर २००१ मध्ये ती रौप्य पदकाची मानकरी ठरली होती. २०१८ च्या कॉमनवेल्थ खेळात ही तिने सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. २०१२ च्या लंडन ऑलम्पिक मध्ये तिने कांस्य पदकाची कमाई केली आहे. तर २०१४ च्या एशियन गेम्स मध्ये ती सुवर्ण पदकाची मानकरी ठरलेली आहे. देश आणि विदेशात वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बॉक्सिंग सारख्या खेळात भारताचा तिरंगा आपल्या खेळाने अगदी अभिमानाने उंचावर फडकवत ठेवणारी मेरी कोम भारतरत्न म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.

मेरी कोम चा हा प्रवास इतका साधा सरळ नक्कीच नाही. २००७ साली जुळ्या मुलांना जन्म दिल्यावर अवघ्या एका वर्षात वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाला आपलसं करताना तिच्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मेहनत घेऊन अशक्य ते शक्य करून दाखवण्याचा प्रवास अनेकांना स्फूर्ती देणारा आहे. २०१३ ला आपल्या तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यावर पण मेरी कोम ने बॉक्सिंग सोडलं नाही. आपलं वजन ४८ किलोग्राम च्या गटात योग्य राहवं म्हणून तिने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे आज सुवर्ण पदक जिंकल्यावर मेरी कोम भावनाविश झाली. ही लढत ५-० अशी पूर्णतः एकतर्फी झाली. ह्यावरून मेरी कोम चा झंझावात युक्रेन च्या हाना ओखाटा ला किती भारी पडला असेल ह्याची कल्पना करू शकतो.

आज स्पर्धा जिंकल्यावर मेरी कोम चे शब्द होते, “तुमच्या प्रेमासाठी आणि मदतीसाठी मी तुम्हा सर्वांची आभारी आहे. माझ्याकडे आज तुम्हाला देण्यासाठी देशासाठी जिंकलेल्या सुवर्ण पदकाशिवाय दुसरं काही नाही. मी २०२० च्या टोकियो ऑलम्पिक मध्ये देशासाठी सुवर्ण पदक जिंकण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेन”.

ज्या देशात स्त्रिया अनेक वर्ष चूल- मुल ह्या मध्ये दबलेल्या होत्या त्यांना आज स्वातंत्र्य मिळाल्यावर त्या काय करून दाखवून शकतात ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मेरी कोम. मेरी कोम ने देशासाठी बॉक्सिंग सारख्या खेळात स्त्री असून दिलेल्या योगदानासाठी भारत सरकारने २००३ मध्ये अर्जुन पुरस्कार, २००६ मध्ये पद्मश्री, २००९ राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, २०१३ मध्ये पद्मविभुषण पुरस्काराने सन्मानित केलं आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी सुद्धा ३ मुलांची आई आपल्या कर्तुत्वाने एक दोन नाही तर सहा सुवर्ण पदकांची मानकरी एका आंतराष्ट्रीय स्पर्धेत ठरते ही गोष्ट एक भारतीय म्हणून अतिशय आनंदाची आणि अभिमानाची आहे.

मेरी कोम कोण? म्हणून प्रियांका चोप्रा चा हवाला देण्याची चूक अनेक भारतीय आणि भारताचा मिडिया आजही करेल कारण आपल्या देशात क्रिकेट आणि चित्रपट ह्या पलीकडे हिरो अस्तित्वात असतात ह्याची जाणीव समाजातील खूप कमी लोकांना आहे. आज मेरी कोम ने सर केलेलं एवरेस्ट शिखर हे सगळ्याच भारतीय स्त्री वर्गाला स्फूर्ती देणार आहे. स्त्री कशात ही कमी नसते. स्त्री आणि पुरुष समानता देवळात प्रवेश करून मिळत नसते तर ती आपल्या कर्तुत्वाने मिळवायची असते. आज जगातील सगळ्यात जास्त सुवर्ण पदक जिंकण्याची मानकरी झालेल्या मेरी कोमचं खूप खूप अभिनंदन आणि तिच्या कर्तुत्वाला आणि तिच्यामधल्या दुर्गाशाक्तीला माझा नमस्कार.

वाचण्यासारखे आणखी काही….

वैचारिक
प्रेरणादायी
प्रासंगिक


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!