तूच आहेस तुझ्या गुंतवणुकीचा शिल्पकार!

Investment Wisdom

आपले दीर्घकालीन धेय्य लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी लवकर गुंतवणुक केली जावी.  हे करीत असतांना चलनवाढीवर मात करणारा परतावा मिळावा म्हणून जोखिम स्वीकारायची गरज असते. आपण जीवनात अनेक गोष्टीकडे अगदी बारीक सारीक गोष्टींकडे काटेकोर लक्ष देतो. मात्र ज्यावर आपले ध्येय अवलंबून आहे त्याकडे अधिक डोळसपणे पहायला हवे ते विसरतो. असे का होत असावे याकडे आपण अधिक सजग होवून पहाणार आहोत का?

याची अनेक कारणे आहेत. आपण केलेल्या गुंतवणुकीचा आढावा घेतला तर बहुतेकांच्या आयुष्यातील पहिली गुंतवणूक ही त्यांनी कशी केली होती ते आठवून पहा. ती अभ्यास करून केली होती का? की कुणाच्या सांगण्यावरुन? बँकेत काम करणाऱ्या आणि जुजबी ओळख असणाऱ्या व्यक्तीने सांगितले म्हणून किंवा आपला मित्र, नातेवाईक यांनी सूचवल्यावरून? त्यापूर्वी आपण त्यांनी सुचवलेली योजना त्यातील फायदे तोटे, यातील जोखिम याची जाणीव करून घेतली होती का? किंवा त्यांनी तशी जाणीव करून दिली होती का? आपल्याला योग्य अशी योजना त्यांनी आपल्यासाठी सुचवली होती का? यातील बहुतेकांचे उत्तर नाही असे आहे. मराठी माणसावर गुंतवणुकीचे संस्कारच झाले नाहित. त्याचप्रमाणे संपत्ती हवी आहे आणि ती मिळवायची आहे हे आपण उघडपणे मान्य करीत नाही. आपली मनातून इच्छा आहे पण ती पूर्ण करण्याचे मार्ग कोणते आहेत त्यात काय धोके माहीत करून घेत नाही. क्षणिक मोहाला भूलून अवास्तव दावे करणाऱ्या योजनांमध्ये मती भ्रष्ट झाल्याप्रमाने  गुंतवणूक करतो. वास्तवात फारच थोड्या लोकांना आपोआप श्रीमंती मिळते इतरांना त्यासाठी कष्ट करावे लागतात. आपण मात्र  पिढ्यानपिढ्या मनाची श्रीमंती हवी अशी वायफळ बडबड करीत आहोत. खरच मनाची श्रीमंती म्हणजे काय हे तरी आपल्याला नक्की कळले आहे का? दुसऱ्याच्या प्रगतिने आपल्याला खरच आनंद होतो का? आपण आपले मित्र नातेवाईक यांना मोठ्या मनाने क्षमा करतो का? सर्वाना सन्मानाची वागणूक देतो का? जर आपण खरंच मनाने श्रीमंत असतो तर हे प्रश्नच गैरलागू झाले असते.

खर तर गरीबी आणि श्रीमंती हे आपण निर्माण केलेले घटक असून आपली वर्तणुक ही आपण गरीबीकडून श्रीमंतीकडे जाणार की श्रीमंतीकडून गरीबीकडे जाणार हे ठरवत असते. यासाठी उपलब्ध विविध साधनांची माहिती करून घेवून जर आपण दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू शकलो तरच खऱ्या अर्थाने श्रीमंत होवू शकू. गरजा मर्यादित ठेवून, खर्चाचे नियोजन करून, जाणीवपूर्वक धोका पत्करून, प्रसंगी कर्ज काढून त्यातून मालमत्तेची निर्मिती करण्याची प्रेरणा आपल्याला मिळायला हवी. आपण कष्टाने मिळवलेल्या पैशाच्या  गुंतवणुकीचा निर्णय सरसकट दुसऱ्यावर टाकून निर्धास्त राहू शकत नाही. तेव्हा आपले गुंतवणुक निर्णय घेण्याएवढे तरी आपण अर्थसाक्षर होवू या आणि खऱ्या अर्थाने मनाने आणि संपत्तीने श्रीमंत होवूयात.

अवास्तव दावे करणाऱ्या योजनांपासून चार हात लांब रहा, लक्षात ठेवा या जगात फुकट काही मिळत नाही. फसव्या कंपन्या, असामान्य दावे करणाऱ्या व्यक्ति आणि स्वार्थी मित्र यापासून दूर कसे रहायचे याचे आत्मभान आपल्याला मिळत रहावे हीच सदिच्छा!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.