मार्ग तिचा वेगळा

मार्ग तिचा वेगळा

रविवारची सकाळ म्हणून ती नेहमीप्रमाणे उशीराच उठली. उठल्याउठल्या तिला जाणवले आज नेहमीसारखे वातावरण नाही. घरात एक प्रकारची तणावपूर्ण शांतता जाणवत होती. तिने लक्ष न देता नेहमीची तयारी करायला सुरुवात केली.

“आज दुपारी कुठे जाऊ नकोस थोडे बोलायचे आहे तुझ्याशी…” आईने रुक्षपणे सांगितले. “हु…. करत ती बाथरूममध्ये शिरली. तरीही काय घडले असेल याचा विचार मनातून जाईना. त्याच तंद्रीत तिने आवरले आणि समोर आलेला नाश्ता करून पुस्तक घेऊन गॅलरीत बसली.

थोड्यावेळाने आईची हाक ऐकू आली. हॉलमध्ये येताच समोर लहान बहीण आणि तिचे मिस्टर बसलेले दिसले. त्याची नजर शरीरावरुन फिरलेली तिला जाणवली. काही न बोलता समोर येऊन बसली. जणू ती आरोपी आणि समोर चार न्यायाधीश बसले होते. आई… कधीहि काही न बोलणारे बाबा…. लायकी नसताना लुडबुड करणारी बहीण आणि वासनेनी भरलेली नजर असणारा तिचा नवरा.

“हे काय आहे ….”?? हातातील कंडोमचे पाकीट उंचावत आईने खड्या आवाजात विचारले.

“च्यायला…. ही भानगड होय ….!! मनातल्या मनात ती चरफडली. नेहमी तर आपण उरलेले कंडोम फेकून देतो यावेळी कसे विसरलो…??? तिला कालची संध्याकाळ आठवली. दरवेळेप्रमाणे कालही तो भेटला होता. तिच्या मैत्रिणीच्या रूमवर ते महिन्यातून दोनदा भेटत होते. काल त्यांच्याबरोबरचा कार्यक्रम आटपून ती रात्री घरी आली आणि तशीच झोपून गेली. पर्समधून ती वस्तू काढायचे तिच्या ध्यानात आले नाही. आता तिच्या सर्व लक्षात आले. कधीना कधी हा प्रसंग येणार याची तिला कल्पना होती आणि त्यासाठी तिने मनाची तयारी ही केली होती. तरीही अचानक हल्ल्याने ती गोंधळली.

“कोण आहे तो ….?? किती दिवस चालू आहेत तुझे हे धंदे…??” आईचा आवाज चढला. बहीण ही कुत्सित नजरेने पाहू लागली. तर तिच्या नवऱ्याच्या नजरेत लबाडी आली. बाप नेहमीप्रमाने शांत निष्क्रिय.

“मित्र आहे….. गेली 4 वर्षे माझ्याबरोबर आहे..” ती शांतपणे म्हणाली.

“लग्न करणार आहेस का…. ???” आईचा प्रश्न.

“नाही …..” तिचे उत्तर. पण त्याचबरोबर आईचा सुटकेचा निःश्वास ऐकू आला. बहिणीची चमकलेली नजर दिसली तर तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर लबाडीचे हसू.

“त्याचे लग्न झालेय…. दोन मुले आहेत त्याला…. “तिने पुढे सांगितले”

“काय ….??” आई ओरडली.

“शी …!! ताई… तुला काहीच कसे वाटत नाही….” बहिणीचा रागाने प्रश्न.

“शोभते का तुला या वयात असे वागणे…?? लोक काय म्हणतील…?? आपल्या घराण्याच्या इज्जतीचे काही वाटत कसे नाही तुला..?? नशीब बहिणीचे लग्न झालेय.” आईचा पारा चढला.

“काय चुकीचे वागते मी..??? माझे वय किती हे सांगू शकाल का तुम्ही ….?? माझे लग्न करायला हवे याची आठवण तरी आहे का तुम्हाला…??” तिचा आवाज चढला.

“नाही जमत तुझे लग्न आणि तुला आपली परिस्थिती माहीतच आहे. हे असून नसल्यासारखे… एक काम धड केले नाही. तरीही मी कसे तरी तुम्हा दोघीना शिकवले. तू हुशार म्हणून चांगली शिकलीस मग नोकरी ही चांगली ताबडतोब लागली बहिणीचे शिक्षण झाले की तुझे लग्न करू असा विचार केला पण ही त्यांच्या प्रेमात पडली शिक्षण अर्धवट सोडून तिचे लग्न करावे लागले. त्यात अजून उशीर झाला. मग वय वाढत गेले तसे लग्न जमेना. हीच परिस्थिती होती त्यात आमची काय चूक….??”

उभी राहून बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या बहिणीला हातानेच रोखत ती म्हणाली “कसली परिस्थिती …..?? बाप कमवत नाही तर त्याला पाठीशी घालून तू माझ्या पगारावर घर चालवतेस. बहिणीचे शिक्षण अर्धवट का राहिले…. ?? तर तिला चवथा महिना चालू झाला म्हणून ना….?? काय करतो तिचा नवरा….?? पंधरा दिवस तर इथेच पडलेले असतात.”

अगं आता चाळीशी पूर्ण झाली माझी. मलाही वाटते लग्न व्हावे, मूलं व्हावीत, नवऱ्याने प्रेमाने पाहावे. हळदी कुंकुला जावे. पण लग्न झाले तर हे पैश्याचे मीटर बंद होईल याची भीती आहे तुम्हाला. तुमची काळजी आहे म्हणून लग्न करीत नाही मी. म्हणून शरीरही तसेच जळत ठेवू का….????

“चार वर्षांपूर्वी तो माझ्या आयुष्यात आला. महिन्यातून दोन वेळा भेटतो आम्ही. त्याव्यतिरिक्त कोणताही संबंध नाही माझा त्याच्याशी. एकमेकांत गुंतयाचे नाही हे ठरलेले आहे आमचे. हे चालूच राहणार आहे..” तिच्या या आवेशाने सगळे थंड पडले.

“आणि हे आम्हाला मान्य नसेल तर… ???” आईने निर्वाणीचा प्रश्न केला.

“तर आता… याक्षणी मी हे घर सोडून जायला तयार आहे. तुमची ही दुसरी मुलगी आणि लाडका जावई काळजी घेतलीच तुमची…..” तिने छद्मीपणे सांगितले. ते ऐकून सर्वच शांत झाले.

“ठीक आहे… जे आहे तसेच चालू दे… तुझ्याबाबतीत थोडा अन्यायच झालाय हे कळते आम्हाला..” आईने शरणागती पत्करली.

“हो… पण आज तुम्ही हे प्रश्न विचारून आपले संबंध क्लिअर केले आहेत. तेव्हा यापुढे तू माझ्या पर्समध्ये हात घालून पैसे काढायचे बंद कर. आणि छोटीचे उठसूट घरी येणे बंद कर. आज आलेत तसे जेवून जातील ते…” असे बोलून उठली आणि गॅलरीत जाऊन पुस्तक वाचत बसली.

वाचकांच्या लेखांबद्दल प्रतिक्रिया

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!