कल, आज और कल… तीन पिढ्यांची गोष्ट….

गेल्या आठवड्यात एका घटनेबद्दल वाचायला मिळालं. घटना तशी सामान्य पण सगळ्यांच्या घरात थोड्याफार प्रमाणात घडणारी होती. भारताच्या एकत्र कुटुंब पद्धतीत आता बदल होत असले तरी अजूनही अनेक घरात तीन पिढ्या वास्तव्य करून आहेत. न्युक्लीअर कुटुंब ही काळाची गरज अथवा आपली गरज आणि आपली अट बनली आहे. पण ह्यात असणारे अनेक तोटे आणि निर्माण होणारे प्रश्न हे फायद्यांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे आजही एकत्र कुटुंबात तीन पिढ्या नांदत आहेत.

पण ह्या सगळ्यामध्ये तीन पिढ्यांच्या विचारात झालेल्या बदलांचा परिणाम हा नकळत घरातील लहान मुलांवर अथवा तिसऱ्या पिढीवर खूप दूरगामी परिणाम करत असतो. ते कधी कधी असे रूप धारण करते की नक्की कोण चुकीचं आणि कोण बरोबर ह्या पेक्षा आपल्या हातातून काहीतरी निसटत जाते आहे ह्याची खंत आपल्याला वाटत रहाते.

गेल्या आठवड्या मधील घटनेत असचं घडलं. तीन पिढ्यांचं प्रतिनिधित्व करणार सामान्य मध्यम वर्गीय कुटुंब. एक लहान मुलगा त्याचे आई- वडील आणि सोबतीला आजी – आजोबा. दिवस आनंदात जात होते आणि वरवर सगळच छान दिसत होतं पण आत कुठेतरी गोष्टी खदखदत होत्या. शेवटी व्हायचं तेच झालं आजी- आजोबा गावी गेले. इकडे धुसमुसणाऱ्या गोष्टी दुसऱ्या पिढीत पण शांत झाल्या पण ह्या सगळ्या गडबडीत कुठेतरी तिसऱ्या पिढीचा आधार निसटला.

अचानक त्या मुलाचं अभ्यासातील लक्ष कमी झालं. मुलगा एकदम शांत झाला. झोपेत अडथळे येऊ लागले. नक्की काय चुकलं ह्याचं निदान करण्यासाठी समोपचार तज्ञांची मदत घ्यावी लागली. आजी – आजोबांच्या घरातून निघून जाण्याने निर्माण झालेली पोकळी कुठेतरी मुलाला अस्वस्थ करत होती. त्याचं पर्यावसन हे वरील गोष्टीतून दिसून येतं होतं. ह्यात चूक कोणाची?

वरकरणी बघता आपल्यापेकी अनेकजण हे दुसऱ्या पिढीतील म्हणजे आई- वडिलांना दोष देऊन मोकळे होतील. कारण आजी- आजोबांचा लळा आणि प्रेम हे नातवंडाना हवं असते. ते शिस्त लावतात, संस्कार लावतात आणि खूप प्रेमही करतात. पण ही झाली एक बाजू ह्याला दुसरी बाजूही तितकीच असते. अनेकदा हे प्रेम / अतिलाड हे मुलांना बेफिकीर आणि उर्मट बनवतात. आई- वडिल रागावले की पाठीशी घालणारे आजी- आजोबा हे मुलांची ढाल बनत जातात. ह्या शिवाय अनेकदा मागच्या पिढीतील लोक नको तितकं लक्ष अनेक गोष्टीत घालतात. प्रत्येक पिढीमध्ये २० वर्षाचं अंतर मानलं तर जवळपास ४० वर्षाच्या काळात जग वेगाने बदलेलं आहे. त्यामुळे वैचारिक पातळीत झालेले बदल आयुष्याच्या उत्तरार्धात स्विकारण सगळ्यांना जमते असं नाही.

दुसऱ्या पिढीतील म्हणजे आता आई- वडील ह्या भूमिकेत असलेल्या पिढीची ह्या सगळ्या गोंधळात दोन्हीकडून ओढाताण होते. एकीकडे आपल्यावर पूर्वापार असलेले संस्कार आणि विचार आणि त्या सोबत आपल्याला घडवणारे पालक तर दुसरीकडे आधुनिकतेची झालेली ओळख आणि त्यात झपाट्याने होणारे बदल. मग ते कार्यक्षेत्र असो वा मुलाचं संगोपन.

गोष्टी ज्या वेगात बदलत आहेत त्याला सामोरे जाताना प्रचंड दमछाक होते आहे. आई- वडिलांच प्रेम सांभाळून त्यांना न दुखावता त्यांना उतारवयात सांभाळण्याची जबाबदारी पेलताना आपल्या पाल्याकडे होणारं दुर्लक्ष ही मन खात असते. शिक्षण, मैत्री, आई- वडील ह्यांची भूमिका झपाट्याने बदलत असताना त्या दोन्ही पिढ्यांचा दुवा बनणं नक्कीच सोप्प नाही. मोठ्यांना उलट बोलता येत नाही तर लहानांना मारून शाहण करता येत नाही. ह्या सगळ्या प्रकारात सगळ्यांना सांभाळून आणि बांधून ठेवणं नक्कीच सोप्प नाही.

तिसरी पिढी जशी सुदैवी तशीच काही सुख हरवलेली. आज पायाशी सगळं मिळत असताना माणसांपासून तुटलेली. आज तिला सगळ्यात जास्ती गरज आहे ती माणसांची. संवाद हरवलेला असताना आभासी जगात हरवलेल्या पिढीचा आज आय.क्यू. खूप चांगला असला तरी ई.क्यू. मात्र कमी झाला आहे. त्यामुळेच संवादाची भूक मग त्यांना नकळत आपल्या आजी आजोबांकडे आकर्षित करत असते.

निरागस मन गोष्टी जितक्या लवकर विसरतात तितक्याच त्या गोष्टींचे दूरगामी परिणाम त्यांच्या मनावर होतं असतात. त्यामुळे अश्या एखाद्या संवाद असणाऱ्या व्यक्तीचं जाणं कधी कधी खूप काही परिणाम त्या मनावर करू शकतात. तिसऱ्या पिढीत आधीच संवादाची कमी आहे. त्यात असं काही म्हणजे मुळापासून घाव.

मुळात कोणाचं चुकलं ह्या पेक्षा आपल्या बदललेल्या भूमिकांना ह्या तिन्ही पिढ्या किती समजून घेतात ह्यावर खूप काही अवलंबून आहे. आजी – आजोबा म्हणून आपलं कितीही प्रेम आपल्या नातवंडावर असलं तरी त्या प्रेमात आपण आंधळ तर नाही ना? ह्याचा विचार नक्कीच करायला हवा. आयुष्यात सगळं उपभोगुन उतारवयात घरच्या आणि संसाराच्या किल्ल्या पुढल्या पिढीकडे देण्यात आणि त्या नवीन विचारांचं स्वागत करण्यात कसला आला आहे कमीपणा?

आपण नकळत कोणाच्या संसारात लुडबुड आणि आडकाठी तर आणत नाही न हा विचार करण्याची प्रगल्भता ह्या वयात नक्कीच यायला हवी. आई – वडील म्हणून दुसऱ्या पिढीचं नेतृत्व करताना आपण काम भागलं म्हणून आई वडिलांना अडगळीत टाकून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का तर पोहचवत नाही ना हा विचार आपण करायला हवा. उतारवयात येणारं एकाकीपण आणि विचारांची घट्ट असलेली वीण ह्या वयात बदलणार नाही म्हणून आपण ती समजून घेण्याची प्रगल्भता शिकलो आहोत का? ह्याचा विचार ही दुसऱ्या पिढीत असणाऱ्या लोकांनी करायला हवा.

आत्ता येणारी पिढी जशी उपजत हुशार निपजते आहे तशीच ती अजून जास्ती एकटी होते आहे. अश्या वेळेस आधार म्हणून, संवाद म्हणून ज्याच्याकडे आशेने ती बघेल असं पालकत्व निर्माण करण्यात आपण कुठवर आहोत ह्याचा अंदाज ही आपल्याला हवा. ओल्या भांड्यांना आता आकार देण्याची क्रिया आपसूक होत असली तरी त्यांना हवा तो साचा निवडण्यासाठी लागणारी सगळी मदत आपण करतो आहोत का? ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार ही करायला हवा.

पहिल्या आणि तिसऱ्या पिढीतील दुवा म्हणून दुसऱ्या पिढीकडे जबाबदारी जास्ती आहे. ह्या सगळ्या धूसर मार्गावरून वाटचाल करणं नक्कीच सोप्प नाही. पण ह्या दोन्ही पिढीतील लोकांना जर योग्य रित्या हाताळलं आणि त्यांच्यात योग्य तो समन्वय साधला तर तीन पिढ्यांची गोष्टीचा शेवट नेहमीच आनंदाचा होईल ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय